Monday, 4 April 2016

थोडाथोडका काळ नव्हे, 
तर..तब्बल तीस वर्षांनी, काल आम्ही एकत्र आलो होतो..!

१९८७ साली, दहावीची परीक्षा दिल्यानंतर, सगळे मित्र जिकडे तिकडे झाले होते. हाताच्या ओंजळीत असणारी मोत्यांची रास, हवेत उधळून द्यावी. त्याप्रमाणे, सगळे मित्र इतस्तः विखरून गेले होते. अगदी, बोटावर मोजण्या इतपत मित्रच एकमेकांच्या संपर्कात होते. 
कोणी कॉलेज करत होतं, तर कोणी गावी निघून गेलं होतं. तर कोणी माझ्यासारखे " रिपिटर " मित्र, पंढरपूरच्या वाऱ्या करत होते.

कालांतराने.. प्रत्येकाचं शिक्षण पूर्ण झालं, तर कोणी ते अर्ध्यावर सोडलं. त्यानंतर, पोटाची खळगी भरण्यासाठी नोकऱ्या कराव्या लागल्या, जो तो मित्र आपापल्यापरीने संसाररूपी चक्रामध्ये पुरता अडकून गेला होता. नाही म्हणता, वयाप्रमाणे सगळ्यांची मुलं आता हाताला आली आहेत. काही नाही तर, बऱ्यापैकी जाणती तरी झाली आहेत.
संसारातून थोडसं बाहेर डोकावू असं वाटत असताना. प्रत्येकाला, आपल्या बालपणीच्या शालेय मित्रांची आठवण होत होती. पण, ते सगळं जुळवून कसं आणायचं..? हा फार मोठा प्रश्न, प्रत्येकाच्या मनामध्ये दडला होता. परंतु ते शिवधनुष्य, आमच्यापैकी दोन मित्रांनी अगदी लीलया पेललं. त्या दोन मित्रांनी, उराशी जिद्द बाळगून हा सगळा मित्रपरिवार एकत्र आणण्याचं कसब पणाला लावलं. आणि, शेवटी तो दिवस उजाडला..

" कोण, कुठला, काय आणि कसा.. कोणाची कोणाला खबरबात नाही. पण एका घट्ट साखळीने आम्ही सगळे जखडलो गेलो होतो. ते प्रेम होतं, तो जिव्हाळा होता. कोणत्याही नात्यात गुंफता न येणा

रा तो प्रेमाचा उमाळा होता..! "

छोटेसे बहिण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. ह्या गीतांच्या ओळीप्रमाणे, आमच्या पैकी बरेच मित्र आज फारच उच्च पदाला पोहोचले आहेत. कोणी प्रोफेसर आहे, तर कोणी मेनेजर आहे तर काही माझ्यासारखे सरकारी कर्मचारी आहेत. तर काही मित्रांचे स्वतःचे व्यवसाय आहेत.
लहानपणी हाफ चड्डीवर फिरणारे आम्ही मित्र. कैकवेळा.. आमच्या त्या हाफ चड्डीला सुद्धा, पाठीमागून दोन मोठमोठी ठीगळं असायची. लाज नाही, कि कोणाची भीडभाड नाही. पण आज तीच मुलं, लहानाची मोठी होत असताना. सुटाबुटात आणि उंची कार घेऊन एकमेकांच्या भेटीला आलेले पाहून. माझा उर तर अगदी आनंदाने भरून आला होता.

तीस वर्षात जग फार बदलून गेलं होतं. आमच्यापैकी कैक मित्र, अकालीच काळाच्या पडद्याआड निघून गेले होते. ती पोकळी मात्र प्रकर्षाने जाणवत होती.
एकमेकांच्या ओळखी करून घेत असताना. काही मित्रांना एकमेकांना ओळखायला फारच कष्ट पडत होते. कारण, कोणी जाड झाला होता. तर कोणी माझ्यासारखा टक्कल ग्रस्थ झाला होता. तर कोणी जाड असणारा अगदी लुकडा होऊन बसला होता.

आमच्यापैकी बरेच मित्र आज उच्चपदस्थ जरी असले. तरी त्याचा, कोणालाही गर्व असा झालेला आढळला नाही. हि फार मोठी जमेची बाजू होती. पुन्हा एकदा नव्याने ओळखी पाळखी झाल्यानंतर, जुन्या आठवणीत रममाण होत. एकमेकांची साथ कधीही न सोडण्याचा संकल्प करत. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. थोड्याच दिवसात, फक्त एकमेकांची नाळ घट्ट जोडली जावी ह्या उद्देशाने. सर्व मित्रांनी मिळून एका समुद्र सफरीचं नियोजन केल आहे.

पुन्हा तेच जुने दिवस अनुभवायला मिळणार. पुन्हा आम्ही तीस वर्षांनी लहान होणार. हरवलेलं बालपण पुन्हा एकदा अनुभवणार. एकमेकांशी पुन्हा तीच दंगामस्ती घालणार. आणि, खूप सारी मज्जा करणार..

पुन्हा एकदा, आम्ही लहान होणार...!

No comments:

Post a Comment