Sunday, 10 April 2016

कारवार भटकंती, ( भाग :- चार )
====================
वरील चित्रात दिसत असणारं हे ठिकाण म्हणजे. कोकणी किंवा कारवारी व्यक्तीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. हा काही एक साधारण ओटा नाहीये. तर हा एक प्रकारचा मल्टीपर्पज असा कट्टा आहे. ह्या ओठ्या



वर धुणीभांडी तर केली जातातच, पण त्याचबरोबर..
कोकणी किंवा कारवारी माणूस..

हा मत्स्य आहाराचा भलताच शौकीन माणूस आहे. यांच्यासाठी बाजारात मिळत असणारे महागडे मासे काहीच कामाचे किंवा आवडीचे नसतात. यांना हवी असते, त्या-त्या भागातल्या समुद्रात किंवा खाडीमध्ये मिळत असणारी स्थानिक मासळी.
हा कोकणी व्यक्ती किंवा महिला, सकाळीच मच्छी बाजारात मासळी खरेदी करिता जात असतात. किंवा, बंदर लांब असेल तर. आपल्या वाडीमध्ये टोपलीत मासे घेऊन विक्रीसाठी येणाऱ्या कोळणीची तरी ते आतुरतेने वाट पाहत असतात.
बाजारात हवी तेवढी आणि आवडीची मच्छी जरी मिळत असली. तरी, वाडी वस्तीवर येणाऱ्या कोळणीकडे मोजकीच मच्छी असते. त्यामुळे, त्याठिकाणी मासे खरेदी करण्या करिता अगदी झुंबड उडालेली पाहायला मिळते. शिवाय, भाव ताव करून आपल्या पसंतीची मच्छी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला. घोडा मैदाम मारल्याचा आनंद मिळत असतो.
त्यानंतर, ते मासे घरी नेवून. घराबाहेर असणाऱ्या या खडबडीत ओठ्यावर मस्त पैकी मासे चोळून त्याचे खवल काढले जातात. आणि, त्यांना स्वच्छ सुद्धा केलं जातं. पूर्वीच्या काळात, मासे स्वच्छ करण्याकरिता प्रत्येक घराबाहेर एक विशिष्ट असा मोठा आणि चपटा दगड ठेवलेला आढळायचा.
नाही म्हणता, काही ठिकाणी अजून सुद्धा ते दगड पाहायला मिळतात. पण नव्याने बांधलेल्या घरांमध्ये हे अशा प्रकारचे ओठे बांधलेले पाहायला मिळतात. तेच हो.. दुधाची तहान ताकावर. पण कोकणात किंवा कारवारात प्रत्येक घराबाहेर तुम्हाला हे ठिकाण नक्की आढळणारच बरं का.
यावर्षी सुद्धा, माझ्या मित्राच्या घरी अगदी स्पेशल कारवारी पाहुणचार झोडपला. सकाळी न्याहारीला घावनं, चटणी आणि दुपारच्या जेवणात माश्याची खुमासदार आमटी आणि भात. आणि त्यासोबत, तळलेल्या माशाचा तुकडा. हे सगळं जेवण फक्त आणि फक्त हिरव्यागार केळाच्या पानावर वाढलेलं होतं. स्वर्ग म्हणजे, दुसरं काय असतं हो..
क्रमशः 

No comments:

Post a Comment