Thursday, 28 April 2016

माझ्या ऑफिसच्या बाजूला, 
एक नवीन इमारत बांधण्याचं काम चालू आहे. विटांचा सांगाडा तयार झालाय. आता, प्लास्टरचं काम चालू आहे. त्या साईटवर कामाला असणारा, एक साठीतला मनुष्य..
रोज सकाळी.. त्या विटांच्या बांधकामावर पाणी मारण्याचं काम करत असतो. हिवाळ्यात मला त्याची खूप कीव यायची. आता उन्हाळा आहे, म्हणून काही वाटत नाही.
काही माणसाचं नशीबच खोटं असतं. त्यांना, मरेस्तोवर राबायचा शापच मिळालेला असतो.

तर.. आज तो व्यक्ती बांधकामाला पाणी मारत असताना. चुकून, त्या पाण्याचा फवारा शेजारील इमारतीच्या एका गेलरीत पडला. तिथे, अगदी त्यांच्याच वयाचे एक वृद्ध गृहस्थ राहायला होते. आणि, त्यावेळी नेमके ते सुद्धा गेलरीत उभे होते. 
त्यांच्या गेलरीत पाणी पडल्या बरोबर. व्हस्सकन, ते त्या म्हाताऱ्यावर खेकसले.

"काय रे म्हाताऱ्या, अक्कल नाहीये का तुला..! नीट पाणी मारता येत नाही का तुला..?
त्यावर शांतपणे, तो वृद्ध गृहस्थ त्यांना म्हणाला..!
"अरे म्हाताऱ्या.. मी मुद्दाम पाणी नाही टाकलं रे, चुकून पडलं बघ..!
त्या व्यक्तीचं, एकेरीतलं प्रतिउत्तर ऐकून, हा धनाड्य म्हातारा भलताच चिडला, आणि त्याला म्हणाला..!
"म्हातारा कोणाला म्हणतोस रे..? तुझी लायकी आहे का मला म्हातारा म्हणण्याची..?
त्यावर..तो गृहस्थ म्हणाला..
"अरे म्हाताऱ्या.. मला म्हातारा म्हणण्याचा अधिकार तुला कोणी दिला..? 
तू, उंची इमारतीत राहतोस, म्हणून मला काहीही बोलशील का..?  तू काय, मला खायाला घालतोस का..?

हे सगळं, मी तिथे उभं राहून पाहत होतो. त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा अनावर झालेला राग मला पाहवत नव्हता. 

" मी लाचार आहे, पण कोणाचा मिंदा नाही..! "
त्याला.. फक्त हेच सांगायचं होतं. आणि, ते मला समजलं होतं..!

शेवटी, मी सुद्धा त्या भांडणात सहभाग घेतला. आणि, त्या शेजारच्या इमारती मधील काकांना म्हणालो. 
काका.. पावसाळ्यात, पावसाचं पाणी तुमच्या गेलरीत येतं, तेंव्हा तुम्ही कोणावर राग काढता हो..?
माझ्या ह्या एका वाक्यासरशी, काका निशब्द झाले. आणि गुपचूप घरात निघून गेले. 

म्हातारपण फार वाईट असतं. " गरीबाचं सुद्धा आणि श्रीमंताचं सुद्धा. " 
एकाला, सांभाळायला कोणी नाहीये. म्हणून, नाईलाजाने तो हे काम करत आहे. आणि, दुसऱ्याला सोबतीने बोलायला कोणी नाहीये. म्हणून, तो बोलण्यासाठीचा बहाणा शोधत आहे..! 

" वाह रे प्रभू तेरी अजब लीला..! "

कामगार बाबांची बाजू घेऊन बोलल्याने, ते माझ्यावर खूप प्रसन्न झाले होते. इतक्या म्हाताऱ्या वयात सुद्धा, ते.. माझे उपकार मानायला विसरले नाहीत. गरीबाचा सुद्धा कोणीतरी वाली असतो. हे अनुभवल्याने त्यांचा आनंद गगनात मानत नव्हता.

आणि.. आनंदाच्या भरात, भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत. त्यांनी, कृतज्ञता पूर्वक मला हात जोडले. हात जोडताना, त्यांच्या हे सुद्धा ध्यानात आलं नाही. 
कि.. आपल्या हातातील पाण्याचा पाईप तसाच चालू आहे. आणि, सकाळच्या पारी.. नकळतच, त्यांना सुद्धा आपादमस्तक गंगास्नान मिळालं.

आणि.. हर्ष उल्ल्हासाने, माझी " नयनगंगा " सुद्धा.. आपसूकच, वाहती झाली..!


No comments:

Post a Comment