Friday, 22 April 2016

समस्त स्त्री वर्गाला, कोणत्याही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जावा..! 

या मताशी, मी अगदी ठाम आहे. पुरुषांना जशी देवाची, देवीची सेवा पूजाअर्चा करावीशी वाटते. तशी, स्त्रियांना सुद्धा ती वाटत असेलच कि. किंबहुना, पुरुषांपेक्षा महिलाच जास्ती धार्मिक असतात. बरेच धार्मिक विधी त्या स्वहस्ते पार पाडत असतात. हे सुद्धा माझ्या बरेचदा पाहण्यात आलं आहे. आणि, प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरी ते पहातच असेल. घरातील पूजापाठ, ह्या महिला मंडळीच करत असतात. पुरुष फक्त एक अगरबत्ती ओवाळून मोकळे होतात.
 
राहिला विषय विटाळाचा.. 
शरीराच्या ज्या भागातून, खुद्द पुरुष सुद्धा जन्म घेतो. ती जागा, अपवित्र असेलच कशी..? हिंदू संस्कृती मध्ये, योनीपूजा आणि लिंगपूजा, हा फार मोठा श्रद्धेचा भाग आहे. त्याला अपवित्र म्हणणं म्हणजे, फारच मूर्खपणाचं ठरेल..

काही वर्षांपूर्वी, हौसेखातर मी माझ्या काही मित्रांना सहकुटुंब तिरुपती यात्रेला घेऊन गेलो होतो. एकूण.. वीस बावीस लोकं आम्ही त्या धार्मिक यात्रेत सहभागी झालो होतो.
ज्या दिवशी, आम्हाला बालाजीच्या दर्शनाला जायचं होतं. त्याच दिवशी सकाळी, माझ्या एका मित्राच्या पत्नीचा नेमका ऋतुकाळ सुरु झाला. 
आज दर्शन करून, आम्ही साधारण तिसर्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार होतो. तोपर्यंत, त्या वहिनींचा ऋतुकाळ काही संपणार नव्हता. आणि, त्या वहिनींना बालाजीच्या मूर्तीचं दर्शन काही घडणार नव्हतं. हे आता जवळजवळ पक्कं झालं होतं. आणि, नाईलाजाने त्यांनी सुद्धा त्याकरिता होकार दर्शविला होता. अशा बाबतीत, महिला खूप समंजस असतात हो..
त्यामुळे, मित्राने त्याच्या बायकोला दर्शनाला सोबत न्यायला टाळाटाळ केली. आणि, नेमकी हि गोष्ट माझ्या कानावर आली. 

त्या मित्राला, एकाबाजूला नेऊन मी विचारलं. का रे बाबा काय गडबड आहे..? तर त्याने वरील घडलेला प्रकार मला सांगितला. त्यावर मी त्याला विचारलं, हा प्रकार आणखी कोणाला माहित आहे का..? तर म्हणाला, नाही कोणालाच माहित नाहीये. हे सगळं अजून आमच्यातच आहे. आणि, आता तुला समजलंय. पण काय आहे, आमच्यामुळे इतर लोकांना शिवताशिवत नको. म्हणून, मीच हा निर्णय घेतला आहे. आणि, तिला सुद्धा हे सगळं मान्य आहे.

हि 'आतली' गोष्ट कोणाला माहित नव्हती म्हणून बरं झालं. आणि, खासकरून कोणत्याच महिलेला माहित नव्हतं. हि फार मोठी जमेची बाजु होती. कारण, एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची फार मोठी अशुभ चिंतक असते. आणि लगेच, तिचं पितळ सर्वांसमोर उघडं करून ती दाखवत असते. राग माणू नका, परंतु हि अगदी सत्य परिस्थिती आहे. 
शेवटी, त्या वाहिनी सुद्धा आमच्या चर्चेत सामील झाल्या. आणि, त्या मला म्हणाल्या. 

" नको हो भाओजी, आम्ही बायका ऋतुचक्र काळात एकमेकींना लगेच ओळखतो..! "

शेवटी, त्या वहिनींची मी कशीबशी समजूत घातली. आणि, त्यांना दर्शनाला येण्यासाठी तयार केलं.. मी त्या मित्राला म्हणालो.. अरे एवढं मोठं देवस्थान आहे. इथे कोण कसा आणि काय करून आला असेल ते आपल्याला माहित आहे का..? आणि, पुन्हा तुझं तरी इकडे कधी येणं होणार आहे का..?
तू काहीही काळजी करू नको. वहिनींना पुन्हा एकवेळा नाहून घ्यायला सांग. आणि, निसंकोचपणे त्यांना आपल्यासोबत घेऊन चल. फारफार तर..दर्शन झाल्यानंतर मंदिरा बाहेर आल्यावर ऋतुचक्र सुरु झाला. असं इतर मैत्रिणींना त्यांना सांगायला सांग. त्यामुळे, इतर महिला सुद्धा त्यांचा हेवा करतील. आणि, तुमचं हि मन मोकळं होईल..

" बघा ना किती भारी नशीब आहे तुमचं..! दर्शन झाल्यावर तुमचा ऋतुकाळ सुरु व्हावा. कमालच झाली कि नाही. शेवटी, त्याला सुद्धा काळजी असतेच हो..! "

नेमकं मी योजल्याप्रमाणे, आमचं दर्शन आटोपलं. त्या वहिनींनी सुद्धा, मंदिराबाहेर आल्यावर काही वेळानंतर इतर मैत्रिणींना तो प्रकार सांगितला. त्यावर, नेमकी त्यांची सुद्धा तीच प्रतिक्रिया होती..
दर्शन आटोपलं, सगळं फिरणं धरणं झालं, आणि कोणालाही त्या विटाळाचा कसलाच त्रास झाला नाही. आणि, त्या दांपत्याला तर नाहीच नाही..

देवाचं काही नसतं हो. हे सगळं काही मानवनिर्मित आहे. पण एक गोष्ट आहे बरं का.

" महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश द्या. पण, त्या खरोखर धार्मिक कारणाने आल्या असतील तरच. विनाकारण, पुरुषांना आणि समाजव्यवस्थेला शह देण्यासाठी हा खटाटोप चालू असेल. तर अशा, नास्तिक स्त्री-पुरुषांना मंदिरात अजन्म बंदीच असावी..! " 
 

No comments:

Post a Comment