Wednesday, 28 February 2018


माझ्या मोठ्या बंधूंच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती.
म्हणून, माझ्या पुतण्याने पुण्यात एक पार्टी अरेंज केली होती. एक छानसं हॉटेल, त्याने बुक केलं होतं. कार्यक्रमाला आमच्या घरातील तीस एक लोकं होती. म्हणजे, संपूर्ण पॉटर फॅमिली तिथे जमा झाली होती.
पुरुष मंडळींनी, आपआपली चूल एका वेगळ्या टेबलावर मांडली होती.
तिथे, त्यांचा "रंगीत" कार्यक्रम सुरु होणार होता. 
माझ्या, पिण्याचं प्रमाण खूप वाढलय. अशी सबब पुढे करून. ओल्या पार्टीत जाण्यासाठी माझ्या बायकोने मला मज्जाव केला होता.
पण काय आहे.. पार्टी आहे, आणि पॉटर पिणार नाही..!! हे समीकरण, काही जुळून येत नव्हतं. पण शेवटी माझा नाईलाज होता.
घरातील सर्व महिला मंडळाच्या टेबलावर मी एकटाच. " वेगळा-वेगळा "
टेबल वर.. खाण्याचे सगळे जिन्नस आले होते.
माझ्या वहिन्यांना. बहिणीला व माझ्या बायडीला मी विचारलं,
तुम्ही काही जूस वगैरे घेणार आहात का ?
पण त्या सगळ्या नाही म्हणत होत्या, माझ्या बायडीला सुद्धा मी तीन वेळा विचारलं..! ती सुद्धा नाहीच म्हणत होती.
हॉटेलिंगच्या बाबतीत आमच्या घरच्या स्त्रिया अगदी जेमतेम आहेत, हे मी जाणून होतो. त्यामुळे मी त्यांच्यासाठी चिकन सूप मागवून घेतलं. आणि मी माझ्या पुढच्या कामाला लागलो. याठिकाणी सर्वांसमक्ष दारू तर काही पिता येणार नव्हती. मग मी माझा ठेवणीतला डाव बाहेर काढला.
मी वेटरला माझ्या जवळ बोलावलं.. आणि त्याला एक "जीम्लेट" आणायला सांगितलं.
( पट्टीतील मदिरा पिनारांना जीम्लेट काय आहे, हे सांगणे नसावे.  )
काही वेळातच.. ते जीम्लेटचं ग्लास माझ्या पुढ्यात आलं.
सुंदर आकार असलेला, व्होडका आणि लिमकाच्या मिश्रणाने काठोकाठ भरलेला तो ग्लास. ग्लासच्या किनारीवर एक गोलसर पात्तळ लिंबाची चकती अडकवलेली होती. त्याच्या कडेलाच सजावट म्हणून एक छोटीशी खेळण्यातील छत्री सुद्धा लावली होती. आणि हे पेय पिण्यासाठी, एक वाकड्या आकाराचं स्ट्रॉ देखील त्यात होतं.
या सगळ्या सजावटीमुळे, तो ग्लास खूप आकर्षक दिसत होता. समोर आलेला हा साग्रसंगीत प्रकार पाहून माझ्या बायडीच्या जिभेला पाणी सुटलं. आणि हे मला ताबडतोब समजलं होतं.
त्या मधुर पेयाचा एक घोट मी घेतो न घेतो. तोच, हिने मला विचारलं, हे ज्यूस चवीला कसं लागतं ओ..? आणि घाईघाईत, मी चुकून बोलून गेलो.
हे जूसच आहे.. गोडच लागतं ते..!
झालं.. हे ऐकताच, आमच्या बाईसाहेबांनी तो ग्लास ओढला ना तिच्याकडे.
आता.. ग्लासात ज्यूस आहे म्हणाल्यावर, मला पुढे काही बोलताच येइना. मी, ग्लासकडे आणि तिच्या तोंडाकडे आशाळभूत नजरेने आणि तितकाच चिंताक्रांत होऊन पाहत होतो. आता..हिला सांगू तरी कसं..? पण कुठलं काय.
ज्यूस गोड लागतंय म्हणून, बघता बघता ग्लासातील त्या स्ट्रॉ च्या सहाय्याने या बयेने अख्खा ग्लास रिचवला.
काही वेळातच, जीम्लेटने तिची कमाल दाखवायला सुरवात केली.
आणि माझ्या काणापाशी येत ती मला म्हंटली, अहो.. मला कसं तरीच होतंय हो..!
खरं तर, मला मनातून राग तर खूप आला होता. पण तो राग माझ्या मनामध्ये दडवत हसतच मी तिला म्हंटलो.
तुला कोणी सांगितलं होतं हा जूस प्यायला...??
तिच्याकडून नेमकी काय चूक घडली आहे. ते ती लगेच समजून गेली होती. नशीब, त्याठिकाणी तिने जास्तीची बडबड केली नाही. नाहीतर, घरातल्या लोकांसमोर माझीच वाजली असती. तेंव्हापासून, तिने एक फार मोठा धसका घेतला आहे. मी घेतलेल्या कोणत्याच ड्रिंकला, ती चुकुनही स्पर्श करत नाही.
अगदी.. खऱ्याखुऱ्या जुसला सुद्धा..!


बऱ्याच मित्र आणि मैत्रिणींच्या आग्रहाखातर, आज मी हि मटन बनवण्याची अगदी सोपी रेसिपी तुमच्या समोर सादर करत आहे. हि रेसिपी इतकी सोपी आणि स्वादिष्ट आहे, कि आमचे पुरुष मंडळी सुद्धा हि रेसिपी अगदी आरामात बनवू शकतील. चला तर मग.. सुरवात करूयात,
आळणी मटन आणि त्याचा पिवळा रस्सा, हा बऱ्याच खवय्यांचा विक पॉईंट असतो. काही व्यक्ती, जेवण करण्या अगोदर, आपली भूक दुपटीने वाढावी म्हणून. हे आळणी सूप, भुरके मारून पीत असतात. आणि, मटणाचे काही मऊ पीस तोंडात घोळवून घेत असतात. आणि तोच स्वर्गीय स्वाद जिभेवर कायम ठेवत. नंतरच्या जेवणावर आडवा हात मारत असतात. हे माझं आजवरच निरीक्षण आहे. कारण, मी स्वतः सुद्धा याच जातकुळीतला आणि पट्टीचा खवय्या आहे.
अळणी मटन बनवण्यासाठी.. आपल्याला साहित्य लागणार आहे. ७५० ग्राम गुलाबी रंगाचं लुसलुशीत मटन. मी मटन घेताना, अगदी मऊ मटन घेत नाही. मटन घेण्यात मी माझी प्रथम पसंती देत असतो. ती बकऱ्याच्या " फुट " या विषयाला. फुट म्हणजे, बकऱ्याच्या पाठीकडील भाग. या भागातील मास, वजनाला जास्ती सुद्धा पडतं. आणि यात, मासा बरोबर थोडी हाडकं सुद्धा असतात. या मटणाचे पीस, अगदी बर्फी सारखे पडतात. पण या मटणात असणारी ती हाडकं, आपल्याला चाऊन चोथा करून खाता येतात. त्यामुळे, आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. आणि हो, मुतखडा असलेल्या व्यक्तींनी हे हाडं चघळायचं धाडस करू नका. या हाडकात फार मोठ्या प्रमाणात, क्षार असतात. असो.. थोडं विषयांतर झालं.
सुरवातीला मटणाला.. एका पाण्यात मस्तपैकी धुवून घ्यावं. त्यांनतर, त्याला अंदाजे.. हळद, मीठ चोळून घ्यावं. आणि साधारणपणे, अर्धा तासभर हे मटन मुरत ठेवावं.
नंतर.. एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घ्यावा. एक छोटा चमचा आले लसणाची पेस्ट घ्यावी, थोडी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घ्यावा.
कुकरमध्ये.. पळीभर तेल टाकावं, त्यात चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतावा. ( आणि हो, कांदा परतताना.. त्यात थोडं मीठ घालावं. यामुळे कांदा लवकर भाजला जातो. ) नंतर त्यात.. हळद, चिरलेली कोथिंबीर आले लसूण पेस्ट आणि पुदिना घालून हे मिश्रण हलवून घ्यावं. एक वाफ आल्यावर, त्यात मटण घालावं. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यावं. एक वाफ येईपर्यंत, कुरकरला अगदी वरच्यावर झाकण लावावं. एक वाफ आल्यावर, हे मटण पुन्हा एकदा पळीने हलवून घ्यावं. आणि त्यात दोन मोठे तांबे गरम पाणी घालावं. हे फार महत्वाचं आहे बरं का, मटण शिजवण्यासाठी गरम पाणीच घालावं. त्यामुळे मटण वातड होत नाही, आणि व्यवस्थित शिजतं. पाणी घालून झाल्यावर, कुकरला झाकण लावून घ्यावं, आणि कुकरची शिट्टी फसफसे पर्यंत. मोठ्या आचेवर हे मटण शिजवून घ्यावं. कुकरची शिट्टी फसफसायला लागली, की गॅस अगदी लहान करावा. आणि पंधरा मिनिटे मंद आचेवर हे मटण शिजू द्यावं. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करावा. आणि अर्धा तास, हे मटण आतील वाफेवर शिजू द्यावं. कुकर थंड झाल्यावर. आळणी मटण आणि हवा तेवढा आळणी रस्सा बाजूला काढून घ्यावा. आणि गरमागरम रस्सा आणि लुसलुशीत मटण खाण्यासाठी सर्व करावं.
त्यानंतर.. आले, लसूण, खोबरं, कांदा, लाल तिखट, आणि तयार मटण मसाला वाटून घ्यावा. हा सगळा मसाला अगदी अंदाजे आणि फार कमी प्रमाणात घ्यावा. फक्त त्या पिवळ्या रश्याला एक तिखटपणा यावा इतकंच. आणि हा मसाला तेलात चांगला भाजून घ्यावा. आणि उरलेल्या आळणी रश्यात हा मसाला घालून, त्याला गॅसवर एक उकळी आणावी.
उरलेल्या मटणासाठी, तव्यावर थोडं तेल घ्यावं. आणि त्यात फक्त लाल तिखट घालून थोडसं परतावं, आणि त्यात उरलेलं आळणी मटण घालावं. आणि हे मिश्रण अगदी हलक्या हाताने हलवून घ्यावं. त्यावर वरून थोडं मीठ भुरकवा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पसरून घ्यावी.
आता बरीच लोकं म्हणतील, ही अगदी साधी पद्धत आहे. पण खरं सांगायला गेलं तर, मटण हा विषय तुम्ही जितका कमी मसाल्यात बनवाल, तितकं ते चविष्ट लागतं. यात तुम्हाला मटण खाल्ल्याचा खरा फील येईल. उगाच मसाला खाल्ल्या सारखं वाटणार नाही. चला तर मग, कामाला लागा..!!

ज्या गावामध्ये किंवा शहरामध्ये आपल्या पोटापाण्याची सोय होत असते. त्या गावाचेच आपण गोडवे गायला हवेत. असं माझं स्पष्ट मत आहे.
वीतभर पोटासाठी आपली गावं सोडून काही लोकं जेंव्हा शहराकडे कूच करत असतात. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनाशी एक खुणगाठ बांधलेली असते. कि ह्या गावात मी माझा एक नवा ठसा उमटवेन इथल्या मातीशी मी एकरूप होऊन जाईल. परंतु.. पोट भरल्यावर माणसाला धर्म आठवतो. ह्या उक्तीप्रमाणे, स्थिरस्थावर झाल्यावर त्या बाहेर गावातील व्यक्तीला आपल्या गावची फारच आठवण येऊ लागते. आणि ती भूक भागवण्यासाठी तो आपल्या प्रांतातील लोकांचा एक समूह स्थापना करतो. त्यांना एकमेकांना भेटून आपल्या गावात असल्याचा आनंद मिळतो. कालांतराने, हीच लोकं एक वेगळा गट निर्माण करू लागतात. आणि त्यावेळी, हि गोष्ट तेथील भूमिपुत्रांच्या नजरेतून सुटेल तर ते नवलच म्हणावं लागेल.
इथून पुढे खर्या संघर्षाला सुरवात होते. गटबाजीचा प्रयत्न करत असताना. काही लोकं राजकारणाशी जवळीक साधताना आढळतात. स्थानिक लोकांना हे काही रुचत नाही. आणि तिथून पुढे मूळ मुद्दा गाववाले आणि बाहेर गावचे असे गट निर्माण होऊ लागतात.
मी स्वतः, ह्या गोष्टीच्या पूर्ण विरोधात आहे..!
पोटासाठी आलोय, तर तिथले होऊन राहा. आणि त्यांच्यात मिसळूनच आपलं नावलौकिक निर्माण करा. त्याला नक्कीच सर्वांचा दुजोरा मिळतो.
मध्यंतरी असंच एका मित्राच्या आग्रहाखातर महाराष्ट्रातील त्या विशिष्ट भागातील ग्राम मेळाव्यात मी सहभागी झालो होतो. सुरवातीचा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पडला. आणि काही वेळाने त्यातील एका व्यक्तीने तिथे व्यासपीठावर गरळ ओकायला सुरवात केली.
" ह्या पुण्यात 'आपल्या' भागातील पाच नगरसेवक निवडून आले आहेत. तर, ते पाचाचे पंचवीस कसे होतील. याकडे अपना सर्वांचं लक्ष असणं जरुरी आहे..! "
हे वाक्य ऐकून, त्यावेळी माझी सुद्धा सटकली होती.
हेच वाक्य.. जर, त्याठिकाणी असणाऱ्या एखाद्या स्थानिक व्यक्तीने ऐकली असती.
तर, त्याची तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहणार आहे का..?
जिथे आलोय तिथलेच होऊन राहण्यात फार मोठं हित दडलेलं असतं..!!

नवरा-बायको.. हे नातं म्हणजे, अगदी जीवनभराची गाठ असते..!
काही व्यक्ती.. हि साथ, आणि मैत्रीची वात सदैव तेवत ठेवतात. तर काही अभागी लोकांच्या जीवनात, हा तेवता दिवा अकालीच मावळला जातो..
तर.. काही नवरा बायको ( स्त्री-पुरुष ) हे लग्न झाल्यावर, काही कारणास्तव एकमेकांच्या बंधनात राहू इच्छित नाहीत. त्यात चुकून जर ती स्त्री कमावती नसेल. तर तिला आयुष्यभर, हालापेष्टा सहन करत. अगदी रडत कुढत, त्याच जीवन साथीबरोबर नाईलाजाने तिला जीवन व्यतीत करावं लागतं.
तर याउलट.. काही कमावत्या महिला.
हि सगळी बंधनं झुगारून, त्या विषयापासून विभक्त होत, आपलं स्वतःचं अस्तिव निर्माण करत असतात. जीवनाचा सगळा आनंद त्या हवा तसा लुटत असतात. कारण, त्यांनी शिक्षणाच्या जोरावर एक यशस्वी जीवन जगण्याचा आणि तितक्याच धेय्याने अफाट द्रव्य कमावण्याचा निश्चय केलेला असतो. आणि काही प्रमाणात, ते त्यात यशस्वी सुद्धा झालेले असतात.
आणि.. या छोट्या-छोट्या चुका, नंतर फार मोठं रूप धारण करतात. आणि.. वेळ, अगदी फारकत घेण्यापर्यंत येते.
टाळी एका हाताने वाजत नसते.. या उक्तीप्रमाणे, वरील विषयातील पुरुष सुद्धा अगदी हाच मार्ग हाताळत असतो. तेच मनमौजी आणि स्वच्छंदी जीवन तो हि जगत असतो.
आणि चुकून.. या दोघांना अपत्य असेल, तर ते अपत्य कायद्याने त्या महिलेकडेच असतं. त्यामुळे ती सुद्धा त्याच्या सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या झेलत आणि स्वीकारत असते.
त्याचवेळी.. वेळोवेळी, तो वडील नामक व्यक्ती सुद्धा त्या मुला संबंधित, त्याला जमेल तितक्या जबाबदाऱ्या पार पडण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो.
या.. होरपळलेल्या प्रकरणानंतर, या दोघांनी.. अखंडपणे, अविवाहित राहण्याचा विडा उचललेला असतो. कारण, " विवाहसंस्था " या विषयावरील त्यांचा पूर्णपणे विश्वास उडालेला असतो.
पण हळूहळू, वय वाढत गेल्यावर. नकळतपणे त्यांना सुद्धा एका जोडीदाराची आवश्यकता भासत असते. पण ते हि गोष्ट जाहीरपणे कोणापाशी व्यक्त करू शकत नसतात. त्यांनी कमावलेल्या पैशामुळे.. किंवा त्यांच्या अंगी असलेल्या पिळदार सौंदर्यामुळे, त्यांना हवं तेवढं शरीरिकी सुख विकत अथवा फुकट मिळत असतं. पण त्या क्षणभंगुर असणाऱ्या द्रव्याने किंवा सौंदर्याने त्यांना " मानसिक " सुख कदापि मिळत नाही. हे सगळं करून, काही वेळाकरिता त्यांची वासना तृप्त होते. पण त्यांचं मन मात्र नेहेमी अतृप्तच राहत असतं.
हि काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी असतात. त्यावर काथ्याकूट करण्यात आता काहीच हाशील नसतं.
कालांतराने.. त्यांचं मुल सुद्धा मोठं होऊ लागतं. आई वडिलांचे तणावपूर्ण जीवनातील संघर्ष पाहून, त्यांचं अपत्य सुद्धा काहीएक कारण नसताना, एका वेगळ्याच विश्वात निघून गेलेलं असतं.
त्याला सुद्धा एकांत आवडत असतो. आई वडिलांविषयी त्याच्या मनामध्ये किंचितही आस्था उरत नाही. त्यांच्या सुख दुख्खाशी त्याला कवडीची सुद्धा किंमत उरत नसते. या सगळ्या गोष्टी घडत असताना,
मला.. एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते..!
आपला मूळ स्वभाव, हा आपल्याला सुरवातीपासूनच माहिती असतो. तर मग, भविष्यात आपल्या जीवनात येणारी वादळं, आपल्याला ज्ञात नसतील का..? हे विषय, आपण वेळीच का थोपवत नसू..?
का म्हणून, आपण.. विषाची परीक्षा घ्यायला जात असू..?

गेल्या शनिवारी..
बालगंधर्व रंगमंदिरात, हे राम नथुराम नाटक आम्ही पाहायला गेलो होतो.
सब कुछ.. ओन्ली, " शरद पोंक्षे " असा या नाटकाचा प्रकार आहे.
या नाटकाचा, पुण्यातील हा शेवटून दुसरा प्रयोग होता. म्हणून, हा प्रयोग मी अगदी आवर्जून पहायाला गेलो होतो. खरं सांगायला गेलं तर.. हे नाटक, माझ्या मनाला म्हणावं इतकं भावलं नाही. कारण, हा वादाचा विषय असल्याने, सगळं सत्य ते दाखवू शकले नाहीत.
असो.. तर, शेवटचा शो असल्याने तो शो अगदी हाऊसफुल्ल होता. कारण, यांनतर, या कार्यक्रमाचे प्रयोग कायमचे बंद होणार आहेत. असा शरदने शब्द दिला आहे.
नाटक म्हणजे, इथे कोणी कॉलरला माईक लावत नाहीत. वर लटकवलेली माईक यंत्रणा ते काम चोख करत असते. आणि त्याकरिता, संवाद नीट ऐकू यावेत म्हणून सर्वांनी शांतात राखणं खूप महत्वाचं असतं.
प्रयोग सुरु होण्याअगोदर.. आयोजकांनी " ब्राम्हणी " आणि खास पुणेरी भाषेत सगळ्यांना सज्जड दम भरला होता. त्यामुळे, प्रयोग सुरु होण्या अगोदर सगळे मोबाईल वगैरे बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना सगळे संवाद व्यवस्थितपणे ऐकू येत होते.
शेवटी.. दीड तासानंतर मध्यांतर झाला. त्यासरशी, सगळी पेटू लोकं रात्रीच्या साडेआकरा वाजता, पुन्हा एकदा तोंड वाजवण्यासाठी, त्या नाट्यगृहातून काही तरी खाऊन किंवा सोबत घेऊन तरी आलेच.
मध्यांतर संपली.. प्रयोग सुरु झाला.. संपूर्ण थियेटर मध्ये कमालीची शांतात होती. आणि, माझ्या पाठीमागच्या बाजूला, एक जाडी महिला, प्लास्टिकच्या वेस्टनात असणारे कुरकुरीत वेफर खाण्यात भलतीच मश्गुल झाली होती.
एकदा झालं, दोनदा झालं.. पण बाईच्या तोंडातून कारकुर आवाज सुरूच होता. आणि हे का कमी म्हणून, प्लास्टिकच्या पिशवीतून वेफर्स बाहेर पडताना पिशवीचा सुद्धा बराच करकरीत आवाज येत होता. या गोष्टीचा बऱ्याच लोकांना त्रास होत होता.
पण.. मांजराच्या, सॉरी त्या बाईच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी..?
पण तितक्यात.. एका शेरदिल व्यक्तीला ते प्रकरण काही सहन झालं नाही. आणि, त्या शांततेचा भंग करत, तो संभाव्य व्यक्ती हवेत बाण सोडत म्हणाला..
अरे बंद कर ना ते खायचं, आत्ता नाय खाल्लं तर जमणार नाही का..?
तुम्हाला खरं सांगतो.. या वाक्यावर थेटरात कोणी हासलं नाही, पण..
या वाक्याची सरबत्ती झाल्या बरोबर. त्या बाईने, आपलं तोंड ताबडतोब बंद केलं. आणि त्यामुळे, खऱ्या अर्थाने.. त्या नाटकातल्या " नथुरामला " आणि प्रेक्षकांना सुद्धा न्याय मिळाला..!

शर्मिला..
दिसायला, खूप सुंदर होती..!
तेंव्हा, मी नुकताच अकरावीत गेलो होतो. माझ्या वडिलांचे एक मित्र, जे बारामतीला राहायला होते. त्यांच्या लग्नाला आता बरीच वर्ष होऊन गेली होती. परंतु, त्यांच्या पत्नीची प्रेग्नन्सी काही सक्सेस होत नव्हती. अवघ्या दोन तीन महिन्यात गर्भ पडून जात होता. सलग चार ते पाच वेळा त्यांना हा पुत्र वियोग सहन करावा लागला होता. त्याकरिता, बरेच डॉक्टर झाले. नवस सायास झाले, पाण्यासारखा पैसा खर्च करून झाला. पण कसलाच गुण म्हणून येत नव्हता. त्यावेळी, पुण्यातील एका नामांकित डॉक्टरांनी..
हि केस.. मी, सक्सेस करून देतो...! असं, त्यांना आश्वासन दिलं होतं.
काकींना दिवस गेल्यापासून. सलग सहा महिने, काकी त्या डॉक्टरांच्या निगराणीखाली होत्या. आणि त्यानंतर, सातव्या महिन्यापासून. प्रसूती होईपर्यंत, त्यांना दवाखान्यातच एडमिट व्हायचं होतं. असं डॉक्टरांकरवी सांगून झालं होतं.
झालं.. काकींना सातवा महिना सुरू झाला. आणि, त्यांची आवराआवर सुरु झाली. सगळा बाडबिस्तारा बारामातीहून पुण्यात दाखल झाला. सुरवातीला ते उभयता आमच्या घरी आले. आणि त्यानंतर, दुसऱ्या दिवशी काकींना त्या दवाखान्यात दाखल केलं गेलं.
काकी, त्या डॉक्टरांच्या देखरेखेखाली दवाखान्यात एडमिट होत्या.
त्याकाळी, माझ्या वडिलांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. त्यावेळी, माझं कॉलेज दुपारी तीन वाजता सुटायचं. म्हणून, वडिलांनी मला फर्मान सोडलं..
काकी सकाळचं जेवण दवाखान्यातच करून घेतील. आणि, तू कॉलेज वरून घरी आलास. कि, त्यांच्याकरिता संध्याकाळच्या जेवणाचा डबा घेऊन जात जा..!
माझ्या वडिलांपुढे नकार द्यायची कोणताच हिंमत नव्हती. त्यामुळे, गपगुमान मला हे काम करावं लागणार होतं. आणि, ते सुद्धा थोडे थोडके दिवस नाही.
तर.. " तब्बल तीन महिने..! "
वडिलांची आज्ञा पाळत, मी काकींना रोज आमच्या घरून पुण्यात जेवणाचा डबा घेऊन जायचो.
त्याच प्रसूतिगृहात.. शर्मिला सुद्धा एडमिट होती. माझ्या, तिथे रोजच्या जाण्यायेण्यामुळे शर्मिलाची आणि माझी, चांगलीच ओळख झाली होती.
का कोण जाने.. ते, मला सुद्धा माहित नाही. पण अगदी पहिल्या भेटीपासुनच आम्ही दोघेही, एकमेकांना एकेरीतच बोलायचो. माझ्या माहितीप्रमाणे, त्यावेळी तिला सुद्धा जेमतेम सातवा महिनाच चालू असावा. असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून मला समजून यायचं..
सौंदर्य काय असतं...! ते मला, शर्मिलाला पाहून समजलं.
सोळावं वरीस धोक्याचं.. तेंव्हा, मी नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता. स्त्री काय असते, आणि कशी असते. याची मला, नुकतीच ओळख आणि आवड सुद्धा होऊ लागली होती.
शर्मिला म्हणजे, अतिशय गोरीपान आणि सुंदर मुलगी, ती अंदाजे वीस बावीस वर्षाची असावी. तिचे खांद्यापर्यंत रुळणारे केस, गोबरे गाल, गुलाबी ओठ, भरलेली अंगकांती. आणि, त्यावर.. दिवस गेल्याने तिला आलेलं गोल गुटगुटीत पोट..
लाजरी,बुजरी, गोड अशी सुंदर मुलगी. खरोखरच, ती खूप म्हणजे खूपच सुंदर होती. कुणीही पटकन तिच्या प्रेमात पडावं अगदी अशीच होती ती.
स्त्री सौंदय काय असतं...? ते मी, प्रथम तिच्यामध्ये पाहिलं होतं. तिचं, वर्णन करावं तीतकं कमीच. माझ्या तारुण्याच्या भरात, मी पाहिलेली ती एकमेव सुंदर स्त्री/मुलगी.
स्वप्न परीच म्हणा ना...!
काय लिहू, किती लिहू, शब्द कमी पडतील.
काकींना डबा घेऊन मी दवाखान्यात गेलो, कि.. मी, तिच्याशी तासन तास गप्पा मारत बसायचो. ती खूप गोड बोलायची. त्यामुळे, तिचा सहवास मला खूप हवाहवासा वाटायचा. तसं पाहायला गेलं तर, मला तिच्याशी प्रेमच झालं होतं. पण, ह्या प्रेमात वासना नव्हती. त्यामध्ये, एकमेकांबद्धल असणारी एक नितांत ओढ होती. त्यामुळे, मला तिचा सहवास खूप हवाहवासा वाटायचा.
दवाखान्यात असताना, तिला भेटायला रोज नवी-नवी लोकं यायची. त्यात, विदेशी लोकांचा हि समावेश असायचा. हि गोष्ट, माझ्या तरुण मनाला खूप खटकायची. कारण, आमच्या काकींना भेटायला येणारे आम्ही जेमतेम लोकच असायचो. याबद्धल, मी तिला काही विचारलं. कि, ती मला काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची. असं, नेहेमीच घडायचं.
आणि, शेवटी तो दिवस उजाडला. नऊ महिन्यांच्या कठोर तपश्चर्येनंतर. काकींनी, सुंदर अशा गोंडस बाळाला जन्म दिला. काका, काकींची इतक्या दिवसांची तपश्चर्या फळाला आली होती. तीन महिने, मी सुद्धा न कंटाळता त्यांना जेवणाचा डब्बा पोहोचवत होतो. त्याचं सुद्धा, मला चीज झाल्या सारखं वाटत होतं.
पाच-सहा दिवसांच्या अंतराने, शर्मिलाने सुद्धा एका सुंदर मुलाला जन्म दिला. ती सुद्धा मला खूप समाधानी दिसत होती. माझं रोजचं येणं जाणं चालूच होतं. आमचे काका, खूप खुश झाले होते. दहा वर्षांनी, त्यांच्या घरात मुल जन्माला आलं होतं. त्या खुशीमध्ये.. त्यांनी, पूर्ण दवाखान्यात पेढे वाटले होते. साधारण पंधरा एक दिवसा नंतर, काकींना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलं. तोपर्यंत, शर्मिला तिथेच होती. काकींना ज्या दिवशी दवाखान्यातून सोडलं. तेंव्हा, मी शर्मिलाला भेटलो. तिला डोळेभरून पाहिलं आणि म्हणालो..
" शर्मिला.. आपली भेट आता काही होणार नाही..! "
खूप जड अंतकरणाने, मी तिला, निरोप दिला. त्यावेळी, शर्मिलाचे डोळे सुद्धा भरून आले होते. पण, तिने वेळीच स्वतःला सावरलं. आणि, ती आतमध्ये निघून गेली.
आता, माझंही दवाखान्यात जाणं येणं बंद झालं होतं. पण, मला तर शर्मिलाची खूप आठवण व्हायची. तिच्याशिवाय मला करमतच नव्हतं. ती, माझ्या रोजच्या जीवनाचा एक हिस्सा झाली होती. पण करायचं काय..? घरात काय सांगायचं..? आणि तिला भेटायला तरी कसं जायचं..?
मी, फारच अडचणीत सापडलो होतो. शेवटी मला काही राहवेना. आणि एके दिवशी धाडस करून मी शर्मिलाला भेटण्यासाठी दवाखान्यात गेलो.
ती.. एका कुशीवर आडवी होऊन बेडवर निवांत पहुडली होती. मी तिला आवाज दिला. तशी ती, ताडकन उठून बसली. मला पाहून, तिला सुद्धा खूप आनंद झाला होता. तिने तिच्या शेजारी मला बसायला जागा करून दिली. तिने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. मी तिच्याशी मनभरून गप्पा मारल्या. आणि, तिला म्हणालो.
शर्मिला... तू सुद्धा, आता तुझ्या घरी जाशील ना..! तू आता, मला परत कधीच भेटणार नाहीस. हो ना ?
ती फक्त, शांत आणि निर्विकारपणे माझं बाळबोध बोलनं ऐकत होती.
एकटक, शून्यात पाहत...
तिच्या धीरगंभीर चेहेऱ्याकडे मला पाहवत नव्हतं. थोडसं विषयांतर करावं म्हणून.
तिच्या बाळाला पाहण्याकरिता, मी पाळण्याकडे गेलो. पाहतो तर, तिचं बाळ काही पाळण्यात नव्हतं. मी, दचकूनच तिला प्रश्न केला..
" शर्मिला sssss तुझं बाळ कुठे आहे गं..?
ती, एकटक शून्यात पाहत मला म्हणाली..
" बाळ.. नेलं ना त्यांनी...!
मला, काही कळायलाच तयार नाही. माझ्या डोक्यात, फक्त गोंधळ चालला होता. काय विचारावं, कसं विचारावं मला तर काहीच समजत नव्हतं. शेवटी, माझ्या मनात नसतानाही. तिच्याशी थोडावेळ गप्पा मारून जड पावलांनी मी तिथून निघून गेलो.
बाहेर जाताना.. मी पुन्हा एकदा, तिच्याकडे वळून पाहिलं. पाणावलेल्या डोळ्याने, ती माझ्याकडे पाहत होती. मी सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी समजण्या इतपत मोठा तरी कुठे होतो..?
त्यानंतर.. दोन एक महिन्यांनी, अचानक शर्मिला आमच्या घरी आली. तिला पाहून मी पुरता चक्राऊनच गेलो होतो. माझ्या आनंदाला काही पारावारच उरला नव्हता. आमच्या घरच्यांनी, तिचं खूप आदरतिथ्य केलं. आमच्या घरी, ती तब्बल दोन दिवस राहिली होती. त्या दोन दिवसाच्या काळात, मी तिच्याशी मन भरून गप्पा मारल्या. आमच्या घरच्यांना, बहुतेक तिची " कर्म कहाणी " माहित असावी. त्यामुळे, आमच्या घरातील कोणीच तिच्यासमोर तिच्या 'बाळाचा' विषय काढत नव्हतं.
दोन दिवसांनी, आमच्या येथील पाहुणचार उरकल्या नंतर. माझे मोठे बंधू, तिला दिल्लीच्या रेल्वेमध्ये बसवून आले. जाताना, तिने माझ्या गालावरून फिरवलेल्या तिच्या कोमल हाताचा स्पर्श. मला, आजून सुद्धा आठवणीत आहे..!
त्यानंतर, आजतागायत शर्मिला मला कधीच भेटली नाही. आज.. मी खूप मोठा, आणि जाणता सवरता सुद्धा झालो आहे.
मला, आता समजतंय. कि, नेमकी काय परिस्थिती होती...? तिने, तसं का केलं असेल..? ते, मला माहित नाही. कारण..
'शर्मिला'.. एक, " सरोगेटेड मदर " होती..!
आज शर्मिला कुठे असेल..? कशी असेल..? कोणत्या परिस्थितीत असेल..? किंवा, असेल कि नाही..? ते काही मला सांगता येणार नाही. आणि, ती जरी या जगात असली. तरी.. तिच्या, बाळाशीवाय ती जगू शकत असेल का..?
ह्या गोष्टीला, आता बरीच वर्षं उलटून गेलीत. तरी सुद्धा, हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो.
आणि शेवटी.. मी, तिच्यासाठी फक्त एवढंच म्हणत असतो..
शर्मिला.. तू, कुठेही असावीस. पण, सुखी असावीस..! 
अद्भुतरम्य शिवमंदिर..
यावर्षी महाशिवरात्रीला.. शंभोचं दर्शन घेण्यासाठी मी कर्नाटकात गेलो होतो.
बेळगाव पासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर, आणि.. कारवारच्या अलीकडे साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर.. उत्तर कणारा, तालुका आणि जिल्हा जोयडा. अणशी अभयारण्यात, अणशी गावापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर, रस्त्याच्या डाव्या बाजूला, डोंगराच्या वरील बाजूस, सुमारे पाचशे मीटर अंतरावर, डोंगर भागात एका गुफेमध्ये हे स्वयंभू शिवलिंग आहे.
त्याठिकाणी मला अशी आख्यायिका ऐकायला मिळाली. कि.. त्याभागात राहत असणाऱ्या, एका पुजाऱ्याला देवाने स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला. आणि त्याला सांगितलं, या गुफेमध्ये माझं एक स्वयंभू शिवलिंग आहे. तू तिथे जाऊन त्याची पूजा अर्चना कर.
दुसऱ्या दिवशी त्या पुजाऱ्याने, ती गुफा शोधून काढली. कारण ती गुफा बरीच घनदाट जंगलात आहे. हि साधारण दहाएक वर्षांपूर्वीची घटना आहे. तेंव्हापासून आजपर्यंत, हे मंदिर फक्त महाशिवरात्र या दिवशीच दर्शनासाठी उघडं असतं. किंवा त्याठिकाणी दर्शन करण्यासाठी भाविक जात असतात. परवाच्या दिवशी फारफारतर दोनेक हजार भाविक त्याठिकाणी येऊन गेले असावेत. नाहीतर इतर वेळी, त्या गुफेत.. अस्वलं आणि इतर जंगली श्वापदं बसलेली असतात.
महाशिवरात्रीच्या अगोदर दोनचार दिवस, त्या गावातील काही लोकं त्या परिसराची पाहणी करतात. आणि त्या भागात मोठमोठे फटाके व ढोल वाजवून त्या गुफेत राहत असणाऱ्या जंगली श्वापदांना त्या ठराविक दिवसासाठी तेथून पिटाळून लावतात. हे प्राणी सुद्धा कोणाला कसलाही त्रास न देता तेथून निघून जातात. त्यानंतर.. तिथे साफसफाई आणि शिवलिंगावर दुग्धअभिषेक केला जातो. आणि हा एक दिवसीय उत्सव संपल्यावर. ती जंगली श्वापदं, पुन्हा आहे त्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी येतात.
या गुफेत, एका वेळेला एकच व्यक्ती जाऊ शकतो. ते हि अगदी खाली बसून बुडाने सरपटत पुढे जावं लागतं, त्या गुफेचं खूपच छोटंसं द्वार आहे. पण आतमध्ये, साधारणपणे तीसेक फुट पुढे चालत गेल्यावर. समोरच गुफेचा मोठा आणि विस्तीर्ण परिसर आहे. कि ज्याठिकाणी एका वेळी, साधारण पन्नासएक व्यक्ती उभ्या राहू शकतात. खरोखर हि खूपच सुंदर अशी नैसर्गिक गुफा आहे. आणि त्यात असणारं शिवलिंग सुद्धा तितकच मनोवेधक आहे. पण या गुफेत आतमध्ये गेल्यावर, आतमध्ये पूर्ण काळोख आहे. त्यामुळे आत जाताना, सोबत विजेरी असणं अत्यावश्यक आहे. आणि त्याठिकाणी ऑक्सिजन सुद्धा फारच विरळ आहे. त्यामुळे, दर्शनाला गेल्यावर काही भाविकांना श्वसनाचा खूप त्रास होतो. अर्थातच कधी नाही ते, याठिकाणी मला सुद्धा श्वसनाचा भयंकर त्रास जाणवला.
आणि त्यामुळे घाबरून जाऊन, मी दुरूनच त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन माघारी फिरलो. पण आतमध्ये गेल्यावर, त्या शिवलिंगाच्या शेजारी भरपूर ऑक्सिजन आहे. आणि त्या भागात भयंकर एनर्जी सुद्धा आहे. कारण, त्याभागात.. अगदी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत, दोन चार भाविक तिथे अगदी ठाण मांडून बसले होते.
पावसाळ्यात या गुफेत भरपूर पाणी सुद्धा साठतं, पण पुढे कसलाही होल किंवा मार्ग नसताना. म्हणजे.. ती गुफा त्या शिवलिंगाच्या मागील बाजूस बंद होते. मग ते पावसाचं पाणी नेमकं कुठे जात असेल..? किंवा झिरपत असेल..? ते मात्र समजत नाही.
त्या गुफेची मी चित्रित केलेली, खालील चित्रफित पाहताना.. तुम्हाला माझ्या श्वासाचा जोरजोरात आवाज ऐकायला मिळेल. त्यावरून तुम्ही या विषयाचा नक्कीच अंदाज बांधू शकता. कि हे ठिकाण किती अवघड ठिकाणी आहे. कारवार किंवा बेळगाव भागात राहत असणाऱ्या व्यक्तींनी, किंवा शिवभक्तांनी याठिकाणी एकदा नक्की जाऊन या. खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे.

आमच्या घरी, अगदी सुरवातीपासून मला मास मटणाचा रतीब होता.
माझे वडील मांसाहाराचे खूप शौकीन असल्याने. त्यांनी मला मटन या विषयातील प्रत्येक जिन्नस खाऊ घातला आहे. हाच कित्ता गिरवत, मी माझ्या मुलाला सुद्धा अस्सल खवय्या बनवला आहे.. ..
मी स्वतः.. चिकन पेक्षा मटणाला जास्ती प्राधान्य देत असतो. मटणात जी मजा आहे, ती चिकनला कधीच नाही. कधीतरी एक चेंज म्हणून, गावरान चिकन वगैरे ठीक आहे. पण या विलायती कोंबड्या काहीच कामाच्या नाहीत.
पण.. जेवण पटकन तयार होतंय म्हणून. या ब्रॉयलर चिकनला हल्ली फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि मटणाच्या मानाने, हे चिकन जरा स्वस्त असतं. त्यामुळे सुद्धा चिकनला बऱ्यापैकी मागणी असते. चिकन हा विषय म्हंटल तर, मी फक्त चिकन तंदुरी या विषयाला प्राधान्य देतो. किंवा जास्तीत जास्त, चिकनच्या चायनिस डिशेश मी आवडीने खातो. चिकन बिर्याणी हा विषय सुद्धा मला फार आवडतो.
पण.. चिकन मसाला किंवा चिकन करी. या विषयाला मी नेहेमी नाक मुरडतच खात असतो. ते सुद्धा, अगदी जीवावर आल्या सारखं. माझ्या माहितीप्रमाणे, मी हॉटेलमध्ये आजवर कधीही चिकन करी किंवा चिकन मसाला विकत घेऊन खाल्लेला नाहीये.
तर.. दहाएक वर्षांपूर्वी, माझा मुलगा हे ब्रॉयलर चिकन खूप आवडीने खायचा. पण मटन म्हणालं, कि तो त्याला तोंडच लावायचा नाही. बायको सुद्धा माझ्या मुलाची बाजू घेऊन बोलायची..
जाऊद्या हो.. त्याला आवडतंय ना, मग चिकनच आणत जावा..!
पण.. हे काही माझ्या बुद्धीला पटत नव्हतं.
आता, मुलाचं चिकन प्रेम कसं सोडवायचं. आणि त्याला मटणाची आवड कशी निर्माण करायची..? या विचारात मी पडलो. आणि, मग मी या कामाच्या कसून मागे लागलो. काहीही झालं तरी, घरी भाजीला आणताना. मी मटनच घेऊन यायचो. आणि नियमाप्रमाणे माझा मुलगा सुद्धा मटणाला तोंड लावायचा नाही. आणि बायकोने सांगून सुद्धा, मी चिकन काही आणायचो नाही.
असं सलग दोन तीन महिने चालू होतं.
पण त्या तीन महिन्याच्या काळात, मी माझ्या मुलाला कधीही तू मटन खा म्हणून आग्रह केला नव्हता. शेवटी एके दिवशी, मुलगा स्वतः होऊन त्याच्या आईला म्हणाला.
" मम्मी मला पण मटन वाढ..! "
त्या दिवसानंतर, माझ्या मुलाला मटणाची इतकी प्रचंड आवड निर्माण झाली. कि आजच्याला तो सुद्धा चिकनला दुय्यम दर्जाचं स्थान देत असतो.
मी बरेचदा पाहत असतो.. काही महिला, त्यांच्या मुलाच्या मागे अगदी जबरदस्ती करून त्यांना खाऊ घालत असतात. आणि ते लहान मुल मात्र, तोंड वेडं वाकडं करून तोंडातील तो घास कसा थुंकून देता येईल. याच्या प्रयत्नात असतात.
अशावेळी, मी कित्तेक आयांना असा सल्ला दिला आहे. कि अरे त्याला जबरदस्ती करू नका, भूक लागल्यावर तो झक मारत खाईल.
पण आईचं प्रेम काही राहत नाही, ती बिचारी त्याच्यामागे जेवणाचा काला घेऊन, मागेमागे फिरतच असते. काही लोकं त्यांच्या मुलांवर खूपच अती प्रेम करत असतात.
पण एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटतेय. तुम्हाला खरोखर तुमच्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आवडी निवडीसाठी बदल घडवून आणायचा असेल.
तर तुम्हाला.. मी अवलंबलेला मार्गच पत्करावा लागेल. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी, त्याग फार महत्वाचा असतो.
" त्यागाशिवाय या जगात दुसरं काहीच मोठं नाहीये..! "


माझी जन्मकथा...
तेंव्हा.. माझ्या आईच्या 'गर्भात' मी नुकताच आकार घ्यायला सुरवात केली होती. आईच्या गर्भात मी जेमतेम चार महिन्यांचा झालो असेल. आणि एकाएकी, माझ्या आईला पोटदुखीचा प्रचंड त्रास जानऊ लागला. आईला होणारा भयंकर त्रास पाहून, माझ्या वडिलांनी अगदी टोकाची भूमिका घेतली. आणि सर्वानुमते, माझ्या आईचा 'गर्भपात' करायचं पक्कं झालं.
दिवस ठरला, वेळ ठरली..
पण, डिलिव्हरीसाठी आईचं नाव ज्या दवाखान्यात नोंदवण्यात आलं होतं. त्या दवाखान्यामध्ये, एक सिनियर लेडी सर्जन डॉक्टर होत्या. त्या दवाखान्यात, त्या फार मोठ्या गायनेक स्पेशालिस्ट होत्या. त्या, धर्माने इंग्रज ख्रिस्ती.. आणि, अविवाहित होत्या.
माझे वडील मला सांगायचे.. कि त्यांना, सिगारेटचं भयंकर व्यसन होतं. म्हणजे, त्या चेन स्मोकरच होत्या म्हणा ना.
कर्णोपकर्णी.. माझ्या आईची क्रिटीकल केसची ही बाब, अगदी त्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली. त्यांनी, माझ्या आईची पुन्हा एकदा सगळी तपासणी केली. माझ्या वडिलांना धीर दिला. आणि, त्यांना गर्भपात न करण्याचा सल्ला सुद्धा दिला. पण.. माझ्या वडिलांची नकारघंटा कायम होती.
कारण, दुसर्या डॉक्टरांनी..
" दोघांपैकी कोणी तरी एकच वाचेल "
असं.. माझ्या वडिलांना निक्षून सांगितलं होतं. आणि माझे वडील कोणत्याही परिस्थितीत, हि रिस्क घ्यायला तयार नव्हते. आणि, ते स्वाभाविक सुद्धा होतं.
त्या लेडी डॉक्टरने, माझ्या वडिलांना पुन्हा एकदा विचारलं.
तुम्ही, हे मुल का म्हणून नको म्हणताय..?
त्यावर माझे वडील म्हणाले, आम्हाला पहिली चार अपत्य आहेत. त्यामुळे, आता आम्ही विचार बदललाय. या होणाऱ्या मुलापेक्षा, मला माझ्या मुलांची " आई " फार महत्वाची वाटतेय. ती नसेल तर, माझा सगळा संसार उघड्यावर पडेल. एक मुल कमी असलं तरी चालेल, पण मी माझ्या बायकोला गमवू इच्छित नाही..!
हे सगळं ऐकून झाल्यावर.. त्या लेडी डॉक्टरने, माझ्या वडिलांना वचन दिलं.
तुमची इच्छा असेल, तर..
हि केस, मी माझ्या हातात घेते. होणारं मुल आणि आई, या दोघांना मी सुखरूप सोडवेन. अशी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि.. यांच्या सगळ्या देखभालीची जबाबदारी माझी,
पण.. होणारं जे काही अपत्य असेल. ते, तुम्हाला..
" मला द्यावं लागेल "
या अवघड विषयावर, माझ्या वडिलांनी बराच काथ्याकूट केला.
" जीव घालवण्यापेक्षा, जीव वाचवून तो एखाद्याला दिला तर त्यात वाईट काय आहे..? "
असा विचार करून, माझ्या वडिलांनी फार मोठं धाडस दाखवलं.
त्या लेडी डॉक्टरला, हि केस तुमच्या ताब्यात घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. माझा जन्म व्हायला अजून पाच महिने अवकाश होता. मधल्या पाच महिन्याच्या काळात, माझ्या आईने सुद्धा खूप सोसलं. आणि, त्या विदेशी डॉक्टर बाईंनी सुद्धा माझ्या आईची बरीच देखभाल केली.
कारण, " उद्याला जन्म घेणाऱ्या बाळाची, तीच आई होणार होती..! "
आणि शेवटी तो शुभ दिवस उजाडला. नऊ महिने आणि नऊ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर..
तेरा डिसेंबर एकोणिसशे एक्काहत्तर साली सायंकाळी ठीक आठ वाजता. या पृथ्वीतलावर, माझं यशस्वी आगमन झालं. त्या लेडी डॉक्टर, त्यांच्या कामात यशस्वी झाल्या होत्या. या बाळंतपणा नंतर, त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. जशा काही, त्या स्वतःच बाळंत झाल्यासारख्या वागत होत्या. त्या दिवशी खूप आनंदी होत्या त्या.
" आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते. "
पाच सहा दिवसांनी, त्या लेडी डॉक्टरने माझ्या वडिलांची भेट घेतली. आणि, त्यांनी दिलेल्या वचनाची त्यांना आठवण करून दिली.
आता.. ती वेळ आली आहे, आपन वचनपूर्ती करावी, अशी त्यांना विनंती केली.
माझ्या आईला तर, यातील काहीच माहित नव्हतं.
माझ्या वडिलांनी, त्या लेडी डॉक्टरला हात जोडून विनंती केली. आणि, तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकत नाही. असं म्हणून, एक विनंतीवजा नकार सुद्धा दिला. शेवटी, कितीही केलं तरी, मी त्यांच्या पोटचा गोळा होतो ना..!!
शेवटी.. दुक्खी अंतकरणाने, त्या लेडी डॉक्टर तेथून निघून गेल्या. त्यानंतर काही दिवसातच, त्या डॉक्टर बाई, भारत सोडून इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास निघून गेल्या. मला दत्तक म्हणून घेण्यामागे कारण म्हणजे. त्यांना स्वतःचा म्हणून, असा कोणीतरी वारसदार हवा होता. आणि मी म्हणजे, त्यांनी स्वतः देखभाल करून मला जीवन प्रदान केलं होतं. त्यामुळे त्यांना या विषयात एक वेगळाच जिव्हाळा होता. त्यामागे.. बाकी त्यांचा दुसरा कुठलाच हेतू नव्हता.
जर त्यावेळी, माझ्या आई वडिलांनी मला त्या लेडी डॉक्टरच्या स्वाधीन केलं असतं तर.. ?
कदाचित, आज माझ्या आयुष्याला फार वेगळं वळण लागलं असतं. चुकून माझ्या वडिलांनी त्या महिलेला होकार दिला असता. किंवा त्यांनी वचनपूर्ती केली असती.
तर.. आज हा पॉटर हि नसता, आणि.. ना कुठला म्याटर असता..!
पण आजही.. राहून-राहून, माझा जीव वाचवलेल्या त्या मातोश्रीची मला वरचेवर आठवण होत असते. तिने जर मनावर घेतलं नसतं, तर कदाचित.. आज मी या दुनियेत आलो नसतो.
मी तर.. माझ्या, त्या " दुसऱ्या " आईला कधी पाहिलं देखील नाही. पण, परमेश्वराला माझी कायम एकच प्रार्थना असते.
जिथे असेल तिथे, सुखी असुदेत ती माझी आई..!

परवा काही मित्रांच्या समवेत, घसा ओला करण्यासाठी मी एका मोठ्या रेस्टॉरंट बार मध्ये बसलो होतो. तिथे चार-चार खुर्च्यांचं एक टेबल होतं. हॉटेलमधील जवळपास सगळी टेबलं मद्यपी लोकांनी भरून गेली होती. उबदार वातवरणात, प्रत्येक व्यक्ती मद्याचा आस्वाद घेत होता. रेस्टॉरंटमध्ये चालू असलेलं हळुवार संगीत सुरेख झिंग चढवत होतं. तितक्यात माझं समोरील बाजूस लक्ष गेलं.
समोरील टेबलवर.. माझ्या समोरासमोर बसलेली एक दाढीधारी व्यक्ती माझ्याकडे चोरून-चोरून पाहत होती. तो व्यक्ती नेमकं कुठलं पेय पीत होता. ते मला माहित नाही, पण बहुतेक तो सॉफ्ट ड्रिंक घेत असावा. बराच वेळ झाला.. आम्ही पेगवर पेग रिचवत होतो. काही वेळानंतर लघुशंका करून यावी म्हणून, मी टॉयलेट मध्ये गेलो. मी मोकळा होतच होतो, तितक्यात.. माझ्याकडे चोरून पाहणारा तो व्यक्ती सुद्धा तिथे आला. मी फ्रेश होऊन, बेसिनमध्ये हात धुवत होतो.
तो व्यक्ती सुद्धा हात धुवण्याच्या बहाण्याने तिथे आला. आणि मला म्हणाला..
- क्यू मिया.. खुलेआम शराब पी रहे हो, किसीके देखनेका आपको डर नही लागता..?
मी ताबडतोब समजून गेलो.. हा बिचारा, मला मुस्लीम व्यक्ती समजून बसला आहे. मग आता, हे प्रकरण तसच पुढे रेटून न्यावं. म्हणून मी त्याला बोलता झालो..
क्या है मिया.. हम लोगोमे शराब को हराम समजा जाता है. लेकीन क्या करे, लत जो लग गयी है. छुटनेका नाम हि नही लेती. और रही बात किसीके देखनेकी..!
तो हमारे भाई लोग, शराब खानेमे तशरिफ नही लाते. इसलिये डरणेकि कोही बात नही.
त्यावेळी.. एक मोठा सुस्कारा टाकत, तो भाईजान मला म्हणाला.
नही यार.. लेकीन ये गलत है..!
शेवटी मी सुद्धा वैतागलो आणि त्या व्यक्तीला म्हणालो..
भाईसाहब.. मी मुस्लीम व्यक्ती नाहीये. तुमची बोळवण करावी म्हणून मी तुमच्या होकारात होकार मिळवला. हे माझ्या हातावरील गोंदण बघा. आहे ना, ओम लिहिला आहे ना.
झालं आता तुमचं समाधान..!
शेवटी त्या व्यक्तीने सुद्धा माघार घेतली. आणि तो त्याच्या टेबलवर जाऊन बसला.
तसा काही हा खास विषय नव्हता, पण आपल्या बिरादरीतील व्यक्ती दारू पीत आहे हे पाहून, त्याने सगळी शहानिशा करून घेतली. हे मला फारच अद्भुत वाटलं.
आमचा वार्तालाप संपल्यावर, तो व्यक्ती त्याच्या टेबलवर जाऊन बसला. काही वेळात, त्याच्या मित्रांचा कार्यक्रम उरकला. त्यानंतर एक मजेदार गोष्ट घडली, बारच्या बाहेर जाताना.. तो व्यक्ती, गुपचूप नजरेनेच, मला " आदाब " करून निघून गेला..!
पण.. या विषयाला आता मी फार कंटाळलो आहे.
या सगळ्या त्रासाला वैतागून, आता.. मी, ती मुसलमानी दाढीच काढून टाकली आहे..!



दोनेक वर्षांपूर्वी मी राजस्थान फिरायला गेलो होतो..!
वेळेअभावी आमेरचा किल्ला मला अगदी दुरूनच पहावा लागला. पण तो किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. तिथे अजुही राजे लोक वास्तव्यास आहेत. त्यानंतर, जयपूर मधील आणखीन एक अंबरचा किल्ला तो सुद्धा आम्ही दुरूनच पाहिला. त्या किल्ल्यात अजूनही, राज घराण्यातील लोकं वास्तव्यास आहेत. तो किल्ला वर्षातून एकदा फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आम जनतेसाठी खुला केला जातो. कारण त्या किल्ल्यात, महादेवाचं फार पुरातन मंदिर आहे. असं माझ्या ऐकण्यात आलं होतं.
इतिहास व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतं. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. पण वेळेअभावी तो किल्ला मला पाहता आला नाही जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. हि सगळी ऐतिहासिक स्थळं पाहत असताना. तिथे असणाऱ्या गाईडने मला प्रश्न विचारला. तुम्ही कोठून आला आहात..?
आम्ही महाराष्ट्रातील आहोत, असं मी त्याला सांगितलं..!
त्यावेळी तो गाईड मला म्हणाला, तुमच्या इथे सुद्धा फार सुंदर सुंदर किल्ले आहेत. पण मी असं ऐकून आहे, कि हल्ली त्या किल्ल्यांची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
मी सुद्धा त्याला माझा होकार कळवला, आणि त्याला विचारता झालो. राजस्थान आणि महाराष्ट्रातील किल्ले साधारण एकाच कालखंडातील आहेत. तर मग आमच्या येथील किल्ल्यांची पडझड झाली, आणि राजस्थानातील किल्ले अजूनही सुस्थितीत आहेत. यामागे नेमकं काय कारण असावं..?
तर तो गाईड मला म्हणाला.. राजस्थानात त्याकाळी, राजपुत राजे आणि मुस्लीम राजे एकमेकांशी रोटीबेटी व्यवहार करायचे. म्हणजे, आपल्या मुली एकमेकांच्या घरी विवाह करून पाठवायचे. त्यामुळे, नातेसंबंधांचा खूप फायदा व्हायचा. आणि पर्यायाने एकमेकांवरील आक्रमणं होत नसायची. युध्द होत नसल्याने किल्ल्यांची नासधूस होत नसायची. त्यामुळेच, आजच्या घडीला राजस्थानातील किल्ले अगदी सुस्थितीत आहेत. त्यामानाने, महाराष्ट्रात मुस्लीम आणि मराठा जमातीत रोटीबेटी व्यवहार न झाल्याने.. युद्ध, मानवी शिरच्छेद आणि त्याचबरोबर बहुतांशी किल्ल्याचं सुद्धा अपरिमित असं नुकसान झालं आहे.
खरोखर.. त्या गाईडचं म्हणणं मला पटत होतं. पण शेवटी फिरून माझं मन पुन्हा मेवाड प्रांतात आलं. मुस्लीम आणि राजपुत लोकांत, त्याकाळी रोटीबेटी व्यवहार होत होते. तर मग, अल्लाउद्दीन खिलजी बरोबर युद्ध हरल्यावर काहीतरी तह नक्कीच झाला असता.
कि.. राणी पद्मावतीला या गोष्टीची अगोदर पासूनच कुणकुण लागली असावी. कि न जाणो, युद्ध हरल्यावर आपल्या सोबत सुद्धा काहीतरी आक्रीत घडू शकतं. कदाचित, भविष्यातील या गोष्टीचा अंदाज आल्यामुळेच, राणी पद्मावतीने तिच्या तमाम दासीसोबत जोहरचा मार्ग पत्करला असेल का..?


मन्या.. नेहमीप्रमाणे आज सकाळीच मजबूत 'टाकून' आला होता. आरोग्य विभागात, या गोष्टी काही नवीन नाहीत. घाणीचं काम करावं लागतं, त्यामुळे या विषयात त्यांना एकप्रकारची अलिखित मुभा दिलेली असते.
काम संपवून, साफ सुतरा होऊन, दहाच्या हजेरीला तो आला होता. आजचा, त्याचा जरा वेगळाच मूड दिसत होता. नेहमीप्रमाणे, नमस्कार करण्याकरिता त्याने मला आवाज दिला.
नमस्कार साहेब..! 
मी सुद्धा त्याला नमस्कार केला.
साहेब चखना खाणार का..?
कधी कधी मूडमध्ये असल्यावर तो मला हा प्रश्न विचारायचं धाडस करायचा.
मी, माझ्या लिखापडीच्या कामात होतो. त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष नसल्या सारखं केलं.
थोड्यावेळाने पाहिलं.. तर, तो अजूनही माझ्या समोरच उभा होता.
शेवटी मी त्याला म्हंटल, काय खातोयेस रे चखना..?
आ sss साहेब, मी काय बी सटर फटर खात नसतोय..!
मी मनात विचार केला. आता चखना म्हणून हा नेमक काय खात असेल...?
दहा वीस रुपयाची 'हातभट्टी' मारणारा माणूस, चखना असा काय खात असणार आहे...?
शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे.. नेमकं काय खात असेल तो ?
आता बाकी माझ्या मनातील कुतूहल जागृत झाल. मी म्हणालो, मन्या बघू काय खातोयेस...!
माझं वाक्य संपतं न संपतं तोच, त्याने.. खिशातून पावशेर भर खरावलेले काजू असलेली प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. हे पाहून मी तर, अवाकच झालो.
पाचशे रुपये किलोची वस्तू, हा गडी चाखण्याला खातोय...?
माझ्या घरातील किराणा माल भरताना, महिन्याला मी जेमतेम हजार बाराशे रुपयाचा सुखा मेवा खरेदी करत असतो.
आणि, याला रोजच्या रोज काजू खायला कसे परवडत असतील...?
माझ्या डोक्यात, विचारांची गर्दी झाली होती.
मी, त्या विचारांकडे दुर्लक्ष केल. आणि, त्याने समोर धरलेल्या पिशवीमधील काही काजू उचलले. आणि, तोंडात टाकले. मन्याला हि बरं वाटलं.
शेवटी, मी त्याला विचारलच...!
तुला रोजच्या रोज काजू खायला कसं परवडतं..?
त्यावर तो म्हणाला, साहेब.. माझ्या घरात डबेच्या डबे भरून.. काजू, बदाम, मनुके असत्यात. कशाची म्हणून कमतरता नसती. माझी बायकू..
" मंगल कार्यालयात "
सयपाक्याच्या हाताखाली कामाला आसती. ती तिथून रग्गड माल आणत असती. कशाचीच कमतरता नसती बघा. हे सगळं ऐकून, मी कपाळावर हात मारून घ्यायचाच बाकी राहिलो होतो.
लग्न कार्यालय.. यजमानांनी केलेली धावपळ, पै पै जमा करून लग्नासाठी जमवलेला पैसा, लग्न कार्यात स्वयंपाक चांगला आणि रुचकर व्हावा म्हणून किराणा मालात भरपूर आणलेला सुखा मेवा, सगळं काही क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. शेवटी जाऊदेत म्हंटल, जास्ती विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता.
काही गोष्टींना खरोखर पर्याय नसतो,
दारू प्यायल्याने एकसारखी त्याच्या तोंडाची टकळी चालूच होती. शेवटी नाईलाजाने त्याची बोलबच्चन ऐकत-ऐकत,
फुकटात मिळालेले खमंग असे ते खरावलेले काजू, एक-एक करत मी सुद्धा माझ्या घशाखाली उतरवत होतो..!


मध्यंतरी.. माझ्या एका मित्रासोबत गप्पा मारत मी उभा होतो.
तितक्यात माझ्या ओळखीतला अजून एक दुसरा मित्र, जो साधारण वयाची पन्नाशी ओलांडलेला आहे. त्याने मला आवाज दिला,
काय भाऊ काय चालु आहे..! मी सुद्धा त्याला ठीक आहे म्हणालो. आणि, तो मित्र आल्या पावली पुन्हा त्याच्या कामाला निघून गेला.
तो मित्र निघून गेल्यावर.. माझ्या सोबत बसलेला मित्र मला म्हणाला.
हा मनुष्य तुझ्या ओळखीचा आहे का..?
मी हो म्हणालो, कारण तो मित्र माझ्या फार जुन्या ओळखीतला होता..!
त्यावर माझा पहिला मित्र मला म्हणाला,
अरे, हा एक नंबर " चीटर " आहे..!
हे ऐकून मला थोडा धक्काच बसला.
आणि.. त्या मित्राची बाजू सावरत मी त्याला म्हणालो. नाहीरे, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. हा खूप चांगला मनुष्य आहे. कोणीही कोणतंही काम सांगू द्या, तो कधीही नाही म्हणत नाही. सदैव कामाला तत्पर असतो. सदा हसत खेळत असतो. आजवर त्याने कोणाला फसवलं आहे. असं माझ्या तरी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाहीये.
त्यावर तो मित्र म्हणाला.. तू समजतो आहेस तो चीटर म्हणजे फसवणूक झाली, असच ना..!
मी सुद्धा त्याला माझा होकार कळवला. तर तो मित्र म्हणाला, मी म्हणतोय तो चीटर हा प्रकार जरा वेगळा आहे. आता बाकी माझे सुद्धा कान टवकारले. कि, हा चीटर म्हणजे नेमका काय प्रकार आहे..?
तर हा विषय असा होता..
पुण्यातील काही गार्डनमध्ये, प्रेमी युगुल लपूनछपून " मज्जा " मारत असतात. त्यावेळी त्यांना कसलच भान उरत नाही. ते दोघेही एकमेकात एकरूप झालेले असतात. आपल्याला, नको त्या अवस्थेत कोणीतरी पाहत आहे. याचं सुद्धा त्यांना भान उरत नाही.
अशावेळी, गार्डनमध्ये फिरण्याच्या बहाण्याने. हा कामुक प्रणय प्रसंग चोरून पाहणाऱ्या व्यक्तींना चीटर असं म्हणतात. ( खरं सांगायला गेलं तर, असे छुपे कामुक प्रसंग पाहून त्यातच समाधान मानणारे व्यक्ती, एका विशिष्ट आजाराचे बळी असतात. ) हि माहिती मला परवा नव्यानेच मिळाली. पण चीटर नाव ऐकून, कोण कोणाला काय नाव ठेवेल त्याचा बिलकुल नेम नाही. याची मला पुन्हा एकदा खात्री झाली.
असो.. तुमच्या भागातील ठराविक भागात, किंवा गार्डनमध्ये सुद्धा असले प्रकार सर्रास घडत असतील. आमच्या पुण्यात, अशा प्रेमी युगुलांसाठी.. संभाजी बाग, बंड गार्डन आणि एम्प्रेस गार्डन अशी तीन प्रसिद्ध ठिकाणं आहेत. तुमच्या भागात सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत का..? आणि जर असतील तर ती कोणती..?
आणि त्याच बरोबर, त्या भागात सुद्धा अशी चीटर लोकं सुद्धा नक्कीच असतील. तर.. तुमच्या भागात, या " चीटर " लोकांना काय म्हणतात..?

Sunday, 18 February 2018

माझे वडील सुद्धा.. मदिरेचे फार मोठे शौकीन होते...!
त्यांच्या बैठकीत, आमच्या कराड भागातील त्यांचे काही जुने मित्र होते. ते सगळे मित्र सुद्धा, पुण्यामध्ये अगदी चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारे होते. त्यातील एक मित्र तर, चक्क एका कॉलेजमध्ये प्राचार्य होते. बाकी इतर मित्र, पिंपरी भागातील नामांकित कंपन्यांमध्ये कामाला होते. यांच्यातील एक तरुण मित्र, नव्यानेच उद्योग धंद्यात उतरला होता. तो एमआयडीसीत छोटी मोठी कामं घेऊ लागला होता. तर.. माझे वडील, वीट कारखानदार होते.
हि सगळी मंडळी.. बक्कळ पैसा कमवणारी होती. पण मदिरा पिण्याच्या बाबतीत या सर्वांची आवड म्हणजे.. हे सगळे मित्र, हातभट्टीच्या दारूला प्रथम पसंती द्यायचे. त्यांची हातभट्टीच्या दारूला पसंती का होती..? ते मला माहित नाही..
( त्यावेळी आमच्या गावात, देशी, विदेशी दारूचं दुकान नव्हतं. कदाचित हे एकमेव कारण असावं.) पण जेंव्हा, मी स्वतः हौशी मद्यपान करू लागलो. तेंव्हा, ते गणित मला समजलं.
आपण जसजशी महागडी दारू प्यायला जाऊ. त्यावेळी, आपल्याला त्या दारूचा स्वाद अगदी हातभट्टीच्या दारूसारखा मिळतो. हे सगळं, मी माझ्या अनुभवांती सांगतोय.
कारण.. एक गंमत म्हणून, हलक्या, महाग देशी, विदेशी सगळ्या प्रकारच्या मदिरा मी प्राशन केल्या आहेत. आता मात्र, हातभट्टीच्या दारूमध्ये फार मोठ्या प्रमाणत भेसळ होत असते. असं मी ऐकून आहे.
त्यावेळी.. आमच्या गावामध्ये, एका व्यक्तीचा हातभट्टीचा दारूचा फार मोठा धंदा होता. पिळदार मिशा, आणि भारदस्त शरीरयष्टी असणारा तो शेठ, अधिकृत सरकारी दुकान असल्या सारखं, तिथे हातभट्टीची दारू विक्री करायचा.
ते ठिकाण म्हणजे, दहा पंधरा गुंठ्याचा फार मोठा परिसर होता. त्यात, त्या शेठचा घोड्यांचा तबेला सुद्धा होता. तो व्यक्ती रेसचा सुद्धा फार मोठा शौकीन होता. खास दारू विकण्यासाठी, सिमेंटच्या बांधकामात तयार केलेली एक विशिष्ट प्रकारची रूम त्याने बांधून घेतली होती.
तिथे मस्तपैकी शटर आणि काउंटर करून, त्याचे कामगार लोकं तिथे दारू विक्री करायचे.
जर्मलच्या तवली मध्ये किंवा प्लास्टिकच्या मग मध्ये तिथे दारू दिली जायची. आणि मग, दोन चार लोकं मोकळ्या जागेत घोळका करून तिथे मदिरेचा यथेच्छ आस्वाद घ्यायचे. तर कोणी, पार्सल घेऊन जायचे.
त्यावेळी दारू पिताना मिळणारा चखना काय असायचा..?
तर, तव्यावर भाजून खारवलेले कडक हरभरे मिळायचे. यापलीकडे आणखीन एक दुसरा चखना म्हणजे. काही घाईघाईने दारू पिणाऱ्या लोकांसाठी.. तिथे बाजूलाच, जाड्या मिठाचं एक भलं मोठं पोतंच ठेवलेलं असायचं. ती घाईमध्ये असणारी कष्टकरी लोकं, दारूचा एक ग्लास मारायचे. आणि, कडवट झालेल्या तोंडाची चव बदलन्यासाठी. तिथे असणाऱ्या पोत्यातून, मिठाचा एक खडा जिभेला चाटवायचे. तर काही लोकं, घरून येताना कागदाच्या पुडीत थोडी मिरची पावडर घेऊन यायचे. याव्यतिरिक्त.. तिथे मी कधीच, कोणाला चांगला चुंगला चखना घेऊन दारू पिताना पाहिलं नाही.
त्यावेळी आमच्या परिसरात.. काही तिबेटी महिला सुद्धा राहायला होत्या. मुंबई पुणे रोडवर त्यांची स्वेटर विक्रीची दुकानं असायची. त्या सुद्धा कधीकधी मदिरा प्राशन करायच्या. पण दारू आणायला बाईने कसं जावं..? त्यामुळे, कधी कधी मला किंवा माझ्या भावाला चार, आठाण्याची लाच देऊ करून. त्या आम्हाला दारू आणून द्यायला सांगत असत.
त्यावेळी.. मी काहीतरी दहा वर्षांचा असेल. तेंव्हा, हातभट्टीच्या दारूची एक मोठी बाटली पाच रुपयाला मिळायची.
या नेपाळी बाया सुद्धा हि दारू पीत आहेत. शिवाय माझे वडील आणि त्यांचे उच्चपदस्थ मित्र सुद्धा हीच दारू पीत आहेत. म्हणजे, या दारूमध्ये नक्कीच काहीतरी विशेषता असणार आहे. हे मी त्या कोवळ्या वयातच ताडलं होतं. पण त्या नेपाळ्या बायांना दारू आणून देताना, मी कधीही त्या दारूला चाखून पाहण्याचा चोरटा प्रयत्न केला नव्हता. हे मी इथे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.
एकदा आमच्या घरी कोणीच नव्हतं. आई आणि मोठे भाऊ कुठेतरी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यादिवशी, माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना घेऊन आमच्या घरातच बैठक मांडली होती. मी खूप लहान असल्याने, माझ्या तिथे असण्याचा त्यांना काहीच अडसर नव्हता. त्यावेळी, यांच्यामध्ये छोटी मोठी कामं घेणारा हा एक मित्र एकटाच काय ते अविवाहित होता. आणि तसा तो या सगळ्यांपेक्षा वयाने लहान सुद्धा होता. हा बिचारा स्वतः घरी जाऊन, हाताने स्वयपाक बनवून खायचा. हा त्याचा रोजचा नित्यक्रम होता.
तर, त्यादिवशी.. घरी गेल्यावर काहीतरी ओमलेट पाव वगैरे खाण्याचा त्याचा मानस असावा. त्यामुळे, आमच्या घरी येतानाच तो त्याच्या सोबत ब्रेडचा पुडा घेऊन आला होता. या सर्वांची मेहेफील रंगात आली होती. ग्लासावर ग्लास रिचवले जात होते. आणि अचानक मी पाहतो तर काय,
तो सिंगल्या काका, चक्क हातभट्टीच्या ग्लासात ब्रेड बुडवून खात होता. बहुतेक त्याला भूक सहन झाली नसावी. त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असावं. बापरे, हा सगळा प्रकार पाहून मी तर भलताच परेशान झालो. कारण, हा प्रकार मी अगदी नव्यानेच पाहत होतो.
आज माझे वडील हयात नाहीत, आणि त्यांचे सगळे मित्र सुद्धा देवलोकी निघून गेले आहेत. पण तो सिंग्ल्या काका अजून हयात आहे.
त्यावेळचे सिंगले, पैश्याला पैसा लावण्यासाठी खूप काही सहन करायचे. पैसा जपून ठेवायचे. वेळप्रसंगी वरील प्रकार सुद्धा करायचे.
पण आजच्याला.. नवीन पिढीमधील सिंगले, बेचलर म्हणून.. आई बापाच्या आशीर्वादाने, त्यांच्या पैशावर जबरी मजा उपभोगत असतात..!