Friday, 4 September 2015

उपवास..

लहानपणी आमच्या घरचे लोक मला उपवास धरू देत नव्हते. कारण, ते आमचं खायचं वय आहे. आणि, त्यात हे उपवास कशाला..? हा त्यापाठीमागचा मूळ उद्देश..
पण म्हणतात ना.. येऊ नकोस, तर कोणत्या गाडीत बसू. 
त्यावेळी माझी, काहीशी अशातली गत होती. नको म्हंटलं तरी मी मुद्दाम उपवास धरायचो..
मी लहानपणी उपवास धरण्याच एकमेव कारण म्हणजे...
" साबुदाण्याची खिचडी..! "
मला काय, इथे असणाऱ्या जवळ-जवळ सगळ्याच मित्रांना लहानपणी साबुदाण्याची खिचडी आवडत असणारच. तर, लहानपणी मला उपवासाची खिचडी खूप आवडायची. पण घरामध्ये, फक्त उपवास धरणाऱ्या व्यक्तींपुरतीच खिचडी बनवली जायची. 
त्यामुळे, जेवताना मला काही खिचडी मिळायची नाही. नाही म्हणता, जेवण करत असताना. माझी आई, तिच्या डिशमध्ये असणाऱ्या खिचडीतले दोन चार चमचे खिचडी माझ्या ताटात मुद्दाम टाकायची. तेवढाच, जेवणाचा स्वाद वाढायचा. 
भरपूर खिचडी खायला मिळावी. म्हणून, लहानपणी मी वर्षातली मोठी एकादशी आणि महाशिवरात्र ह्या दोन उपवासांची अगदी आतुरतेने वाट पाहायचो. 
साबुदाणा, उकडलेला बटाटा, खरपूस शेंगदाणे घालून बनवलेली खिचडी दोन टाईम मनसोक्त हादडायचो. कारण, हे दोन्ही उपवास उपवास दुसऱ्या दिवशी सुटायचे. काहीवेळेस, माझी आई रात्रीच्या वेळी वरयाचा भात आणि दाण्याची आमटी करायची. पण, मला काही ती आवडायची नाही. पण सांगता कोणाला, मुकाट्याने खावी लागायची. पण खूप मजा वाटायची. 

त्यावेळी, आमच्या मोठ्या कुटुंबात साबुदाण्याची खिचडी हा चैनीचा विषय होता. दिवस काही राहत नाहीत. कालांतराने.. मी मोठा झालो, कमावता झालो, माझं लग्न झालं. 
आणि एकदा, रविवारी सुट्टीच्या दिवशी नेमकी संकष्टी चतुर्थी आली. मी मस्त बेत आखला, आणि घरीच गरमागरम साबुदाणा वडे बनवले. 
त्यादिवशी, मी मनसोक्त साबुदाने वडे खाल्ले. जशी संध्याकाळ झाली, तसं माझ्या पोटात दुखू लागलं. साबुदाणा पचायला खूप जड, म्हणून त्याच्या सोबत दही खायचं असतं. हे मी साफ विसरून गेलो होतो. माझं पोट टम्म फुगलं. वायू सुद्धा विसर्जित होत नव्हता. त्यादिवशी, उपवास सोडायचा म्हणून कसाबसा मी फक्त वरण भात खाल्ला.

त्यानंतर.. वारंवार पोटाच्या तक्रारी वाढू लागल्या. आणि त्यामुळे, साबुदाण्याची खिचडी माझ्यापासून खूपच दुरावली गेली. आता, रोज म्हंटलं तरी मी ती साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो. पण म्हणतात ना, 

" घर भरलं आणि तोंड धरलं..! " 

हे अगदी खरं आहे. प्रत्येक श्रवणात, माझे महिनाभर उपवास असतात. पण मी, कधीही साबुदाण्याची खिचडी खात नाही. जास्तीच भूक लागली, तर एखादं फळ खातो. किंवा वेफर्स वगैरे तोंडात टाकतो. शरीराला जास्ती त्रास देत नाही. नाहीतर, मी अगदी कडकडीत उपवास करतो.

लहानपणी काही मंडळींना, उपवासात मी भरमसाठ खाताना पाहायचो. आणि कुतूहल म्हणून मी माझ्या आईला विचारायचो, 
आई... हि लोकं उपवासाला इतकी का खातात गं..? 
त्यावर, माझी आई तिच्या ग्रामीण भाषेत मला सांगायची. 
अरे देव म्हणतो... दिवसभर चर पण माझं वर्त ( व्रत ) कर..!

आईचे ते भोळे भाबडे शब्द मला अजूनही जसेच्या तसे आठवतात. पण आता, चरायचे दिवस राहिले नाहीत. हायब्रीड आणि जंक फूड खाण्यामुळे पोटाच्या तक्रारी मध्ये कमालीची वाढ झाली आहे. पूर्वीच्या लोकांनी, खाण्याच्या बाबतीत भरपूर मज्जा केली. काळानुरूप, ती आज आम्हाला अनुभवता येत नाही. हे सुद्धा, ह्या सुधारित जीवनशैलीतलं एक कटू सत्य आहे.


   

No comments:

Post a Comment