Tuesday, 26 December 2017

आज बऱ्याच वर्षांनी, काही वेळापूर्वी बाईक वरून घरी येत असताना, ट्राफिक पोलिसाने मला अडवलं.. शिट्टी मारून, त्या पोलिसाने मला गाडी बाजूला घ्यायला लावली..
थोडसं ट्राफिक जाम होतं, मागून लोकं हॉर्न वाजवत होते. आणि त्या गडबडीत, बाईक बाजूला घेत असताना नेमका माझा थोडासा तोल गेला. मी गाडी बाजूला घेतल्यावर, तो पोलीस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला..
घेतलीय का..?
मी म्हणालो.. हो घेतलीय कि..!
मी जसं त्याला घेतलीय म्हणालो.. तसा त्याचा चेहेरा एकदम फुलला. कारण, ड्रिंक अँड ड्राईव मध्ये मी पकडलो गेलो होतो. मग त्या पोलिसाने, त्याच्या हाताची मुठ वळली. आणि मुठीचा चपटा भाग माझ्या तोंडाला लावला, आणि म्हणाला..
जोरात फुंकर मारा..!
मी जोरात त्या मुठीवर फुंकर मारली. त्यानंतर त्याने, ती मुठ त्याच्या नाकापाशी नेली. आणि तिचा वास घेतला, मुठीला दारूचा वास काही आला नाही.
मग तो म्हणाला... दारूचा वास तर येत नाय कि.. मग तुम्ही कसं म्हणालात घेतलीय म्हणून..?
मग मी त्याला.. माझ्या बॅगमधील कॉटर काढून दाखवली. आणि म्हणालो.. हे काय, घेतलीय कि. आता घरी गेल्यावर निवांत घेणार..!
माझ्या या वाक्यावर तो पोलीस असला वैतागला म्हणून सांगू, आणि रागा रागात तो मला म्हणाला..
हा काय मस्करी करायचा टाईम आहे का..?
मी म्हणालो.. अहो साहेब मस्करी कसली, तुम्ही माझी बॅग चेक केली असती. तर त्यात तुम्हाला हि कॉटर घावली असती का नसती..? त्यामुळे, या चेकिंगच्या भीतीने मी तुम्हाला खोटं बोललो नाही.
शेवटी रागारागाने तो मला म्हणाला.. जावा-जावा, तुम्ही लई शाहने आहात. आता लवकर जावा इथून.
मी पुन्हा त्याला म्हणालो.. साहेब लायसन्स दाखवू का..?
तर म्हणाला.. जावा कि राव आता, कशाला माझं डोकं खाताय, कोण भेटलं नाही का तुम्हाला आज दिवसभर..?
शेवटी.. मी सुद्धा, त्या तरुण पोलिसाची जास्ती फिरकी न घेता, पटकन तिथून काढता पाय घेतला.

डोक्यावर नाहीयेत, म्हणून.. निदान हनुवटीवर तरी ठेऊयात.. असा विचार करून, वर्षभरापूर्वी मी विशीष्ट प्रकारची मुसलमानी दाढी ठेवायला सुरवात केली. आणि काही दिवसातच मला ते चांगलं शोभून सुद्धा दिसायला लागलं.
कामाला पुण्यात असल्याने, मी घरी फक्त झोपायला आणि जेवायला येतो. असं म्हणलं, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण सकाळी आठ वाजता कामाला गेलं, कि रात्री आठ नऊ वाजता घरी परतायचं. त्यामुळे, घरी येऊन फक्त जेवायचं आणि झोपायचं. हाच माझा नित्यक्रम झाला आहे.
सुरवातीला दाढी कोरण्यासाठी, मला आमच्या कामात असणाऱ्या एका मित्राने खूप गळ घातली..
म्हणाला, कुंभार साहेब.. तुम्ही दाढीला कट मारून घ्या, मस्त दिसेल तुम्हाला..!
आणि लागलीच मला तो, त्याच्या फेवरेट न्हाव्याकडे घेऊन गेला..
सिकंदर..
पाच, सव्वापाच फुट उंचीचा काळासावळा आणि किरकोळ शरीरयष्टीचा सिकंदर. त्याच्या कामात भलताच तरबेज होता. तसा तर हा सिकंदर मुळचा युपी मधील मुलगा आहे. पण जन्माने पुणेकर असल्याने, तो अगदी सुटसुटीत मराठी बोलत होता. मी त्या खुर्चीवर बसत, माझा चेहेरा त्याच्या हवाली केला.
तो म्हणाला.. बोला साहेब, कोणता कट मारू..?
मी म्हणालो, माझ्या चेहेऱ्याला कोणता कट सूट होईल, तो मारा..!
तर त्याने, हा विशिष्ट प्रकारचा, अवघड आणि दिसायला खास असणारा कट मारून दिला. तसं पाहायला गेलं तर, हा कट खूप अवघड आहे. दोनचार वेळा, माझ्या रविवारच्या सुट्टी दिवशी. असा कट मी आमच्या येथील न्हाव्याकडे मारण्याचा प्रयत्न केला. पण नाही, त्या लोकांचे हात लटपट करायला लागले. शेवटी मी सुद्धा.. सिकंदरच्या सुट्ट्या ध्यानात ठेऊन, फक्त त्याच्याकडूनच दाढी करून घेऊ लागलो. ओठा खालचं कोरीवकाम करण्यासाठी, त्याने कधीही मला ओठाच्या आतील बाजूस आतून जीभ लाऊन तो विशिष्ट भाग उचलून धरायला लावला नाही. नाहीतर सर्रास न्हावी, हे काम करताना.. " आतून जीभ लावा " असा आदेश सोडत असतात.
ढोले पाटील एरिया तसा फार हायफाय आहे. तरी सुद्धा त्यामानाने त्या एसी सलूनमध्ये, दाढी करायला फक्त सत्तर रुपये चार्ज आकारला जातो. ( बाकी ठिकाणी हा चार्ज पन्नास रुपये आहे. ) आणि मी सुद्धा, स्वखुशीने देत असलेली दहा रुपये टीप. आठवड्यातून दोनदा माझा हा खर्च ठरलेला होता.
सिकंदर त्याच्या कामात खूपच माहीर आहे. याचं एक उदाहरण म्हणजे, मी एकदा रात्रीच्या वेळी दाढी करायला बसलो होतो. तेंव्हा अचानक लाईट गेली, म्हणजे त्या भागात दिवसभर लाईट नव्हती. आणि माझी दाढी करणं चालू असताना, नेमका जनरेटर बेकप सुद्धा संपला.
माझी दाढी अर्धवट झाली होती. पण त्या बहाद्दराने, मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात माझी दाढी करून दिली. ती सुद्धा अगदी परफेक्ट.
आत्ता चार दिवसांपूर्वी मी फोन करून त्याच्याकडे दाढी करायला गेलो होतो. कारण, त्याला फार बुकिंग असते. फोन करून गेलं तर ठीक, नाहीतर दोन चार तास मोडायची शक्यता असते.
तर.. दाढी करता करता तो मला म्हणाला. शेठ, तुमची दाढी करायला आता तुम्हाला नवीन माणूस शोधायला लागेल. मी हे काम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला निघालो आहे.
हि वार्ता ऐकून, नाही म्हणता मला फार आनंद झाला. दोनपाच वर्ष तिकडे काम करून आल्यावर. तो चांगला गडगंज होईल. त्यामुळे मी सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या. पण काही कारणास्तव त्याचं विदेशी जाणं लांबणीवर पडलं. सध्या तो मुंबई मध्ये, वर्षभर काम करून बऱ्यापैकी इंग्रजी बोलायला येऊ लागल्यावर पुढील प्रयास करणार आहे.
आता.. दाढीला अगदी असाच कट मारणारा न्हावी कुठे शोधावा..?
म्हणून, आमच्या गावातील एका न्हाव्याच्या दुकानात मी दाढी करायला गेलो. दाढी झाल्यावर, त्याला बगल साफ करून दे म्हणालो. तर म्हणाला, बगल साफ करायला पन्नास रुपये चार्ज आहे. आयला.. हि तर कमालच झाली.
पुण्यातील हायफाय एरियातील दुकानात, हि सेवा मला अगदी मोफत आणि विनातक्रार मिळत होती. तेच आमच्या गावठाणात, या विषयाला भलताच भाव आला होता.
तो विषय मी तिथेच सोडून दिला, आणि दाढीचे पैसे किती झाले म्हणून विचारलं. तर तो न्हावी म्हणाला शंभर रुपये झाले. मी पुन्हा एकदा आश्चर्य चकीत झालो. नकली काम करण्यासोबत इथे रेट सुद्धा खूपच हायफाय होते. आता पुन्हा कधीच मी त्या दुकानात दाढी करायला जाणार नाही.
माझं आता फक्त एकच काम चालू आहे. नवनव्या दुकानात जाऊन, मी वेगवेगळ्या न्हाव्यांची ट्रायल घेत आहे. जोवर, मला.. खरा, मुकद्दर का " सिकंदर " सापडत नाही तोवर..!

Saturday, 23 December 2017

माझ्या सरकारी नोकरीतील दहाएक वर्षांचा काळ, हा.. पुणे स्टेशन परिसरातील भागात गेल्याने. त्या भागात घडणाऱ्या, विविध प्रकारच्या लुटमारीच्या घटना मला सातत्याने पाहायला मिळाल्या. त्यातील काही विशेष घटना, मी क्रमशः तुम्हाला सांगू इच्छित आहे.
पुणे स्टेशन परिसरात, अतिक्रमण होऊ नये म्हणून. त्या भागात आम्ही फिक्स पॉईंट लाऊन घ्यायचो. दिवसभर, त्या परिसरात पेट्रोलिंग करत काही वेळानंतर एका ठराविक ठिकाणी आम्ही थांबून घ्यायचो. हे असं अधूनमधून चालूच असायचं.
दुपारची वेळ होती. मी माझ्या गाडीमध्ये पुस्तक वाचत बसलो होतो. पुस्तक वाचून थोडा कंटाळा आला म्हणून आसपासच्या बाजूस थोडं निरीक्षण करत असताना. अचानक एक अप्रिय घटना माझ्या नजरेस दिसली.
अंदाजे साठी ओलांडलेला एक सभ्य दिसणारा गृहस्थ, रस्त्याने निघाला होता. दुपारची वेळ असल्याने, रस्त्यावर वर्दळ थोडी कमीच होती. तो वृद्ध व्यक्ती माझ्या गाडीपासून थोडा पुढे निघून गेला. आणि लागलीच, त्याच्या पाठोपाठ वीसेक वर्षांचा एक मुलगा आला. त्या मुलाने, म्हाताऱ्याला पकडलं. आणि काहीच कारण नसताना त्याला मारायला सुरवात केली. हा प्रकार मला काही समजला नाही. माझ्या गाडीत असणारे सगळे कर्मचारी, जेवण करायला गार्डनमध्ये गेले होते. त्यामुळे मी एकटा या भांडणात पडू शकत नव्हतो.
म्हाताऱ्याला तर काहीच समजत नव्हतं, कि हा नेमका काय प्रकार घडतोय..? तितक्यात, त्या मुलाच्या पाठोपाठ आणखीन एक मुलगा तिथे आला, आणि पहिल्या मुलाला म्हणाला..!
- क्या हो गया रे..? तर, तो पहिला मुलगा म्हणाला,
- अरे, इसने मेरे बहेन को छेडा..!
असं म्हणताच.. त्या मुलाने सुद्धा, त्या म्हाताऱ्याला दोन झापड्या लगावल्या. तो म्हातारा त्यांना हात जोडून सांगत होता. मी काही केलं नाहीये, पण ती मुलं काही ऐकायलाच तयार नव्हती. नंतर त्यातील एका मुलाने, त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे दोन्ही हात मागील बाजूस घट्ट धरून ठेवले. आणि दुसऱ्या मुलाने, त्या व्यक्तीच्या पँटचे खिसे चाचपायला सुरवात केले. आणि नेमका त्या म्हाताऱ्याच्या खिशातून त्यांना पैशाचा भलामोठा गठ्ठा सापडला. तसं त्यांनी, त्या म्हाताऱ्याला जोरात एक लात घातली. तो म्हातारा खाली पडला. आणि अगदी चपळाईने पलीकडच्या बाजूला एक रिक्षा आली. आणि हि दोन्ही मुलं पटकन त्या रिक्षात बसली, आणि त्यांनी तेथून पोबारा केला. हा सगळा प्रकार, फक्त एका मिनिटात घडला आणि संपला सुद्धा.
हा प्रकार घडत असताना, त्या रोडवरून बरीच लोकं येजा करत होते. पण त्यातील कोणीही त्यांना हटकायचा प्रयत्न केला नाही. माझ्यासाठी हा सगळा प्रकार अगदी नवीन होता. काय करावं मला समजत नव्हतं. शेवटी धीर एकवटून, मी गाडीच्या खाली उतरलो. आणि त्या वृद्ध व्यक्तीला उचलून उभं केलं. माझ्या गाडीत असणारं पाणी मी त्याला पाजलं. त्यावेळी नकळत, मला त्या व्यक्तीच्या तोंडाचा वास आला. तो व्यक्ती थोडीशी दारू प्यायला होता. त्या म्हाताऱ्याने, अगदी विनम्रतेने मला हात जोडले, आणि कोणतीही तक्रार न करता तो पुढे निघून गेला.
घडला प्रकार पाहून, माझ्या डोक्यात अगदी मुंग्या पडल्या होत्या, हा वाटमारीतला नेमका कोणता प्रकार असावा..? तेही अगदी दिवसा ढवळ्या..!
काही वेळानंतर, दुरूनच हे सगळं पाहत असणारा त्या भागातील एक जुना जाणकार व्यवसायिक माझ्याकडे आला. त्या व्यक्तीला, सगळे लोकं डॉक्टर म्हणायचे. कारण, पूर्वी तो व्यक्ती ससून हॉस्पीटल मध्ये डॉक्टरच्या हाताखाली कामाला होता.
डॉक्टर मला म्हणाला..
कुंभार साहेब, हे सगळं बघून तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल नाही..! मी हो म्हणालो.. त्यावर डॉक्टर म्हणाला,
" आज तुम्ही हे पाहिलंय. इथून पुढे असलं काही पहायचं सुद्धा नाही. आणि यांच्या मध्ये सुद्धा पडायचं नाही. हि सगळी गर्दुल्ली मंडळी आहेत. नशेसाठी हि लोकं कोणत्याही थराला जातात. त्यांच्या कामात अडथळा आल्यावर ते कोणतंही कृत्य करायला मागेपुढे पाहत नाहीत. "
- मी डॉक्टरला म्हणालो, काय करतील काय ते..?
डॉक्टर म्हणाला.. " ते दुसरं तिसरं काही करत नाहीत. आपल्या तोडावर ब्लेडच्या पात्याने उभा वार करतात, आणि पळून जातात. तोंडावर झालेल्या वाराला टाके सुद्धा घालता येत नाहीत. आणि ती जखम लवकर भरून सुद्धा येत नाही. आपला चेहेरा खूप कुरूप होऊन जातो. रोज आरशात तोंड बघताना, आपल्याला त्या दिवशीची गोष्ट आठवते. आणि आपण स्वतःला कोचत बसतो.
या लोकांसाठी अशा गोष्टी फार किरकोळ असतात. ते नशेच्या पूर्णपणे आहारी गेलेले असतात. जेलच्या वाऱ्या त्यांच्यासाठी काही नवीन नसतात. त्यांचं नेहेमीच आतबाहेर चालू असतं. त्यामुळे, कितीही वाईट वाटलं तरी, तुम्ही या फंदात कधीही पडू नका..! "
आज.. ती डॉक्टर नामक व्यक्ती हयात नाहीये. आम्ही त्यांचे चालू धंदे बंद करायचो. त्यांच्या मनात आमच्या विषयी राग असायचा. पण आम्ही तरी काय करणार..? तो आमच्या नोकरीचा एक भाग होता.
हे सगळं डॉक्टरला समजत होतं. परंतु माझ्या विषयीची त्याच्या अंगातील माणुसकी बिलकुल कमी झाली नव्हती. त्यामुळे अशा बिकट प्रसंगत सुद्धा त्याने मला योग्य तेच मार्गदर्शन केलं होतं.
त्यामुळे.. तुमच्या पैकी कोणीही. तरुण असो किंवा वृद्ध, पुणे स्टेशन परिसरात पैशाची पाकिटं तुम्ही कधीही बाहेर काढू नका. जेणेकरून तुमच्याकडे किती पैसे आहेत, हि कोणाला समजणार नाही. प्रवास करण्यासाठी तिकिटाचे अगदी मोजकेच पैसे वरच्या खिशात ठेवत चला. त्या परिसरात अनोळखी व्यक्तींशी संभाषण टाळा. नाहीतर, तुमच्यावर सुद्धा असा जीवघेणा प्रसंग गुदरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Thursday, 21 December 2017


#दाल ( डाळ ) #पकवान..
आमच्या पिंपरी भागात, सिंधी लोकांचे खाऊचे जे काही छोटेमोठे ठेले आहेत. त्यावर, हमखास मिळणारा हा खमंग पदार्थ. पूर्वी त्या ठेल्यांवर हा पदार्थ मी दुरूनच पाहायचो. पण न जाने का, तो खाण्याची माझी कधीच हिम्मत झाली नाही. पण एकदा, मी मनाशी ठरवलं. आज काहीही झालं तरी, हा पदार्थ आपण खायचाच. मी ज्यावेळी हा पदार्थ खाल्ला, त्यावेळी हे दाल पकवान फक्त दहा रुपयाला होतं. चपातीच्या आकाराची मैद्याची एक कडक आणि कुरकुरीत पुरी ज्याला पकवान असं म्हणतात. आणि त्यासोबत, विशिष्ट पद्धतीने बनवलेलं आणि जरा वेगळ्याच चवीचं वरण, म्हणजेच दाल. चना डाळीच्या या जाडसर वरणामध्ये.. चिरलेला कांदा, चिंचेचं पाणी आणि चाट मसाला घातला जातो. त्यामुळे हि दाल खूपच चटपटीत लागते.
हा पदार्थ घरी बनवायला तसा खूप सोप्पा आहे.
चला तर मग, आज आपण हा नवीन पदार्थ बनवायला शिकुयात. पकवान बनवण्याकरिता, आपल्याला लागणार आहे. चार कप मैदा, तेल, मीठ, जिरे किंवा ओवा, खाण्याचा सोडा आणि पकवान तळण्यासाठी तेल. चार कप मैदा चाळून घ्यावा.. त्यामध्ये तेल, जिरे किंवा ओवा, मीठ पाणी, आणि थोडा खाण्याचा सोडा घालून पीठ मळून घ्यावं.
हे पीठ मळत असताना, एक काळजी घ्यावी. हे कणिक, जास्ती घट्ट किंवा जास्ती नरम नसावं. कणिक मळून झाल्यावर त्याला सुमारे अर्धा तास मुरत ठेवावं. आणि मग, त्या कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करून. सात, आठ इंचाच्या आकारात पुऱ्या लाटून घ्याव्यात. पुऱ्या लाटून झाल्यावर, त्यावर चाकूच्या टोकाने दहा-वीस ठिकाणी नखभर लांबसर टोचून घ्यावं. त्यामुळे, तळताना हि पुरी फुगत नाही. आणि सोबत कुरकुरीत आणि कडक सुद्धा होते. असे सात आठ कडक पकवान ( पुऱ्या ) थोडे लालसर होईपर्यंत कडकडीत तेलामध्ये तळून घ्यावेत.
आता आपण दाल बनवायला घेऊयात.
दाल बनविण्यासाठी आपल्याला खालील सामग्री लागणार आहे.
दोनशे ग्राम चणाडाळ, तेल किंवा तूप, दोन टोमाटो, दोन तीन हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, चीमुठ्भर हिंग, अर्धा चमचा जिरे, चमचाभर.. हळद, धने पावडर, गरम मसाला, चाट मसाला, आणि लाल मिरची पावडर. चवीप्रमाणे मीठ आणि सोबत, चिंचेचा, खजुराचा आंबट गोडसर कोळ, उभा चिरलेला कांदा आणि कोथंबीर.
सुरवातीला.. चणाडाळ दोन तास पाण्यामध्ये भिजवत ठेवावी. त्यानंतर डाळ कुकरमध्ये घालून, त्यात दोन कप पाणी, मीठ आणि हळद पावडर घालून एक शिट्टी करावी. व त्यानंतर हि डाळ तिन ते चार मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी.
तोवर.. दाल बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यावा.
टोमाटो थोडे मोठे मोठे चिरून घ्यावे, टोमाटो, आलं आणि हिरवी मिरची यांना मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावं. कढईत तेल गरम करून घ्यावं, त्यात हिंग आणि जीऱ्याची खमंग फोडणी करून घ्यावी. त्यामध्ये.. हळद, धने पावडर आणि मिरची, आलं, टोमाटो पेस्ट घालावी. हे मिश्रण, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावं. नंतर त्यात, कुकरमध्ये शिजलेली डाळ घालावी. हे सर्व मिश्रण डावाने एकजीव करून घ्यावं. दाल जास्ती घट्ट असल्यास थोडं पाणी घालावं. दोन पाच मिनिटे हि डाळ मंद आचेवर शिजवून घ्यावी. त्यावर, गरम मसाला आणि चिरलेली कोथंबीर पेरून घ्यावी.
सर्व्ह करताना.. एका मोठ्या पसरट वाटीमध्ये दाल घ्यावी. त्यावर पात्तळ उभा चिरलेला कांदा आणि चिंच खजुराचा चमचाभर गोड कोळ घालून, त्यावर चाट मसाला भुरभुरून हि दाल.. कडक आणि खमंग पकवाना सोबत खाण्यास द्यावी.
हि पाककृती तुम्ही घरी नक्की बनवून बघा. खूपच थोड्या वेळात बनणारा हा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्याला अगदी उत्तम. पण कधी वेळ मिळाल्यास, सिंधी केम्पमध्ये जाऊन सिंधी बांधवांच्या हातचा दाल पकवान सुद्धा नक्की चाखून या. त्यांच्या हाताला पाकिस्तानातील सिंध प्रांतामधील एक वेगळीच चव आणि मेहेक असते.

Tuesday, 19 December 2017

गेली दोन तीन वर्ष झाली..
लग्न मंडपात, स्टेजवर.. म्हणजे, नवरा नवरीच्या अगदी समीप असेल तरच. त्या वधूवरांना आशीर्वादित करण्यासाठी मी अक्षता किंवा फुलं घेत असतो.
अन्यथा, हे दोन्ही विषय मी अगदी कटाक्षाने टाळत असतो. समज आल्यावर, प्रत्येक व्यक्तीने याचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही. अन्नाची नासाडी, आणि नको ते अतिरिक्त खर्च हे टाळलेच पाहिजे.
याचबरोबर.. लग्नामध्ये असणारा अजून एक खर्चिक विषय म्हणजे..
" लग्नपत्रिका "
सुरवातीच्या काळात, मी स्क्रीन प्रिंटींगचा व्यवसाय सुद्धा केला आहे. त्यावेळी, माझा व्यवसाय असून सुद्धा. लग्नपत्रिका हा विषय मला कायम खटकायचा. त्याला, कारण हि तसच घडलं होतं.
माझा एक मुस्लीम मित्र, त्यावेळी माझ्याकडे लग्नपत्रिका छापायला आला होता.
सगळा मथळा तयार झाल्यावर, त्याने एका पांढऱ्या हॅन्डमेड पेपरवर अगदी साधी आणि सुटसुटीत अशी लग्नपत्रिका माझ्याकडून छापून घेतली.
त्या लग्नपत्रिकेवर, फक्त नवरा नवरीचं आणि त्यांच्या आई वडिलांची नावं, विवाहसोहळा ज्या ठिकाणी पार पडणार होता, त्या ठिकाणचा पत्ता. आणि, आमंत्रितांसाठी शुभेच्छापर दोन ओळी त्यावर लिहिल्या होत्या. याव्यतिरिक्त, दुसरा कोणताही मजकूर किंवा देवा धर्माची नावं किंवा धार्मिक स्थळांचे फोटो अथवा, कुराणमधील काही आयतं वगैरे काहीच लिहिलं नव्हतं.
माझ्या मनात हि शंका पटकन आली, आणि सहजच मी त्या मित्राला विचारता झालो.
कि.. प्रिंटेड लग्नपत्रिका, किंवा देवा धर्माचा विषय यामध्ये कुठेच नमूद केला नाहीये. किंवा नातेवाईकांची नावं सुद्धा नाहीयेत. याचं कारण काय..?
तर तो म्हणाला.. हे फक्त एक आमंत्रण आहे. त्यावर नको त्या गोष्टी कशाला पाहिजेत. या कागदाचं काम झालं, कि आपण त्याला लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकून देणार असतो. त्यावेळी देवादिकांची नावं किंवा कचऱ्यात पडलेल्या त्यांच्या तसबिरी पाहून आपल्या धार्मिक भावना दुखवणार नाहीत का..?
विषय अगदी छोटा होता, पण तो माझ्या मनाला खूप भिडला. त्यानंतर मी कित्तेक मित्रांना याविषयी सांगितलं. पण माझा विषय कोणीच मनावर घेतला नाही. त्यामुळे, आजही कित्तेक कचरा पेट्यात आपल्याला.. देवी, देवतांचे फोटो पडलेले आढळतात.
खरोखरच ज्यांना या विषयाची जान झाली असेल. त्यांनी या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. कारण एकतर, त्या लग्नपत्रिका सुद्धा खूप महाग असतात. आणि माझ्यामते एकप्रकारे तो वायफट खर्चच आहे.
एकदा मी तिरुपतीला गेलो असता, त्या भागात मी एक खूप सुंदर लग्नपत्रिका पाहिली होती.
आपलं व्हिजिटिंग कार्ड असतं ना, अगदी तेवढीच लग्नपत्रिका. फक्त नवरा बायकोचं नाव आणि विवाहस्थळाचा पत्ता, विषय संपला. पत्रिकेचा खर्च हि वाचला, आणि नेमकं उदिष्ट सुद्धा साध्य झालं.
आणि याही पुढे जाऊन, फक्त फोनाफोनी करून, किंवा.. मेसेज पाठवून सुद्धा तुम्ही हे काम लीलया पार पाडू शकता. यामध्ये मुख्य विषय म्हणजे वेळेची बचत होते. पैसे वाचतात, आणि धावपळ सुद्धा कमी होते. जुने मानपानाचे विषय वगैरे आता सगळ्यांनी सोडून द्यायला हवेत. कारण हि वेळ प्रत्येकावर येणार असते. त्यामुळे या विषयात सर्वांना सवलत मिळू शकते.
जमल्यास, या विषयाचं सर्वांनी आचरण करावं. त्यामुळे, पैशाचा अपव्यय सुद्धा टळेल. आणि कोणाच्या धार्मिक भावना सुद्धा दुखवल्या जाणार नाहीत..!
काही लोकं खूपच द्वाड असतात..
मुलगी अगदी सोळा वर्षाची झाली, कि लगेच तिच्या लग्नाच्या मागे लागतात. इथे सगळे बोंबलून बोंबलून सांगतायेत. मुलगी शिकवा मुलगी वाचवा. आणि काही लोकं या विषयाचा धज्जा उडवत त्याला वाटण्याच्या अक्षता लावताना आपल्याला हमखास पाहायला मिळत असतात.
काही वर्षांपूर्वी.. आमच्या इथे राहणाऱ्या एका कुटुंबामध्ये, त्यांच्या पंचवीस वर्षाच्या घोड्या मुलासाठी. त्यांनी चौदा वर्षांची एक हरिणी शोधून आणली होती. त्यावेळी, त्या चिमुरडीला पाहून.
सख्या रे.. घायाळ मी हरिणी..!
हे गीत माझ्या नजरेसमोरून नकळतपणे तरळून गेलं. त्याकाळी, मी तसा फार धीट होतो. त्यामुळे, त्या मुलीच्या सासूला मी विचारलं सुद्धा. एवढी लहान मुलगी सून म्हणून तुम्ही कशी काय आणलीत..? तर ती म्हणाली, आमच्यात मुलींना लई मोठ्या होईपर्यंत घरात ठेवत नसत्यात.
मी म्हणालो, का..?
तर, ती म्हणाली.. पोरी लई मोठ्या झाल्यावर धगड्या ( म्हणजे कोण्या मुलाशी / पुरुषाशी अनैतिक संबंध, ) ठेवत्यात.
च्या मारी.. या शुल्लक कारणासाठी विनाकारण त्या मुलींचं मूलपण हि लोकं मारून टाकतात राव. हा साधारण, तीस वर्षांपूर्वीचा काळ आहे.
लवकर लग्न झालं, कि मुलींना लवकर मुलं होतात. त्यामुळे काहीवेळा फारच विनोदी घटना घडून जातात. माझ्या एका मानलेल्या बहिणीच्या घरी, भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी मला जेवणाचं आमंत्रण आलं होतं. मी खवैय्या गडी असल्याने, त्या मैत्रिणीच्या नवऱ्याने मस्तपैकी चुलीवरचं मटन बनवलं होतं. मी सहकुटुंब जेवायला गेलो होतो. तसाच तिझा अजून एक मानलेला भाऊ सुद्धा तिच्या घरी सहकुटुंब जेवायला आला होता. त्या दुसऱ्या कुटुंबाला मी काही ओळखत नव्हतो. मैत्रिणीचा मानलेला भाऊ अजून काही आला नव्हता. पण त्याची बायको मात्र आली होती. ती बाई बिचारी अगदी किरकोळ शरीरयष्टीची होती.
झालं.. आम्ही सगळे जेवायला बसलो, त्या बाई शेजारी साधारण तिच्यापेक्षा दोनचार वर्षांनी लहान असलेली एक मुलगी बसली होती. आता काहीतरी बोलायचं म्हणून, मी त्या ताईला म्हणालो. हि तुमची लहान बहिण आहे का..! माझ्या या प्रश्नावर त्या बाईचा चेहेराच पडला. आणि ती म्हणाली, नाही हो.. माझी मुलगी आहे. बापरे.. तिच्या या अनपेक्षित उत्तरावर मी भलताच चपापलो. कारण समोरील दृश्य अगदी तसच होतं ना. नाही म्हणता,माझ्या या प्रश्नाने त्या बाईला खूप कससं झालं होतं. शेवटी मी त्या विषयाकडे कानाडोळा केला, आणि मटनावर आडवा हात मारला. पण समोर जेवायला बसलेली ती बाई पोटभर जेवली कि नाही. ते मला शेवटपर्यंत समजलं नाही.
नंतर माझ्या मैत्रिणीने, मला वरील घटना समजावून सांगितली. ती मुलगी कर्नाटक भागातली होती. अगदी चौदा वर्षाची असताना तिझं लग्न लाऊन दिलं. आणि सोळाव्या वर्षी तर ती आई सुद्धा झाली. तीझी मुलगी आता सोळा वर्षांची आहे. आणि हि तीस बत्तीसची. आणि ती मुलगी सुद्धा अंगाने जरा भरदार होती. मग त्या दोघीत दिसायला असा कितीसा फरक असणार आहे..?
आजही कित्तेक व्यक्ती, त्यांच्या मुलींची लग्नं अगदी सोळाव्या आणि अठराव्या वर्षीच उरकून मोकळे होतात. त्याला कारण म्हणजे आजची फोरवर्ड पिढी. मोबाईल हातात पडल्यामुळे, नको त्या वयात, सगळ्या गोष्टी मुला मुलींना लवकर समजायला लागल्या. आणि, शिकण्या सवरण्याच्या वयात, अशा गोष्टी पाहण्यात आल्यावर. मुला मुलींना बिलकुल दम धरवत नाही.
खरं सांगायला गेलं तर, मुलांकडे कोणी इतकं बारीक लक्ष देत बसत नाही. आणि, खासकरून मुलींचे गुणदोष आई वडिलांच्या किंवा नातेवाइकांच्या नजरेतून बिलकुल सुटत नाहीत. कारण, मुलगी म्हणजे काचेचं भांडं. शेवटी खानदानी रुतबा कायम ठेवण्यासाठी. आणि शेवटचा पर्याय म्हणून, आईवडील त्या मुलीचं लवकरात लवकर शुभमंगल करून मोकळे होतात. त्यामुळे, एक तिढा तर सुटतो. पण पुढे आणखीन बरेच विषय नव्याने क्रियेट होतात. आणि ते, तुम्हा आम्हा सर्वांना माहित देखील आहेत..!

Saturday, 9 December 2017

चपाती एग पॅटिस ( माझी घरगुती पद्धत )
==========================
आम्हा लोकांना, एक फार घाण सवय असते..
नेहेमी आपलं एकच टुमनं असतं.. या हॉटेलमध्ये ते चांगलं मिळतं. आणि त्या हॉटेलमध्ये ते चांगलं मिळतं. पण हे मात्र कोणीही सांगत नाही. कि आमच्या घरात अमुक, तमुक चांगलं बनत असतं.. त्यामुळे मी कायम सांगत असतो. घरचं खा आणि घरच्या सारखेच राहा.
अगदी फिट आणि तंदुरुस्त.
तर.. घरात बनवता येणारी एक अगदी साधी रेसिपी आज आपण शिकणार आहोत. परंतु, बनवून झाल्यावर ती रेसिपी खूपच रिच दिसते. ज्याचं नाव आहे, अंड्याचे पॅटिस. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्या साहित्य लागणार आहे.
साहित्य :- दोन अंडी, एका चपातीचं कणीक, हळद, मीठ, तूप किंवा बटर, अर्धा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमाटो, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिना.
कृती :- एका बाऊल मध्ये दोन अंडी चांगली फेटून घ्यावीत. त्यामध्ये वरील सगळे जिन्नस मिसळून घ्यावेत. आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं फेटून घ्यावं.
कणकेच्या पिठाचा गोलसर उंडा तयार करून त्याला हाताने पसरट गोल करून घ्यावा. त्यानंतर, मोदक बनवताना आपण जशी पारी बनवून घेतो. त्याप्रमाणे त्याची एक पारी बनवून घ्यावी. आणि हलक्या हाताने त्याची थोडी जाडसर चपाती लाटून घ्यावी.
गॅसवर तवा गरम करत ठेवावा, आणि मंद आचेवर हि चपाती तेल न टाकता दोन्ही बाजूने शेकून घ्यावी. चपाती शेकत असताना, काही वेळात ती चपाती टम्म फुगून वर येईल. चपाती फुगून आल्यावर, एका बाजूने तिच्या पापुद्र्याला हळुवार एक काप द्यावा. चपातीच्या आतील गरम वाफ बाहेर निघून गेल्यावर. त्या कापाच्या आतील बाजूस, म्हणजे चपातीच्या पोटात, अंड्याचे मिश्रण भरून घ्यावं. उलत्ण्याने, अंड्याचं मिश्रण चपातीच्या आतील बाजूस व्यवस्थितपणे पसरून घ्यावं.
यानंतर.. चपातीवर चमचमीत तूप किंवा बटर टाकून चपाती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावी. चपाती भाजून घेत असताना. चपातीच्या आतील अंड्याचं मिश्रण सुद्धा व्यवस्थित शिजत असतं. चपातीला मस्तपैकी रंग आणि खरपूसपणा आल्यावर. तव्यावरच तिला चार काप द्यावेत.
आणि टोमाटो सॉस बरोबर, हे पॅटिस गरमागरम सर्व करावं.
लहान मुलं, हा पदार्थ खूप आवडीने खातात. खूपच पोटभरू आणि चविष्ट आणि अगदी थोड्या वेळात तयार होणारा असा हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून पहा.


Thursday, 7 December 2017

आज सकाळी, खडकी बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी मी गेलो असता. तिथे भलामोठा वजनकाटा लाऊन एक अडतदार शेतकऱ्याकडून विकत घेतलेली भाजी विक्री करत होता.
त्याच्याकडे.. पापडी, तूर, घेवडा आणि वालाच्या शेंगा विक्रीला ठेवल्या होत्या. तो, कोणतीच भाजी अर्धा किलो देत नव्हता. दोन भाजा मिळून एक किलो दे म्हणालो. तरी सुद्धा, त्याचा नकारच.
शेवटी, एका घमेल्यात मी एक किलो वालाच्या शेंगा आणल्या. तर तो त्याच्याच मस्तीत. हातामध्ये घमेलं धरून माझा हात खूप अवघडला होता.
आणि.. आठी बोटात सोन्याच्या अंगठ्या घातलेल्या हाताने. पैसे मोजण्यात तो व्यापारी मग्न होता. शेवटी रागारागाने, मी ती भाजी होती त्या ढिगार्यात टाकून दिली. आणि पुन्हा एकदा बाजारात फेरफटका मारू लागलो.

मंडईत एके ठिकाणी, एक गरीब वृद्ध शेतकरी.. एक छोट्या पोत्यावर त्याच्याकडे असणारी छोटीछोटी गावरान कारली विकायला बसला होता. त्याने, एवढ्या कडाक्याच्या थंडीत पहाटे विक्रीसाठी किती माल आणला होता, ते मला माहिती नाही. पण आता त्याच्या पोत्यावर, कारल्याच्या भाजीचे फक्त तीनच वाटे उरले होते. दहा रुपयाला एक वाटा, याप्रमाणे तो ती कारली विकत होता. मी सगळा बाजार फिरून आलो, तरी सुद्धा त्याची ती तीन वाटा कारली मात्र काही विकली गेली नव्हती. तितक्यात एक महिला त्या शेतकऱ्याला विचारती झाली.

कशी दिली कारली..?
शेतकरी म्हणाला.. घ्या ना ताई, दहा रुपायाला वाटा आहे..!
ती कारली, शेंड्याच्या मध्याला थोडीशी लालसर झाली होती. त्यामुळे ती कारली खालीवर पाहून पुन्हा खाली ठेवत. नाक मुरडत ती बाई निघून गेली.
तेवढ्यात तो शेतकरी म्हणाला..
घ्या ताई, मला बी घरी जायचय. वीस रुपयाला तीन वाटे घेऊन टाका..!
तरी सुद्धा.. ती बाई तशीच पुढे निघून गेली.

मी तिथे शेजारील बाजूस लिंबू विकत घेत होतो. वरील प्रकार मला काही पाहवला नाही. आणि रागारागात, मी लिंबू घ्यायचे सोडून दिले. आणि, कारल्याचे ते तिन्ही वाटे माझ्या पिशवीत भरले. दहाच्या तीन नोटा, त्या शेतकऱ्याच्या हातात कोंबल्या. आणि तेथून चालता झालो. तोच त्या शेतकऱ्याने मला आवाज दिला..

ओ भाऊ, तुम्ही दहा रुपये जास्ती दिलेत..!

हे ऐकून, मी एकवार मागे वळून पाहिलं, त्या शेतकऱ्याच्या चेहेऱ्यावर एक विस्मयकारक हास्य पसरलेलं होतं. तो, त्या दहा रुपयाच्या नोटेकडे डोळे भरून पाहत होता.
आणि.. मागे वळून हसत मुखाने मी त्या शेतकऱ्याला म्हणालो.
राहूद्या काका..

आज तरी, हि कडू कारली मला गोड लागुद्यात..!


Tuesday, 5 December 2017

साधारण तीसेक वर्षांपूर्वी,
आमच्या घराच्या समोर, एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरु होतं. त्या कामावर, वॉचमन म्हणून कर्नाटक भागातील, तुकाराम नावाचा एक व्यक्ती कामाला होता. साधारण पन्नाशीच्या वयात असणारा तुकाराम तिथे रखवालदार आणि सोबतच बिल्डींगच्या बांधकामाला पाणी मारायचं जादा काम करायचा. तो कन्नड लेहेजात विशिष्ट प्रकारची मराठी भाषा बोलायचा. रोजच्याला त्याची भाषा ऐकून, आणि त्याच्या संगतीत राहून. त्याच्या तोंडून बाहेर पडणारे काही ठेवणीतले शब्द मी सुद्धा नकळत बोलायला लागलो होतो.
तुकारामचं सगळं बिऱ्हाड कर्नाटकात राहायला होतं. तो इथे एकटाच, पोटापाण्यासाठी राहायला आला होता. त्यावेळी, मी नेमका.. दहावी नापास झालो होतो. अभ्यास सोडला तर, दिवसभर मलाही दुसरं काही काम नसायचं. मग मी त्याच्याशी गप्पा मारत बसायचो. कधी-कधी त्याच्या झोपड्यात जाऊन, त्याने हाताने बनवलेलं जेवण सुद्धा मी खाऊन यायचो. बिचारा तसा फार प्रेमळ होता. आणि, माझी संगत सुद्धा त्याला खूप आवडायची.
त्यावेळी.. पहाटे पाच वाजता नळाला पाणी यायचं. असेच हिवाळ्याचे दिवस होते. एकदा सकाळच्या पारी, इमारतीला पाणी मारून झाल्यावर. थोडी उब मिळावी म्हणून तुकाराम उन्हाला उभा राहिला होता. त्याला पाहून, लागलीच मी सुद्धा त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
आणि तितक्यात.. एक बाई रस्त्याने रडत रडत जाताना आम्हाला दिसली.
तुकाराम तसा फार हळवा आणि दयाळू होता. त्याला त्या बाईचं दुखः पाहवलं नाही. तिच्यासोबत नेमकं काय घडलं असेल..? हे जाणून घेण्यासाठी तो फारच उतावीळ झाला होता,
आणि तो त्या बाईला म्हणाला..
" ए बाई हिकडं ये गं..!
रडत रडत ती बाई आमच्यापाशी आली. ती अजूनही हुंदके देतच होती.
तुकाराम म्हणाला... का मून रडायली गं..?
तर म्हणाली.. नवऱ्यासोबत भांडणं झाली. खूप मारलं आहे त्याने मला.
आता.. नवरा बायकोची भांडणं झाली आहेत. त्याला आम्ही तरी काय करणार. म्हणून, तिला शांत करत तुकारामने एक ग्लासभर पाणी तिला आणून दिलं. त्या बाईने ते पाणी पिलं, थोडी शांत झाली. आणि, डोळे पुसत ती तेथून निघून गेली.
त्यावेळी.. घरोघरी शौचालयं नव्हती. त्यामुळे बरेचसे लोक सरकारी शौचालयाचा वापर करत असत. आणि.. आमच्या घराला लागून असणारा रस्ता, नेमका शौचालयाकडे जात होता. त्यामुळे, परसाकडे जाणाऱ्या सगळ्या लोकांची वर्दळ याच रोडने असायची.
नेहेमीप्रमाणे.. आज सुद्धा तुकाराम उन्हाला उभा राहिला होता. आणि मी सुद्धा टाइमपास करत तिथेच उभा होतो. तितक्यात काल रडत रडत गेलेली ती बाई. आमच्या समोरून निघून गेली.
तिच्या हातामध्ये, पाण्याची बादली होती. बहुतेक ती सुद्धा शौचालयात निघाली असावी.
त्यादिवशी काय गणित घडलं समजत नाही, पण ती बाई दिवसभरात किमान तासाभराच्या अंतराने आम्हाला शौचाला जाताना दिसली होती. आता तिला पोटाचा त्रास झाला होता, कि आणखीन काय झालं होतं. ते, ती आणि तो परमेश्वरच जाणो.
पण दिवसातून पाच सहावेळा त्या बाईला शौचाला जाताना पाहून. तुकाराम अचानक भडकला. आणि.. मागचा पुढचा कोणताच विचार न करता, रागारागात त्या बाईला म्हणाला..
नुसतं खातीस आणि हागायला जातीस, मग त्यानी मारल नायतर काय करल..?
तिकडे काहीही असो, पण तुकारामच्या तोंडचं हे वाक्य ऐकून, मला मात्र खूप हसायला आलं.
तुकारामच्या तोंडून आलेलं हे वाक्य ऐकताच, त्या बाईने सुद्धा तिथून ताबडतोब पोबारा केला.
त्या दिवसापासून, ती बाई आमच्या येथील रस्त्याने शौचाला जाताना मला कधीच दिसली नाही. बहुतेक, तुकारामचा धसका घेऊन..
त्या बाईने, शौचाला जाण्याचा रस्ता किंवा शौचालय तरी बदललं असावं...!

Monday, 4 December 2017

आमच्या गावातील, ( कराड मध्ये ) सर्रास लोकं. आपापल्या घरासमोरील संडास बाथरूमला. रात्रीच्या वेळी कुलूप लावत असतात..
आता तुम्ही सांगा, संडास म्हणजे काही कुलूप लावायची जागा आहे का..?
पण.. नाही म्हणता, काही नालायक लोकांना घाबरून, त्यांना हे भीषण कृत्य करावंच लागतं.
कारण, काही लोकांचे विचार अगदी नीच पातळीचे हो..
स्वतः घरासमोर संडास बांधायचं नाही. पण, रातच्याला लोकांच्या संडासात जाऊन गपगुमान घाण करून यायची.
कधी पुढारणार हो आपला देश..?
आपलं सरकार, रोजच्या रोज नवनव्या योजना काढतंय. गुड मॉर्निंग पथक सुद्धा काढून झालं, एवढं करून सुद्धा.. गुपचूप, सकाळच्या पारी, माळरानात लपूनछपून प्रातर्विधी करताना, त्या गुड मॉर्निंग पथकाच्या हाती लागून सुद्धा, हे छुपं कृत्य करत असतात. आणि असं करत असताना, घाबरून काही लोकं आपला जीव सुद्धा गमावून बसली आहेत.
जेजुरीच्या आसपासच्या गावात, माळरानात शौचाला बसलेला एक व्यक्ती, दंड भरावा लागेल म्हणून, गुड मॉर्निंग पथकाला घाबरून पळत सुटला होता. आणि त्या पळापळीतच, अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. आणि तो व्यक्ती जागेवरच खलास झाला. सांगा ना केवढ्यात पडलं हे. विनाकारण जीव गेला कि नाही. आणि बदनामी वेगळी, गावात शेवटपर्यंत हसायचा विषय झाला. काय तर, गडी हागता-हागता मेला..!
वेळप्रसंगी.. सरकार अनुदान सुद्धा देतंय. पण त्याचा वापर कोण करणार..?
आणि तरीही..एवढं सगळं घडून सुद्धा काही लोकांना अक्कल येत नाही. काही पुरुष, रात्री अपरात्री.. स्वतः असा नको तो फाजीलपणा करत असतात. त्यामुळे अशी कुलपं लावावी लागतात. हे झालं पुरुषांचं,
पण.. महिलांनी काय करायचं..?
" टॉयलेट " सिनेमात.. अक्षय कुमारने सुद्धा सांगून झालंय. आणि, आता मी सुद्धा सांगतो.
नको त्या, मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा.. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये शौचालय बांधायलाच पाहिजे. तुम्हाला लाज नाही, पण किमान बायकांना तरी आहे. काही नाही, तर.. हे तरी ध्यानात घ्या राव.
या विषयावर, एका खेड्यात मी एकदा फार मोठा विनोदी स्लोगन वाचला होता. तो खास तुमच्यासाठी मी पेश करत आहे.
आरं मर्दा, उगाच कशाला पिळतोस मिशा. तुझी बायको रस्त्यावर काढतेय..
" उठाबशा "
लगेच शाहने व्हा, आणि गाव खेड्यात राहणाऱ्या आणि शहरातील सुद्धा काही व्यक्तींनी. आपापल्या घराच्या बाहेर, शौचालय बांधून घ्या. कोणी नाही, तर.. किमान तुमच्या घरातील " आयाबायांचा " तरी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद लागेल.

Sunday, 3 December 2017

गेल्या गुरुवारी.. सकाळी सात वाजता,
आम्ही दोघे उभयता, एसटी स्थानकावर जाऊन पोहोचलो. अनवधानाने सांगावं लागतंय.
कि.. मी माझ्या रोजच्या कामात, रोजीरोटी करिता चारचाकी चालवत असतो.
पण अजूनही..
मी माझी स्वतःची, चारचाकी विकत घेतली नाहीये.. विषय वेगळा आहे, आणि त्यामागे बरीच कारणं सुद्धा आहेत. असो..
तर.. सकाळी, साडेसात वाजता.. पैठणला जाण्यासाठी आम्हाला एसटी होती.
आणि लागलीच.. सव्वासात वाजता, घोगऱ्या आवाजात एसटी मधील एका पुरुष कर्मचाऱ्याने माईकवर पुकारा केला.
साडेसात वाजताची पैठणला जाणारी गाडी, फलाट क्रमांक दोन वर उभी आहे..!
खातरजमा म्हणून, मी एकवार चौकशी करून आलो.
त्या संभाव्य गाडीसमोर, ड्रायव्हर आणि कंडक्टर तंबाखूला चुना लावत उभे होते.
मी त्यांना म्हणालो,
" पैठणला जाणारी एसटी हीच आहे का..! "
तर.. मुखात अजून तंबाखू न टाकल्याने, एकसुरात त्या दोघांनी हो म्हणून मला सांगितलं.
आम्ही दोघांनी घाई गडबड केली, आणि.. लागलीच आम्ही एसटी मध्ये प्रवेशित झालो.
आम्ही गाडीत येईपर्यंत, गाडी बऱ्यापैकी गच्च झाली होती. प्रत्येक सिंगल्याने आपल्या आवडीप्रमाणे विंडो सिट काबीज केली होती.
शेवटी नाईलाज झाल्याने, अगदी मागील बाजूस.. शेवटून तीन नंबरच्या सीटवर आम्ही दोघे जाऊन बळेच एकमेकांना खेटून बसलो.
काही वेळातच गाडीचा स्टार्टर मारला गेला, आणि.. एसटीने बसस्थानक सोडलं, आणि.. आमचा सुखकर प्रवास सुरु झाला.
थोड्याच वेळात.. चालत्या गाडीतच कंडक्टर माझ्यापाशी आला, त्याला पाचशेची नोट देत मी म्हणालो. दोन पैठण द्या. त्याने मला, लागलीच टू बाय वन असं एक पांढरं तिकीट माझ्या हातात दिलं. आणि सोबत उरलेले पैसे सुद्धा दिले.
आणि..काही वेळातच, आमची एसटी पुणेस्टेशन बसस्थानकावर येऊन पोहोचली.
सकाळी.. आम्हाला, घरून निघायला अंमळ उशीर झाला असल्याने, माझ्या बायकोने चहा काही पिलाच नव्हता. म्हणून, हॉटेलात जाऊन पहिला तिला मी चहा पिऊ घातला. नाहीतर लगेच, तिझं डोकं दुखायला सुरवात होते.
आम्ही एसटीच्या बाहेर जाताना, आमच्या सीटवर कोणी दुसरं पेसेंजर बसू नये. म्हणून, आम्ही तिथे एक ओढणी ठेऊन दिली. आणि, आम्ही हॉटेलमध्ये निघून गेलो.
आम्ही.. म्हणजे, माझी बायको आणि मी चहा पिऊन एसटीमध्ये आल्यावर बघतो तर,
एक.. गोरी गोमटी आणि जाडजूड अशी अगदी सुशिक्षित आणि सुंदर दिसणारी बाई, तिच्या दोन जाड्या भरड्या मुलांना घेऊन आमच्या सीटवर विराजमान झाली होती. बायकोने सीटवर ठेवलेली ओढणी तिने चक्क मागे टाकून दिली होती.
खरच, काही लोकांना अकलेचा भागच नसतो. शेवटी माझ्या बायकोने तिला झापल्यावर, ती गपगुमान उठून मागे जाऊन बसली.
कारण, ती बाई जरी जाडी असली.. तरी, माझी बायको सुद्धा " पंडित केसरी " आहे.
पुन्हा एकदा.. एसटीने पहिला गियर टाकला, गाडी धक्क्याला लागली, आणि त्या चिकण्या जाड्या बाईपाशी तो कंडक्टर आला.
तर.. माझी मुलं अजून लहान आहेत म्हणून ती बया त्यांची तिकीटच काढेना. एकच फुल तिकीट द्या..! असं म्हणून, ती आडून राहिली.
मला तर त्यावेळी, " बॉम्बे टू गोवा " हा सिनेमाच आठवला.
पण काय सांगायचं.. तो कंडक्टर सुद्धा लई बेरकी होता. सगळ्या तोंडी परीक्षा घेऊन. त्या मुलांची खरी वयं, त्याने मुलांकडूनच वदवून घेतली. शेवटी, रडत खडत त्या बयेने जाड्या मुलांची हाफ तिकिटं काढली. आणि पुन्हा एका आमची गाडी पुण्याच्या बाहेर मार्गस्थ झाली.
आम्हाला एसटीत बसून, आता दोनेक तास उलटले होते. आणि, एकाकेक गाडीच्या सुखद हेलकाव्याने माझा डोळा कधी लागला, ते मला समजलच नाही. आणि.. काही वेळाने माझा डोळा जसा उघडला. आणि मी पाहतो तर काय,
ती एसटी.. सासवड रोडने पुढे निघाली होती.
तसा मी थोडा दचककलो, मनात विचार केला, कदाचित. हि एसटी सगळीकडे फिरत-फिरत पैठणला जाणार असेल..!
पण कसलं काय, मला बिलकुल राहवलं नाही. आणि शेवटी मी बायकोला म्हणालो.
पूजा.. हि गाडी वेगळ्याच दिशेने चालली आहे गं..!
तशी.. माझी बायको मला म्हणाली,
तुम्ही एवढं काय सिरीयस होताय, तुमच्या खिशातून ते तिकीट काढून बघा ना..!
आणि, खरं सांगायाला गेल तर..
सकाळपासून, मी स्वतःशीच निव्वळ आंधळी कोशिंबीर खेळत होतो. एसटीत बसताना, मी त्या एसटीचा नामफलक सुद्धा पाहिला नव्हतं. कि तिकीट घेताना, त्यावर गावाचं नाव सुद्धा मी पाहिलं नव्हतं.
माझ्याकडून.. सहसा असं कधीच घडत नाही. पण आज मात्र, माझी पक्की फसगत झाली होती. आणि शेवटी..मी तिकीट काढून पाहतो तर, त्या तिकिटावर गावाचं नाव लिहिलं होतं.
" फलटण "
बापरे.. मला खूप जोरात झटका बसला. शेवटी मी सीटवरून उठून कंडक्टरपाशी गेलो. आणि त्याला जाब विचारला.
कि.. मी तुम्हाला गाडीत चढताना सुद्धा विचारलं होतं. आणि, तिकीट मागताना सुद्धा गावाचं नाव सांगितलं होतं.. मग हा प्रकार कसा घडला..?
तर तो कंडक्टर म्हणाला, अहो हे आमचं रोजचं रुटीन आहे. रोज आम्ही फलटणच्या गाडीवरच कामाला असतो. चूक झाली, आमच्या ऐकण्यात फरक झाला असेल. पण, तुम्ही तरी गाडीचा बोर्ड पाहायला पाहिजे होता ना..!
त्याच्या या वाक्क्यावर, मी पुढे काहीच बोलू शकलो नाही. चूक माझीच होती.
शेवटी.. तो कंडक्टर मला म्हणाला, आता तुम्ही एक काम करा. सासवडला खाली उतरा, आणि पुन्हा स्वारगेटला जावा. तिथून तुम्हाला पैठणची एसटी मिळेल. मी सुद्धा, त्याच्या होकारात माझा होकार मिळवला. आणि तितक्यात, त्या एसटीचा मोटार सारथी मला म्हणाला,
साहेब.. आता तुम्ही इथवर आलाच आहात, तर पुढे जेजुरीला उतरा. खंडोबाचं दर्शन घ्या, आणि बारामती मार्गे पुढे पैठणला जा..!
खरं सांगायला गेलं तर,
त्यावेळी मला जुनं काहीतरी आठवलं. दोनचार दिवसांपासून, रोजच्या रोज कोणीतरी जेजुरीला जाऊन, खंडोबाचं दर्शन घेऊन आल्याचे फोटो फेसबुकवर अपलोड करत होते.
आणि.. रोजच्या रोज ते फोटो पाहून, खंडोबाच्या दर्शनाला जाण्याची एक सुप्त इच्छा माझ्या मनामध्ये दडली होती. पण कामातून सुट्ट्या मिळत नाहीत. म्हणून मी मुद्दाम याकडे कानाडोळा करत होतो.
पण म्हणतात ना.. त्याचं बोलावणं आल्यावर, तो कोणत्याही प्रकारे आपल्याला त्याच्याकडे बोलावून घेतोच. खरं सांगतो, हे लिहिताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आलाय.
आहे हो, देव आहेच..!
सदानंदाचा येळकोट.. येळकोट येळकोट जय मल्हार..!
खरं सांगायला गेलं तर..
बेकरी मध्ये बनणारे पदार्थ मला बिलकुल आवडत नाहीत. कारण, मैदा हा माझा सर्वात मोठा दुश्मन आहे. पण नाही म्हणता, कधी कधी नाईलाजाने बेकरीत मिळणारे पदार्थ मी खात असतो.
मी पालिकेत कामाला लागलो तेंव्हा,
म्हणजे, प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला आम्हाला रोख रकमेत पगार मिळत असायचा. त्यामुळे, कधी कधी मी सरकारी नोकर आहे कि नाही..? त्याची सुद्धा मला शंका वाटायची. 
पण साधारण पंधरा वर्षांपूर्वी, आमचे पगार सुद्धा बँकेत जमा होऊ लागले. आणि माझ्या मनाने सुटकेचा निश्वास सोडला.
तर, त्यावेळी.. पगार झाला, कि घरी जाताना मुला बाळांना काहीतरी खाऊ न्यावा,
म्हणून.. मी स्वारगेट वरून निघताना बसमधून मुद्दाम आमच्या पालिकेच्या बस थांब्याला उतरायचो. आणि तिथे समोरच असणाऱ्या, " रामसर " नावाच्या बेकरी मधून काही जिन्नस खरेदी करायचो. आणि, बेकरीत मिळणारे ते गोडधोड पदार्थ घरी घेऊन जायचो. त्यानंतर रेल्वे रुळावरून पुढे चालत जाऊन, शिवाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर मी पोहोचायचो.
अनारकली म्हणजे, खारी प्रकारात मोडणारा खोबऱ्याचा किस आणि टुटीफ्रूटीचं भरपूर सारण भरून तयार केलेला एक खुसखुशीत असा गोड पराठा आहे. ज्याला एका पोळीचे चार तुकडे करून विकला जातो.
त्यावेळी.. मला पगार खूप कमी होता, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला फार मोठा आनंद मिळायचा. तो आजच्या घडीला पैसे देऊन सुद्धा विकत मिळणार नाही.
तर, त्यावेळी.. त्या बेकरीतून नव्याने विकत घेतलेला अनारकली नावाचा एक पदार्थ. मला, आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडला होता. त्यामुळे दर महिन्याला ही अनारकली माझ्या घरी अगदी हक्काने यायची. पण काही काळानंतर, माझ्या कामाचा रूट सुद्धा बदलला. आणि, बसने येणं जाणं सुद्धा बंद झालं. आणि योगायोगाने रोखीने पगार मिळायचा सुद्धा बंद झाला. त्यामुळे, दर महिन्याला पगार झाल्यावर घरी खाऊ घेऊन जायचा विषय सुद्धा बंद झाला.
त्यामुळे..या विषयावर, आजही माझी बायको मला खूप टोकत असते.
परवा.. माझ्या कामाचा एक भाग म्हणून, मी नेमका शिवाजीनगर परिसारत गेलो होतो. आणि सहजच मला त्या जुन्या विषयाची आठवण झाली. मग काय.. रामसर बेकरीमधून लागलीच सहा अनारली मी विकत घेतल्या.
त्यावेळी.. हि अनारकली फक्त पाच रुपयाला एक मिळायची. आता मात्र, तिची किंमत पंधरा रुपये झाली आहे. पण तुम्ही काहीही म्हणा, १९३२ सालापासून सेवेत असलेली हे बेकरी. त्यांच्या इथे बनत असलेल्या प्रत्येक पदार्थाची चव अगदी टिकवून आहे. इथे मिळणारा प्रत्येक पदार्थ कागदी खाकी पिशवीच्या वेष्टनात घालून दिला जातो. तुम्ही सुद्धा कधीतरी नक्की ट्राय मारा.

माझ्या लहानपणी, अगदी नवसाने मिळणारा खाऊ म्हणजे.. ऑरेंज किंवा पायण्यापल फ्लेवरची चघळायची गोळी. त्याकाळी गोळीचा आकार बऱ्यापैकी मोठा असायचा. मग ती गोळी बराच वेळ तोंडात घालून चघळत बसायची. गोळी चघळायची पद्दत सुद्धा अशी असायची. की ती गोळी लवकर संपता कामा नये, इतक्या सावकाश पद्धतीने ती गोळी चघळायची. आणि बराच वेळ तिचा स्वर्गीय स्वाद अनुभवत बसायचं.
पण कधी कधी काय व्हायचं, गोळी पुरवून पुरवून चघळायच्या नादात. कधी कधी ती गोळी भसकन नरड्यात घुसन पोटात उतरायची.
त्यावेळी मात्र मला खूप दुःख व्हायचं. आणि मी स्वतःशीच पुटपुटत बसायचो.
गोळी चाऊन खाल्ली असती तर बरं झालं असतं. किमान तिचा संपूर्ण आस्वाद तरी घ्यायला मिळाला असता..!
पण कधी कधी तीच गोळी चघळून चघळून अगदी लहान व्हायची, तेंव्हा मात्र गोळी चघळाल्याचा मला फार मोठा आनंद व्हायचा. आणि आनंदाच्या भरात, शेवटला उरलेला गोळीचा तो चपटा तुकडा. दाताने चाऊन, खाऊन मी एक वेगळाच आनंद उत्सव साजरा करायचो..!
नाहीतर.. हल्लीची ती ओठभर पसरलेली कॅडबरीची जाहिरात पाहताना अगदी कससं होतं.
आणि पुन्हा एकदा आपल्याच बालपणात हरवण्याचा अतोनात आनंद सुद्धा होतो.

मध्यंतरी मी एक पोस्ट केली होती. कि आजवर या फुलाची भाजी मला खायला मिळाली नाहीये. त्यानंतर बऱ्याच मित्रांनी मला त्याबाबत विविध सूचना केल्या. हि फुलं कुठे मिळतील किंवा काय, याबाबत मला खूप सारी माहिती मिळाली होती. पण कामाच्या व्यापातून, ती फुलं मला शोधता आली नाही. किंवा मी टाळाटाळ केली असं म्हणा.
पण.. माझ्या काही मित्रांच्या हे पक्कं लक्षात होतं. आणि पंडितजींना आपण हि हादग्याची फुलं घरपोच पोहोचावूया असा काही मित्रांनी मनामध्ये चंगच बांधला होता.
गेल्या महिन्यात, सकाळी दहाच्या सुमारास अहमदनगर येथे राहत असणारे माझे फेसबुक मित्र, श्री. Vivek Shinde यांनी मला एक मेसेज आणि त्यासोबत त्या फुलांचा एक फोटो मला पाठवला. पंडित भाऊ.. तुमच्यासाठी हि हादग्याची फुलं मी विकत घेतली आहेत. मला तर काही पुण्यात यायला जमणार नाही. पण आत्ता मी नगरच्या एसटी स्थानकापाशी आलो आहे. तिथे कोणाशी तरी ओळख काढून हि फुलं मी तुम्हाला पुण्याला पोहोचवतो.
काय प्रेमळ मित्र मिळालेत मला या माध्यमामुळे. पण काही कारणास्तव, त्यांना ती फुलं माझ्यापर्यंत पाठवता आली नाहीत. पण आठवणीने माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास, नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
त्यानंतर.. जळगाव येथे राहत असणारे माझे आणखीन एक फेसबुक मित्र. श्री. Vishal Kakane यांनी सुद्धा माझी पोस्ट वाचून ती फुलं घेऊन ठेवली होती. ते सुद्धा मला म्हणाले, भाऊ फुलं घेऊन ठेवली आहेत. आज रात्रीच्या लग्झरी बसने ती फुलं मी पुण्यात पाठवून देतो. तुम्ही ती कलेक्ट करा. पण मी विचार केला. चोवीस तासाचा खंड पडल्यावर, पुण्यात येई पर्यंत ती फुलं कोमेजून जातील. आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नावर पाणी फिरेल. त्यामुळे, या मित्राला सुद्धा मी सांगितलं. कि तुम्ही जास्तीचा त्रास करून घेऊ नका. इथे येई पर्यंत, ती फुलं खराब होतील. ना मला ना तुला. अशातला प्रकार होईल. त्यामुळे या मित्राचे मनपूर्वक आभार मानत तो विषय मी तिथेच संपवला. काही मित्र, खूपच प्रेम करतात राव माझ्यावर.
त्यानंतर.. काल सकाळी, माझ्या आणखीन एक फेसबुक मित्राचा मेसेज आला. त्यांचं नाव आहे, Atul Parkhe भाऊ, तुमच्यासाठी गावावरून मी हादग्याची फुलं आणली आहेत. माझ्या दुकानावर येऊन घेऊन जावा. आता काय बोलावं या मित्र प्रेमाला. हे मित्र माझ्या घरापासून अगदी जवळच राहायला असल्याने. माझ्या मुलाला मी त्यांच्या दुकानात पाठवलं. आणि ती फुलं काल माझ्या घरी आली. अनायसे आज एकादशीच आहे, आता आज या फुलांचा समाचार घेतो. मस्त भजी खाऊन तृप्त होतो.
सांगा ना.. या माध्यमाने मला अजून काय द्यायला हवं आहे..?
अगदी भरून पावलो मी, मित्रांचं प्रेम आणि त्यांची माझ्याबद्धल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या आस्थेला मी मनपूर्वक सलाम करतो.
लव यु फ्रेंड्स..!!