Sunday, 3 December 2017

बद्धकोष्ठता या विषयाचा मी फार वर्षा पूर्वीपासून बळी आहे..!
पोट साफ न होणं, म्हणजे रोगराईला आमंत्रण. ज्याचं पोट साफ असतं, तो जगातील सर्वात सुखी माणूस म्हणून ओळखला जातो. प्रेमाचे सगळे मार्ग जसे पोटातून जातात. तसेच, निरोगी जीवनाचे सुद्धा सगळे मार्ग आपल्या पोटातूनच जात असतात.
वेळी अवेळी जेवन करणं, पोटाचं पोतं करून त्यात नको ते जिन्नस कोंबनं, नशिल्या पदार्थांचं सेवन करणं. समतोल आहार न घेणं, यामुळे बद्धकोष्ठता हा रोग बळावतो.
एकतर माझी पचनक्रिया अगदी मंद आहे. त्यामुळे, सकाळी नऊ ते दहा वाजता मी माझी न्याहारी उरकून घेतो. मग तोच माझा नाश्ता, आणि तेच माझं जेवण. अगदीच गरज भासली तर, दुपारच्या वेळी काहीतरी हलकंसं खानं किंवा ज्यूस वगैरे प्यायचं. ते संध्याकाळी आठ, नऊ वाजता जेवण करून घ्यायचं हा माझा नित्यक्रम आहे.
खरं तर.. रात्रीचं जेवण, हे सूर्यास्त होण्यापूर्वी करावं. असं आपलं आयुर्वेद आपल्याला सांगतं. पण या धावपळीच्या जीवन पद्धतीत तो योग आपणाला जुळवून आणता येत नाही. रात्रीच्या जेवणानंतर वज्रासन करावं, त्यानंतर शतपावली करावी. जेवणानंतर झोपण्याच्या वेळात किमान दोन तासाचं अंतर असावं. झोपताना कोमट पाणी प्यावं. हे सगळे उपाय करून सुद्धा माझ्या पोटाच्या तक्रारी काही केल्या दूर होत नव्हत्या.
त्याकरिता.. पोट साफ होण्यासाठी, कधी कायमचूर्ण घे तर कधी नव्याने आलेलं पेट सफा नावाचं चूर्ण घ्यायचो. पण त्याने सुद्धा, म्हणावा असा फरक जाणवत नव्हता. आणि कसं आहे, पोट साफ नसलं कि मनुष्य उत्साही दिसतच नाही.
मध्यंतरी, माझ्या एका मित्राने पोट साफ होण्यासाठी एक नवीन उपाय मला सांगितला.
" इसबगोल "
हे नाव ऐकायला जरा विचित्र आहे, पण पोट साफ होण्यासाठी हा फायबरयुक्त बेचव भुस्सा शरीराला भलताच लाभदायक आहे. इसबगोल हा एक विशिष्ट प्रकारचा भूश्या सारखा तंतुमय पदार्थ आहे. ज्याच्या सेवनाने पोटातील आतड्याची योग्य प्रकारे साफसफाई होते. इतर जडीबुटी प्रमाणे, पोटातील आवश्यक घटक द्रव्य बाहेर न टाकण्याचं बहुमुल्य काम हे औषध करतं.
रोज रात्री झोपण्या अगोदर, दहा ग्राम इसबगोल ग्लासभर कोमट पाण्यात, दुधात, दह्यात किंवा ताकामध्ये भिजवून सेवन करावं. अधिक चांगला रिझल्ट मिळण्यासाठी. त्यांतर, वरून एक ग्लास पाणी सुद्धा प्यावं. याच्या सेवनाने पोट साफ होण्याच्या क्रियेसाठी पोटात दुखणे किंवा पहाटे लवकर शौचाला होणे. असला काहीही प्रकार घडत नाही. आपल्या नित्य नियमाप्रमाणे शौचाला गेल्यावर शंभर टक्के पोट साफ होतं. हे औषध सलग एक आठवडाभर सेवन केल्याने. पोटाची संपूर्णपणे साफसफाई होते. पचनशक्ती सुधारते, आणि आपल्याला अज्ञात असलेल्या पोटाच्या कित्तेक व्याधींवर नकळत हे औषध रामबाण म्हणून काम करतं. शिवाय याचे कोणतेच साईड इफेक्ट नाहीयेत. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्हाला सुद्धा, जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल. तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.
शेवटी काय आहे, हे सगळं काही पोटासाठी चाललं आहे. पोट खुश तर आपण खुश..!

No comments:

Post a Comment