Wednesday, 29 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- नऊ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दुपारचे दीड वाजले होते. आता परतीचा प्रवास सुरु करायचा होता. तत्पूर्वी, पोटपूजा करण्यासाठी आम्ही एक छोट्या टपरी वजा हॉटेलमध्ये थांबलो. तिथे.. तळलेल्या गोड करंज्या, जिलेबी, राजमा भात, आलू पराठे, भजी इत्यादी पदार्थ उपलब्ध होते. प्रत्येकाला खाण्यासाठी जे हवं आहे, ते घेतलं. आहे तसं पोटात ढकललं. आणि, पुन्हा एकदा पुढच्या पायी प्रवासाला आम्ही सुरवात केली.
आम्ही सगळे मित्र सोबतच निघालो होतो. आणि, पुन्हा एकदा तोच प्रकार, ताजेतवाने झालेले माझे सगळे मित्र मला सोडून झटकन पुढे निघून गेले. एका दृष्टीने, जे घडत होतं त्याला मी चांगलच म्हणत होतो. कारण, माझ्यासोबत ते मित्र चालत असते, तर मला इतकं सारं अनुभवता आलं नसतं, पाहता आलं नसतं कि लिहिता सुद्धा आलं नसत..!
तीव्र उतारावर चालत असताना, माझ्या गुढग्याला फार त्रास होत होता. मी, हळूहळू लंगडत लंगडत मार्गक्रमण करत होतो. त्यात उन्हाचा भयंकर चटका लागत होता. जेवण झाल्यामुळे, थोडी सुस्ती सुद्धा आली होती. आणि त्यात, जेवण झाल्यावर मी लगेच पाणी पीत नसल्याने. मला भयंकर तहान सुद्धा लागली होती. चालताना.. थोडं थोडं करत, मी चक्क दोनेक लिटर पाणी पिऊन गेलो होतो.
जय जमना मैय्याकी.. असा हिंदी भाषिकांप्रमाणे जयघोष करत, आम्ही ती उतरण उतरत होतो. आम्हाला वाटेत भेटणाऱ्या, आणि खालून चालत येणाऱ्या लोकांचं मनोबल वाढावं. म्हणून, मी त्यांना आवर्जून सांगायचो..
अगदी थोडं अंतर राहिलं आहे. बस, तुम्ही अगदी पोहोचलाच म्हणून समजा..!
माझ्या मुखातून, अशी दिलासा देणारी वाक्य ऐकून पायी प्रवास करणाऱ्या लोकांचा हुरूप आणखीन वाढायचा. आणि, मला सुद्धा मनोमन आनंद व्हायचा.
परतीच्या प्रवासात.. माझं, जवळजवळ चारेक किलोमीटर अंतर उतरून झालं होतं. आता, अगदी शेवटचा टप्पा उरला होता. थोडं अंतर चालून गेल्यावर, माझा एक मित्र माझी वाट पाहत रस्त्यात थांबला होता.
अरे चल ना बाबा लवकर,
पुन्हा.. पुढे गेल्यावर, तुझ्या एकट्या करिता सर्वाना ताटकळत बसावं लागेल. म्हणून, मी तुझी वाट पाहत मागे थांबलो आहे..!
गपगुमान..एकवार, मी त्या मित्राचा उपदेश ऐकून घेतला.
खरं पाहायला गेलं तर, त्याचंही खरच होतं म्हणा. बाकी मित्रमंडळी, आमच्यापुढे अगदी एखाद किमी अंतरावर होते. मी हळूहळू चालत येतोय म्हणून, एका मित्राला माझ्यासाठी मागे ठेवत त्यांचा सुद्धा रमत गमत प्रवास सुरु होता. माझ्या एकट्यामुळे, पुढे जाऊन सर्वांना ताटकळत बसावं लागेल. ते माझ्या मनाला सुद्धा पटत नव्हतं. माझं शरीर साथ देत नसताना सुद्धा, मी पुन्हा एकदा जोमाने आणि जोरदार चालायला सुरवात केली.
आता, आम्हाला मुक्काम स्थळी पोहोचायला. फक्त, अर्धा किमी अंतर उरलं होतं.
आणि.. अचानक, ढग दाटून आले.
पाऊस पडणार नाही असं वाटत होतं. पण, आकाशात कमालीची हलचल जाणवत होती. जोरदार सोसाट्या वाऱ्याच्या वेगाने, ढग सुद्धा विरघळल्या सारखे एकमेकात गुंफन घालत होते. दोन मनं शरीराने एकरूप झाल्यावर, त्यांच्यात कोणतेच पाश उरत नाहीत. अगदी असंच काहीतरी नभात घडत होतं. आकाश मंडलात, जोरदार हालचालींना सुरवात झाली होती. घाबरे होऊन, आम्ही दोघे झपाट्याने वाट उरकत होतो. परंतु, ते सगळं निष्फळ ठरलं. आणि तितक्यात.. जोरदार पावसाला सुरवात झाली.
मी तर, ते लहरी वातवरण पाहून पक्का घाबरून गेलो होतो. कारण, आभाळ पूर्ण काळोखाने माखलं गेलं होतं. अशावेळी मनात नको त्या भीत्या उत्पन्न होत असतात. आडोसा म्हणून, आम्ही दोघे डोंगराच्या एका कपारीला टेकून थांबलो. तर.. वरून माती घरंगळत आमच्या अंगावर पडू लागली. नको त्या भीत्या मनात डोकावू लागल्या. पावसात जावं म्हंटल तर, आमच्याकडे रेनकोट सुद्धा नव्हते.
घोड्यावर आणि डोलीवर जाणारी लोकं पूर्ण बंदोबस्तात होती. पण घोडं बिचारं भिजत भाजत तोंड खाली घालून मुकाट्याने चालत होतं. आजूबाजूला कुठे दुकानही नव्हतं. त्यामुळे, पाऊस थांबेपर्यंत आम्हाला तिथेच थांबावं लागणार होतं. दुपारचे चार वाजले होते,
आम्ही ज्याठिकाणी थांबलो होतो. तिथेच, आडोशाला एक माय लेक येऊन थांबले. मी, त्या मुलाला म्हणालो.
तुझ्या आईला, चालत जायला जमणार नाही. आता चार वाजलेत, तुम्ही यमुना माई पर्यंत पोहोचेस्तोवर तुम्हाला रात्रीचे नऊ तरी नक्कीच वाजतील. त्यापेक्षा, एकतर तू पुन्हा खाली तरी जा, किंवा पुढे जाण्या करिता तुझ्या आईला एखादा घोडा तरी करून दे. किंवा, नाहीच जमलं तर, उद्या सकाळी प्रवास सुरु कर.
माझं बोलनं.. त्याला बिलकुल पटलं नाही.
माझा फुकटचा उपदेश ऐकायला नको. म्हणून त्याने, त्याच्या आईला सोबत घेऊन भर पावसात यमुनोत्रीच्या दिशेने तेथून पोबारा केला.
तोवर, आमचे बाकी मित्र.. जानकी चट्टीला पोहोचून गाडीमध्ये बसले होते.
आणि.. त्यांचे आम्हाला फोनवर फोन सुरु झाले. या राव लवकर, किती वाट पहायची तुमची..? तितक्यात, पाऊस थोडा कमी झाला.
आणि आम्ही, पटपट निघायला सुरवात केली. आम्ही, पाच पन्नास पावलं पुढे जातोय न जातोय तोच. पुन्हा एकदा जोरदार पावसाने आम्हाला झोडपून काढलं. अंगावर एकदम बादलीभर पाणी कोणीतरी टाकावं. इतका भयंकर मोठा फ्लो होता तो.
आम्ही पळतच निघालो, तितक्यात शेजारीच एक दुकान होतं. तेथून, आम्ही वीस रुपयाला एक पात्तळ मेणकापडाची " बरसाती " ( रेनकोट ) विकत घेतली. संपूर्ण भिजलो होतो, तरी सुद्धा त्या बरसातीला मी घाईघाईने अंगावर चढवली. अशावेळी, मनुष्य कितीही हुशार असुध्यात, त्याचं डोकं बिलकुल चालत नाही. आणि धावत पळत, आम्ही कसेबसे गाडीपर्यंत जाऊन पोहोचलो. गाडीत बसलेले, बाकी सगळे मित्र सुद्धा पावसात चिंब भिजले होते. त्याठिकाणी आम्ही पोहोचताच,
धीरगंभीरपणे, आमचा ड्रायव्हर.. "शरद पवार" आम्हाला म्हणाला.
अब यहासे.. हम जल्दी निकल पडते है,
परतीचा रस्ता खूप खराब आणि घसरडा आहे. शिवाय, पावसाचा काहीच भरवसा नाही. पुढे वाटेत काय वाढून ठेवलं आहे. ते, आपल्याला माहीत नाही..!
त्यामुळे, वेळ न दवडता आपण पुढील प्रवासाची तयारी करूयात.
पडत्या फळाची आज्ञा झेलावी, तशी आम्ही पवारची आज्ञा झेलली. आणि, गाडीमध्ये बसून पुढील अवघड प्रवासाला सुरवात केली.
क्रमशः
चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- आठ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सकाळी नऊ वाजता आम्ही चालायला सुरवात केली होती. आणि, आता दुपारचा बाराचा ठोका झाला होता. वातावरण थंड वाटत असलं तरी सूर्य नारायण भयंकर चटके देत होता. तशातच, काही अप्रिय घटना सुद्धा पाहायला मिळत होत्या. वयोवृद्ध लोकांना चालत यात्रा करताना पाहून मनाला खूप वाईट वाटत होतं.
कारण.. काही ठिकाणी, त्यांच्याच वयाची लोकं डोलीत बसून जाताना त्यांच्या पाहण्यात येत होते. आणि, ते सुद्धा कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते. ऐश आराम कोणाला नको आहे..? तितक्यात.. एका मराठी आजीच्या बाजूने मी जात असताना. मी त्यांना सहज म्हणालो.
आज्जी चालताना काही त्रास होतोय का..?
तर म्हणाल्या,
नाही बाबा. देवाच्या दारात जायला कसला त्रास आलाय..!
भयंकर मोठी इच्छाशक्ती घेऊन काही लोकं या प्रवासाला आली होती. त्यांच्या अंगात असलेली उर्जा पाहून, मला सुद्धा एकप्रकारचं बळ येत होतं. कारण, एका भयंकर मोठ्या अपघातात, माझ्या पायाचे दोन्ही गुडघे निकामी झाले आहेत. तरी सुद्धा, न डगमगता मी सुद्धा हि यात्रा पायीच करत होतो. या जगामध्ये दुखः कधीच संपणारी नाही. शेवटी कोणाकोणाचा विचार करायचा..?
माझे पाय सुद्धा भडभडून आले होते. विश्रांतीला थांबलं कि, पोटऱ्या आणि मांड्याचं मास जागेवर फडफड करत होतं. पण आता, शेवटचा फक्त एक किमीचा टापू उरला होता.
आणि.. दूरवरून मला, यमुना मातेच्या मंदिराचा कळस दिसला. चारधाम यात्रेतील पहिलं धाम माझ्या नजरेच्या टप्प्यात आलं होतं. नकळत माझे डोळे पाणावले. हे दुखः नाही, तर इच्छापूर्तीचा आनंद होता.
भरभर चालत, मी तो शेवटचा टप्पा पार करू लागलो. आणि, मंदिराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. मंदिरा जवळील छोट्याशा पायवाटेला लागुनच, काही लोकांनी आपली जेवणाची दुकानं थाटली होती. तव्यावर भाजणाऱ्या खमंग पराठ्यांचा वास सभोवार दरवळत होता. पायी प्रवास असल्याने, सकाळपासून आम्ही फक्त चहा आणि बिस्किटावरच होतो. पण, अंघोळ आणि देवदर्शन झाल्याशिवाय जेवण करायचं नाही. असं मी माझ्या मनाशी ठरवलं होतं.
माझे सगळे मित्र पुढे निघून आले होते. आता पहिलं काम म्हणजे, त्या सर्वांना शोधायचं होतं. जास्ती नाही, पण दीड दोन हजार भाविक त्याठिकाणी असावेत.
मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या मी चढू लागलो. सुरवातीला, चप्पल ठेवण्यासाठी एक चप्पल घर केलं होतं. तिथेच बरीच लोकं खोळंबून पडली होती. मी त्या सर्वांना मागे टाकत. यमुनेच्या मुख्य प्रवाहाजवळ गेलो. समोरच माझे काही मित्र कपडे काढून अंघोळ करण्याच्या तयारीत उभे होते. पण अंघोळ करायला कोणीच सुरवात करत नव्हता. नदीचा तो छोटासा प्रवाह पार करुन मला पलीकडच्या दिशेने जायचं होतं. म्हणून, मी प्रथम यमुनेच्या तीराला नमस्कार केला. आणि, माझा एक पाय नदीमध्ये घातला. आणि, विजेच्या चपळाईने झटकन मी माझा पाय पुन्हा पाण्याबाहेर काढला. चारशे चाळीस होल्टचा करंट अंगामध्ये शिरावा. इतकं थंड पाणी होतं ते.
नाईलाज होता, शेवटी कसाबसा मी नदीपार गेलो. समोरच्या बाजूला माझं लक्ष गेलं. तिथे काही महिला अंगावर ठराविक एक कपडा ठेवून, संपूर्ण विवस्त्र होऊन यमुनेत स्नान करत होत्या. एकतर महिला किती नाजूक असतात, आणि त्यात हे भयंकर थंड पाणी. पण त्या बिचाऱ्या लोट्याने अंगावर पाणी घेत यमुना स्नान करत होत्या. त्यांच्या धाडसाला, दुरूनच मी साष्टांग घातला. आणि, पुढे निघालो
आम्ही धडधाकट पुरुष असून सुद्धा, तिथे अंघोळ करायला घाबरत होतो. शेवटी, मनाचा हिय्या केला, आणि यमुनेच्या थंड पाण्यामध्ये मी माझा देह बुचकळून बाहेर काढला. सतत तीन वेळा अशी क्रिया केल्या नंतर. माझी गात्र कमालीची गारठली गेली. तसाच बाहेर आलो, अंग पुसलं नाही. आणि, तिथे जवळच असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये मी डुबकी मारली. माझं शरीर इतकं गारठलं होतं, कि त्या गरम पाण्यात सुद्धा जवळजवळ पंधरा मिनिटं मला थंड वाटत होतं. हाता पायाला थंड झिणझिण्या येत होत्या. त्यानंतर, त्या गंधकाच्या गरम पाण्यात मला खूप मजा वाटू लागली. मजा काय, नंतर त्यातून बाहेर पडूच वाटत नव्हतं. शेवटी, त्या गरम पाण्याचा मोह आवरता घेतला. आणि, त्या कुंडा बाहेर पडलो.
याठिकाणी, नदीमध्ये अंघोळ करताना एक विचित्र अनुभव मला पाहायला मिळाला. एकीकडे यमुनेचं थंड बर्फाचं वाहतं पाणी. तर, त्या नदीच्या बाजूला एका खडकाच्या कपारीतून भयंकर अतीतप्त पाणी वाहत होतं. परमेश्वरी म्हणा किंवा भौगोलिक म्हणा..!
पण, त्या चमत्काराला एकवेळ मी मनोमन प्रणाम केला. नवीन कपडे परिधान केले, आणि यमुनेच्या मंदिराकडे निघालो.
यमुनामाईची अशी आख्यायिका आहे. कि, यमुना हि सूर्याची मुलगी आहे. आणि, यमाची बहिण. यमुनेत स्नान करणारा प्रत्येक व्यक्ती, यम पाशातून कायमचा मुक्त होऊन जातो. असं मानलं जातं.
चालतच.. मी, यमुना माईच्या त्या छोटेखाणी मंदिरापाशी गेलो. दुरूनच यमुना मैय्याचे दर्शन घेतले. सर्व परिवार, हितचिंतन आणि तुम्हा सर्व मित्रांचा नमस्कार सुद्धा यमुना मैय्याच्या चरणी अर्पण केला. आणि, परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
क्रमशः
कॉलेज लाइफ मध्ये, आम्हा सात आठ मित्रांचा खूप खुशालचेंडू ग्रुप होता.

आम्ही सगळेच मित्र, मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने. आम्हा सर्वांचंच मस्त ट्युनिंग जुळलं होतं.
तर.. आम्हा सर्व मित्रांमध्ये, आमचा एक मित्र दिसायला फारच सुंदर होता.
एक पुरुष दुसऱ्या पुरुषाची तारीफ करतोय. म्हणजे, तुम्हाला त्याच्या सौंदर्याची नक्कीच कल्पना आली असावी.

तर.. तो चिकना मित्र सोडून. आम्ही सगळे मित्र, कॉलेजमधील सुंदर दिसणाऱ्या मुलींवर लाईन मारायचो. पण हा मित्र, आमच्या सोबत असताना म्हणा, किंवा एकटा असताना म्हणा. त्या सुंदर मुलींना, हा बिलकुल भिक घालायचा नाही. मला.. त्याच्या या गोष्टीची फार कमाल वाटायची.
म्हणून, सहजच एकदा मी त्याला छेडला..

काय रे.. आम्ही सगळे, ठरवून एका-एका मुलीवर लाईन मारतोय. आणि, तू त्यापैकी कोणत्याच मुलीकडे साधं पाहत सुद्धा नाहीस..?
त्यावर तो मला म्हणाला..
हे बघ कसं आहे, तुम्ही लोकं ज्या मुलींवर लाईन मारत आहात. त्या मुलींवर, आपल्या कॉलेज मधील जवळपास सगळीच मुलं लाईन मारत असावीत. आणि, एवढ्या मोठ्या गर्दीत तुमचा नंबर कधी लागणार..?
मला एक गोष्ट सांग, दोन महिन्यात तुमच्यापैकी एकाने तरी, मला ' गोड ' बातमी कळवली आहे का..! त्या मुलींपाठीमागे, भली मोठी लाईन लागली आहे. आणि तुम्ही लोकं सुद्धा, मुर्खासारखे त्या लाईनीत उभे आहात. तुम्हाला वाटतय का, तुमचा नंबर लागेल म्हणून..?

ह्या चिकण्या पोराचे चिकणे बोल ऐकून, मी तर पक्का गारद झालो होतो. नाही म्हणता, त्याच्या बोलण्यात तथ्य सुद्धा होतं. बोलण्या बोलण्यात, त्याने आम्हाला मुर्खात जमा करून टाकलं होतं.

शेवटी.. मीच त्याला हटकलं, आणि म्हणालो...
पण एक गोष्ट मझ्या ध्यानात येत नाहीये. तू एवढा चीकीना चोपडा आहेस. मग तुला कधी वाटलं नाही का. कॉलेजमध्ये तुझी सुद्धा एखादी गर्ल फ्रेंड असावी म्हणून.
त्यावर, छद्मीपणे हसत तो मला म्हणाला..
आपला फंडा फार निराळा आहे. ज्या मुलींकडे, तुम्ही लोकं ढुंकून सुद्धा पाहत नाही. आपण, त्या मुलींना पटवतो. कधीही, कमी गर्दीत लक्ष द्यायचं. एक तर, मी दिसायला सुंदर आहे. त्यामुळे, त्या जेमतेम मुली मला अलगद पटून जातात. आणि तुम्ही लोकं, विनाकारण त्या चिकण्या पोरींच्या मागे टाईम वेस्ट करता..

त्याची कुटनीती ऐकून, माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या होत्या.
तितक्यात.. आमच्या समोरून, एक जेमतेम दिसणारी काळी सावळी मुलगी त्याला पाहून एक मादक स्माईल देत पुढे निघून गेली.

तेंव्हा, हा मला म्हणाला..

दोन महिन्यात.. हि दुसरी आहे बघ, पहिली वाली तुला नंतर कधी तरी दाखवतो..!!

Sunday, 26 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- सात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
यात्रे मधील.. आज, आमचा पहिलाच मुक्काम होता. सकाळपासूनच्या प्रवासात, आम्हाला पाऊस वगैरे काही लागला नव्हता. पूर्ण प्रवासात अगदी कडकडीत उन होतं. त्यामुळे, टीव्हीतल्या ढगफुटीच्या बातम्या मला तद्दन खोट्या वाटत होत्या. खडखडीत वातावरणामुळे आम्ही अगदी निश्चिंत झालो होतो.
खरादी या छोट्याशा खेडेगावामध्ये, मुक्कामासाठी समोर आलेल्या लोकांचा ग्रुप पाहून. प्रत्येकी.. शंभर, दीडशे ते दोनशे रुपयामध्ये. इथे, राहण्याची अगदी उत्तम व्यवस्था होऊन जाते. या भागात सुद्धा, लाईट आणि अंघोळीसाठीच्या गरम पाण्याची फारच वानवा आहे.
परंतु.. या भागात, जेवण फार स्वस्त आणि मस्त आहे बरं का. ऐंशी ते शंभर रुपयात, इथे जेवणाची भरपेट आणि अमर्यादित थाळी आपल्याला मिळते. संपूर्ण घरगुती जेवण असतं, घरालाच लॉज केलेला असतो. त्यामुळे, त्या घरातील प्रत्येक स्त्री पुरुष सगळे जन तिथे अविरत खपत असतात. ते खाणार, तेच आपल्याला खायला देणार. त्यामुळे, नकली किंवा हॉटेल टाईप जेवण तिथे कोणी बनवत नाही.
तर, त्या भागातील जेवणाच्या थाळीमध्ये..डाळ, भात, चपाती, राजमाची पातळ भाजी, आणि.. बटाटा, सिमला मिरची, कोबी, फ्लावर यापैकी कोणतीतरी एक सुक्की भाजी असते. या भाज्यांव्यतिरिक्त अन्य कोणतीही भाजी आपल्याला तिकडे खायला मिळत नाही.
या भागात, लाईटची खूपच बोंबाबोंब आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे, तेथील लहरी वातावरण. पावसाळी वादळ आलं, आणि एखादं झाड उन्मळून विजेच्या तारेवर पडलं. कि लाईट बोंबलली. आणि, डोंगराळ भाग असल्याने. कामं लवकर होत नाहीत. त्यामुळे, तिथे कायमच्या बत्त्या गुल असतात. आणि, रात्रंदिवस जनरेटरची सतत घरघर चालू असते.
लवकर उठायचं असल्याने, आम्ही लवकर झोपी गेलो. ते एक बरं, कि सकाळी अंघोळ न करताच आम्हाला निघायचं होतं. त्यामुळे, आमचा तो वेळ सुद्धा वाचणार होता. कारण, यमुनोत्रीच्या उगमापाशी गरम पाण्याचं कुंड आहे. जवळजवळ सगळेच भाविक, त्या ठिकाणीच अंघोळीला जात असतात.
ठरल्याप्रमाणे सकाळी पाच वाजता, आमचा प्रवास सुरु झाला. खरादी ते स्याना चट्टी पर्यंतचा खडतर प्रवास आम्ही उरकला. पुढे रस्ता चांगला बनवला असल्याने, स्याना चट्टी ते हनुमान चट्टी पर्यंतचा प्रवास आम्ही विनासायास पार केला..
आणि.. तिथून पुढे, जानकीबाई चट्टी पर्यंत आमच्या गाड्या गेल्या. यमुनोत्री यात्रेतील हे शेवटच स्थानक आहे. या भागात, छोट्या वाड्या वस्त्यांना 'चट्टी' असं संबोधलं जातं.
या शेवटच्या ठिकाणी, जानकी चट्टीला सगळ्या गाड्या पार्क केल्या जातात. आणि, इथून पुढे आपला.. सहा किमीचा धार्मिक पायी, घोडा किंवा पालखी प्रवास सुरु होतो.
इथे सुद्धा, यात्रेसाठी आरामात बसून जाण्याकरिता डोल्या आणि घोड्याच्या सोयी केल्या आहेत. या सहा किमीच्या अंतराकरिता, घोडेवाले आपल्याकडून तब्बल पंधराशे रुपये वसूल मोजून वसूल करतात. जे कि, त्याकरिता सरकारी भाडं फक्त सहाशे रुपये आहे. सगळीकडे, काळाबाजार चालूच असतो, त्याला हि लोकं तरी अपवाद कशी असतील..? आणि, त्यात कहर म्हणजे..
उदा :- यात्रेकरू शंभर आणि घोडे पन्नास.
त्याठिकाणी.. निव्वळ अशातली गत आहे. त्यामुळे, त्या घोड्यांचा भाव फार वधारलेला असतो. काही नाही जमलं. तरी, दिवसभरात एक तरी भाडं मिळून जातं. त्यामुळे, ती लोकं कोणत्याही यात्रेकरूला घोडा घेण्यासाठी मनधरणी करत नाहीत. किंवा, त्याच्या मागेपुढे हांजी हांजी सुद्धा करत नाहीत.
चालण्याचं अंतर कमी असल्याने, आणि नव्या दमाने यात्रेला सुरवात केली असल्याने. आम्ही, घोडेवाल्यांना भाव न देता पायी प्रवासाला सुरवात केली. आमच्या सोबत, काही आवश्यक कपडे घेतले. आणि आमची दिंडी, यामुनोत्रीच्या दिशेने निघाली. याठिकाणी बोर्डावर लिहिलेली अंतरं जरा फसवी आहेत बरं का. सहा म्हणता, पायी प्रवासाचं ते आठ दहा किमीच अंतर होतं. स्याग ब्याग पाठीवर लादली, आणि आम्ही पायी प्रवासाला सुरवात केली.
यमुनोत्रीला सुद्धा फारच अवघड रस्ते आहेत. पण, अमरनाथ इतके अवघड नाहीयेत. घोड्यावरून प्रवास करताना, आपल्या डोक्याला अक्षरशः दगड खेटतात. इतके खालीपर्यंत झुकलेले पर्वत या भागात आहेत. पैसेवाली लोकं, डोल्या किंवा घोडे करून झुलत जात होते. तसा मी सुद्धा गरीब माणूस आहे. मला सुद्धा अशा चिनी परवडणाऱ्या नाहीयेत. परंतु, माझ्या पारखी नजरेने एक गोष्ट पक्की ताडली.
पायी जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये बहुतांशी महाराष्ट्रीयन आणि राजस्थानी लोकांचा भरणा अधिक होता. बरेच वयोवृद्ध लोकं, हि यात्रा पायीच करत होते. त्याला मुख्य कारण म्हणजे, खिशामध्ये असणाऱ्या पैश्याचा आभाव..
मी पायी यात्रा करत असताना. आम्हा सर्व मित्रांची फाटाफूट झाली होती. मी एकटाच निघालो होतो. माझ्या मोबाईलवर, हळुवार आवाजात मस्त गाणी ऐकत माझा खडतर प्रवास चालू होता.
तितक्यात..वाटेमध्ये, काही महिलांचा भला मोठा जत्था माझ्यासमोरून चालता झाला. वीसेक बायका असाव्यात त्या. या सगळ्या महिला राजस्थानी होत्या. यातील, जवळ-जवळ सगळ्या महिला ह्या वयाची साठी ओलांडलेल्या होत्या.
पण त्यात, एक महिला फक्त पंचविशीची असावी. तिचा पेहेराव पाहूनच मला समजलं. कि ती बिचारी तरुणपनातच विधवा झाली असावी. यात्रेदरम्यान चालत असताना, तिच्या चेहऱ्यावर.. अगदी शून्य भाव होते. मौजमजा करण्याच्या वयात नशिबी आलेलं वैधव्य ती भोगत होती.
आणि.. " आता तुला असंच देवधर्म करत जगावं लागणार आहे..! " हे.. सगळ्या महिला, तिला पटवून आणि समजावून सांगत होत्या. आणि ती बिचारी, निर्विकारपणे आपला तरुण देह जाळत यात्रेत मार्गक्रमण करत होती.
ती विधवा मुलगी, दिसायला कमालीची सुंदर होती. तिच्या पुढील जीवनात काय लिहून ठेवलं आहे. ते परमेश्वराच्या हवाली करत. मी माझं बुड जमिनीला टेकवलं. कारण, त्यांच्या सोबत मी चालत राहिलो असतो. तर.. त्या महिलेला पाहून माझ्या दुख्खाला पारावर उरला नसता. पाच दहा मिनिटं गेली, जुना विषय मी पूर्णपणे विसरून गेलो. जमिनीवर बसल्याने, मी सुद्धा थोडा ताजातवाना झालो. दूरवर दिसणारे बर्फाचे पर्वत माझ्या डोळ्यांना छानसा गारवा देत होते. आणि पुन्हा एकदा, मी पायी मार्गक्रमण करायला सुरवात केली.
थोडं आंतर चालून गेल्यावर..
वाटेमध्ये, कोवळ्या वयाचं एक नवदाम्पत्य मला दिसलं. मुलगी, अगदी पंधरा सोळा वर्षांची असावी. तर मुलगा फक्त जेमतेम अठरा वर्षांचा असावा. तारुण्याने मुसमुसलेले हे दोघेही खूप खुशालचेंडू होते. मस्त हातामध्ये हात माळून, घरच्या लोकांचा ससेमिरा चुकवत. हे दोघेच, मस्त मजा करत एकत्र निघाले होते. हे दोघे सुद्धा राजस्थानीच होते. त्यांच्या पेहेरावावरून आणि बोली भाषेवरून ते माझ्या पटकन ध्यानात आलं. अगदी एकमेकाला खेटून चालणारे हे दोघे, माझ्या नजरेच्या टप्यात होते. आणि गंमत म्हणजे, चालता-चालता तो मुलगा त्याच्या चिमुकल्या बायकोच्या गालाचे हलकेच मुके सुद्धा घेत होता. नवीन वय, नवीन हंगाम त्यांना गप्प बसू देत नव्हता. आपण धार्मिक यात्रेमध्ये आहोत, याचा सुद्धा त्यांना पूर्ण विसर पडला होता.
एकीकडे, त्या महिलेचं वैधव्य. तर दुसरीकडे, हा लाडिक प्रणय प्रसंग.
बरीच मोठी विसंगती मला त्याठिकाणी पाहायला मिळाली होती. देवाचं नामस्मरण राहिलं बाजूला. आणि भलतच दिसलं माझ्या नजरेला. काय करता, काही गोष्टींना इलाज नसतो. शेवटी.. त्या दोघा प्रेमी युगलांना, मी माझ्या नजरेच्या आड केलं.
डोली किंवा घोडा नाही. पण चालत असताना, हि करमणूक सुद्धा मला नेटकं ताजंतवानं करून गेली. या सगळ्या, कडू गोड आठवणी जतन करत, सोबतच यमुना मातेच्या नावाचा जप करत, मी पुढे मार्गक्रमण करू लागलो.
क्रमशः
आपण परिधान केलेली अंतरवस्त्र..
हि, सहजासहजी कोणालाही दिसत नसतात.
किंवा,
कोणीही..अगदी ठरवून, त्यांचं थेट प्रदर्शन करत नसतं.
तरी सुद्धा,
त्यांची खरेदी करत असताना.
आपण,
ते शक्य तितके महागडे, आणि " फॅन्सी " असेच खरेदी करत असतो..!!

Friday, 24 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- सहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पहाटे सहा वाजता, मित्राच्या खोडीमुळे मला जाग आली.
मुखमार्जन केलं, थंड पाण्याने अंघोळ उरकली. आणि, आमच्या ब्यागा आवरून.. आम्ही लॉजच्या खाली येऊन थांबलो.
आमच्या गाडीवाल्याला एक फोन केला. तोवर, आम्ही चहापाणी उरकलं, बरोबर आठच्या ठोक्याला तो गाडीवान आमच्यासमोर हजर झाला.
दूर कुठेतरी.. एका गल्लीमध्ये त्याने त्याची गाडी लावली होती. तिथवर, आम्ही आमचं सामान ओढत नेलं. या नको त्या मेहेनतीने सकाळ-सकाळ आम्ही चांगलेच घामाघूम झालो. त्या, ड्रायव्हर मित्राची गाडी फारच जुनाट होती. संगीत व्यवस्था म्हणावी अशी ठीक नव्हती. पण, तो गाडीचालक स्वतः मालक असल्याने. त्याने, गाडी बऱ्यापैकी उत्तम ठेवली होती.
आमच्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा फार मजेदार होतं. " शरद पंवार " तिकडे सुद्धा, 'पवार' हे आडनाव आहे बरं का. पण, त्या भागातील " प " वर अनुस्वार असल्याने, त्याचा उच्चार पंवार असा होतो. असो.. तर, शरदने, आमचं सगळं सामान गाडीवर व्यवस्थित लादून घेतलं. पुन्हा एकदा, आमची त्या दलालाबरोबर पैश्यांची देवाणघेवाण झाली.
आणि.. सकाळी, ठीक नऊ वाजता आमच्या गाडीचा, पवारने स्टार्टर मारला.

हर हर गंगे, चारधाम भगवान कि जय..
हा जयघोष करत, आमची खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरवात झाली. हरिद्वार मधील, भरपूर आणि वायफट गर्दी पार करता-करता आमचा तिथेच तासभर गेला.
ऋषिकेश मार्गे.. आम्ही पुढे निघालो. पुढे साधारण, पन्नास एक किमी गेल्यावर, नरेंद्र नगर नावाच्या गावातील रस्त्याला मुख्य चौकातून दोन फाटे फुटले.
एक रस्ता.. बद्री, केदारला जाणारा होता. तर दुसरा रस्ता, यमुनोत्री आणि गंगोत्रीला जाणारा होता.
ऋषिकेश ते यमुनोत्री हा २२२ किमी अंतराचा प्रवास आहे. तुम्हाला हे अंतर कमी जरी वाटत असलं. तरी, या भागात गाड्यांचा वेग अत्यंत कमी असल्याने. ताशी, वीस ते पंचवीस किमीच गाडी धावत असते. त्यामुळे, हे अंतर पार करायला आम्हाला किमान दहा तास ते बारा तास लागणार होते.
आजूबाजूचा निसर्ग पाहत आमची गाडी यामुनोत्रीच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. आता, ड्रायव्हर सांगेल त्याप्रमाणे आम्हाला प्रवास करायचा होता.
त्यामुळे, पवार म्हणाला.. कि सुरवातीला आपण, यमुनोत्री आणि गंगोत्री करणार आहोत. आणि त्यानंतर बद्री, केदारला जाणार आहोत. आम्ही सुद्धा त्याच्या हो मध्ये हो मिसळली. कारण, या यात्रेमध्ये हि सीक्वेन्सच अगदी बरोबर अशी मानली गेली आहे.

आणि.. आमची गाडी, यमुनोत्रीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. आमचा ड्रायव्हर, थोडा मितभाषी असल्याने, त्याला बोलतं करण्याकरिता मी त्याच्याशी संभाषण सुरु केलं.

पंवार सहाब.. किती वर्षापासून तुम्ही गाडी चालवत आहात..?
दहा वर्ष झालीत..!
काही.. गुठ्का, तंबाखू, बिडी, सिगारेट पिता कि नाही..?
तर.. नाही म्हणाला.
मग.. दारू तरी पिता कि नाही..?
माझ्या या मिश्कील प्रश्नावर तो गालातल्या गालात हसला. आणि, मान हलवून त्याने मला तसा होकार कळवला.

तो.. गुठ्का वगैरे खात नव्हता म्हणून बरं झालं. नाहीतर.. त्याचं गाडीतून ते सारखं-सारखं थुंकण मला बिलकुल आवडलं नसतं.
आता.. पवार आमच्यात थोडा मिसळून गेला होता. आम्ही शक्य तितकं त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळातच, देहरादून आणि मसुरी हि दोन थंड हवेची ठिकाणं आम्ही ओलांडली. तोवर, दुपारचे दोन वाजून गेले होते. आमची दुपारची जेवणं उरकली. आणि, पुन्हा एकदा आम्ही पुढे कूच केली.

भयंकर कठीण घाटातून आमची गाडी मार्गक्रमण करत होती. वेळ पुढे निघाला होता. रस्ता मागे पडत चालला होता. आणि मजल दरमजल करत आम्ही बडकोट या जिल्ह्याच्या गावापर्यंत येऊन पोहोचलो. तोवर, रात्रीचे सात वाजत आले होते.
रस्त्यावर, छोटीमोठी खेडेगावं गावं लागत होती. त्याभागात, लॉज हा प्रकार फारसा प्रचलित नसल्याने. आम्हाला, कोणाच्या तरी हॉटेल वजा घरामध्ये राहावं लागणार होतं.
त्याच्या बंदोबस्तात, रस्त्यावर काही मुलं आम्हाला हातवारे करून..

" आमच्याकडे मुक्काम करा "

म्हणून.. आम्हाला, हाताने इशारे करत होते. काहीठिकाणी तर, मुलांसोबत त्या भागातील गोऱ्या गुलाबी गालाच्या मुली सुद्धा बसलेल्या होत्या.
किमान.. " त्यांना " पाहून तरी लोक आपल्या इथे मुक्काम करतील. अशी आशा, त्यांना होती. काय करावं, शेवटी पापी पेट का सवाल है..!
आणि.. या ' सुंदर ' योजनेमुळे, काही अंशी ते लोक त्यात सफल सुद्धा होत होते.

आम्ही.. यामुनोत्रीच्या अलीकडे, पन्नास किलोमीटर अंतरावर थांबणार होतो.
शेवटी.. 'खरादी' नावाच्या एका खेडे गावामध्ये शरद पवारने आमची गाडी बाजूला घेतली. आणि, आमचा पहिला मुक्काम तिथे निश्चित झाला..!

क्रमशः
कृत्रिम सौंदर्य, हे " क्षणिक " असतं.
परंतु,
नैसर्गिक सुंदरता, हि " अमर " असते..!!
मनुष्य हा..
एक, असा विचित्र प्राणी आहे.
ज्याला,
घरामध्ये.. हॉटेल सारखं जेवण हवं असतं.
आणि,
हॉटेलमध्ये.. घरगुती पद्धतीचं जेवण हवं असतं.
चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- पाच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रात्रीची.. बायको मुलाबरोबर आणि मित्रांसोबत माझी फोनाफोनी उरकल्यावर. झोपी जाण्याअगोदर. आम्ही, ज्या व्यक्तीची गाडी प्रवासाकरिता बुक केली होती. त्याचं त्याठिकाणी येनं झालं होतं. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. एकतर, हे फार मोठं धार्मिक ठिकाण, आणि आम्हाला भेटायला आलेला तो गडी. दारू पिऊन अगदी फुल टाईट झालेला होता.
मी त्याला म्हणालो.. अरे, क्या भाई.. आप तो बहोत टाईट हो गये हो...! ये, देवभूमी है के और कुछ..? त्यावर तो मला म्हणाला.. सर, दिनभर गाडी चलानेके बाद, रातको तो हम पितेही है. और.. कल आपके साथ जो ड्रायव्हर आनेवाला है. वो भी, हर रात दारू पियेगा. पियेंगे नही, तो. जियेंगे और चलायेंगे कैसे..?

त्याच्या या उत्तरावर मी अगदी निरुत्तर झालो होतो. पर्याय नाही त्याला इलाज नाही. कारण, यावर्षी सीजन खूप जोरदार असल्याने. यात्रेच्या प्रवासाकरिता गाड्या मिळत नव्हत्या. चुकून आम्ही त्याला नकार दिला असता, तर दुसरी गाडी मिळेल कि नाही. त्याची बिलकुल शास्वती नव्हती. नाय होय म्हणता-म्हणता,
रुपये.. तीस हजार पाचशे मध्ये आमचं दहा दिवसाचं पेकेज ठरलं गेलं.
गाडी बाबत बोलणी करण्याकरिता आलेले गृहस्थ भरपूर मदिरा प्राशन करून आले होते. त्यामुळे, त्यांच्याशी फुकाचं हितगुज न करता. पैशावर आणि जीवावर उदार होत, आम्ही त्याला तीन हजार रुपये आगावू रक्कम म्हणून देऊ केली.
हरिद्वार ते संपूर्ण चारधाम यात्रेत. कुठेही.. मदिरा, कांदा, लसून आणि इतर उत्तेजक वस्तू मिळत नाहीत. असं आम्हाला समजलं होतं. पण.. तसं काहीएक नाहीये,
पूर्ण यात्रेदरम्यान, ह्या सगळ्या गोष्टी अगदी विनासायास मिळतात. हे, फारच मोठं दुर्दैव म्हणावं लागेल.
शिवाय, आमच्याशी सुमोची कमिटमेंट करून आम्हाला " महिंद्रा मेक्स " हि गाडी घ्यायला भाग पाडणारी मंडळी भलतीच चलाख निघाली. कमिशन खाऊन नामानिराळे झाले. आम्हाला मिळालेली गाडी सुद्धा अगदी म्हणावी अशी ठीकठाक नव्हती. पण करता काय, आज गाडी नाकारली कि पुन्हा दुसरी गाडी मिळेल कि नाही. त्याची शाश्वती नव्हती.
मी खूप ऐकून होतो.. कि त्या पहाडी भागात अगदी टकटकीत गाड्या असतात. रद्दी गाड्यांना तिथे परवाना नाकारला जातो. वगैरे-वगैरे बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या होत्या. पण तसं काहीएक नाहीये, भरपूर रद्दी गाड्या सुद्धा तिथे पैसा पासिंग करून मिळत असाव्यात. शेवटी प्रवास त्यांना करायचा नसतो ना. त्यामुळे, शक्यतो समोरासमोर गाडी ठरवावी. म्हणजे, आपली फसगत होत नाही. आगाऊ रक्कम दिल्यावर आम्ही आमच्या रुममध्ये आलो. आणि उद्या यात्रा कशी सुरु करायची त्याचा विचार करत निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
क्रमशः
चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- चार.
प्रत्यक्ष यात्रेला सुरवात होण्याअगोदर,
आदल्या रात्री.. बद्रीनाथ भूमीमध्ये पावसाने अगदी कहर केला. मी बाहेरगावी असल्याने, मला त्या गोष्टीची काहीच खबरबात नव्हती. कारण, टीव्ही पाहायला आम्हाला वेळच कुठे होता. पण, फेसबुक वरील माझ्या सर्व मित्र मैत्रिणीचा सगळा जीव माझ्या वाटेवरच लागला होता. नेहेमीच्या बातम्या पाहण्याच्या सवयीमुळे. आणि, घरबसल्या त्यांनी ती दुर्घटना पाहिली. पण.. या गोष्टीची मला काहीच खबरबात नव्हती.
गंगा आरती करून आल्यानंतर, आमचं रात्रीचं जेवण उरकल्यावर. नेहेमीच्या सवयीप्रमाणे मी माझा मोबाईल बंद केला. आणि, झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. नवीन ठिकाण असल्याने, मला झोप काही येत नव्हती.
आणि अचानक.. माझ्या एका मित्राचा मोबाईल खणखणला, तो बिचारा, बिछान्यावर पडल्या-पडल्या लगेच झोपी गेला होता. म्हणून.. त्याचा फोन मी अटेंड केला, त्यावरील फोन नंबर काही माझ्या ओळखीचा नव्हता. आणि, फक्त नंबरच आला होता. त्या व्यक्तीचं, नाव त्यावर आलं नव्हतं. नाही म्हणता शेवटी मी तो फोन उचलला, आणि, तिकडून मला आवाज आला..
" काका.. माझे पप्पा आहेत का हो तिथे..? "
आमच्या घरून, माझ्या मुलाने केलेला तो फोन होता. माझ्या मुलाचे ते शब्द ऐकून, माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. नको त्या भयंकर भीत्या माझ्या मनात डोकावू लागल्या.
मुलाला म्हणालो..
अरे सोनू.. मी पप्पाच बोलतोय. काय झालं रे बेटा...?
माझ्या या वाक्यानंतर, सर्वत्र भयाण शांतता मला जाणवली. माझं डोकं सुन्न झालं होतं. आणि, माझ्या मुलाने माझ्या बायकोकडे फोन दिला.
त्यांनतर.. फोनमध्ये फक्त रडण्याचे हुंदके मला ऐकू येत होते. मला काहीच समजायला मार्ग नव्हता. कि नेमकं काय घडलं आहे..?
शेवटी, मी बायकोला थोडं शांत केलं. आणि, विचारलं. कि नेमकं काय झालंय..?
तेंव्हा मला समजलं,
कि बद्रीनाथ भूमीमध्ये महाजलप्रलय आला आहे. त्या भागात, ढगफुटी झाली होती. हे सगळं प्रकरण घडण्या पाठीमागे कारण होतं.
अलका ताईची, " कुबेर " वरील पोस्ट..!
अवघ्या काही मिनिटात, मी माझ्या बायकोचं मनोबल ठीक केलं. आणि, सर्वप्रथम मी माझा फोन चालू केला. लगेच दुसऱ्या मिनिटाला, मला फोनवर फोन सुरु झाले.
त्यात.. Rahul Naik भाई, Amey Sonawane भाई, दत्ता शंकर शिंदे भाऊ, अलका ताई,Bandu Girigosavi भाऊ यांचे फोन येऊन गेले. तर दुसरीकडे, माझा फेसबुक इनबॉक्स मेसेजने पूर्ण भरून गेला होता.
त्यात, नम्रता माळी पाटीलRamaa Atul Nadgauda ताई आणि इतर सुद्धा बरेच मेसेज होते. त्या सर्वांना मी माझी ख्याली खुशाली कळवली.
तोवर, कुबेर ग्रुपवर एकच हाहाकार माजला होता. जो तो माझ्या काळजीत होता.
एकवार.. मी त्या सर्व हितचिंतकांना, माझी खुशाली कळवली. तेंव्हा, सर्वांचा जीव भांड्यात पडला. आणि सगळे निश्चिंत झाले.
राहुल भाऊ, अमेय भाई, आणि अलका ताई यांनी माझी खूप समजूत काढली. पंडित भाऊ..दिवस चांगले नाहीयेत, नसेल तर तुम्ही ताबडतोब माघारी फिरा. यात्रा नंतर सुद्धा करता येईल..!
" किती प्रेम करता रे मित्रांनो माझ्यावर..! "
तुमच्या, या प्रेम पूर्वक उपकाराचा मी कसा उतराई होऊ..?
शेवटी, सर्वांना मी माझ्या जीवाचा हवाला दिला. निश्चितपणे माझी यात्रा पूर्ण होईल याची सर्वाना ग्वाही दिली. आणि, झोपी जाण्याचा लटका प्रयत्न केला.
पण छे.. फिरून-फिरून, बायको मुलाचे आणि सर्व काळजीवाहू मित्रांचे चेहेरेच माझ्या नजरेसमोर तरळत होते. पुढे काय होणार..? हि काळजी सतावत होती..!!
तेवढ्यात आमच्या गाडीवाल्याचा मला निरोप आला. त्याच्याशी थोडं वार्तालाप करून आलो. आणि मध्यरात्री, कधी एकदा मी झोपी गेलो ते माझं मलाच समजलं नाही. सकाळी जाग आली, ते माझ्या मित्राच्या खोडील वागणुकीमुळे,
त्याने.. माझ्या अंगावरील रजाई खसकन ओढून काढली. आणि, माझी निद्रा समाधी भंग पावली..
क्रमशः
चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- तीन.
गंगा आरती उरकली, आणि आम्ही मुक्काम स्थळी निघालो. हरिद्वार मधील, एका साध्या हॉटेलमध्ये, त्याचं नाव " हॉटेल अमृतसर " असं होतं. तिथे आम्ही जेवण केलं. फक्त शंभर रुपयात, अगदी उत्कृष्ट आणि पोटभर जेवण त्या ठिकाणी मिळतं. जेवण केलं, आणि आम्ही आमच्या लॉजवर पोहोचलो.
यात्रेचं, पुढील वर्णन होणारच आहे. तत्पूर्वी, आपण थोडं मागे जाऊयात.
यात्रेला जाण्या अगोदर, पूर्वतयारी म्हणून.. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ती हरिद्वार प्रवासाची तिकिटं काढणं. तसेच तिथे पोहोचल्यावर लॉज बुकिंग, किंवा पुढील प्रवासासाठी अंतरजालाच्या मदती नुसार. एखादी, कार किंवा जीप बुक करायच्या आपण मागे लागतो. कारण, तिथे गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना त्याचा त्रास नको. हा, त्यामागचा मूळ उद्देश असतो. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे. चारधाम यात्रा करणाऱ्या, माझ्या प्रत्येक मित्राला माझं एक सांगणं आहे.
" हि घोडचूक, कोणीही करू नका..! "
कारण.. यात्रेची पूर्वतयारी म्हणून. मी सुद्धा, हरिद्वार मधील एका स्थानिक धंदेवाईक व्यक्तीला पुण्याहून तेथील गाड्यांचे दर आणि बजेट विचारलं होतं. त्यांनी दिलेलं बजेट, आणि प्रत्यक्षात माझा झालेला खर्च. म्हणजे, त्याठिकाणी दलाल लोकांचं कमिशन धरून मला मिळालेलं बजेट. यामध्ये, पक्की 'पन्नास' टक्के तफावत होती.
योगायोगाने, मला भेटलेला व्यक्ती तेंव्हा आजारी पडला होता. हरिद्वारला पोहचल्यावर, मी त्याच्याशी संपर्क साधला. तरी सुद्धा, मला तो पूर्वी सांगितले तेच रेट सांगत होता. शेवटी, मी एका स्थानिक टूरिस्ट कंपनी सोबत संपर्क साधल्यावर. मला, पुढील गोष्टीची कल्पना आली. आणि विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने.. मी हरिद्वार मध्ये पोहोचलो आहे. हे समजताच, तिथून पुढे, त्याने माझ्याशी संपर्क साधला नाही. बहुतेक, त्याचं पितळ उघडं पडण्याची त्याला भीती वाटली असावी.
सगळीकडे चालते तशीच, त्या भागात सुद्धा निव्वळ फसवाफसवी, आणि गल्लाभरू कामं चालू असतात. त्याठिकाणी, सर्वात मोठं काम म्हणजे. आपल्या, सामोरासमोरील व्यवहार. त्यामध्ये, फसगत होण्याची शक्यता फार कमी असते. असं माझं तरी मत आहे. चार ठिकाणी चौकशी केल्यावर आपल्याला त्याचा अंदाज येतोच.
चारधाम यात्रा..
मोजमापा प्रमाणे, तशी तर हि आठ दिवसांची यात्रा आहे. पण चुकून, यात्रेदरम्यान अचानक वातावरणात काही बदल झालाच. तर गडबड होऊ नये, म्हणून हि यात्रा दहा दिवसांची ठरवली जाते. भले मग, ती यात्रा आठ दिवसात जरी पूर्ण झाली. तरी तुम्हाला, त्या गाडी मालकाला दहा दिवसांचे ठरलेले पैसे द्यावे लागतात.
किंवा, यात्रेदरम्यान चुकून काही नैसर्गिक आपत्ती आलीच. तर.. तिथून पुढे जादाच्या पंधरा वीस दिवसांचे सुद्धा, तुम्हाला ठरलेले आहेत तितकेच पैसे मोजावे लागतात. तो अतिरिक्त भार आपल्यावर पडत नाही.
हा.. त्या, भागातील एक अलिखित नियम आहे.
त्या भागात, भटकंती दरम्यान. वाटेमध्ये, इतर सुद्धा फिरण्याची बरीच ठिकाणं आहेत. तुम्हाला जर, ती ठिकाणं पाहण्याचा मोह झाला. तर, त्या अतिरिक्त फिरण्यासाठी लागणाऱ्या वाढीव दिवसांची रक्कम मात्र तुम्हाला जागीच मोजावी लागते.
कारण.. आपण फक्त, चारधाम यात्रेसाठीच ती गाडी ठरवलेली असते. त्यामुळे, तो मोटार चालक आपल्याला फक्त चारधाम यात्राच करून माघारी आणतो. त्याव्यतिरिक्त, तो आपल्याला दुसरीकडे कुठेही फिरवत बसत नाही.
पण आपण, त्याच्याशी थोडं आपुलकीने वागलो. तर, तो सुद्धा थोडा मवाळ होत.. आणि, आपल्या ( प्रवाश्यांना ) खिशाला चाट देत. वाटेतील, इतर प्रेक्षणीय ठिकाणं सुद्धा तो आपल्याला प्रेमाने दाखवतो. आणि, त्याचे 'एक्स्ट्रा' पैसे सुद्धा तो आपल्याकडून वसूल करतो. सुरवातीलाच, तशी आपल्याशी तो बोलीच करून घेतो.
ह्या वाटेत.. अमुक एक ठिकाण आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. त्याकरिता, मुख्य रस्ता सोडून मला दहाएक किमी आत जावं लागणार आहे. त्याचे तुम्हाला अतिरिक्त असे पाचशे रुपये मला द्यावे लागतील..!
आपल्याला वाटलं, तर आपण तिथे जाऊ शकतो.
नाहीतर, पुढे रस्ता धावतच असतो.
शेवटी.. हि त्याची वरकमाई असते. पण, त्या भागातील आपल्याला माहित नसणारी एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला त्याठिकाणी पाहायला मिळते. हि सुद्धा, आपल्या जीवनातील एक फार मोठी कमाई असते.
कारण, त्या भागातून यात्रा करून आलेला एखादा व्यक्ती. घरी आल्यावर..आपल्याला, त्या भागातील. " ठराविक एका ठिकाणाला तुम्ही गेला होता का..? "
अशी विचारणा करतो. आणि, त्यावेळी आपण जर नाही असं म्हणालो,
कि.. तो लगेच आपली खिल्ली उडवतो.
हे सगळं टाळण्याकरिता,
त्या ड्रायव्हरला, आपणाला खूप खुश ठेवावं लागतं. त्याच्याशी सलोख्याने बोलणे, त्याला काही हवं नको ते पाहणे. त्याला गाडी चालवण्या बाबत बिलकुल मार्गदर्शन न करणे. आपण, त्याचे गुलाम आहोत अशा रीतीने वागणे. हे त्या भागात अगदी क्रमप्राप्त आहे.
नाहीतर, त्याचं डोकं फिरल्यावर, किंवा तो नाखूष असल्यावर. आपल्याला त्या भागातील इत्यंभूत माहिती मिळत नाही. आणि, तो म्हणावं असं सहकार्य सुद्धा करत नाही.
इतक्या लांब, दऱ्याखोऱ्यात आपण काय वारंवार जाणार आहोत का..?
हे त्याठिकाणी, ध्यानात ठेवून पुढे वाटचाल करणं कधीही हिताचं ठरतं.
प्रत्येक जन, फक्त पैश्यासाठी धावत असतो. पण, तुम्हाला म्हणून मी एक गोष्ट सांगतो. त्या भागात.. मला, महिना लाख रुपये जरी पगार मिळाला. तरी सुद्धा, त्या पहाडी भागात मोटार सारथी म्हणून मी कदापि काम करणार नाही..!
यावरून, तेथील रस्त्यांची आणि सफरीची तुम्हाला कल्पना यावी..!
क्रमशः

Tuesday, 21 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- दोन.
एकतर, त्याठिकाणी पायी चालणाऱ्या यात्रेकरूंची फार मोठी झुंबड. त्यात, तिथल्या स्थानिक लोकांच्या दुचाकींची कर्णकर्कश पीsss पीsss प..
पूर्ण रस्ताभर किंवा ते त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत. त्यांच्या दुचाकीचा हॉर्न काही बंद होत नाही. जसे काही, हे यात्रेकरू म्हणजे त्यांचे सातजन्माचे वैरी असावेत. त्या हॉर्नच्या आवाजाने, आपला जीव अगदी नकोसा होतो. त्यात कमी का म्हणून,
यात्रेकरू चालत असताना.. आमच्या हॉटेलमध्ये जेवायला या..! म्हणून, आग्रह धरणारे हॉटेलचालक निराळेच.
हे सगळे अडथळे पार करत-करत, आपण गंगा घाटावर पोहोचेपर्यंत. सगळा गंगा किनारा भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरून गेलेला असतो. शेवटी, नाईलाजाने पायाच्या टाचा वर करून आपल्याला गंगा आरतीचा आनंद घ्यावा लागतो. हि कसरत टाळण्यासाठी, किमान दोन तास अगोदर तरी. म्हणजे, साधारण सात वाजता गंगा आरती असते. त्याअगोदर, आपण त्या नियोजित ठिकाणी हजर असायला हवं. म्हणजे, अगदी सायंकाळी पाच च्या आत गंगा किनारे
पोहोचलं. कि सगळं काही, अगदी यथासांग आणि मनाजोगतं पार पडतं..!
गर्दीतले अनावश्यक धक्के बुक्के सहन करत.. सायंकाळी साडेसहा वाजता, मी कसाबसा गंगा घाटावर पोहोचलो. आम्हाला थोडा उशीरच झाला होता.
बापरे.. सगळा गंगाकीणारा, मानव जातीने तुडुंब भरून गेला होता. त्याअगोदर, घाट मार्गाच्या रस्त्यावर चालायला सुद्धा मोकळी जागा नव्हती. अगदी मुंगी पावलांनी लोकं पुढे सरकत होती. सगळीकडे, तोबा गर्दी झाली होती. कशीबशी वाट काढत, आणि दंडुकेधारी पोलिसांचा ससेमिरा चुकवत. मी, गंगेच्या किनारी पोहोचलो.
तरी सुद्धा. मुख्य गंगा किनाऱ्यावर जिथे " गंगा आरती " होणार होती. त्या ठिकाणा पासून मी बराच दूर होतो. मी जिथे उभा होतो, त्या ठिकाणावरून मला गंगा आरती व्यवस्थित दिसणार नव्हती. कारण, मी पडलो बुटका मनुष्य.. मी, टाचा वर करून सुद्धा काही खास उपयोग होत नव्हता. इतकी भयंकर गर्दी त्याठिकाणी होती. शेवटी.. मनाचा हिय्या केला, थोडा निर्लज्ज झालो. आणि, घुसखोरी करत मी मुख्य आरतीच्या ठिकाणी पोहोचलो.
सगळीकडे, अगीद धार्मिक वातावरण तयार झालं होतं. प्रत्येकजण, गंगा आरतीच्या प्रतीक्षेत तिष्टत बसला होता. गंगा किनारी नदीमध्ये पाय सोडून बसलेल्या लोकांच्या चरणांना गंगा मैय्याचं पवित्र जल शीतल अनुभूती देत होतं. त्यामुळे, त्यांचा उत्साह आणखीनच द्विगुणीत झाला होता. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र नुकताच डोकावू लागला होता. आता.. गंगा आरतीला सुरवात होणार. तितक्यात, सर्व भाविकांनी गंगेच्या प्रवाहातून आपापले पाय बाहेर काढून घेतले. आरती सुरु होणार,
तितक्यात.. शिपाया सारखे कपडे परिधान केलेला एक कर्मचारी भाविकांच्या त्या गर्दीमध्ये, हरिद्वार आणि गंगा घाटावरील सगळी धार्मिक आख्यायिका यात्रेकरूंना विषद करू लागला. पाप पुण्याच्या गोष्टी सांगू लागला.
मी मनातच म्हणालो, खरं आहे राव.. येथील प्रत्येक मनुष्य फारच धार्मिक आहे. हा मनुष्य तर पेशाने शिपाई वाटतोय. तरी सुद्धा, आपलं काम करून तो हे धार्मिक कार्य सुद्धा करत आहे.
तितक्यात, माझ्या डाव्या मनाने मला मलीन केलं. आणि, मला प्रश्न विचारला.
हा मनुष्य.. नक्की 'सेवा' करतोय कि 'मेव्याचा' बंदोबस्त करतोय..?
आणि.. माझं डावं मन अगदी तंतोतंत खरं ठरलं. सगळा समाचार विशद करत असताना. शेवटी.. त्या व्यक्तीने, गंगा आरतीचा लाभ मिळण्याकरिता. प्रत्येकाला, आरतीच्या एका वातीचे पाचशे रुपये. तर, गंगा आरती गंगेला ओवाळण्यासाठी हजार रुपयाचा आकडा घोषित केला.
झालं... गंगेच्या 'बाजाराला' सुरवात झाली होती. हे दृश्य पाहून, ती बिचारी गंगा सुद्धा आजवर लाखो अश्रू ढाळून मोकळी झाली असेल. पण ती बिचारी, आम्हा भक्तांकरिता अविरत वाहत आहे. आणि, वाहत राहील. शेकोडो श्रद्धाळू भाविकांनी, गंगा आरतीच्या लाभाकरिता रोख रकमा मोजायला सुरवात केली. सर्वांना, त्याची रीतसर पावती सुद्धा दिली गेली.
पैसा जमा झाल्यावर, मुख्य गंगा आरतीला सुरवात झाली. आणि, लक्ष-लक्ष दीपांनी गंगा घाटाचा आसमंत उजळून निघाला. गंगा माईच्या खळखळून वाहणाऱ्या स्त्रोताचा आवाज, आरतीच्या गुंजारावामध्ये हरवून आणि हरखून गेला होता. आणि तितक्याच तन्मयतेने, प्रत्येक भाविक स्वर्गसुखात नाहून निघत होता.
गंगा आरती झाल्यावर, आम्ही सर्वांनी गंगा स्नानाचा पवित्र कार्यक्रम आटोपला. इतक्या रात्री, थंडीमध्ये सुद्धा सर्व भाविक गंगास्नानाचा आनंद घेत होते.
याला म्हणतात श्रद्धा. तिथे, स्त्री पुरुष असा कोणताही भेद राहत नाही. सर्वजण, गंगा माईच्या समोर नतमस्तक झालेले होते. आणि, त्या खळाळत्या जलप्रवाहात. आपल्या शरीरातील गुण दोषांना सुद्धा वाहतं करत होते.
क्रमशः

Sunday, 19 June 2016

आज दुपारी.. माझी बाहेरील कामं उरकून मी घरी आलो.
घरामध्ये, माझी बायको आणि अन्य एक महिला बसली होती. तिच्या ओळखीची कोणीतरी असेल, असं म्हणून मी पुढे चालता झालो. तर माझी बायको मला म्हणाली, अहो.. तुम्ही हिला ओळखलंत का..?
बायकोच्या या अनाहूत प्रश्नावर मी सुद्धा थोडा चपापलो. आणि, त्या महिलेकडे मी जरा निरखून पाहिलं. मला, थोडी ओळख पटल्या सारखी झाली..!
आणि, पटकन मी म्हणालो,
तू " सोनार " आहेस ना..!
माझ्या ह्या अनपेक्षित उत्तरवार, माझी बायको आणि ती महिला सुद्धा अगदी चाट पडली. आणि, तितकीच आनंदित सुद्धा झाली. ती महिला, दुसरी तिसरी कोणी नसून, माझ्या बायकोची वर्गमैत्रीण होती. तब्बल बावीस वर्षांनी मी तिला पाहत होतो. तिच्या वडिलांची आणि माझी, जुजबी ओळख असल्याने. मी सुद्धा तिला बऱ्यापैकी ओळखत होतो. ती.. अगदी, पूर्वी होती तशीच दिसत होती. त्यामुळे, तिला पटकन ओळखता आलं.
माझं मन थोडं भूतकाळात गेलं. शालेय जीवनात, आपण मुलंच फार व्रात्य नसतो, तर मुली सुद्धा तितक्याच व्रात्य असतात. तर ह्या सगळ्या मुली.. ह्या सोनार आडनावाच्या मुलीला प्रेमाने..
" सोनी " म्हणायच्या. आणि, तिला पडलेलं हे उपनाव शाळेत सर्वांना माहित होतं. अगदी, मला सुद्धा माहित होतं.
बऱ्याच गप्पागोष्टी झाल्या, त्यानंतर.. चहापान आणि पुन्हा एकदा आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. माझ्या डोक्यावरचं छप्पर गायप झाल्याने. तिने तर मला ओळखलंच नाही. पण नंतर, माझी चेहरेपट्टी तिच्या ध्यानात आली.
हि काय करते..? ती कुठे असते..? अशी, सगळी विचारपूस झाली. जुन्या मैत्रिणी भेटल्याने या दोघी खूप खुश झाल्या होत्या.
बोलता-बोलता तिच्या सासर घरचा विषय निघाला. ती राहायला हल्ली मध्यप्रदेश मध्ये असते. तिचे मिस्टर, वन विभागात कामाला आहेत. सहज म्हणून मी तिला विचारलं..
तुझं सासरचं आडनाव काय आहे गं..!
तर, थोडी लाजतच ती म्हणाली.. " सोनी "
बापरे.. तिच्या या उत्तरावर, आम्ही तिघेही अगदी मनमोकळे आणि पोटधरून हसलो. काय कमाल आहे ना, ज्या नावाने शाळेत सगळ्या मुली तिला चिडवायच्या. तेच नाव, तिला सासरी आडनाव म्हणून मिळावं. काय जबरदस्त योगायोग आहे ना..!
चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- एक.

मी केलेली चारधाम यात्रा, तिला छोटा चारधाम असं संबोधलं गेलं आहे. उत्तराखंड या भागाला, देवभूमी तथा तपोभूमी सुद्धा म्हंटल गेलं आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने.. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हि तीर्थस्थानं येतात. आणि मोठा चारधाम म्हंटलं, कि त्यामध्ये.. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी, आणि रामेश्वर हि तीर्थक्षेत्र येतात.
मोठा चारधाम म्हणजे, संपूर्ण भारताची परिक्रमा आली. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर हा प्रवास म्हणजे कश्मीर ते कन्याकुमारी. तर.. छोटा चारधाम म्हणजे, निव्वळ हिमालयाच्या पहाडी रांगामध्ये मनसोक्त अशी धार्मिक भटकंती मानलं गेलं आहे.

माझ्यामते, मोठा चारधाम पेक्षा छोटा चारधाम यात्रा फार खडतर आहे. कारण, या यात्रेदरम्यान काही भक्तगण " पंचकेदार " हि यात्रा सुद्धा करत असतात. पंचकेदार यात्रा म्हणजे, त्या शिवभक्ताची खरी कसोटी ठरते. कारण, छोटा चारधाम करत असताना माझी जी दमछाक झाली. त्याहून कैकपटीने मोठा पल्ला या पंचकेदार यात्रेदरम्यान पार करावा लागतो. आणि ते काम, अगदी सहजशक्य नाहीये. त्यामुळे, इच्छा असून सुद्धा मी तो मोह आवरता घेतला. कर्मधर्म संयोगाने, माझ्या हयातीत कधी तो योग्य योग जुळून आला..
तर, प्रभूचरणी मी सुद्धा विलीन असेन.

चारधाम यात्रेत, सर्वात प्रमुख स्थान ठरतं, ते म्हणजे " हरिद्वार " हरीच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला, याच मार्गाने किंवा द्वारातून आपला तीर्थ प्रवास सुरु करावा लागतो. अतिशय गजबज असणारं हे ठिकाण, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अगदी गारठून गेलेलं असतं. हे पाच सहा महिनेच काय ते, त्यांचे कमवायचे किंवा सुगीचे दिवस असतात. त्यामुळे, यात्रेदरम्यान तेथील प्रत्येक व्यक्ती अगदी कंबर कसून कामाला लागेलेला असतो. वर्षभराची बेगमी, त्यांना याच काळात करून ठेवायची असते. त्यामुळे, ह्या काळात, पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत सगळी लोकं इथे अविरत सेवा पुरवताना आपल्याला पाहायला मिळतात.

इतर शहरांप्रमाणे, हरिद्वारच्या रेल्वे स्टेशन भागातील लॉज सुद्धा अगदी 'त्याच' लायकीची आहेत. मला काय म्हणायचं आहे, ते तुम्हाला समजलं असावं. घाईघाईने मी सुद्धा, या अशा भयंकर अवघड परीस्थित अडकलो होतो. त्यामुळे, प्रत्येकाला सावध करणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे, थोडी शोधाशोध करून व्यवस्थित आणि रेल्वे स्टेशन पासून थोडा दूर पण छानसा लॉज प्रत्येकाने आपल्या बजेट नुसार निवडावा.
चार व्यक्तींकरिता.. साधारणपणे, बाराशे रुपयांपासून ते पुढे कितीही. याप्रमाणे आपल्याला तिथे चांगले लॉज मिळून जातात. शिवाय, धर्मशाळा सुद्धा आहेतच.
या भागात, विजेची खूप बोंबाबोंब असल्याने. लॉज मालकाशी सुरवातीलाच सगळ्या गोष्टी क्लियर करून घ्याव्यात. नंतरहून कोणतीही तक्रार चालत नाही. रात्री दहा वाजल्यापासून, सकाळपर्यंत तिथे लाईट नसते. दिवसा तसा काही फारसा विषय येत नाही. मोठमोठे लॉज मालक, आपल्या लॉजमध्ये जनरेटर लाऊन बाकी सगळ्या सोयी करत असतात.
पण सकाळी, अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय. अगदी नशिबानेच व्हावी. नाहीतर थंड पाण्याने.शंभो.. हर, हर नारायणा.. करनं भाग पडतं..

मुख्य शहरापासून, ते गंगा घाटापर्यंतच्या अलीकडे एक किमी अंतरावर तेथील पोलीस यंत्रणेने त्या भागात मोठ्या चारचाकी वाहनांना मज्जाव केला आहे. त्यामुळे, तीनचाकी रिक्षाचालकच या भागातील ठराविक ठिकाणापासून आपल्याला अर्धा किलोमीटरभर अगोदरच सोडून मोकळे होतात.
तिथून पुढे गंगा घाटापर्यंत, आपल्याला पायी प्रवास करावा लागतो. पण तो प्रवास इतका भयंकर असतो. कि त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. असं काय मोठं दिव्य त्या रस्त्यावर असेल..? हा प्रश्न तुम्हाला हमखास पडणारच. पण ज्या व्यक्तीला, ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असेल. त्यांच्याकरिता, हा भाग म्हणजे अगदी नरका समान आहे. इतकंच काय, या विषयाला वैतागून..तेथील पोलीस लोकं सुद्धा, हातामध्ये, एक भलं मोठं अणकुचीदार दाबण घेऊन त्याठिकाणी कार्यरत असतात.
न ऐकणाऱ्या रिक्षाचालकांना, किंवा इतर वाहनांना काहीएक न बोलता. ती लोकं त्यांची टायर पंक्चर करत असतात. त्यावरून, तुम्हाला तेथील परिस्थितीचा अंदाज यावा.

क्रमशः