Friday, 24 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- सहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पहाटे सहा वाजता, मित्राच्या खोडीमुळे मला जाग आली.
मुखमार्जन केलं, थंड पाण्याने अंघोळ उरकली. आणि, आमच्या ब्यागा आवरून.. आम्ही लॉजच्या खाली येऊन थांबलो.
आमच्या गाडीवाल्याला एक फोन केला. तोवर, आम्ही चहापाणी उरकलं, बरोबर आठच्या ठोक्याला तो गाडीवान आमच्यासमोर हजर झाला.
दूर कुठेतरी.. एका गल्लीमध्ये त्याने त्याची गाडी लावली होती. तिथवर, आम्ही आमचं सामान ओढत नेलं. या नको त्या मेहेनतीने सकाळ-सकाळ आम्ही चांगलेच घामाघूम झालो. त्या, ड्रायव्हर मित्राची गाडी फारच जुनाट होती. संगीत व्यवस्था म्हणावी अशी ठीक नव्हती. पण, तो गाडीचालक स्वतः मालक असल्याने. त्याने, गाडी बऱ्यापैकी उत्तम ठेवली होती.
आमच्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा फार मजेदार होतं. " शरद पंवार " तिकडे सुद्धा, 'पवार' हे आडनाव आहे बरं का. पण, त्या भागातील " प " वर अनुस्वार असल्याने, त्याचा उच्चार पंवार असा होतो. असो.. तर, शरदने, आमचं सगळं सामान गाडीवर व्यवस्थित लादून घेतलं. पुन्हा एकदा, आमची त्या दलालाबरोबर पैश्यांची देवाणघेवाण झाली.
आणि.. सकाळी, ठीक नऊ वाजता आमच्या गाडीचा, पवारने स्टार्टर मारला.

हर हर गंगे, चारधाम भगवान कि जय..
हा जयघोष करत, आमची खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरवात झाली. हरिद्वार मधील, भरपूर आणि वायफट गर्दी पार करता-करता आमचा तिथेच तासभर गेला.
ऋषिकेश मार्गे.. आम्ही पुढे निघालो. पुढे साधारण, पन्नास एक किमी गेल्यावर, नरेंद्र नगर नावाच्या गावातील रस्त्याला मुख्य चौकातून दोन फाटे फुटले.
एक रस्ता.. बद्री, केदारला जाणारा होता. तर दुसरा रस्ता, यमुनोत्री आणि गंगोत्रीला जाणारा होता.
ऋषिकेश ते यमुनोत्री हा २२२ किमी अंतराचा प्रवास आहे. तुम्हाला हे अंतर कमी जरी वाटत असलं. तरी, या भागात गाड्यांचा वेग अत्यंत कमी असल्याने. ताशी, वीस ते पंचवीस किमीच गाडी धावत असते. त्यामुळे, हे अंतर पार करायला आम्हाला किमान दहा तास ते बारा तास लागणार होते.
आजूबाजूचा निसर्ग पाहत आमची गाडी यामुनोत्रीच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. आता, ड्रायव्हर सांगेल त्याप्रमाणे आम्हाला प्रवास करायचा होता.
त्यामुळे, पवार म्हणाला.. कि सुरवातीला आपण, यमुनोत्री आणि गंगोत्री करणार आहोत. आणि त्यानंतर बद्री, केदारला जाणार आहोत. आम्ही सुद्धा त्याच्या हो मध्ये हो मिसळली. कारण, या यात्रेमध्ये हि सीक्वेन्सच अगदी बरोबर अशी मानली गेली आहे.

आणि.. आमची गाडी, यमुनोत्रीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. आमचा ड्रायव्हर, थोडा मितभाषी असल्याने, त्याला बोलतं करण्याकरिता मी त्याच्याशी संभाषण सुरु केलं.

पंवार सहाब.. किती वर्षापासून तुम्ही गाडी चालवत आहात..?
दहा वर्ष झालीत..!
काही.. गुठ्का, तंबाखू, बिडी, सिगारेट पिता कि नाही..?
तर.. नाही म्हणाला.
मग.. दारू तरी पिता कि नाही..?
माझ्या या मिश्कील प्रश्नावर तो गालातल्या गालात हसला. आणि, मान हलवून त्याने मला तसा होकार कळवला.

तो.. गुठ्का वगैरे खात नव्हता म्हणून बरं झालं. नाहीतर.. त्याचं गाडीतून ते सारखं-सारखं थुंकण मला बिलकुल आवडलं नसतं.
आता.. पवार आमच्यात थोडा मिसळून गेला होता. आम्ही शक्य तितकं त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळातच, देहरादून आणि मसुरी हि दोन थंड हवेची ठिकाणं आम्ही ओलांडली. तोवर, दुपारचे दोन वाजून गेले होते. आमची दुपारची जेवणं उरकली. आणि, पुन्हा एकदा आम्ही पुढे कूच केली.

भयंकर कठीण घाटातून आमची गाडी मार्गक्रमण करत होती. वेळ पुढे निघाला होता. रस्ता मागे पडत चालला होता. आणि मजल दरमजल करत आम्ही बडकोट या जिल्ह्याच्या गावापर्यंत येऊन पोहोचलो. तोवर, रात्रीचे सात वाजत आले होते.
रस्त्यावर, छोटीमोठी खेडेगावं गावं लागत होती. त्याभागात, लॉज हा प्रकार फारसा प्रचलित नसल्याने. आम्हाला, कोणाच्या तरी हॉटेल वजा घरामध्ये राहावं लागणार होतं.
त्याच्या बंदोबस्तात, रस्त्यावर काही मुलं आम्हाला हातवारे करून..

" आमच्याकडे मुक्काम करा "

म्हणून.. आम्हाला, हाताने इशारे करत होते. काहीठिकाणी तर, मुलांसोबत त्या भागातील गोऱ्या गुलाबी गालाच्या मुली सुद्धा बसलेल्या होत्या.
किमान.. " त्यांना " पाहून तरी लोक आपल्या इथे मुक्काम करतील. अशी आशा, त्यांना होती. काय करावं, शेवटी पापी पेट का सवाल है..!
आणि.. या ' सुंदर ' योजनेमुळे, काही अंशी ते लोक त्यात सफल सुद्धा होत होते.

आम्ही.. यामुनोत्रीच्या अलीकडे, पन्नास किलोमीटर अंतरावर थांबणार होतो.
शेवटी.. 'खरादी' नावाच्या एका खेडे गावामध्ये शरद पवारने आमची गाडी बाजूला घेतली. आणि, आमचा पहिला मुक्काम तिथे निश्चित झाला..!

क्रमशः

No comments:

Post a Comment