Wednesday, 29 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- नऊ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दुपारचे दीड वाजले होते. आता परतीचा प्रवास सुरु करायचा होता. तत्पूर्वी, पोटपूजा करण्यासाठी आम्ही एक छोट्या टपरी वजा हॉटेलमध्ये थांबलो. तिथे.. तळलेल्या गोड करंज्या, जिलेबी, राजमा भात, आलू पराठे, भजी इत्यादी पदार्थ उपलब्ध होते. प्रत्येकाला खाण्यासाठी जे हवं आहे, ते घेतलं. आहे तसं पोटात ढकललं. आणि, पुन्हा एकदा पुढच्या पायी प्रवासाला आम्ही सुरवात केली.
आम्ही सगळे मित्र सोबतच निघालो होतो. आणि, पुन्हा एकदा तोच प्रकार, ताजेतवाने झालेले माझे सगळे मित्र मला सोडून झटकन पुढे निघून गेले. एका दृष्टीने, जे घडत होतं त्याला मी चांगलच म्हणत होतो. कारण, माझ्यासोबत ते मित्र चालत असते, तर मला इतकं सारं अनुभवता आलं नसतं, पाहता आलं नसतं कि लिहिता सुद्धा आलं नसत..!
तीव्र उतारावर चालत असताना, माझ्या गुढग्याला फार त्रास होत होता. मी, हळूहळू लंगडत लंगडत मार्गक्रमण करत होतो. त्यात उन्हाचा भयंकर चटका लागत होता. जेवण झाल्यामुळे, थोडी सुस्ती सुद्धा आली होती. आणि त्यात, जेवण झाल्यावर मी लगेच पाणी पीत नसल्याने. मला भयंकर तहान सुद्धा लागली होती. चालताना.. थोडं थोडं करत, मी चक्क दोनेक लिटर पाणी पिऊन गेलो होतो.
जय जमना मैय्याकी.. असा हिंदी भाषिकांप्रमाणे जयघोष करत, आम्ही ती उतरण उतरत होतो. आम्हाला वाटेत भेटणाऱ्या, आणि खालून चालत येणाऱ्या लोकांचं मनोबल वाढावं. म्हणून, मी त्यांना आवर्जून सांगायचो..
अगदी थोडं अंतर राहिलं आहे. बस, तुम्ही अगदी पोहोचलाच म्हणून समजा..!
माझ्या मुखातून, अशी दिलासा देणारी वाक्य ऐकून पायी प्रवास करणाऱ्या लोकांचा हुरूप आणखीन वाढायचा. आणि, मला सुद्धा मनोमन आनंद व्हायचा.
परतीच्या प्रवासात.. माझं, जवळजवळ चारेक किलोमीटर अंतर उतरून झालं होतं. आता, अगदी शेवटचा टप्पा उरला होता. थोडं अंतर चालून गेल्यावर, माझा एक मित्र माझी वाट पाहत रस्त्यात थांबला होता.
अरे चल ना बाबा लवकर,
पुन्हा.. पुढे गेल्यावर, तुझ्या एकट्या करिता सर्वाना ताटकळत बसावं लागेल. म्हणून, मी तुझी वाट पाहत मागे थांबलो आहे..!
गपगुमान..एकवार, मी त्या मित्राचा उपदेश ऐकून घेतला.
खरं पाहायला गेलं तर, त्याचंही खरच होतं म्हणा. बाकी मित्रमंडळी, आमच्यापुढे अगदी एखाद किमी अंतरावर होते. मी हळूहळू चालत येतोय म्हणून, एका मित्राला माझ्यासाठी मागे ठेवत त्यांचा सुद्धा रमत गमत प्रवास सुरु होता. माझ्या एकट्यामुळे, पुढे जाऊन सर्वांना ताटकळत बसावं लागेल. ते माझ्या मनाला सुद्धा पटत नव्हतं. माझं शरीर साथ देत नसताना सुद्धा, मी पुन्हा एकदा जोमाने आणि जोरदार चालायला सुरवात केली.
आता, आम्हाला मुक्काम स्थळी पोहोचायला. फक्त, अर्धा किमी अंतर उरलं होतं.
आणि.. अचानक, ढग दाटून आले.
पाऊस पडणार नाही असं वाटत होतं. पण, आकाशात कमालीची हलचल जाणवत होती. जोरदार सोसाट्या वाऱ्याच्या वेगाने, ढग सुद्धा विरघळल्या सारखे एकमेकात गुंफन घालत होते. दोन मनं शरीराने एकरूप झाल्यावर, त्यांच्यात कोणतेच पाश उरत नाहीत. अगदी असंच काहीतरी नभात घडत होतं. आकाश मंडलात, जोरदार हालचालींना सुरवात झाली होती. घाबरे होऊन, आम्ही दोघे झपाट्याने वाट उरकत होतो. परंतु, ते सगळं निष्फळ ठरलं. आणि तितक्यात.. जोरदार पावसाला सुरवात झाली.
मी तर, ते लहरी वातवरण पाहून पक्का घाबरून गेलो होतो. कारण, आभाळ पूर्ण काळोखाने माखलं गेलं होतं. अशावेळी मनात नको त्या भीत्या उत्पन्न होत असतात. आडोसा म्हणून, आम्ही दोघे डोंगराच्या एका कपारीला टेकून थांबलो. तर.. वरून माती घरंगळत आमच्या अंगावर पडू लागली. नको त्या भीत्या मनात डोकावू लागल्या. पावसात जावं म्हंटल तर, आमच्याकडे रेनकोट सुद्धा नव्हते.
घोड्यावर आणि डोलीवर जाणारी लोकं पूर्ण बंदोबस्तात होती. पण घोडं बिचारं भिजत भाजत तोंड खाली घालून मुकाट्याने चालत होतं. आजूबाजूला कुठे दुकानही नव्हतं. त्यामुळे, पाऊस थांबेपर्यंत आम्हाला तिथेच थांबावं लागणार होतं. दुपारचे चार वाजले होते,
आम्ही ज्याठिकाणी थांबलो होतो. तिथेच, आडोशाला एक माय लेक येऊन थांबले. मी, त्या मुलाला म्हणालो.
तुझ्या आईला, चालत जायला जमणार नाही. आता चार वाजलेत, तुम्ही यमुना माई पर्यंत पोहोचेस्तोवर तुम्हाला रात्रीचे नऊ तरी नक्कीच वाजतील. त्यापेक्षा, एकतर तू पुन्हा खाली तरी जा, किंवा पुढे जाण्या करिता तुझ्या आईला एखादा घोडा तरी करून दे. किंवा, नाहीच जमलं तर, उद्या सकाळी प्रवास सुरु कर.
माझं बोलनं.. त्याला बिलकुल पटलं नाही.
माझा फुकटचा उपदेश ऐकायला नको. म्हणून त्याने, त्याच्या आईला सोबत घेऊन भर पावसात यमुनोत्रीच्या दिशेने तेथून पोबारा केला.
तोवर, आमचे बाकी मित्र.. जानकी चट्टीला पोहोचून गाडीमध्ये बसले होते.
आणि.. त्यांचे आम्हाला फोनवर फोन सुरु झाले. या राव लवकर, किती वाट पहायची तुमची..? तितक्यात, पाऊस थोडा कमी झाला.
आणि आम्ही, पटपट निघायला सुरवात केली. आम्ही, पाच पन्नास पावलं पुढे जातोय न जातोय तोच. पुन्हा एकदा जोरदार पावसाने आम्हाला झोडपून काढलं. अंगावर एकदम बादलीभर पाणी कोणीतरी टाकावं. इतका भयंकर मोठा फ्लो होता तो.
आम्ही पळतच निघालो, तितक्यात शेजारीच एक दुकान होतं. तेथून, आम्ही वीस रुपयाला एक पात्तळ मेणकापडाची " बरसाती " ( रेनकोट ) विकत घेतली. संपूर्ण भिजलो होतो, तरी सुद्धा त्या बरसातीला मी घाईघाईने अंगावर चढवली. अशावेळी, मनुष्य कितीही हुशार असुध्यात, त्याचं डोकं बिलकुल चालत नाही. आणि धावत पळत, आम्ही कसेबसे गाडीपर्यंत जाऊन पोहोचलो. गाडीत बसलेले, बाकी सगळे मित्र सुद्धा पावसात चिंब भिजले होते. त्याठिकाणी आम्ही पोहोचताच,
धीरगंभीरपणे, आमचा ड्रायव्हर.. "शरद पवार" आम्हाला म्हणाला.
अब यहासे.. हम जल्दी निकल पडते है,
परतीचा रस्ता खूप खराब आणि घसरडा आहे. शिवाय, पावसाचा काहीच भरवसा नाही. पुढे वाटेत काय वाढून ठेवलं आहे. ते, आपल्याला माहीत नाही..!
त्यामुळे, वेळ न दवडता आपण पुढील प्रवासाची तयारी करूयात.
पडत्या फळाची आज्ञा झेलावी, तशी आम्ही पवारची आज्ञा झेलली. आणि, गाडीमध्ये बसून पुढील अवघड प्रवासाला सुरवात केली.
क्रमशः

No comments:

Post a Comment