Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- दहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकदाचा कसाबसा आमचा प्रवास सुरु झाला. पावसात भिजल्याने, सगळे मित्र थंडीने काकडून गेले होते. प्रत्येकाने आपल्या अंगावरील ओले कपडे काढून त्यांना पिळून सीटवर जागा मिळेल तिकडे सुकायला ठेवले होते. जानकी चट्टी येथे, जोरदार पाऊस पडत असल्याने. त्याठिकाणी कुठेही, कपडे बदलण्यासाठी कोरडी जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे..बाकी कपडे अंगावरच वाळतील असं ठरवून. उब मिळवण्यासाठी, अंगावर टॉवेल किंवा शाल पांघरून सगळे जन एकमेकाला चिटकून बसले होते. गाडीतील वातावरण उबदार व्हावं म्हणून, आम्ही आमच्या गाडीच्या काचा बंद केल्या होत्या.
पण बाहेर.. जोरदार पाऊस कोसळत होता. यमुनोत्री ते गंगोत्री, हे एकूण २२८ किमीच अंतर होतं. आज आणि उद्या मिळून, आम्हाला हा मोठा टप्पा पार करायचा होता. आजचा दिवस तर, जवळपास संपत आला होता.
दुपारचे चार वाजून गेले होते. सुसाट वेगात आमची गाडी मार्गक्रमण करत होती. चालत्या जीप मधून, घाटातून खाली पाहवत नव्हतं. इतक्या खोल दऱ्या, आणि त्यातून वाहणाऱ्या बर्फाच्या खळाळत्या नद्या पाहून. मनामध्ये, एक अनाहूत भीती घर करून जात होती. मोठ्या वादळी पावसामुळे, रस्त्यावर जागोजागी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते. काही ठिकाणी.. काही होतकरू महिला, ती पडलेली झाडं तोडून जळणासाठी सरपण म्हणून घरी घेऊन जात होत्या. यात, नकळतपणे त्यांच्या हातून समाजकार्य सुद्धा घडत होतं. आणि, त्यांची सरपणाची सुद्धा सोय होत होती. आणि, त्यात त्यांच्या गरिबीची एक हलकीशी झलक सुद्धा मला दिसत होती. त्या भागातील महिलांना, अशी तातडीची कामं सांगावी लागत नाहीत. सुगावा लागल्याबरोबर.. त्या स्वतःच, ताबडतोब अशा ठिकाणी पोहोचतात. आणि, आपला कार्यभाग उरकून मोकळ्या होतात. अशा जास्तीच्या कामांना, ते.. आपली जबादारी पेक्षा, जास्ती प्रमाणात कर्तव्यच समजतात. अशी दृश्य पाहून, मी फारच भारावून गेलो होतो. त्या माता भगिनींना मी मनोमन सलाम करत होतो. धन्य त्या माता माऊली.
आणि बघता-बघता, जानकी चट्टी, स्याना चट्टी, आणि त्यामधील असणारा तो अवघड घाटाचा टप्पा पार करून, आम्ही काल ज्याठिकाणी मुक्कामी राहिलो होतो. त्या खरादी नामक गावा पर्यंत येऊन पोहोचलो. सायंकाळचे सहा वाजले होते.
रोज रात्री, आठ वाजेपर्यंत गाडी हाकायची. असं आम्ही ठरवलं होतं. आणि चुकून, पावसामुळे वातावरण बिघडलं. तरच, सातएक वाजता एखादं चांगलं ठिकाण पाहून मुक्काम करायचा, असं आमचं ठरलं होतं.
नशिबाने.. आम्हाला ड्रायव्हर सुद्धा चांगला भेटला होता. त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त प्रवास करत होतो.
आता.. आमची गाडी, बडकोटच्या अलीकडील मुख्य चौकातून डावीकडे वळण घेत गंगोत्रीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली होती.
पावसामुळे ओले झालेले रस्ते, खूपच काळेकुट्ट आणि भयानक दिसत होते. यात्रा सुरु होण्यापूर्वीच, त्या भागातील सगळे रस्ते अगदी मस्त आणि तुळतुळीत करून ठेवले होते. त्याबद्धल तेथील सरकारचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण, एकतर, भयंकर घाटमाथा. आणि त्यात कहर म्हणजे एकेरी रस्ता. त्या ठिकाणी काम करताना, त्यांना किती अडचणी येत असतील. त्याची, आपल्याला कल्पना येऊ शकते.
रस्त्याचं इतकं सुंदर काम केलं होतं. कि..रस्त्यावर तुम्हाला एक खड्डा काय आढळेल. इतक्या दुर्गम भागातील सुंदर रस्ते पाहून, मी पुण्यात आणि स्पेशली खड्यांच्या गावात राहत असल्याची मला खूप लाज वाटत होती.
" नावाजला गुरव, कि देवळात हागून घाण "
हि.. फार पूर्वीपासून चालत आलेली एक म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच, चांगला म्हणता-म्हणता. आमच्या ड्रायव्हरने, आम्हाला त्याची कला दाखवायला सुरवात केली.
एकतर हा भयंकर आडवळणी रस्ता, आणि त्यात नुकताच अंधार पडायला सुरवात झाली होती. आणि अचानक,
ह्या बाबाच्या गाडीचा वेग भयंकर वाढला होता..!
आत्तापर्यंत, अगदी संयमित गाडी चालवणारा मनुष्य. एकाएकी इतक्या वेगात गाडी का चालवू लागलाय, ते आम्हाला समजेनासं झालं.
सगळ्यांच्या चेहेऱ्यावर, एक अनाहूत भीती पसरली होती. आमच्या पाठोपाठ इतर गाड्या सुद्धा येत होत्या, पण त्या फार दूर अंतरावर असायच्या. आणि जवळ आल्यातरी आम्हाला पास करून भुर्रकन पुढे निघून जायच्या.
एकतर.. आमची गाडी म्हणावी इतकी दुरुस्त नव्हती. त्या गाडीच्या स्टियरिंग मध्ये भरपूर प्ले होता. क्लच पेंडलचा कचकच आवाज यायचा. मागील दोन्ही टायर रीमोल्ड होते. नाही म्हणता, ब्रेक तेवढे ठीकठाक होते. पण, वेळ सांगून येतेय का हो..? कारण, गाडीवरील ताबा सुटला.. कि सरळ, " यमसदनी " जाण्याचा तो मार्ग होता.
या फाजील कारणामुळे, मी त्याला दोनचार वेळा हटकलं सुद्धा..
पवार सहाब..( झक मारत साहब म्हणावं लागतं.. नाहीतर, ) गाडी जरा धीरे चलाइये..! पण, मला ऐकून..तो फक्त " हुं " म्हणायचा. आणि, आहे त्याच वेगात पुढे गाडी ताबलायचा. नाईलाज त्याला काय इलाज. शेवटी, आम्ही सगळं काही देवाच्या हवाली सोपवलं. आणि, आम्ही सगळे जन गाडीमध्ये गपगार होऊन बसलो.
आता, पावसाचा जोर सुद्धा थोडा ओसरला होता. घाटमाथा संपून, जरा सपाटीचा रोड लागला होता. त्यामुळे, आमच्या सुद्धा जीवात जीव आला. सरळसोट रस्ता दिसल्याने, पुन्हा एकदा त्याच्या गाडीने वेग धरला.
संध्याकाळचे सात वाजत आले होते. पवारच्या वेगवान ड्रायव्हिंगला घाबरलेल्या माझ्या काही मित्रांनी, चहा पिण्याकरिता एका ठिकाणी गाडी थांबवली. आणि सर्व मित्रांनी मला तक्रार केली.
त्याला सांगा, आपण इथेच कुठेतरी जवळपासच्या ठिकाणी मुक्काम करूया म्हणून..! आणि.. चहा पिता पिताच, आम्ही तशा आशयचा त्याला तगादा लावला.
पण, तो काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणायचा..
पाऊस थांबला आहे. अजून थोडं अंतर कापून आपण थांबुयात. शेवटी..शरद पवारच तो, आमचं ऐकेल तर शपत..
आमचाही नाईलाज होता, आमची गाडी सुसाट वेगाने पुढे निघाली होती. बरंच अंतर पुढे गेल्यावर मुख्य रस्त्यावर डावीकडील बाजूला गंगोत्रीला जाण्याचा फाटा होता. आणि, या बहादराने गाडी समोरच्या रोडने पुढे नेली.
मी त्याला विचारलं, आपण इकडे कुठे निघालो आहोत..?
तर म्हणाला, इथून जवळच असणाऱ्या एका गावात आपण मुक्काम करणार आहोत. आता खूप वेळ झाला आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावरून गंगोत्रीकडे जाणार्या गाड्या पुढे सोडल्या जात नाहीत.
जाऊदेत.. पुढील गावात मुक्काम आहे, हे ऐकून माझा सुद्धा जीव भांड्यात पडला. त्याच बरोबर माझे मित्र सुद्धा खुश झाले. सगळे जन खूप हरकून गेले होते, जसा काही सर्वांना बोनस मिळाला असावा..
" चीण्याली सौद " नाव असलेल्या गावाच्या शिवेतून आमची गाडी आत गेल्याबरोबर. पवार हळुवार गाडी चालवत आम्हाला त्या भागातलं सगळं काही वर्णन करून दाखवू लागला.
इकडे अमुक आहे, तिकडे तमुक आहे. या गावात, राहायची सोय सुद्धा मस्त आहे. जेवण सुद्धा चांगलं मिळतं. या गावात फार मोठी वीज निर्मिती होते.. वगैरे, वगैरे..
आम्हाला काहीच समजत नव्हतं, तो.. या गावाचे एवढे गुण का गातोय..?
थोड्यावेळाने, आमची गाडी एका छानशा हॉटेलपाशी येऊन थांबली. मस्त, नवीनच बांधलेलं हॉटेल होतं. बाराशे रुपयात एक रूम, अशा दोन रूम आम्हाला तिथे मिळाल्या. लॉज मध्ये अंघोळीसाठी मस्त गरम पाण्याची सोय सुद्धा होती.
पवारने आम्हाला तिथे सोडलं, आमच्याकडून आगाऊ दहा हजार रुपये मागून घेतले.
आणि म्हणाला..
मी थोडं गावात जाऊन येतो, तुम्ही जेवून झोपा. जेवणाकरिता माझी वाट पाहू नका, मी उद्या पहाटे पाच वाजता येतो.
तेथून जाताना, हॉटेलमध्ये एका व्यक्तीशी " पंवार " काहीवेळ बोलत उभा होता.
तो गेल्यावर, आम्ही त्या व्यक्तीपाशी त्याची बरीच खोदून चौकशी केल्यावर आम्हाला समजलं.
ते गाव म्हणजे.. त्या पवारांची सासरवाडी होती. आणि, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने त्याची बायको सुद्धा याच गावी सुट्टीसाठी माहेरी आली होती.
लब्बाड कुठला..!!
तेंव्हा कुठे आमच्या लक्षात हि गोष्ट आली. याची गाडी, एवढी सुसाट आणि सैराट का झाली होती..!
आम्हाला यात्रेला घेऊन येण्यागोदर, तो नुकतीच चारधाम यात्रेची ट्रीप करून आला होता. आणि, पुन्हा घरी न जाताच तसाच आमच्यासोबत तो पुन्हा यात्रेला निघाला होता.
कदाचित..बायकोचा " विरह " त्याला सहन झाला नसावा.
म्हणून, आमची मस्त सोय करण्याच्या बहाण्याने. बायकोची सुद्धा भेट होईल असं पाहून,
त्याने, एका दगडात दोन पक्षी मारले होते.

क्रमशः

No comments:

Post a Comment