Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- तेवीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पहाटे पाच वाजता, आमच्या रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. आम्ही झोपेतून खडबडून जागे झालो. दरवाजाच्या बाहेर, सुहास्यवदनाने पवार उभा होता.
चलो सरजी.. निंद खुल गयी हो तो आगे निकल पडते है...!
या ठिकाणावरून सुद्धा, आम्हाला फक्त तोंडं धुवून प्रवासाला निघायचं होतं. कारण, एकतर इथे लॉजवर गरम पाण्याची सोय नसते. आणि, थंड पाण्यात अंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शिवाय.. बद्रीनाथ धामाच्या ठिकाणी, गरम पाण्याचे कुंड आहेतच. तिथे निवांत अंघोळ करता येईल. असं ठरवून, मुखमार्जन करण्यासाठी मी बाथरूममध्ये गेलो. सहज म्हणून, माझं आरशात लक्ष गेलं.
माझा चेहेरा, मला थोडा विचित्रच वाटत होता. नीट निरखून पाहिल्यावर समजलं. माझ्या चेहऱ्याची नाजूक कातडी जळून गेली होती. केदारनाथ यात्रेत पायी चालताना भयंकर चटक्याने नाकाची गालाची आणि कपाळाची त्वचा जळाली होती, गरम होतंय म्हणून, मी शर्ट काढून सुद्धा चाललो होतो. त्यामुळे, माझ्या दोन्ही खांद्यावरील त्वचा सुद्धा जळाली होती. त्यामुळे, मेलेल्या त्वचेचा माझं शरीर त्याग करत होतं. आणि, त्या मेलेल्या पांढरट त्वचेमागून नव्याने येणारी लालसर त्वचा स्पष्ट दिसत होती. आणि, मेलेली पांढरी त्वचा माझ्या संपूर्ण चेहेऱ्यावर बुरशिसारखी पसरली होती. त्या पांढऱ्या त्वचेमुळे माझा चेहरा थोडा विद्रूप दिसत होता. मी कसंबसं तोंड धुतलं. आणि सर्वांगावर, तेलकट नेविया क्रीम चोपडली. तेंव्हा कुठे, माझा चेहेरा जरासा मेकप झाला.
सगळी आवराआवर केली, ब्यागा गाडीवर लादल्या आणि पुढील प्रवासाला आम्ही सुरवात केली. पुढील प्रवासात.. विरही गंगा, पिपल कोटी, गरुड गंगा, टंगनी, हेलंग, इत्यादी प्रमुख स्थानं ओलांडत आपण जोशी मठ येथे पोहोचतो. जोशीमठाच्या अलीकडे, गरुड गंगा याठिकाणी आम्हाला एकाच ठिकाणी वाटेमध्ये दोन छोटीशी मंदिरं लागली. त्यांची नावं अनुक्रमे लक्ष्मीनारायण मंदिर आणि गरुड भगवान मंदिर अशी होती. अशी मान्यता आहे, कि..गरुड भगवान मंदिराच्या मागील बाजूस वाहणार्या गरुड गंगा नदीतील दगड आपल्या घरात ठेवले. तर त्या घरामध्ये साप वगैरे कधी येत नाही. माझ्या काही हौशी मित्रांनी, त्या नदीतील काही दगड त्यांच्यासोबत घेतले. दोन्हीही मंदिरात, भक्तिभावाने आम्ही माथा टेकवला. थोडं, चहापाणी उरकलं. आणि पुन्हा एकदा, पवारने गाडीचा दांडा पुढे ढकलला.
पुढे गेल्यावर, जोशीमठ नामक ठिकाण लागलं. बद्रीनाथ परिसरात, जेंव्हा स्नो फॉल सुरु होतो. तेंव्हा, बद्रिनाथाच्या मुख्य मंदिराची कपाटं ( दरवाजे ) बंद केली जातात. त्याकाळात, फक्त भारतीय लष्कराचे जवानाच मंदिराच्या आसपासच्या बाजूला खडा पहारा देत उभे असतात. त्याकाळात, सर्वमान्य नागरिकांना त्या भागात जाण्यास मज्जाव केला जातो. या शीत काळात, बद्रीनाथाची पूजक मूर्ती जोशीमठ येथे विराजमान केली जाते. आणि, शीत काळातील पुढील सहा महिने, जोशी मठामध्ये बद्रीनाथ भगवानाचे पूजापाठ आणि अन्य विधी पार पाडले जातात. जोशीमठ येथे निवासाकरिता फारच चांगल्या सुखसोयी आहेत. त्यामुळे, बरेच भाविक यात्रेला जाताना किंवा यात्रा करून परत येताना याठिकाणी आवर्जून मुक्काम करत असतात.
सकाळच्या आल्हाददायक वातावरणात, थंड हवेच्या ठिकाणी हेलकावे खात आमची गाडी मार्गक्रमण करत होती. जोशीमठ हे ठिकाण ओलांडून, आम्ही आता पुढे मार्गक्रमण करत होतो. आता भयंकर उताराचा रस्ता सुरु झाला होता. समोरच्या बाजूला भारतीय लष्कराने एक स्वागताचा बोर्ड लावला होता. वाटेमध्ये असणारी.. विष्णूप्रयाग, गोविंद घाट, पांडूकेश्वर हि ठिकाणं ओलांडत आम्ही पुढे निघालो होतो. साधारणपणे, तीसेक किमी अंतरावर बद्रीधाम राहिलं असावं. आणि, इतका भयंकर कठीण रस्ता सुरु झाला. कि, विचारता सोय नाही. शब्द अपुरे पडतील, इतका भयानक रस्ता. निव्वळ मातीचा रस्ता, ना त्याला कसले कठडे आहेत. कि त्यावर डांबरी आच्छादनाचा काही प्रकार आहे. वरच्या बाजूला, भुसभुशीत मातीचे डोंगर कधी एकदा आपल्या अंगावर पडतील, त्याचा नेम नाही. अगदी अरुंद रस्ते त्यात एकेरी वाहतूक, कधी-कधी रस्ता जाम झाल्यावर एखाद्या डोंगराखाली गाडी उभी असल्यावर अशी घबराट व्हायची, कि सांगता सोय नाही. तुम्ही म्हनताल, किती घाबरतोय हा व्यक्ती. पण त्याठिकाणी गेल्यावर, सत्य परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण, तेथील डोंगर कधी माती ओकतील त्याचा नेम नव्हता. त्या भयंकर ठराविक ठिकाणावरून पुढे निघून गेल्यावर जीव भांड्यात पडायचा. कारण, वरून मातीचा लोंडा आला. कि जागेवर गपगार व्हायचं काम आहे. शेवटी, जीवावर कोण उदार होणार आहे हो. पण निसर्गाच्या पुढे आपण सगळे हतबल आहोत. त्याची याची देहा मला अनुभूती मिळाली.
शेवटी ती कठीण चढाई उरकण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि समोर असणारा बद्री विशाल कि जय असा नारा करणारा हिरवा फलक माझ्या नजरेस पडला. आता मी खऱ्या अर्थाने जिंकलो होतो. चौथ्या धामात मी प्रवेशित झालो होतो. इथून पुढे काय व्हायचं असेल ते होऊदेत. कारण, मी आता प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन पोहोचलो होतो. जिथे प्रत्यक्ष माझे विष्णू भगवान विराजित आहेत. त्याठिकाणी पोहोचण्याचं भाग्य मला लाभलं होतं. वातवरण अगदी मस्त होतं. दुपारचे बारा वाजत आले होते. पवारने गाडी एका बाजूला पार्क केली. आणि, मंदिराकडे जाणारा रस्ता आम्हाला दाखवला.
अहाहा.. काय तो नजारा होता. शेजारून वाहणारी शुभ्र अशी अलकनंदा नदी, आणि तिच्या किनाऱ्यावर असणारं, बद्रीनाथाचं सुवर्णझळाळी असणारं मंदिर.
दुरून मंदिर पाहिल्याबरोबर, साक्षात विष्णू भगवान माझ्या सोबतीला असल्याचा मला भास झाला. काय तो अलौकिक सोहळा सांगावा. चारी बाजूने, बद्री विशाल कि जय अशा गुंजारवाने वातावरण प्रफुल्लीत झालं होतं.
मंदिराच्या अलीकडेच, काही हौशी लोकांनी भंडाऱ्याचं नियोजन केलं होतं. समोर प्रसाद आला होता. अन्नाला नाही म्हणून चालणार नव्हतं.
बासमती तांदळापासून, विशिष्ट प्रकारे बनवलेला तो गोड खिचडी भात ईतका अमृततुल्य होता. कि, इथे लिहित असताना सुद्धा माझ्या तोंडाला पुन्हा एकदा पाणी सुटलं आहे.
तो प्रसाद भक्षण करून, आम्ही मुख्य मंदिराच्या दिशेने निघालो.
त्याअगोदर असणाऱ्या तप्त कुंडावर आम्ही अंघोळीसाठी गेलो. थेट कुंडावर न जाता, तेथील लोकांसाठी, देवस्थानच्या लोकांनी एका बाजूला गरम पाण्याचे नळ त्यांना काढून दिले होते. तिथे, म्हणावी अशी गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही तिथे गेलो, त्या स्थानिक नागरिकांच्या बादल्या आणि मग घेऊन तिथेच आम्ही अंघोळी उरकल्या.
तेथील लोकांचं एक बरं आहे बरं का,
बद्रीनाथ येथील सहा महिन्यातील वास्तव्यात, त्यांना गरम पाणीपुरवठा अगदी विनामुल्य होत असतो. ज्यात, अंघोळी पासून ते कपडे धुवन्यापर्यंतची सगळी कामं ते या ठिकाणी येऊनच करत असतात. बाकी सहा महिने, मंदिराची कपाटं बंद असल्याने,
या गरम पाण्याच्या कुंडाच्या आधारे, भारतीय लष्कर सीमेवर कडा पहारा देत असतं. कारण, बद्रीनाथ मंदिराच्या मागील बाजूचा हिमालय ओलांडला कि लगेच चीनची हद्द सुरु होते.
अंघोळी उरकल्या, आणि देवदर्शनासाठी आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो. एक किलोमीटर भर मोठी दर्शनबारी तयार झाली होती. कारण, मंदिरात काहीतरी पूजा अर्चा चालू असल्याने दर्शनबारी बंद केली गेली होती. दोनच्या सुमारास, पुन्हा एकदा मंदिराचा मुख्य दरवाजा उघडला गेला. मुंगी पावलाने रांग पुढे निघाली होती. भलीमोठी रांग असल्याने, काही वृद्ध महिला, लोकांना त्यांना रांगेत घेण्याची विनवणी करत होत्या.
पण काही लोकांना, त्यांची जराशी सुद्धा कणव येत नव्हती. माझ्यापाशी आलेल्या साताठ वृद्ध महिलांना, मी माझ्यासमोरच घेऊ केलं. त्यावेळी, इतर लोकांना ह्या माई आमच्या सोबतच आहेत..! असं सांगून मी वेळ मारून नेली. म्हातारं माणूस आहे, वृद्धापकाळाने पाय थकलेले असतात. हे प्रत्येक व्यक्तीने, काही ठिकाणी मनामध्ये समजूतदारपणे त्याचं आचरण केलं पाहिजे. असं माझं स्पष्ट मत आहे.
अर्ध्या तासात, आम्ही मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. गर्दीमध्ये बरीच धक्का बुक्की चालू होती. अशा धार्मिक ठिकाणी गेल्यावर लोकं आपला संयम का विसरून जातात तेच मला समजत नाही. शिस्तबद्धपणे मार्ग्रक्रमण करत अगदी शांत चित्ताने प्रत्येकाने दर्शनाचा आनंद घेतला पाहिजे. पण नाही, ढकला ढकली आणि धक्का बुक्की करण्यात आणि रांगेच्या मुख्य चढाओढीत बाजी मारण्याच्या नादात आपण देवदर्शनासाठी आलो आहोत हेच विसरून जातो. आणि मुख्य मंदिरासमोर आपण परमेश्वराच्या मूर्तीसमोर असताना काही केल्या आपलं चित्त थाऱ्यावर राहत नाही. आणि मनभरून दर्शन घ्यायच्या आतच आपल्याला त्या गाभाऱ्यातून ढकलून बाहेर काढलं जातं. हे सगळं टाळण्यासाठी संयम फार महत्वाचा असतो. घाईघाईने जाणार्या लोकांना पुढे वाट करून देत आम्ही मात्र शांत चित्ताने परमेश्वराच्या चरणी लीन झालो. माझा माझ्या संपूर्ण कुटुंबियांचा आणि तुम्हा सर्व फेसबुक मित्रांचा नमस्कार बद्री विशाल चरणी वाहून प्रसन्न अंतकरणाने मी मंदिराच्या बाहेर पडलो. एक स्वर्गीय सुख प्राप्त झाल्याची अनुभूती मला त्याठिकाणी मिळाली. मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या बैठक व्यवस्थेत थोडावेळ आम्ही सगळे ध्यानस्थ बसून बद्रीनाथाची आराधना केली. आणि मंदिर परिसरात असणाऱ्या इतर काही गोष्टी पाहण्यात रमून गेलो.
क्रमशः

No comments:

Post a Comment