Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- अठरा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गौरी कुंडात स्नान झाल्याबरोबर..
गौरी माता आणि उमा महेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही तेथून बाहेर पडलो. आणि मुख्य रस्त्यावर आलो. मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूला असणाऱ्या छोट्याशा बाजारपेठा आणि रस्त्यावरील यात्रेकरूंची गर्दी पार करत आम्ही ज्या ठिकाणी घोड्यांचे सरकारी ठेके होते, त्या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलो.
त्याठिकाणी असणाऱ्या फलकावरील दर आम्ही पहिले. एका व्यक्तीला घोड्यावरून जाण्यासाठी, सरकारी दर अठराशे रुपये होता. तत्पूर्वी काही लोकं आम्हाला वाटेतच म्हणाले होते, " सरकारी दरापेक्षा ती लोकं बाराशे रुपये जास्ती घेतात. " आणि, तीन हजार रुपयात आपल्याला केदारनाथ मंदिरापर्यंत नेऊन सोडतात. येताना, उतार असल्यामुळे आपण चालत वगैरे येऊ शकतो.
यमुनोत्रीची छोटीशी का होईना. पण कठीण चढाई करून, माझे पाय तर अगदी घाईला आले होते. त्यामुळे, काहीही झालं तरी मी घोड्यावर बसून जाणार होतो. माझे बाकी मित्र भक्कम चालणारे होते, त्यामुळे ते पायीच येणार होते.
शेवटी.. घोड्यावर बसून जाणारा, मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघे मिळून घोड्याची चौकशी करायला गेलो. आणि, त्या लोकांचे घोड्याचे दर पाहून आम्ही अवाकच झालो. आज प्रवासासाठी घोडे कमी असल्याने, त्या लोकांनी भाविकांची अडवणूक करून, फक्त.. जाण्याकारीताचा, पाच हजार रुपये असा आजचा भाव फोडला होता. आम्ही रोजच्याप्रमाणे, त्यांना तीन हजार रुपये द्यायला तयार होतो. पण ती लोकं फारच आखडून बसली होती. पाच हजार रुपयाच्या खाली कोणीच यायला तयार नव्हता.
एवढे मोठे पैसे, वायफट खर्च करायला माझं काही धाडस होत नव्हतं.
काय करावं..? मला तर काहीच सुचत नव्हतं. तोपर्यंत, आमचे बाकी सात मित्र चालत पुढे निघून गेले होते.
शेवटी.. मी मनात विचार केला, जोवर चालता येयील तितकं चालुयात. शेवटी, वाटेत थकल्यावर तिथून एखादा घोडा करूयात. कारण, अमरनाथ यात्रेचा अनुभव माझ्या पाठीशी होताच. त्यामुळे, मी अगदी निश्चिंत होतो. ज्या लोकांना घोडे मिळाले होते, त्यांचा प्रवास सुरु झाला होता. काही लोकं घोडा न मिळाल्याने तिथेच तिष्टत उभे होते. तर, काही लोकांनी डोल्यामध्ये झुलत आपल्या यात्रेला सुरवात केली होती. लक्ष्मी पुत्रांसाठी.. आकाशात, घरघर करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या फेऱ्या सुद्धा सुरु झाल्या होत्या. वेळ वाढत चालला होता. शेवटी, आम्ही दोघांनी एक ठोस निर्णय घेतला. सगळं काही केदारनाथावर सोपवलं, आणि आम्ही सुद्धा पायी जाण्याचा निर्णय घेतला.
हर हर महादेव.. म्हणून, आम्ही आमच्या पायी यात्रेला सुरवात केली. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महाप्रलया नंतर आता नवीन बनवलेला रस्ता अगदी मस्त आहे. आपत्ती येऊन एक वर्ष उलटून गेलं. तरी तेथील सरकार, ते काम वेळेत पूर्ण करायला हतबल ठरलं होतं. शेवटी, तेथील सरकारने आणि भारतीय लष्कराने त्याकरिता अपार मेहेनत घेतली. आणि नव्याने सिमेंटच्या रस्त्याची निर्मिती झाली. हा रस्ता, खूपच मजबूत बनवला आहे. भल्यामोठ्या संकटांना सुद्धा हा रस्ता सडेतोड जवाब देऊ शकतो. इतकी मोठी ताकत त्या रस्त्यात आणि आपल्या भारतीय लष्करात आहे. याचा मला खूपच गर्व आहे.
शेवटी.. आम्ही चालायला सुरवात केली. सुरवातीला, रस्ता चढाईसाठी म्हणावे इतके श्रम आम्हाला पडत नव्हते. कारण, नुकतीच आम्ही चढाईला सुरवात केली होती.
मस्त प्रसन्न वातावरणात आमची यात्रा सुरु होती.
सुरवातीच्या टप्प्यात, पहाड चढताना मला घाम यायला सुरवात झाली. भास्कर, वक्रदृष्टी करून माझ्याकडे पाहत होता. तितक्यात, माझ्या समोरून एक विदेशी महिला चालती झाली. सहा फुट उंचीची, गोरी गोमटी आणि धिप्पाड बाई.. बघता-बघता चालताना मला मागे टाकून पुढे निघून गेली. ती पुढे गेल्यावर, एका वळणाला तिची आणि माझी नजरानजर झाली, ती माझा कमालीचा गेटप पाहून भलतीच खुश झाली होती. तिने माझ्याकडे पाहून, एक हसरा कटाक्ष टाकला. मी सुद्धा, तिला थम्स दाखवून माझी पसंती कळवली. आणि, ती आली तशी भुर्रकन पुढे सुद्धा निघून गेली.
चालताना, सगळा निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी. माझ्या डोळ्यावरील थंडगार गॉगल, मला अमूल्य अशी साथ देत होता. डोक्यावरील रुमाल, उन्हापासून माझं संरक्षण करत होता. सोबतच, माझा केमेरा सुद्धा मला मस्त मस्त फोटो टिपण्यासाठी मदत करत होता. त्याच बरोबर, वाटेत पायी चालण्यासाठी अजून किती अंतर शिल्लक आहे. तिकडे सुद्धा माझे डोळे असायचे. भरपूर चालत गेल्यावर, असाच एक बोर्ड मला दिसला.
मी जवळपास, दोन किमी अंतर कापलं होतं.
चल बेटा.. अजून चौदा किमी अंतर तुला कापायचं आहे. असं, स्वतःला सांगून. मी पुढे निघालो. उंचसखल भागातील रस्ता, दरीमध्ये वाहणारी मंदाकिनी नदी, आणि विविध पक्ष्यांचा आवाजाचं संगीत ऐकत माझी पायी वारी चालू होती.
आता मात्र, उन्हाचा तडाखा फारच वाढला होता. माझ्या अंगातून घामाच्या धारा सुरु झाल्या, शेवटी वैतागून.. मी, माझ्या अंगातला शर्ट काढला. आणि, त्याला पाठीवरील शबनम ब्याग मध्ये ठेवला. आता, जीन्स पेंट आणि बनियानवर माझा प्रवास चालू होता. शर्ट काढल्यामुळे, माझ्या अंगाला थोडं गार वारं लागत होतं. त्यामळे, माझ्या चालण्याचा जोश फारच वाढला. त्यात अजून एक गोष्ट आठवली, आपल्याकडे मोबाईल सुद्धा आहे.
मी.. लागलीच त्यावर गाणी सुरु केली, बनियन मध्ये विशिष्ट खोपा करून त्यात मी मोबाईल ठेवला. आणि, मस्तपैकी गाणी ऐकत माझा प्रवास सुरु झाला.
येणारे जाणारे लोक माझ्याकडे फार कुतूहलाने किंवा हा माणूस लैच वाढीव दिसतोय.
अशा अविर्भावात पहायचे. पण, आपलं एक धोरण आहे.
" मेरे मनको भाया, मै कुत्ता काटके खाया..! "
अशावेळी.. मी कोणाचीच भीडभाड ठेवत नसतो. आणि नाहीतरी, त्या दुर्गम भागात आपल्याला कोण ओळखायला आलंय हो. त्यात विशेष म्हणजे, माझे कोणी मित्र सुद्धा माझ्यासोबत नव्हते. मग तर मी अगदीच मोकळेपणाने माझ्या मस्तीमधे यात्रेचा आनंद उपभोगत मोकळा श्वास घेत पुढे मार्गक्रम करत राहिलो. रस्त्यात असणारी.. जंगलचट्टी, भिमबली, रामबडा हि ठिकाणं मी कधीच मागे टाकली होती.
वाटेमध्ये, काही वृद्ध लोकं सुद्धा मला चालताना दिसायचे. त्यांना चालताना पाहून, मला आणखीन हुरूप चढायचा. मजल दरमजल करत मी पुढे निघालो होतो. चालून-चालून तहान खूप लागत होती. एकदम ढसाढसा पाणी पिलं, तर पोटात दुखेल. म्हणून, घोटघोट पाणी पीत मी पुढे निघालो होतो. आता जवळपास, साडेआठ किमीचा टप्पा मी ओलांडला होता. नाही म्हणता, पायांनी अजूनतरी कोणतीही तक्रार केली नव्हती. म्हणून मी फार आनंदित होतो. माझ्याजवळ असणारी पाण्याची बाटली संपली होती. थोडी भूक लागल्यासारखी वाटत होती. जास्ती खाऊन जमणार नव्हतं, थोडीशी पोटपूजा करावी, आणि एक पाण्याची बाटली घ्यावी. म्हणून, पुढे कुठे दुकान आहे का ते पाहू लागलो, साधारण अर्धा किमी अंतरावर, मला एक पडाव दिसला. ते ठिकाण होतं, छोटा लीनचोली. मी तिथे पोहोचायला, आणि माझा थकलेला एक मित्र मला तिथे दिसायला एकच वेळ झाली. मी त्याच्यापाशी जाऊन पोहोचलो, आणि पहिल्या टप्प्यातलं पाहिलं विश्रांतीचं ठिकाण मी तिथे निवडलं.
थोडावेळ आराम केला, बराच वेळ कोणाशी बोललो नव्हतो. म्हणून, मित्राबरोबर थोड्या गप्पा मारल्या. नंतर एका दुकानात गेलो, तिथे काही हलकं फुलकं खायला मिळतंय का ते पाहिलं. तिथे, बिस्कीट वेफर्स आणि शीतपेय या व्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं. पण एका गोष्टीचं मला फार नवल वाटत होतं. इतका दुर्गम भाग असून सुद्धा, तिथे चक्क ओरिजिनल बिसलेरी नावाचं पाणी मिळत होतं. जे कि पुण्या मुंबई मध्ये नकली पाण्याच्या बाटल्यांचा सुळसुळाट आहे. पोटाला काहीतरी आधार असावा म्हणून, मी दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या दोन वेफर्सचे पुडे घेतले आणि आणि ( सगळं काही माहित असून सुद्धा ) दोन " थम्सअपच्या " अर्धा लिटरच्या बाटल्या सुद्धा घेतल्या. कारण, त्याठिकाणी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या पाहाडी भागात मिळणाऱ्या, सगळ्या वस्तूचे डबल भाव आहेत आहेत बरं का..
असणारच नाही का, इतक्या दुरून त्यांना हे समान वाहून जे आणायचं असतं.
मी खरेदी केलेल्या तिन्ही वस्तू, मी आणि मित्राने वाटून घेतल्या. आणि पुन्हा एकदा आमचा पायी प्रवास सुरु झाला. वेफर्सच्या तुकड्याबरोबर थम्सअप ची चव अगदी न्यारी लागत होती. खूप भूक लागली होती, त्यामुळे पटकन वेफर्स आणि थम्सअप संपवलं. त्यावर, पाण्याचा एक घोट घेतला. आणि, हळूहळू चालत मी पुढे निघालो.
आता मात्र, माझ्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता. त्यामुळे, माझ्या मित्राला मी पुढे जाण्याचा इशारा केला. आणि, सावकाश चालत माझा एकला चलो रे प्रवास सुरु झाला. आता मी, केदारनाथ भूमीच्या अगदी मध्यावर पोहोचलो होतो. आणि अचानक, माझं लक्ष डावीकडील पहाडावर गेलं.
त्या दूरवरच्या पहाडावर मध्यभागी मला एक पुसटशी रेष दिसत होती. थोडावेळ थांबून मी तिथे नीट निरीक्षण केलं. आणि सर्रकन माझ्या अंगावर काटा आला.
हो..ती पुसट दिसणारी रेष म्हणजे जुनी पायवाट होती..!
म्हणजे, केदारनाथला जाण्याचा तो जुना रस्ता होता. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महाजलप्रलयात हि वहिवाट कायमची बंद पडली होती.
कारण.. तो रस्ता, आता संपूर्ण असा राहिलाच नव्हता. पन्नास मीटरचा रोड, कि तिथूनपुढे शंभर मीटर वाहून गेलेला रस्ता. असा तुटक झालेला रस्ता मला त्याठिकाणी पाहायला मिळत होता. ते भयानक दृश्य पाहून, मी जागीच थिजलो. आणि, हा जलप्रलय घडला त्यावेळी प्रत्यक्ष काय प्रसंग घडला असेल. ती चित्र, माझ्या नजरेसमोर तरळू लागली.
त्या डोंगर किनाऱ्यावरून यात्रेकरू निघाले आहेत. कोणी डोलीवर असेल, कोणी घोड्यावर तर कोणी पायी असेल. आणि अचानक, हिमालयाच्या रांगामधून " अतिवृष्टीमुळे " वाहणाऱ्या नद्यांना भलामोठा पूर येऊन. त्या.. या पहाडी रस्त्यामार्गे, दरीतील मंदाकिनी नदीला गाठायला आडमार्गाने आल्या असतील.
आणि.. वरून खाली येताना. आपल्या सोबत, त्या.. मोठमोठे दगड आणि मातीचा मलबा सुद्धा घेऊ आल्या असतील. आणि, त्या अक्राळविक्राळ पद्धतीने आणि भयंकर वेगाने वाहणारं बर्फाचं पाणी, दगड आणि मातीचा मलबा यांचा एकत्रित मारा. त्या रस्त्यावरील भाविकांवर झाला असेल. त्यावेळी.. तेथील लोकांची काय परिस्थिती झाली असेल..?
लोकं.. अगदी किड्या मुंग्यासारखी वाहून गेली असतील.
माझ्या भोळ्या मनाला वाटलं, आता ज्या ठिकाणचा रस्ता शिल्लक होता. किमान तेथील लोकं तरी जगली वाचली असतील. असं माझं मन मला सांगत होतं.
पण भरपूर विचार केल्यावर.. माझ्या हे लक्षात आलं. लोकं कसे वाचतील कसे हो..?
एकतर वरून धोधो पडणारा पाऊस, आणि त्या चिखलाच्या मलब्यामध्ये,
याची देहा.. डोळ्यासमोर, जिवंत गाडली जाणारी लोकं पाहून. माणूसच काय, प्रत्यक्ष देव सुद्धा मूर्च्छित झाला असता. तिथे.. माणसाची काय तमा.
हा सगळा आलेख, माझ्या नजरेसमोरून जात असताना. माझ्या डोळ्यातून, आसवं कधी आणि कसे ओघळले. ते, माझं मलाच समजलं नाही.
संकटात सापडेल्या लोकांचा आक्रोश माझ्या कानात गुंजत होता. त्यांचे भयभीत चेहेरे माझ्या नजरेसमोर तरळत होते. अगदी सुन्न होऊन, मी एका दगडाला टेकून बसलो होतो. आणि, सीतापुर मधील मुक्कामात मला काही भास होत होते. ते का होत होते..? त्याची उकल मला झाली. आजही.. बरेच अतृप्त आत्मे, तिथे भटकत असावेत. पण, ते कोणाला त्रास देण्याच्या हेतूने नक्कीच नाही. याची मला खात्री पटली. मी हात जोडून सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहीली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, परमेश्वराला तशी आराधना सुद्धा केली. आणि, पुढे पावूल टाकलं.
मजल दरमजल करत पुढे मी निघालो. सकाळपासून चालण्याचं जवळपास अर्ध अंतर मी चालून आलो होतो. दूरवर बर्फाचा डोंगर मला दिसत होता. त्याच्या कुशीतच केदारनाथाचं मंदिर होतं. हे सगळं काही पाहत असताना. आता बाकी, माझे पाय मला चालायला नको म्हणत होते. वाटेत, एखादा घोडा मिळेल या आशेवर मी होतो.
पण.. वाटेमध्ये, पिट्टू सोडला तर दुसरं कोणतंच साधन मिळणारं नव्हतं. आणि, पिट्टू मध्ये बसून जाणं, परवडण्यापेक्षा मला न " आवडणारी " गोष्ट होती.
एका ठिकाणी, एक दक्षिण भारतीय महिला तिचे पती आणि त्यांचा आठ एक वर्षांचा मुलगा मला रस्त्यात फतकल मारून बसलेले आढळले. ती महिला चालून खूपच थकली होती. त्या महिलेला, आता बिलकुल चालवत नव्हतं. तिचा नवरा बाकी अगदी धडधाकट होता,
पण शेवटी..त्याच्या बायकोसमोर त्याने सुद्धा हात टेकले होते.
ती बाई, तशी बर्यापैकी जाडजूड होती. त्यामुळे, पिट्टू लोक सुद्धा तिला पाठीवरून घ्यायला नकार देत होते. आणि ती बाई,
रडवेला चेहेरा करून, चक्क वेड्यासारखी कोणत्याही सवारी असणाऱ्या घोडे वाल्याला, तेलगु भाषेत..
मला " केदारनाथला " घेऊन चला म्हणायची.
त्या कुटुंबाचे, भयंकर घडणारे हाल मला पाहवत नव्हते. त्यावेळी, त्यांच्यासमोर दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. त्या, मुख्य पुरुषाचे हाल मला पाहवत नव्हते. त्याचा राग फार अनावर झाला होता. पण, तो आता हतबल झाला होता.
त्यांच्या नशिबाने, त्यांना एखादा घोडा मिळाला तर ठीक. नाहीतर, त्यांचं केदारनाथ येथे येनं फार कठीण काम होतं.
त्यांना पाहून, नाही म्हणता मी सुद्धा थोडा खचून गेलो होतो. शेवटी, हे सगळं नजरेआड करण्यासाठी मी तेथून थोडा दूरवर निघून गेलो. आणि, शांत चित्ताने एका ठिकाणी मी बैठक मारली..!!

क्रमशः

No comments:

Post a Comment