Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- तेरा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गंगा स्नाना नंतर, आम्ही गंगोत्री मधील भागीरथीच्या मुख्य मंदिरात दर्शनाला गेलो. तिथे,
गंगाजी, यमुनाजी, सरस्वतीजी, लक्ष्मीजी, पार्वतीजी आणि अन्नपूर्णेची मूर्ती आहे. सोबतच महाराज भगीरथ यांची हात जोडून उभे असलेली मूर्ती सुद्धा आहे.
गंगा दर्शन आटोपून, गंगेचं पवित्र जल आम्ही आमच्या सोबत घेतलं. काही श्रद्धाळू तर, हे गंगाजल अगदी दहा वीस लिटर या प्रमाणात सुद्धा घेऊन जात होते. सर्वांनाच या पवित्र आणि खडतर ठिकाणी यायला जमत नाही. गंगा स्नान किंवा तिचं दर्शन प्राप्त होत नाही. त्यामुळे, अशा वंचित भाविकांना किमान गंगाजल जर तरी पोहोच करावं. हाच त्यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश असतो.
पुन्हा एकवार, संपूर्ण निसर्ग मी माझ्या डोळ्यात सामावत होतो. आता निघायची वेळ झाली होती. या देवभूमितून, माझा पाय निघता निघत नव्हता. पण, वेळ आणि पुढील दोन धामांची यात्रा सुद्धा मला खुणावत होती. पुन्हा एकवार, गंगा भागीरथीच्या चरणावर आमचं मस्तक टेकवून, आम्ही तेथून पुढील प्रवासाला निघालो. अशा पवित्र ठिकाणी गेल्यावर वेळेचं गणितच राहत नाही, दोनतीन तास अगदी असेच निघून गेले होते. आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला, भागीरथीच्या खळाळत्या प्रवाहाबरोबर, आमची गाडी सुद्धा गंगेचं मधुर संगीत ऐकत हळुवार मार्गक्रमण करत होती. माझं मन अगदी भरून आलं होतं. माझे पुण्यकर्म फळाला आले होते. मी स्वतःला फार पुण्यात्मा समजू लागलो होतो.
पुन्हा तेच अजस्त्र पहाड, आणि नागमोडी वळणं पार करत आम्ही निघालो. वाटेमध्ये चढण असणाऱ्या एका ठिकाणी, आम्हाला फार मोठा जाम लागला. पण अशावेळी तेथील पोलीस सुद्धा फार सतर्क असतात. आम्ही, त्या ट्राफिक जामच्या अगदी शेवटला होतो. आणि तितक्यात, दोनचार बुलेटवर डायरेक्ट " थ्री स्टार " अधिकारी तेथे आले. अतिशय सुंदर, आणि रुबाबदार पोलीस अधिकारी मला तिथे पाहायला मिळाले. थोडावेळ, सिनेमाच पाहत असल्याचा मला भास झाला. आणि, अवघ्या काही मिनिटात तो जाम मोकळा करून फटफट्या उडवत ते तेथून निघून सुद्धा गेले.
पवारकडे मी सहज म्हणून चौकशी केली, कि हि पोलीस मंडळी इतकी सतर्क कशी काय..? त्यावर पवार म्हणाला, यात्रेमध्ये अर्धा तासाच्या वर जाम जर अडकून पडला. तर या लोकांच्या नोकऱ्या सुद्धा जाऊ शकतात. यात्रे दरम्यान, इतके कडक कायदे त्या ठिकाणी अमलात आणले जातात. मनोमन, मी पुन्हा एकदा त्या उत्तराखंडमधील सरकारचे आभार मानले. आणि, पवारने आमच्या गाडीचा स्पेशल गियर टाकला.
घाटमाथा पार केला, आता सगळा उतार लागला होता. पवार डीझेल बचत करायच्या नादात गाडी न्युट्रल करून चालवत होता. सूर्य दिसत नव्हता, वातवरण ढगाळ झालं होतं. पाऊस कधी सुरु होईल त्याचा नेम नव्हता. अरुंद रस्ते, पुन्हा एकदा मला भीती दाखवू लागले. आमच्या मुक्कामाचं ठिकाण यायला अजून पन्नास किमी बाकी होते. म्हणजे अजून दोन तास प्रवास शिल्लक होता. अचानक काळोख दाटून आला, आणि रिमझिम पावसाला सुरवात झाली. हळूहळू म्हणता..
पावसाने त्याचा जोर वाढवला. आणि, त्याने तुफान मारा सुरु केला. गाडीमध्ये पुन्हा एकदा स्मशान शांतात पसरली होती. त्या परिसरात, पावसामुळे सध्या काय धुमाकूळ चालू आहे. ते तुम्ही बातम्यांच्या माध्यमातून पहात असलाच. तर प्रत्यक्ष त्यावेळी, अशा भयानक वातावरणात आम्ही किती घाबरलो असु. याचा तुम्हाला अंदाज आलाच असावा.
माझा मित्र आणि मी, आम्ही दोघेही पट्टीतले ड्रायव्हर असून सुद्धा आम्ही जाम घाबरलो होतो. पवार मात्र सराईतपणे गाडी हाकत होता. परंतु.. घाटाच्या प्रत्येक वळणाला, तो रोडच्या अगदी किनार्यावरून चर्रर्र करत जायचा. तेंव्हा, आमची फारच घबराट व्हायची. पावसामुळे, काचेवर धुक्याचा पडदा तयार व्हायचा. मी आणि माझा मित्र समोरचं काहीच दिसत नाहीये म्हणून रुमालाने त्याला स्वच्छ करायचो. पण पवारवर त्याचा काहीएक परिणाम व्हायचा नाही. बे एके बे प्रमाणे समोर नजर ठेवून तो गाडी हाकायचा.
हे सगळं घडत असताना, आमच्या काळजाचा ठोका चुकायचा. परंतु, पवारला काहीएक बोलायचं आमचं धाडस होत नव्हतं. हा चिडला, तर अजून गोंधळ व्हायचा..! पावसाचा जोर आणि याच्या गाडीचा वेग काही कमी होत नव्हता.
आणि इकडे, आमचे पाय बसल्या जागीच गाडीचा ब्रेक मारण्याचा नाहक प्रयत्न करत होते. भयंकर थंडीत सुद्धा, आम्हाला घाम फुटला होता. शेवटी, मी पवारला म्हणालो..
थोडी उजव्या बाजून गाडी घे राव, डावीकडे मोठी दरी आहे. आम्हाला त्याची फार भीती वाटतेय. त्यावर, मुखावर " प्रेम चोपडा " सारखं छद्मी हसू आणत, तो पुन्हा एकदा संपूर्ण वेगात गाडी रेटत निघाला. सगळं काही परमेश्वराच्या हवाली करत, आम्ही आपलं मरण उघड्या डोळ्याने पाहत होतो. त्या ड्रायव्हर लोकांना, हा नेहेमीचा रूट असल्याने. त्यांना त्याचं काही नवल वाटत नसतं. पण, आपली मात्र पाचावर धारण बसत असते.
दुरूनच जरा लाईट असेलेली गजबज दिसू लागली कोणतं तरी गाव आल्याचं ते सूचक चिन्ह होतं. बहुतेक, हे आमच्या मुक्कामाचं ठिकाण असावं असं आम्हाला वाटलं. पण नाही, ते भलतच खेडेगाव होतं. तिथे मुक्कामाची सोय नव्हती. अंधाऱ्या रात्री रोडचा अंतर दर्शवणारा बोर्ड माझ्या नजरेसमोरून भुर्रकन निघून गेला. अजून, वीस किमी अंतर कापायचं बाकी होतं. मुखामध्ये हरिनामाचा जप करत आम्ही पुढे निघालो. पावसाचा जोर वाढला, कि इकडे पवारच्या गाडी चालवण्याचा सुद्धा जोर वाढायचा. आणि, आमच्या काळजाचा ठोका चुकायचा. हा सगळा तमाशा पाहून, दोनचार जन तर गाडीतच झोपून गेले.
हे खरोखरच विकतचं दुखणं झालं होतं.
पण.. आमच्या काही डोळ्याला डोळा लागत नव्हता.
शेवटी एकदाचं मणेरी गाव आलं, पवारने गाडी बाजूला घेतली. पावसाळी वातवरण असल्याने, अडवणूक करून हजारच्या जागी दीड हजार मोजून आम्हाला झक मारत त्या रूम घ्याव्या लागल्या. रोज असणारं तेच जेवण, एकशेवीस रुपयांना एक थाळी असं घ्यावं लागलं. संकटात सापडल्यावर, या गोष्टी सर्रास होत असतातच.
आम्ही त्याकडे, हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. जेवणं आटोपली, सगळे जन थंडीने गारठले होते. कानटोप्या स्वेटर घालून सगळे मित्र जाडजूड रजयात घुसले. ते, सकाळी सातच्या ठोक्यालाच सगळे जागे झाले.

क्रमशः

No comments:

Post a Comment