Sunday, 31 July 2016

माझ्या मुलाने, परवा मला नवीन दुचाकीची मागणी केली. मुलाची आवड आहे, नाही म्हणता येत नाही. आणि, नाही म्हणावं तर..
उद्या पुन्हा नवीन प्रश्नांचा मला भडीमार नको. माझ्यासाठी तुम्ही काय केलत..?
आपली ताकत, आणि आवड आहे. म्हणून, काहीवेळा हौसेखातर मुलांच्या सर्व गोष्टी आपल्याला मान्य कराव्याच लागतात. हे कोणालाच चुकलेलं नाहीये.
परंतु, त्याचबरोबर..
माझं मन, पुन्हा एकदा उत्तराखंडमधील त्या खडतर भागात जाऊन पोहोचतं, गरिबीच्या दाहीदिशा मला त्या भागात पाहायला मिळाल्या.
त्यातीलच एक मुख्य विषय, म्हणजे.. " पिट्टू "
त्या भागात.. केदारनाथ यात्रेदरम्यान, मी माझ्या मुलाच्या वयाचे बरेच पिट्टू मुलं त्याठिकाणी पाहिले. पण, त्यातील एकही पिट्टू मला तिशीच्या पुढील वयातील दिसला नाही.
याचं नेमकं काय कारण असावं..? हा विचार मला पडलाच नाही.
कारण, पन्नास साठ किलो वजनाच्या व्यक्तीने त्याच्याच वजनाच्या किंवा त्यापेक्षा जास्ती वजनाच्या लोकांना इतक्या खडतर चढाईसाठी आपल्या पाठीवर वाहून नेल्यावर. तो व्यक्ती, वयाच्या पन्नाशी पर्यंत धडधाकट राहू शकेल का..?
हा, फक्त विचार करण्याचा विषय आहे.
सकाळी आठ वाजले तरी, आपली ऐन तरुणाईतील मुलं आपल्या मखमली अंथरुणातून किंवा झोपेतून उठत नसतात. त्याचवेळी.. त्या उत्तराखंड भागातील मुलं, पहाटे.. चार वाजल्यापासून, आपल्या दैनंदिन रोजीरोटी करिता. पाठीवर, बांबुच बास्केट घेऊन आपल्या पोटाच्या आगीकारिता वजनी लोकांना पाठीवर घेऊन केदारनाथ पहाडाच्या कठीण चढाईसाठी कामाला लागलेली आपल्याला त्याठिकाणी पाहायला मिळतात.
अतोनात कष्ट आहेत हो. त्या मुलांना, ती " गधा मेहेनत " करताना पाहून. यात्रेदरम्यान, सुन्न होऊन मी अक्षरशः ढसाढसा रडलो होतो. नाही हो, नको त्या वयात नको ती कामं त्या मुलांना करावी लागतात. पण, ती मुलं हे सगळं आनंदाने स्वीकारत असतात.
त्या भागातील मुलांची हौसमौज कोण पुरवत असेल..? कारण, एकतर त्या भागात पैश्याची फार वानवा. त्यामुळे, वयाच्या ऐन उमेदीत मजामस्ती करण्याच्या वयात त्या मुलांना घराला हातभार लावण्याकरिता. कामा धंद्याला लागावं लागतं. हि फार मोठी शोकांतिका आहे.
काय करावं..?
शेवटी पापी पेट का सवाल आहे..!
तिथे, काम केलं तर पैसा मिळेल. नाहीतर, तरुण मुलांना कामाविना घरात फुकटचं कोणीच पोसणार नाही. नाहीतर, हे असलं वजनी काम नको. म्हणून, काही मुलं थेट पुण्या मुंबईची वाट धरतात. आणि, पैसे कमवायला घराबाहेर पडतात.
इथे आल्यावर तरी काय आहे हो. शिक्षण कमी असल्याने, त्यांना सर्रास कुठेतरी मोलमजुरीसाठी जावं लागतं. नाहीतर, हॉटेलमध्ये वेटर म्हणून तरी काम करावं लागतं. नशिबाचा फेरा कोणालाच चुकला नाही. पण कुठेतरी, मनाला चणचण लागून राहते.
असो.. माझ्या मुलाला मी नवीन बाईक घेऊन देणार आहे.
पण, एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाने या अभागी मुलांची ओंजळ अजून किती दिवस भरणार नाही..? या गोष्टीमुळे, माझं काळीज सतत तीळतीळ तुटत राहील.
यात, यत्किंचितही शंका नाही..!


No comments:

Post a Comment