Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- चौदा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सकाळची आवराआवरी करून घेतली. गरम चहा नरड्या खाली ओतला. आणि, जीपमध्ये बसून उत्तरकाशी या जिल्ह्याच्या ठिकाणी आलो. तेथील पुरातन अशा, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात माथा टेकला. आमचा पुढील प्रवास सुखरूप व्हावा असं परमेश्वराला तिथं साकडं घातलं.
आणि.. आमच्या गाडीचे टायर पुन्हा एकदा धाऊ लागले. आता, केदारनाथच्या भूमीकडे आणि प्रस्थान ठेवलं होतं.
उत्तरकाशी ते केदारनाथ हे जवळपास २५७ किमीचं अंतर आहे. मजल दरमजल करत आमची गाडी पुढे निघाली. वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी उत्तराखंड भागातील गरिबी दिसून येत होती. शेती हा एकमेव पर्याय असल्याने, तेथील सर्वच महिला आणि पुरुषांना शेतीत काम करणं हे क्रमप्राप्त आहे. काही नाही तर, घरातील गुरांसाठी चारापाण्याची व्यवस्था तरी त्या महिलांना करावीच लागते.
त्याकरिता, पाठीवर भलं मोठं डालगं अडकवून त्यांना चाऱ्याच्या शोधात घराबाहेर पडावं लागतं. कोणत्याही पुरुषाने अगदी सहज म्हणून जावं..कि,
" ती माझी बायको असती, तर मी तिला कधीही असल्या कामाकरिता घराबाहेर धाडलं नसतं..! "
इतकं अप्रतिम सौदर्य आणि कमनीय बांधा त्या महिलांच्या ठाई दडलेला होता. त्या महिलांचे हे शेतीतील अपार कष्ट पाहून, आपल्या येथील महिलांचा मला फार हेवा वाटत होता. शेवटी, प्रत्येकाचं नशीबच म्हणावं लागेल. घाट माथ्यावरील हिरवळ पाहत आम्ही आगेकूच करत होतो. आता, टेहेरी नामक जिल्ह्याच्या ठिकाणावरून आमची गाडी मार्गक्रमण करत होती. हिरवागार निसर्गरम्य परिसर डोळ्यात मावत नव्हता. इतकं अप्रतिम सौंदर्य त्या भागात दडलेलं आहे.
पुढे.. कीर्तिनगर, मलेठा, श्रीनगर ( हे श्रीनगर काश्मीर मधील नाही. ) आणि शेवटी रुद्रप्रयाग येथे आम्हाला जायचं होतं. त्यागोदर वाटेमध्ये, आम्हाला चमियाला नावाचं एक गाव लागलं. तिथे आम्ही, थोडी फळं वगैरे खरेदी केली. आणि, तोंड चालू ठेवत आम्ही पुढे मार्गक्रमण करू लागलो.
यात्रेला जाण्याअगोदर, चुकीची माहिती मिळाल्याने. आमच्यापैकी काही मित्रांनी प्रवासात अतिरिक्त बोजा वहायला नको. म्हणून, गरम कपडे घेतले नव्हते.
त्यामुळे, घनसाली नावाच्या गावामध्ये आम्ही थोडी खरेदी करण्याकरिता थांबलो. तसं पाहायला गेलं तर, मला काहीएक खरेदी करायची नव्हती. म्हणून, मी इकडेतिकडे भटकत होतो. भटकताना, रस्त्यावर एका ठिकाणी मला एक मनुष्य आलू पराठा बनवत असताना दिसला. पुढे गेल्यावर कसं जेवण मिळेल ते माहित नव्हतं. म्हणून, मी सरळ त्या हॉटेलमध्ये घुसलो. हॉटेलमध्ये, एक महिला तिच्या लहान मुलाला जेवण भरवत होती. आतील मेनू बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं.
" इथे दारू पिण्यास सक्त मनाई आहे "
त्या हॉटेलमध्ये, मोठा लट्ठ पराठा फक्त वीस रुपयाला होता. मी, एक आलू पराठा ऑर्डर केला. आणि, हॉटेलमध्ये असणाऱ्या दुसऱ्या बोर्डवरील मेनूकार्ड पाहिलं.
अरेरे..त्यावर सगळ्या मांसाहारी पदार्थांची नावं होती. काहीवेळाने, दोन गिऱ्हाईकं त्या ठिकाणी आले. आणि हॉटेलच्या आतील बाजूस जाऊन बसले,
त्यांना लगेच, काचेचे ग्लास धुवून दिले गेले. सोबत, दारू सुद्धा दिली गेली. नाही म्हणता, मी थोडासा वैतागून त्या माणसाला म्हणालो.
हे काय नाटक आहे रे..? दारूबंदी म्हणता. आणि सर्रास दारू विकता.
त्यावर, तो मनुष्य मला म्हणाला. वो वहा मालकन बैठी है, उनसे बात करो.
आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला होता. बाईला पुढे करून, इथे नको तो धंदा चालू होता. असो, सगळीकडे हीच बोंबाबोंब आहे. पराठा थोडा कडवट होता. मी तो तसाच सोडला, आणि तेथून बाहेर पडलो.
बाहेर.. माझा मित्र रस्त्यावर काहीतरी शोधत होता. त्याला, तू काय शोधतोय असं विचारलं. तर म्हणाला, कमरेच्या कटदोऱ्याला बांधून ठेवलेले माझे तेरा हजार रुपये कुठेतरी पडले आहेत..! माझा हा मित्र अजूनही, त्याच जुन्या जमान्यात वावरतोय. सोबत पाकीट ठेवायची त्याला बिलकुल माहित नाही. एकदा हरवलेला पैसा हि काही सापडणारी वस्तू नव्हती. पैसे गेल्याचे त्याच्या चेहेऱ्यावर तसे विशेष भाव नव्हते. कारण, त्याच्या सोबत ए.टी.एम. कार्ड सुद्धा होतं. आणि, त्यात भरमसाठ माल सुद्धा होता.
खरेदी आटोपून सगळे मित्र आले. मित्राचे पैसे हरवल्याने, सगळ्यांनी एकवार हळहळ व्यक्त केली. आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
वाटेमध्ये, चेकपोस्ट वर पोलिसांकडून आमची गाडी अडवली गेली. पवार अगदी क्लियर कट माणूस, सगळी कागदपत्र अगदी परफेक्ट पाळून होता. तरीही, त्याठिकाणी त्याचं चलान कापलं गेलं. आता नेमका किती दंड बसला आहे. ते आम्हाला समजलं नव्हतं, कारण गाडीच्या खाली कोणी उतरलं नव्हतं. हताश होऊन आणि थोडं रागाने पवार त्या पोलिसाकडे पाहत होता. बऱ्याच वेळाने, दंड भरून तो गाडीमध्ये आला. आता आम्हाला भीती, कि दंड बसल्याने हा रागारागात गाडी चालवणार. आणि, आमच्या गोट्या कपाळात घालणार. शेवटी.. मीच त्याला म्हणालो,
किती दंड घेतला..? तर म्हणाला, शंभर रुपये..!
कशाकरिता घेतला..? तर म्हणाला, युनिफोर्म घातला नव्हता त्यामुळे..!
शंभर रुपयाकरिता, त्याचा इतका जीव चालला होता. पूर्ण यात्रे दरम्यान याने एवढाच काय तो शंभर रुपये दंड फाडला असेल. आपल्या भागात हि यात्रा असती, तर पूर्ण यात्रेदरम्यान टोलनाके आणि दंड भरण्यात दोन चार हजार नक्कीच गेले असते. पण त्या भागात पैशाला फार महत्व. आणि तेवढीच जपणूक सुद्धा,
हे दंडाचे शंभर रुपये कुठे. आणि, माझ्या मित्राचे तेरा हजार कुठे. पैसे गेल्यामुळे दोघांच्या जीवात झालेल्या घालमेलीत मला कमालीची तफावत जाणवत होती.
एकुणात, फारच अवघड गणित होतं..!

क्रमशः

No comments:

Post a Comment