Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- सोळा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
या.. सीतापुर ठिकाणी मुक्कामी आल्यावर, शोले सिनेमातल्या एखाद्या निर्जन गावामध्ये आल्यासारखा मला भास होत होता. का ते मला माहित नाही, पण या गावात मला काही मन रमण्या सारखं वाटत नव्हतं.
त्यामुळे, माझ्या बेचैनीत कमालीची वाढ झाली होती. कोण जाने का, पण माझ्या मनात एकप्रकारची भीती दाटून आली होती.
माझ्या आजूबाजूला, कोणी तरी असल्याचा मला सतत भास होत होता. कोणीतरी, मला चोरून पहातंय किंवा ऐकतंय असा भास व्हायचा. त्या हॉटेल मधील रुममध्ये सुद्धा, कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत आहे. असा मला भास व्हायचा.
मी.. ह्या पृथ्वीतलावर नसून, अगदी वेगळ्याच कोणत्यातरी दुनियेत असल्याचा मला भास होत होता. त्या भागातील वातावरण सुद्धा, मला अगदी विचित्र असं वाटत होतं.
धड आभाळ हि नाही कि पाऊस हि नाही. उन्हाळा म्हणावा, तर थंडीचा जबरी कडाका होता. त्यामुळे कारण नसताना, मी अगदी उदास झालो होतो. मी भुताटकीच्या गोतावळ्यात तरी नाही ना..? असा सुद्धा मला दाट संशय यायचा. काय करावं, काहीच कळत नव्हतं. कोणाला सांगावं..? आणि, काय सांगावं..? हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. घाबरून, काहीतरी विचित्र हालचाली कराव्या, तर इतर मित्रांना त्याची झळ पोहोचायची. म्हणून, मी माझ्या बिछान्यावर गपगुमान पडून होतो. पण, मला झोप काही लागत नव्हती.
मन मोकळं तरी कोणाकडे करावं, हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. घरी फोन करावा तर त्यांना टेन्शन, मित्रांना फोन करावा तर घरामध्ये कळणार. नेमकं काय करावं, ते मला सुचत नव्हतं. शेवटी, माझे मित्र राहुल भाऊ यांना मी फोन करायला घेतला. तर, मोबाईलवर असणारी रेंज अचानक निघून गेली. त्यामुळे, माझ्या मनाची नुसती घालमेल चालू होती. शेवटी वैतागून, त्या अंधाऱ्या रात्री मी एकटाच लॉजच्या बाहेर पडलो. रात्रीचे अकरा वाजून गेले होते.
ज्या व्यक्तीकडून आम्ही रूम भाड्याने घेतली होती. त्याने, त्याच भागात रोडला लागून एक दुकान सुद्धा थाटलं होतं. त्यात बूट, स्वेटर, ब्याग पासून बऱ्याच अत्यावश्यक वस्तू विक्रीला ठेवल्या होत्या. दुकानात गेलो, काहीएक कारण नसताना हातमोजे आणि रेनकोट खरेदी केला. ते दुकान, दोघे बापलेक चालवत होते. थोडा विरंगुळा म्हणून मी त्या दोघांशी वार्तालाप केला. ते दोघेही, मजबूत दारू पिले होते. माझ्याशी बोलताना, त्यांच्या तोंडाचा दारूचा भकाभका मला वास येत होता. इकडे थंडीमुळे, सगळी लोकं सर्रास दारू पीत असतात. ते मला समजलं होतच, पण त्या दोघांना पाहून, विनाकारच मी भूत बंगल्यात तरी राहत नाहीये ना..? अशी शंका माझ्या मनात दाटून आली. म्हणून, या दोघांना मी काहीएक प्रतिप्रश्न केला नाही. पण, एक गोष्ट मात्र घडली. या मधल्या वेळात..
कोण जाने का, पण.. माझ्या मनात येणारे भलते सलते विचार, अगदी नाहीसे झाले होते. दुकानातून बाहेर पडलो. आणि मी तडक रुममध्ये गेलो, झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण झोप काही येत नव्हती, कडाक्याची थंडी पडली होती. आपल्या गादी इतक्या जाड जाड रजया आम्ही अंगावर घेतल्या होत्या. तेंव्हा कुठे, थोडी उब निर्माण झाली. आणि मध्यरात्री मला कधी झोप लागली ते काही समजलं नाही.
माझी.. नेटकी दोन चार तासांची झोप झाली असेल. आणि.. काही लोकांच्या आवाजी कालव्याने माझी झोप चाळवली. बरोबर चार वाजले होते, लोकांची केदारनाथला निघायची घाई चालू झाली होती. इथून सुद्धा, आम्हाला अंघोळ न करताच निघायचं होतं.
कारण.. यात्रेच्या सुरवातीलाच, " गौरी कुंड " नामक ठिकाणी, गरम पाण्याचे कुंड आहेत. यात्रेला जाताना, तिथेच सर्व भाविक अंघोळ करून पुढे निघत असतात.
त्या कालव्यामुळे जाग आल्याने, आम्ही सुद्धा उठायची गडबड केली, सगळं आवरेपर्यंत शेवटी पाच वाजलेच. रुमच्या बाहेर आलो. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. सगळीकडे अगदी शुकशुकाट होता. सगळे लोक पुढे निघून गेले होते. लागलीच सगळ्यांनी प्राथर्विधी उरकला तोंडावर पाण्याचे हबकारे मारले. थोडंसं फ्रेश झालो. आणि, आपापलं समान घेऊन आम्ही रुमच्या बाहेर पडलो.
पवार बाकी, आज गाडी टकाटक करून लॉज बाहेर आमची वाट पाहत थांबला होता. आम्ही तत्काळ आपापल्या ब्यागा जीपवर चढवल्या, त्याअगोदर, यात्रेकरिता किंवा प्रवासाकरिता लागणारं सगळं सामान. प्रत्येकाने आपल्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा ब्याग मध्ये काढून घेतलं होतं.
त्यामध्ये.. टूथ ब्रश पासून ते अंतर्वस्त्र, टॉवेल, एक नवीन ड्रेस, रेनकोट, गरम कपडे, पाण्याची बाटली, अशा वस्तू घेतल्या होत्या. सगळी जय्यत तयारी झाली होती.
पुन्हा एकदा देवाचं नाव घेतलं..
आणि, आम्ही प्रवासाला सुरवात केली. अंधारामध्ये, तो दरीभागातील रास्ता अवघ्या अर्ध्या तासात पार करून आम्ही सोनप्रयाग येथे जाऊन पोहोचलो. सोनप्रयाग पासून पुढे, गौरी कुंडापर्यंत कोणत्याही खासगी वाहनांना जाण्यास मज्जाव केला गेला आहे. देवस्थान कमिटी, आणि सरकारने त्याठिकाणी काही ठेकेदारांच्या गाड्या नियुक्त केल्या आहेत. त्या गाड्या, आपल्याला सोनप्रयाग ते गौरीकुंडा पर्यंत नेऊन पोहोचवतात.
आम्ही.. पहाटेचं चहापाणी, उरकलं आणि पुढे निघालो,
तर..रस्त्यामध्ये, मनुष्य नावाची भयंकर विचित्र गर्दी जमा झाली होती. भारताच्या कानाकोपर्यातून आलेले भाविक, अठरा पगड जातीचे आणि भाषेचे लोक तिथे जमा झाले होते. सर्वांची, पुढे जाण्यासाठी एकच लगबग चालू होती. शेवटी, आम्ही सुद्धा त्या गर्दीचा एक हिस्सा झालो..
" बोलो केदारनाथ भगवान कि जय..! "
असा जयघोष करत, आम्ही सुद्धा पुढे निघालो. सुरवातीलाच, रस्त्यामध्ये घोडेवाल्यांची भलीमोठी गर्दी होती. परंतु.. इथे सुद्धा, नेमकी तीच परिस्थिती होती.
कोणताही घोडेवाला मालक, स्वतः होऊन यात्रेकरूंना घोडा घेण्यासाठी विचारणा करत नव्हता. आम्ही सुद्धा, घोड्यावरून जाणार होतो. पण, सुरवातीचं पाच किमी अंतर जीपने लवकर कटेल असं ठरवून. आम्ही, तिथे असलेल्या यात्रेकरूंच्या रांगेत उभे राहिलो. त्या रांगेत, साधारण दोनतीनशे लोकं उभी होती. बराच वेळ लागणार, म्हणून आम्ही सुद्धा त्या रांगेत ताटकळत उभे राहिलो.
एका सरकारी जीपमध्ये, साधारण दहा एक लोकं जायची. त्यामुळे, पुढील प्रवासाकरिता आम्हाला बराच वेळ लागणार होता. शेवटी, त्या ठिकाणी आमचा तासभर मोडलाच. गर्दी हटत चालली होती, आमचा नंबर आल्यावर, आम्ही सगळे मित्र एका जीपमध्ये बसलो. दहाच्या लोकांच्या ठिकाणी, त्या जीपमध्ये बारा तेरा लोकं बकरे कोंबल्या सारखे कोंबून ते लोक नेत होते. शिवाय, भली मोठी लाईन पाहून काही लोक हे पाच किमी अंतर चालत पुढे निघाले होते. त्यातील, काही थकलेले लोक.. ड्रायव्हरची परवानगी घेऊन, गाडीच्या मागे असलेल्या बंपरवर लटकून सुद्धा येत होते.
भयंकर कठीण रस्ते होते. आणि, तितकेच भयंकर लोकं सुद्धा होते. परंतु, काही लोकांना त्याची किंवा त्यांच्या जीवाची बिलकुल भीती किंवा पर्वा नव्हती.
शेवटी.. कसेतरी धक्केबुक्के खात, एकदाचे आम्ही गौरीकुंडाच्या गाडी तळापर्यंत येऊन पोहोचलो.

क्रमशः

No comments:

Post a Comment