Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- सतरा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गाडीतळापासून काही अंतर चालत गेल्यावर, आम्ही गौरी कुंडापाशी येऊन पोहोचलो. केदारनाथ धाम या ठिकाणी, दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे गौरी कुंडाचा सगळा चेहरा मोहराच बदलून गेला होता. सगळीकडे अगदी भकासपणा जाणवत होता.
ज्या ठिकाणी.. पूर्वी गौरी कुंड होतं, त्याठिकाणी आता काहीच उरलं नव्हतं. दोन वर्षांपूर्वी आलेल्या भयंकर मोठ्या आस्मानी महाप्रलयात सगळं काही वाहून गेलं होतं. एका बाजूला मंदाकिनी नदीचा स्त्रोत वाहत होता. तर दुसऱ्या बाजूला नव्याने बनवण्यात आलेल्या भल्यामोठ्या आणि उंच रस्ता कम ओट्याखालुन दगडाच्या कपारीतून गरम पाण्याचे दोन मोठे स्त्रोत वाहत होते.
नाही म्हणता, त्याठिकाणी सुद्धा आता युद्धपातळीवर कामं चालू आहेत. आणि ती कामं स्वतः भारतीय लक्षर करत आहे. त्यामुळे, सगळी कामं अगदी योग्य रीतीने आणि लवकरात लवकर पार पडली जातील. यात बिलकुल शंका नाही.
तर.. त्याठिकाणी असलेल्या, दोन मोठ्या पाईपलाईन द्वारे, पुरुष आणि स्त्रिया असं दोघांना मिळून अंघोळीसाठी गरम पाणी विभागणी करून दिलं गेलं होतं.
महिलांकरिता, रेडीमेड ताडपत्रीच्या चेंजिंग रूम होत्या. आणि, अंघोळ करायला बंधिस्त जागा सुद्धा होती.
तर.. पुरुषांना मात्र, उघड्यावर बसून अंघोळ करावी लागत होती.
पाईपलाईन द्वारे येणारं, अंगाला चटका बसणारं असं कडक पाणी होतं. त्याठिकाणी, आता कुंड नसल्याने अंघोळीसाठी तिथे साधी बादली सुद्धा ठेवली गेली नव्हती. कि पाईपलाईन द्वारे येणारं पाणी अंगावर ओतून घेण्यासाठी काही मग वगैरे सुद्धा ठेवला गेला नव्हता.
भारतीयांच्या बौद्धिक जुगाडामुळे,
पेप्सीच्या दोन लिटरच्या प्लास्टिकच्या बाटलीचं तोंड कापून त्यापासून बनवलेल्या एका मगने सर्व भाविकांना अंघोळ करावी लागत होती. पूर्वतयारी किंवा कल्पना नसल्याने, तो एकच मग सगळे भाविक आलटून पालटून वापरत होते. त्यात, त्या भागात अंघोळ करण्यासाठी लोकांची भलतीच रीघ लागली होती. कारण, अंघोळीसाठी दुसरा कोणताच पर्यायच नव्हता ना. अंघोळीसाठी असणारी भलीमोठी गर्दी पाहून, काही भाविक तिथे अंघोळ करणं सुद्धा टाळत होते.
समोरील गजबजलेल्या लोकांचं दृश्य पाहून, आम्ही सुद्धा घाईघाईने आपआपले कपडे उतरवले. " हमाम में सभी नंगे " या उक्तीप्रमाणे, लाज सोडून त्या धार्मिक हमामामध्ये आम्ही सुद्धा सहभागी झालो. दादा, मामा करून.. आम्ही सुद्धा, दोनचार पाण्याने भरलेल्या पेप्सी बाटलीच्या मगमधून दोनचार बाटल्या आमच्या अंगावर ओतून घेतल्या.
ह्या गंधकाच्या पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. अंगावर पाणी घेतल्यानंतर, ताबडतोब आपल्याला खूप ताजं तवानं वाटू लागतं. आणि, चुकून या पाण्याचं कुंड वगैरे असेल. तर त्या गरम पाण्यातून आपल्याला बाहेर पडावंसंच वाटत नाही.
परंतु, त्या पाण्यामध्ये जास्ती वेळ डुंबत राहणं आपल्याला खूप महागात पडू शकतं. त्याचे, बरेच सैद्धांतिक नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत. ते सगळे नियम काही मला माहित नाही. अतिउत्साही लोकांनी, जाणकाराकडून त्याची इत्यंभूत जानकारी घ्यावी.
शेवटी, आम्ही सुद्धा त्या गरम पाण्याचा मोह आवरता घेतला. आणि, तेथून बाहेर पडलो. अंग पुसलं, आता आम्ही मस्त ताजेतवाने झालो होतो.
पुढील प्रवासात, कपडे खराब होतील. म्हणून, आहे तेच कपडे आम्ही पुन्हा अंगावर चढवले. आणि, आम्ही पुढे निघालो.
बाहेर पडताना, वाटेत असणाऱ्या, गौरी माई मंदिर आणि उमा महेश्वर महादेव मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. आणि, पुढील प्रवासाचा श्रीगणेशा केला..!
गौरीकुंड ते केदारनाथ धाम.. हे एकूण, सोळा किमीच अंतर आहे.
त्याठिकाणी.. पायी, घोड्यावर, पीठ्ठू, डोली किंवा हेलिकॉप्टर या पाच मार्गाने आपल्याला जाता येतं. पायी चालत यात्रा करायची असेल, तर तुमच्या पायात किंवा अंगात तेवढी ताकत असायला हवी. नाहीतर, फुकाच्या मर्दुमकीचा तिथे निभाव लागत नाही.
बाकी.. उरलेली तिन्ही साधनं, हि तुमच्या खिशातील पैश्यावर अवलंबून आहेत.
हेलिकॉप्टरची वारी करण्यासाठी, पंधरा दिवस ते महिनाभर अगोदर अंतरजाला वरून तुम्हाला तशी आगाऊ बुकिंग करून ठेवावी लागते. अन्यथा, आयत्यावेळी ती सोय होत नाही. हेलिकॉप्टरने.. सोनप्रयाग ( सीतापुर ) ते केदारनाथ पर्यंत अवघ्या सहा मिनिटात तुम्हाला आणून सोडलं जातं. आणि, आपण हेलिकॉप्टरने आलो आहोत म्हणून. आपल्याला ताबडतोब व्हीआयपी दर्शन सुद्धा तिथे दिलं जातं. त्यामध्ये, देवस्थान आणि हेलिकॉप्टर कंपन्यांनी त्यांच्यामध्ये आर्थिक साठंलोटं करून घेतलं आहे. हेलिकॉप्टरणे येणाऱ्या भाविकांचं दर्शन, अवघ्या तासाभरात आटोपून जातं.
हेलिकॉप्टरचा प्रवास सुरु होण्याअगोदर, त्या भाविकांना तशा सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या असतात. त्यांना तिथे उतरल्यावर, ठराविक वेळेचं गणित सांगितलं जातं. परंतु, चुकून वातवरणात काही बिघाड झालाच. तर बाकी काही असेल ते सगळं काही माफ असतं.
परंतु..दर्शन झाल्यावर, विनाकारण टाइमपास करणाऱ्या लोकांना वेळेत न आल्याने.
हेलिकॉप्टर चालकांकडून तिथे त्यांना मुद्दाम रखडवून सुद्धा ठेवलं जातं.
त्यामुळे, तिथे गेल्यावर नको तो शहाणपणा काहीच कामी येत नाही. दर्शन आटोपल्यावर, त्या ठिकाणावरून प्रत्येक यात्रेकरूला ताबडतोब निघावंच लागतं.
त्यामुळे, हेलिकॉप्टरने आल्यावर आपल्यावर बरीच बंधनं सुद्धा येतात. आपण वेळेत आल्यावर, आपणाला नियोजित वेळेवर पुन्हा हेलिकॉप्टर द्वारे सोनप्रयाग येथे नेवून सोडलं जातं. या जाण्या येण्याच्या प्रवासाचे, तिथे सात हजार रुपये आकारले जातात.
जे दर, आजकालच्या आर्थिक दृष्टीने अगदी अत्यल्प असे आहेत..!
घोड्यावर बसून जाण्याचे दर,
फक्त पहाडावर जाण्याकरिता, एका सरकारी घोड्याला अठराशे रुपये दर तेथील सरकारने ठरवून दिला आहे. परंतु, या भागात घोडे कमी असल्याने. तेथील घोडेमालक, आपल्याकडून अडवणूक करून अतिरिक्त बाराशे रुपयांची मागणी करतात. आणि, आपल्याला ती त्यांना झक मारत द्यावी सुद्धा लागते. नाहीतर, पायी चलो रे..
असे, एकूण तीन हजार रुपये फक्त जाण्याकरिता लागतात. आणि, परतीच्या प्रवासाकरिता तुम्हाला घोडा हवा असेल. तर, त्याचे अतिरिक्त असे दोन हजार रुपये ते घेतात. असे, जाण्या येण्यासाठी एकूण पाच हजार रुपये तुमच्याकडून आकारले जातात.
अजून दोन हजार घातले असते, तर आपल्याला हेलिकॉप्टरने जाता आलं असतं..!
असा विचार, आपल्या मनात लगेच येऊन जातो.
पण, आगाऊ बुकिंग न केल्याने.. आपल्याला, त्या आल्हाददायक सेवेपासून वंचित राहावं लागतं.
हे सगळं जरी असलं, तरी घोड्यावर बसून किंवा पायी चालत जाण्यात जी मजा आहे. ती मजा हेलिकॉप्टरने कदापि येत नाही. चालत जाताना, वाटेतील नयनरम्य नजारे आपल्याला पाहायला मिळतात. प्रकृतीची अलौकिक सौदार्यता याची देहा न्याहाळता येते. हि मजा आपल्याला हेलिकॉप्टरने घेता येत नाही.
बाकी, वेळेची कमतरता असलेल्यांना हेलिकॉप्टरची मजा सुद्धा काही निराळीच वाटत असते. शेवटी काय आहे, के पैसा बोलता है..!
पिट्टू म्हणजे, पाठीवरील छोट्याशा लाकडी बास्केट मधून, जी बास्केट बांबूच्या सहाय्याने बनवलेली असते. त्यातून लोकांची वाहतूक करणारा व्यक्ती.
एक पिट्टू.. त्याच्याच वजनाच्या व्यक्तीला, किंवा त्याहून जास्ती वजन असणाऱ्या व्यक्तीला आपल्या पाठीवरून वाहत नेत असतो.
तसं तर, सुरवातीपासून कोणताच व्यक्ती पिट्टू करत नाही. कारण, एकतर त्यांची फीस खूप महाग असते. यात्रेच्या सुरवातीलाच, त्यांना विचारणा करणारा व्यक्ती एकतर मूर्ख असतो. किंवा, चुकून त्यांना विचारलं तर, ते डायरेक्ट..
जाण्याकरिताचा, आपल्याला " दहा हजाराचा " आकडा सांगून मोकळे होतात.
शेवटी, कितीही झालं तरी इतकी मोठी चढण. माणूस, स्वतःचा बोजा घेऊन पायी चढून जावू शकत नाही. तर, एका व्यक्तीने त्याच्या वजनाचा व्यक्ती घेऊन इतका मोठा पहाड चालत जाने म्हणजे ते फारच दिव्य काम झालं नाही का..!
तर.. हे पिट्टू लोक, रोजच्या रोज यात्रेत गौरी कुंडापासून चालत केदारनाथच्या दिशेने आपला पायी प्रवास सुरु करतात. आणि वाटेमध्ये एखादा व्यक्ती, महिला किंवा लहान मुल चालताना थकलं. तर तिथे त्याच्याशी भावताव करून त्यांना घेऊन पुढे मार्गक्रमण करत असतात. हे पिट्टू लोकं, त्यांच्या मेहेनतीचे सुद्धा भरपूर पैसे घेतात बरं का. अर्ध्या वाटेतून एका व्यक्तीला घेऊन जाण्याचे ते चार ते पाच हजार मोजून घेतात. पण त्यांची मेहेनत सुद्धा तितकीच भयंकर असते बरं का. आपण, लाख रुपये घेऊन सुधा तसलं काम करू शकत नाही. आणि चुकून, दिवसभरात त्यांना एकही ग्राहक मिळालं नाही. तर ते तसेच मोकळ्या हाताने पायी चालत खाली येतात. अशा रिकाम्या फेऱ्या सुद्धा त्यांच्या नशिबी येत असतात. पण काय करणार, शेवटी.. पापी पेट का सवाल है..!
अजून दुसरा एक पर्याय इथे उपलब्ध असतो. तो म्हणजे डोली. लाकडी डोलीमध्ये एका व्यक्तीला बसवून चार लोक त्याची वाहतूक करत असतात.
अगदीच बोजड लोकं, ज्यांना घोड्याचा प्रवास सुद्धा जमणार किंवा सहन होणार नाही. अशी लोकं, किंवा आजारी व्यक्ती या डोलीतून प्रवास करत करतात.
या डोलीत बसून जाण्याकरिता, जाण्यायेण्याचा खर्च साधारण आठ ते दहा हजारांच्या घरात जातो. शेवटी, सगळ्या गोष्टी आपल्या ऐपतीप्रमाणे आहेत.
पायी, घोडा, डोली, पिट्टू कि हेलिकॉप्टर..?
चला तर मग, आता जास्ती वेळ न दवडता आपण केदारनाथ यात्रेला सुरवात करूयात.

क्रमशः

No comments:

Post a Comment