Saturday, 23 July 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- पंचवीस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सर्दी खोकल्याने, मी अजून सुद्धा जाम होतो. त्यामुळे, औषध पाणी घेऊन विक्स लाऊन मी बिछान्यावर पडलो. आमचा लॉज अगदी नदीकिनारी असल्याने, नदीचा खळखळाट रात्रभर ऐकू येणारच होता. नंतर काहीवेळाने मला झोप लागली, आणि अचानक कसल्याशा हालचालीने मला जाग आली. आमच्या रुममध्ये, विशिष्ट प्रकारची कंपनं मला जाणवत होती. हा नक्कीच भूकंपाचा प्रकार असावा, किंवा नदीच्या वाढत्या पातळीमुळे तसा भास झाला असावा. ते काहीही असो, आता मात्र मला काही झोप लागणार नव्हती. घड्याळात पाहिलं पहाटेचे तीन वाजले होते. अजून दोनतीन तास कटायचे होते. मी तसाच बिछान्यावर पडून राहिलो. आणि विचार करता करता मी कधी एकदा झोपी गेलो ते माझं मलाच समजलं नाही.
आज प्रवासाची काही घाई नव्हती, म्हणून आम्ही थोडं उशिरा म्हणजे सात वाजता उठलो. हॉटेलमधील एका वेटरला थोडे अतिरिक्त पैसे देवू केले. आणि त्याच्याकडून अंघोळीसाठी गरम पाणी मागवून घेतलं. वातावरण अगदी स्वच्छ झालं होतं. काल रात्री, इथे मुसळधार पाऊस पडला असेल असं कोणीच म्हणून शकणार नाही. इतकं स्वच्छ वातावरण होतं. कालची काळरात्र सुखरूप कटली होती. यातच सगळं काही आलं. अंघोळी उरकल्यावर, सगळं सामान घेऊन आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. सगळं समान गाडीवर लादलं. आज दिवसभरात, आम्हाला चमोली ते हरिद्वार हे दीडशे किलोमीटरचं अंतर कापायचं होतं. त्यामुळे प्रवासाचा अतिरिक्त असा ताण नव्हता. परतीच्या प्रवासात रुद्रप्रयाग करून आम्ही पुढे निघालो. त्यांनतर, देवप्रयाग येथील अलकनंदा आणि भागीरथी नदीचा अनोखा संगम बघितला. वेळेअभावी, त्या संगमात पवित्र स्नान आम्हाला करता आलं नाही. पुढील प्रवासात, ऋषिकेशच्या अलीकडे असणारं निलकंठेश्वर नामक ठिकाणाला आम्ही भेट देवून आलो. अशी आख्यायिका आहे, कि समुद्र मंथनातून निघालेलं विष जेंव्हा शिवजींनी प्राशन केलं. त्यावेळी, त्यांच्या कंठामध्ये फार जहाल जळजळ होऊ लागली. तेंव्हा, या पहाडावरील थंड ठिकाणी विश्राम करण्यासाठी शिवजी आले होते. ते पवित्र ठिकाण पाहून आम्ही पुढे निघालो, वाटेमध्ये गंगा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये, काही क्लबने वाटर राफ्टींग चे केम्प आयोजित केले होते. ती राफ्टींग करणारी तरुण मुलं मुली सुद्धा आमच्यासोबत रबरी बोटीमध्ये नदीतून झुलत ऋषिकेशला येऊन पोहोचत होते.
ऋषिकेशला पोहोचलो, तोवर रात्रीचे सहा वाजून गेले होते. हृषिकेश हे ठिकाण मला म्हणावं इतकं आवडलं नाही. राम झुला, लक्षमण झुला आणि गंगेच्या किनारावर असणारं बारा ज्योतिर्लिंग मंदिर हि ठिकाणं सोडली, तर मला.. मी निव्वळ पुण्यातल्या कोरगाव पार्कमध्ये आल्याचा भास होत होता. हृषिकेश मध्ये, ओशो रजनीश यांचा आश्रम असल्याने. संपूर्ण रस्त्यावर, फिरंगी लोकांची आवक जावक सुरु होती. प्रत्येक पावलागणिक एक तरी विदेशी नागरिक दिसतच होता. आणि त्या विदेशी गोऱ्या मुलींच्या पाठीमागे गोंडा घोळत फिरणारे, चित्र विचित्र पोशाख आणि केशभूषा केलेले आपले भारतीय तरुण पाहायला मिळत होते. त्यातील काही भाग्यवान मुलांनी त्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढलेलं सुद्धा पाहायला मिळत होतं. ऋषिकेश पाहून झाल्यावर, आम्ही पुन्हा एकदा आमच्या जीपमध्ये बसलो,
ऋषिकेश ते हरिद्वार हे पंचवीस किमी अंतर आहे. जाताना वाटेमध्ये एक अभयारण्य सुद्धा लागतं. आमची गाडी त्या भागातून जाताना तेथील एक पोलीस आम्हाला म्हणाला. थोडं सावकाश जावा, जंगलात रोडवरून हिंस्र प्राणी फिरत असतात. प्राणी कसले घेऊन बसलात. साधा कुत्रा सुद्धा आम्हाला त्या मार्गात आढळला नाही. मात्र काही छुप्या ठिकाणी बैठक मारून काही पीताड लोकांचे दोनचार ग्रुप मात्र आम्हाला तिथे आढळले.
शेवटी, रात्री दहा वाजता आम्ही हरिद्वार येथे येऊन पोहोचलो. आमच्या चारधाम यात्रेची याठिकाणी सांगता झाली होती. सुखरूपपणे प्रवास घडवल्या बद्धल आम्ही सर्वांनी पवारचे आभार मानले. त्याचे उरलेले पैसे त्याला चुकते केले. सर्व मित्रांनी, त्याच्याशी गळाभेटी केल्या. प्रत्येकाने यथाशक्ती त्याला बक्षिशी देऊ केली. त्याने सुद्धा त्याचा खुशीने स्वीकार केला. गेल्या आठ दिवसात आम्हाला एकमेकांचा खूप लळा लागला होता. जड अंतकरणाने, पवारने आम्हाला अलविदा केला. आणि पवारचा मोबाईल खणाणला..
पवारच्या चेहेर्यावरील भाव पाहून, काहीतरी अघटीत घडलं असावं, हे मला ताबडतोब समजलं. पवारला मी काय झालं म्हणून विचारलं, तर म्हणाला..
आपण, चमोली मध्ये काल ज्या ठिकाणी मुक्काम केला होता. तिथे ढगफुटी झाली आहे..! निसर्गाचा भयंकर प्रकोप ऐकून मी पुन्हा एकदा नखशिखांत हादरलो होतो. आणि, आम्ही तशा प्रसंगात अडकलो नाही, म्हणून थोडा सुखावलो सुद्धा.
मला शेवटचा हात मिळवून पवार पुढे निघून गेल्यावर त्याने पुन्हा मागे वळून काही पाहिलं नाही. मी मात्र त्याची गाडी माझ्या नजरेआड होईपर्यंत त्याला पाहत होतो. जशी त्याची गाडी दिसेनाशी झाली, तसा मी सुद्धा माघारी फिरलो. सुखरूप यात्रा घडवल्या बद्धल परमेश्वराचे आभार मानले. आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही सर्वांनी हॉटेल अमृतसर च्या दिशेने आमचा मोर्चा वळवला..!
समाप्त.

No comments:

Post a Comment