Sunday, 31 July 2016

माझ्या मनमिळाऊ स्वभावामुळे, माझी कोणाशीही पटकन दोस्ती होऊन जाते. कोणाला काही अडल्या नडल्या गोष्टी ते मला बिनधास्त विचारत असतात. त्यासोबतच, त्यांची सुख दुखः देखील ते माझ्याशी शेअर करत असतात.
मित्रांप्रमाणे, माझ्या काही मैत्रिणी सुद्धा आहेत. त्या सुद्धा, मला इतक्या जवळच्या आहेत. कि, ज्या गोष्टी एका पुरुषाबरोबर कोणी शेअर करणार नाही. अशा गोष्टी सुद्धा, त्या विवाहित मुली माझ्याबरोबर बिनदिक्कत शेअर करत असतात. तेवढा विश्वास आहे त्यांना माझ्यावर.
हल्लीच, माझ्या दोन मैत्रिणींची नुकतीच लग्नं झाली आहेत. नव्याची नवलाई, नव्याचे नऊ दिवस. अशा काहीशा थाटात सध्या त्यांचा वावर असतो. आम्ही सुद्धा.. मित्र, मैत्रिणी त्यांना मुद्दाम चिडवत असतो. काय मग..! कसं काय..! वगैरे, वगैरे..
पण त्याचा, त्या दोघींना कधी राग वगैरे येत नाही. त्या दोघींकडून, आमचं असलं काहीबाही बोलनं अगदी फ्रेंडली स्वीकारलं जातं.
तर परवा.. त्या दोन नवविवाहिता आमच्या गोतावळ्यात गप्पा मारत बसल्या होत्या.
अचानकपणे गप्पा मारता-मारता, त्या दोघीच.. एकमेकीशी चर्चा करू लागल्या.
दोघींच्या हातात, हातभार असा..भरगच्च हिरवा चुडा होता. आणि, त्या विषयावर त्यांचं गुऱ्हाळ सुरु झालं. आणि, त्यातीलच एकीने सहजच त्या दुसरीला विचारलं.
का गं.. तो हातामधील चुडा का बांधून ठेवला आहेस..?
त्यावर.. दुसरी विवाहिता बोलती झाली,
अगं चुडा वाढू नये ( म्हणजे हातातील बांगडी फुटू नये ) म्हणून सासू बाईंनी त्यांना असं दोऱ्याने बांधून ठेवायला सांगितलंय..!
त्यावर.. पहिली विवाहिता तिला म्हणाली, तू नाही गं तुझा चुडा बांधलास..?
तर, ती म्हणाली..
नाही गं, एकतर मला सासूबाई नाहीयेत. आणि, असं चांगलं वाईट सांगणारं कोणी जुनं जाणतं सुद्धा आमच्या घरात नाहीये. हिचं हे वाक्य पूर्ण होईपर्यंत, तिला मधेच थांबवत पहिली विवाहिता थोड्याशा लाडिक अंदाजाने उतावीळपणे तिला म्हणाली.
अगं पण.. रात्री, बांगड्यांचा आवाज येत नाही का..?
त्यावर, पहिली मैत्रीण म्हणाली.. काही नाही गं, बेडरूम मधील पंखा पाचवर करायचा. मग, कोणालाच कसलाच आवाज ऐकू येत नाही.
आणि.. हसत हसत, दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या. आणि, पुन्हा एकदा बांगड्यांचा खळखळाट झाला..
त्या दोघी, आपसातल्या गप्पात इतक्या रममाण झाल्या होत्या. कि, त्यांच्या आजूबाजूला आम्ही सुद्धा आहोत. याचं त्यांना बिलकुल भानच राहिलं नव्हतं.
हे सगळं काही, त्या दोघींकडून इतक्या कमी वेळात घडून गेलं. कि नंतर, भानावर आल्यावर आम्हा सर्वांना पाहून. त्या दोघी, लाजेने चूर होऊन आम्हा मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यातून धूम ठोकून निघून गेल्या..!

No comments:

Post a Comment