Friday, 24 June 2016

चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- तीन.
गंगा आरती उरकली, आणि आम्ही मुक्काम स्थळी निघालो. हरिद्वार मधील, एका साध्या हॉटेलमध्ये, त्याचं नाव " हॉटेल अमृतसर " असं होतं. तिथे आम्ही जेवण केलं. फक्त शंभर रुपयात, अगदी उत्कृष्ट आणि पोटभर जेवण त्या ठिकाणी मिळतं. जेवण केलं, आणि आम्ही आमच्या लॉजवर पोहोचलो.
यात्रेचं, पुढील वर्णन होणारच आहे. तत्पूर्वी, आपण थोडं मागे जाऊयात.
यात्रेला जाण्या अगोदर, पूर्वतयारी म्हणून.. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ती हरिद्वार प्रवासाची तिकिटं काढणं. तसेच तिथे पोहोचल्यावर लॉज बुकिंग, किंवा पुढील प्रवासासाठी अंतरजालाच्या मदती नुसार. एखादी, कार किंवा जीप बुक करायच्या आपण मागे लागतो. कारण, तिथे गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना त्याचा त्रास नको. हा, त्यामागचा मूळ उद्देश असतो. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे. चारधाम यात्रा करणाऱ्या, माझ्या प्रत्येक मित्राला माझं एक सांगणं आहे.
" हि घोडचूक, कोणीही करू नका..! "
कारण.. यात्रेची पूर्वतयारी म्हणून. मी सुद्धा, हरिद्वार मधील एका स्थानिक धंदेवाईक व्यक्तीला पुण्याहून तेथील गाड्यांचे दर आणि बजेट विचारलं होतं. त्यांनी दिलेलं बजेट, आणि प्रत्यक्षात माझा झालेला खर्च. म्हणजे, त्याठिकाणी दलाल लोकांचं कमिशन धरून मला मिळालेलं बजेट. यामध्ये, पक्की 'पन्नास' टक्के तफावत होती.
योगायोगाने, मला भेटलेला व्यक्ती तेंव्हा आजारी पडला होता. हरिद्वारला पोहचल्यावर, मी त्याच्याशी संपर्क साधला. तरी सुद्धा, मला तो पूर्वी सांगितले तेच रेट सांगत होता. शेवटी, मी एका स्थानिक टूरिस्ट कंपनी सोबत संपर्क साधल्यावर. मला, पुढील गोष्टीची कल्पना आली. आणि विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने.. मी हरिद्वार मध्ये पोहोचलो आहे. हे समजताच, तिथून पुढे, त्याने माझ्याशी संपर्क साधला नाही. बहुतेक, त्याचं पितळ उघडं पडण्याची त्याला भीती वाटली असावी.
सगळीकडे चालते तशीच, त्या भागात सुद्धा निव्वळ फसवाफसवी, आणि गल्लाभरू कामं चालू असतात. त्याठिकाणी, सर्वात मोठं काम म्हणजे. आपल्या, सामोरासमोरील व्यवहार. त्यामध्ये, फसगत होण्याची शक्यता फार कमी असते. असं माझं तरी मत आहे. चार ठिकाणी चौकशी केल्यावर आपल्याला त्याचा अंदाज येतोच.
चारधाम यात्रा..
मोजमापा प्रमाणे, तशी तर हि आठ दिवसांची यात्रा आहे. पण चुकून, यात्रेदरम्यान अचानक वातावरणात काही बदल झालाच. तर गडबड होऊ नये, म्हणून हि यात्रा दहा दिवसांची ठरवली जाते. भले मग, ती यात्रा आठ दिवसात जरी पूर्ण झाली. तरी तुम्हाला, त्या गाडी मालकाला दहा दिवसांचे ठरलेले पैसे द्यावे लागतात.
किंवा, यात्रेदरम्यान चुकून काही नैसर्गिक आपत्ती आलीच. तर.. तिथून पुढे जादाच्या पंधरा वीस दिवसांचे सुद्धा, तुम्हाला ठरलेले आहेत तितकेच पैसे मोजावे लागतात. तो अतिरिक्त भार आपल्यावर पडत नाही.
हा.. त्या, भागातील एक अलिखित नियम आहे.
त्या भागात, भटकंती दरम्यान. वाटेमध्ये, इतर सुद्धा फिरण्याची बरीच ठिकाणं आहेत. तुम्हाला जर, ती ठिकाणं पाहण्याचा मोह झाला. तर, त्या अतिरिक्त फिरण्यासाठी लागणाऱ्या वाढीव दिवसांची रक्कम मात्र तुम्हाला जागीच मोजावी लागते.
कारण.. आपण फक्त, चारधाम यात्रेसाठीच ती गाडी ठरवलेली असते. त्यामुळे, तो मोटार चालक आपल्याला फक्त चारधाम यात्राच करून माघारी आणतो. त्याव्यतिरिक्त, तो आपल्याला दुसरीकडे कुठेही फिरवत बसत नाही.
पण आपण, त्याच्याशी थोडं आपुलकीने वागलो. तर, तो सुद्धा थोडा मवाळ होत.. आणि, आपल्या ( प्रवाश्यांना ) खिशाला चाट देत. वाटेतील, इतर प्रेक्षणीय ठिकाणं सुद्धा तो आपल्याला प्रेमाने दाखवतो. आणि, त्याचे 'एक्स्ट्रा' पैसे सुद्धा तो आपल्याकडून वसूल करतो. सुरवातीलाच, तशी आपल्याशी तो बोलीच करून घेतो.
ह्या वाटेत.. अमुक एक ठिकाण आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. त्याकरिता, मुख्य रस्ता सोडून मला दहाएक किमी आत जावं लागणार आहे. त्याचे तुम्हाला अतिरिक्त असे पाचशे रुपये मला द्यावे लागतील..!
आपल्याला वाटलं, तर आपण तिथे जाऊ शकतो.
नाहीतर, पुढे रस्ता धावतच असतो.
शेवटी.. हि त्याची वरकमाई असते. पण, त्या भागातील आपल्याला माहित नसणारी एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला त्याठिकाणी पाहायला मिळते. हि सुद्धा, आपल्या जीवनातील एक फार मोठी कमाई असते.
कारण, त्या भागातून यात्रा करून आलेला एखादा व्यक्ती. घरी आल्यावर..आपल्याला, त्या भागातील. " ठराविक एका ठिकाणाला तुम्ही गेला होता का..? "
अशी विचारणा करतो. आणि, त्यावेळी आपण जर नाही असं म्हणालो,
कि.. तो लगेच आपली खिल्ली उडवतो.
हे सगळं टाळण्याकरिता,
त्या ड्रायव्हरला, आपणाला खूप खुश ठेवावं लागतं. त्याच्याशी सलोख्याने बोलणे, त्याला काही हवं नको ते पाहणे. त्याला गाडी चालवण्या बाबत बिलकुल मार्गदर्शन न करणे. आपण, त्याचे गुलाम आहोत अशा रीतीने वागणे. हे त्या भागात अगदी क्रमप्राप्त आहे.
नाहीतर, त्याचं डोकं फिरल्यावर, किंवा तो नाखूष असल्यावर. आपल्याला त्या भागातील इत्यंभूत माहिती मिळत नाही. आणि, तो म्हणावं असं सहकार्य सुद्धा करत नाही.
इतक्या लांब, दऱ्याखोऱ्यात आपण काय वारंवार जाणार आहोत का..?
हे त्याठिकाणी, ध्यानात ठेवून पुढे वाटचाल करणं कधीही हिताचं ठरतं.
प्रत्येक जन, फक्त पैश्यासाठी धावत असतो. पण, तुम्हाला म्हणून मी एक गोष्ट सांगतो. त्या भागात.. मला, महिना लाख रुपये जरी पगार मिळाला. तरी सुद्धा, त्या पहाडी भागात मोटार सारथी म्हणून मी कदापि काम करणार नाही..!
यावरून, तेथील रस्त्यांची आणि सफरीची तुम्हाला कल्पना यावी..!
क्रमशः

No comments:

Post a Comment