चारधाम यात्रा, ( प्रवास वर्णन ) भाग :- एक.
मी केलेली चारधाम यात्रा, तिला छोटा चारधाम असं संबोधलं गेलं आहे. उत्तराखंड या भागाला, देवभूमी तथा तपोभूमी सुद्धा म्हंटल गेलं आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने.. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हि तीर्थस्थानं येतात. आणि मोठा चारधाम म्हंटलं, कि त्यामध्ये.. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी, आणि रामेश्वर हि तीर्थक्षेत्र येतात.
मोठा चारधाम म्हणजे, संपूर्ण भारताची परिक्रमा आली. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर हा प्रवास म्हणजे कश्मीर ते कन्याकुमारी. तर.. छोटा चारधाम म्हणजे, निव्वळ हिमालयाच्या पहाडी रांगामध्ये मनसोक्त अशी धार्मिक भटकंती मानलं गेलं आहे.
माझ्यामते, मोठा चारधाम पेक्षा छोटा चारधाम यात्रा फार खडतर आहे. कारण, या यात्रेदरम्यान काही भक्तगण " पंचकेदार " हि यात्रा सुद्धा करत असतात. पंचकेदार यात्रा म्हणजे, त्या शिवभक्ताची खरी कसोटी ठरते. कारण, छोटा चारधाम करत असताना माझी जी दमछाक झाली. त्याहून कैकपटीने मोठा पल्ला या पंचकेदार यात्रेदरम्यान पार करावा लागतो. आणि ते काम, अगदी सहजशक्य नाहीये. त्यामुळे, इच्छा असून सुद्धा मी तो मोह आवरता घेतला. कर्मधर्म संयोगाने, माझ्या हयातीत कधी तो योग्य योग जुळून आला..
तर, प्रभूचरणी मी सुद्धा विलीन असेन.
चारधाम यात्रेत, सर्वात प्रमुख स्थान ठरतं, ते म्हणजे " हरिद्वार " हरीच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला, याच मार्गाने किंवा द्वारातून आपला तीर्थ प्रवास सुरु करावा लागतो. अतिशय गजबज असणारं हे ठिकाण, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अगदी गारठून गेलेलं असतं. हे पाच सहा महिनेच काय ते, त्यांचे कमवायचे किंवा सुगीचे दिवस असतात. त्यामुळे, यात्रेदरम्यान तेथील प्रत्येक व्यक्ती अगदी कंबर कसून कामाला लागेलेला असतो. वर्षभराची बेगमी, त्यांना याच काळात करून ठेवायची असते. त्यामुळे, ह्या काळात, पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत सगळी लोकं इथे अविरत सेवा पुरवताना आपल्याला पाहायला मिळतात.
इतर शहरांप्रमाणे, हरिद्वारच्या रेल्वे स्टेशन भागातील लॉज सुद्धा अगदी 'त्याच' लायकीची आहेत. मला काय म्हणायचं आहे, ते तुम्हाला समजलं असावं. घाईघाईने मी सुद्धा, या अशा भयंकर अवघड परीस्थित अडकलो होतो. त्यामुळे, प्रत्येकाला सावध करणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे, थोडी शोधाशोध करून व्यवस्थित आणि रेल्वे स्टेशन पासून थोडा दूर पण छानसा लॉज प्रत्येकाने आपल्या बजेट नुसार निवडावा.
चार व्यक्तींकरिता.. साधारणपणे, बाराशे रुपयांपासून ते पुढे कितीही. याप्रमाणे आपल्याला तिथे चांगले लॉज मिळून जातात. शिवाय, धर्मशाळा सुद्धा आहेतच.
या भागात, विजेची खूप बोंबाबोंब असल्याने. लॉज मालकाशी सुरवातीलाच सगळ्या गोष्टी क्लियर करून घ्याव्यात. नंतरहून कोणतीही तक्रार चालत नाही. रात्री दहा वाजल्यापासून, सकाळपर्यंत तिथे लाईट नसते. दिवसा तसा काही फारसा विषय येत नाही. मोठमोठे लॉज मालक, आपल्या लॉजमध्ये जनरेटर लाऊन बाकी सगळ्या सोयी करत असतात.
पण सकाळी, अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय. अगदी नशिबानेच व्हावी. नाहीतर थंड पाण्याने.शंभो.. हर, हर नारायणा.. करनं भाग पडतं..
मुख्य शहरापासून, ते गंगा घाटापर्यंतच्या अलीकडे एक किमी अंतरावर तेथील पोलीस यंत्रणेने त्या भागात मोठ्या चारचाकी वाहनांना मज्जाव केला आहे. त्यामुळे, तीनचाकी रिक्षाचालकच या भागातील ठराविक ठिकाणापासून आपल्याला अर्धा किलोमीटरभर अगोदरच सोडून मोकळे होतात.
तिथून पुढे गंगा घाटापर्यंत, आपल्याला पायी प्रवास करावा लागतो. पण तो प्रवास इतका भयंकर असतो. कि त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. असं काय मोठं दिव्य त्या रस्त्यावर असेल..? हा प्रश्न तुम्हाला हमखास पडणारच. पण ज्या व्यक्तीला, ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असेल. त्यांच्याकरिता, हा भाग म्हणजे अगदी नरका समान आहे. इतकंच काय, या विषयाला वैतागून..तेथील पोलीस लोकं सुद्धा, हातामध्ये, एक भलं मोठं अणकुचीदार दाबण घेऊन त्याठिकाणी कार्यरत असतात.
न ऐकणाऱ्या रिक्षाचालकांना, किंवा इतर वाहनांना काहीएक न बोलता. ती लोकं त्यांची टायर पंक्चर करत असतात. त्यावरून, तुम्हाला तेथील परिस्थितीचा अंदाज यावा.
क्रमशः
No comments:
Post a Comment