Monday, 26 June 2017

पराठा या विषयाची मला खासी आवड आहे..!
पराठा.. मग तो कोणताही असुध्यात. आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा, गोबी पराठा, मशरूम पराठा. असे अनेक आणि कित्तेक प्रकारचे पराठे आपल्याला घरी बनवता येतात.
पराठा बनवताना.. साजूक तूप किंवा बटर वापरलं, तर पराठा फारच खुमासदार आणि खमंग होतो. आणि त्यामुळे, त्याच्या चवीत सुद्धा कमालीची भर पडते.
पराठ्याबरोबर सायीचं दही आणि साखर हे हवंच. त्याशिवाय, या मेजवानीला रंगत उरत नाही. या पराठ्याबरोबर तोंडी लावायला, अजून एक गोष्ट नक्कीच हवी. ती म्हणजे, उभा चिरलेला कांदा घ्यायचा. आणि त्यात, लोणच्याचा सार घालून ते चांगलं एकजीव करून घ्यायचं.
तोंडी लावायला, हा एकदम मस्त आयटम आहे.
त्याचबरोबर.. मी पराठा खाताना, सोबत एक सलाड सुद्धा घेत असतो.
" कोबी सलाड "
साहित्य :- उभा आणि पात्तळ चिरलेला कोबी.
फोडणी साहित्य :- तेल, जिरे, मोहरी, कडीपत्ता, लसून पाकळी, हिंग आणि उभी चिरलेली मिरची.
पात्तळ चिरलेल्या कोबीला एका बाऊल मध्ये मीठ लाऊन घ्यावं. वरील सर्व जीन्नासाची तेलात कडकडीत फोडणी करून घ्यावी. लसून ठेचून घ्यावा आणि कडीपत्ता हाताने चुरून घ्यावा. आणि तयार झालेली खमंग फोडणी, चिरलेल्या कोबीवर पसरावी. हे सर्व मिश्रण हलक्या हाताने एकीजीव करून घ्यावं. तयार आहे चटपटीत कोबी सलाड. कोणाला आवडत असेल, तर वरून चाट मसाला टाकला तरी हरकत नाही. एकदम सोप्पा आयटम आहे.

Saturday, 24 June 2017

रोज रात्री, दारू पिऊन घरी येणाऱ्या व्यक्तींनी.
घरी येताना..
तुम्ही दारू पिण्याकारिता जेवढे पैसे खर्च केले असतील. तितक्याच किमतीच्या महागड्या आईसक्रिम, तुम्ही.. तुमच्या घरच्यांना खाण्यासाठी घेऊन येत चला.
काही दिवसात, तुमचं दारू पिणं आपोआप बंद होईल..!
हातभट्टी आणि देशी दारूवाले.. क्षमस्व.   
पैसे मिळवण्याकरिता काही लोकं इतकी लाचारी पत्करतात. कि त्या गोष्टीला अगदी मर्यादाच उरत नाही. पण जीवनात, काही गोष्टींचं तारतम्य हे नक्कीच बाळगायलाच हवं.
आमचं लग्न झाल्यावर, आम्ही दोघांनी एक धाडसी निर्णय घेतला. कि, आपल्याला जे काही पहिलं अपत्य होईल. आपण त्यावरच समाधान मानूयात. आपल्याला दुसरं मुल नकोच.
एवढंच काय, माझा मुलगा जसा कळता झाला. त्यावेळी, त्याला सुद्धा आम्ही तुला बहिण भाऊ हवा आहे का..? अशी विचारणा केली होती. त्यावेळी त्याने सुद्धा, आम्हाला नको म्हणून सांगितलं होतं. कारण, माझ्या बंधूंच्या मुली आणि मुलं यांनाच तो आपले सक्खे बहिण भाऊ मानतो.
त्यामुळे, या भाऊ बहिण विषयात त्याला म्हणावा असा रस नव्हता.
ठरल्याप्रमाणे, आम्ही आमच्या इच्छेची अमलबजावणी सुद्धा केली. त्यावेळी, आमचा मुलगा लहान असल्याने, संततिनियमनाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आम्हाला करू दिली नाही.
ते म्हणाले.. नंतर सावकाशपणे करा, आत्ताच घाई करण्याची काहीएक आवश्यकता नाहीये.
त्यानंतर, आम्ही सुद्धा ती गोष्ट विसरून गेलो. पण, आम्ही आमच्या निर्णयावर अगदी ठाम होतो. आणि.. साधारण चार पाच वर्षांपूर्वी, पुणे पालिकेतील एक व्यक्ती मला भेटली.
आणि सहज म्हणून, विचारपूस करताना तो व्यक्ती मला म्हणाला.
तुम्हाला किती मुलं आहेत..?
त्यावर मी त्यांना उत्तर दिलं, कि आम्हाला एकच मुलगा आहे.
तर ते म्हणाले.. तुम्ही किंवा तुमच्या मिसेसने संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे का..?
तर मी त्यांना नाही असं उत्तर दिलं.
त्यावर ते मला म्हणाले.. अहो तुम्ही हि शस्त्रक्रिया करून घेतली नसेल. तर ताबडतोब करून घ्या. कारण.. महाराष्ट्र सरकारने असा एक अध्यादेश काढला आहे. कि ज्या सरकारी कर्मचारी व्यक्तींनी एका अपत्यावर संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला, दोन जादा वेतनवाढी देण्यात येणार आहे.
नाही म्हणता, माझ्यासाठी हि आनंदाची बातमी होती. कारण या ना त्या कारणाने, आम्ही त्या लाभार्थींच्या यादीमध्ये बसत होतो. त्यानंतर, आम्ही उभयतांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. आणि माझ्या सौने, स्वतः हि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सगळे सोपस्कार पार पडले, आम्हाला थोडासा त्रास झाला, पणऑपरेशन सक्सेस झालं.
त्यानंतर.. या जादा वेतन वाढीच्या प्रोसिजरसाठी जी काही लागत होती, ती सगळी कागदपत्रे जमा करून, मी त्या कामाच्या मागे लागलो. जवळपास सगळी कामं मार्गी लागली होती. या कामासाठी धावपळ करताना, माझा तब्बल एक महिना गेला होता.
शेवटी.. सगळी आणि इत्यंभूत कागदपत्रे असणारी परिपूर्ण अशी फाईल. मी आमच्या आरोग्य विभागात सबमिट करण्यासाठी गेलो. तर, त्या विभागातील कारकून मला म्हणाले.
अहो.. या विषयावर तर सरकारने हल्लीच स्थगिती आणली आहे..!
हे तुम्हाला माहित नाही का..?
एखादा सरकारी अध्यादेश निघाल्यावर, शक्यतो त्यावर कधीही स्थगिती येत नसते. तर मग, या प्रकरणात नेमकं काय घडलं असेल..? या गोष्टीने मी फार व्यथित झालो होतो. नाही म्हणता, आकाश पाताळ एक करत, याचा मला शोध घ्यावाच लागला. आणि, जेंव्हा या मुद्द्याला मी हात घातला. त्यावेळी, माझ्यासमोर एक फार मोठं भीषण वास्तव सामोरं आलं. कि ज्याची, आपण कधी कल्पना सुद्धा करू शकत नाही.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी,
काही सरकारी कर्मचारी असणाऱ्या स्त्री पुरुषांनी फार वेगवेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीचा मार्ग अवलंबला होता. जे ऐकून, तुम्हाला सुद्धा त्या लोकांची कीव करावीशी वाटेल.
स्वतःची लायकी नसताना, मोठाले पगार घेणारे लोकं. अशा नीच पातळीवर उतरतातच कसे..?
तर.. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी..
काही महिलांना एका अपत्या नंतर, गर्भाच्या पिशवीचा त्रास जाणवू लागला होता. अशा महिलांनी, डॉक्टरी उपचाराने गर्भाची पिशवी काढून टाकली होती. ज्यामुळे, त्यांना इथून पुढे अपत्य होणारच नव्हतं. गर्भाची पिशवी काढली नसती. तर त्यांनी, दुसऱ्या अपत्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असते. परंतु अशा स्त्रियांनी सुद्धा, संततिनियमन केल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर करून या योजनेचा लाभ मिळवला होता.
तर काही पुरुषांनी, त्यांना दोन अपत्य असताना. संततिनियमन करून घेतलं होतं. पण दुर्दैवाने, त्यातील त्यांचं एक अपत्य अकाली मृत्यू पावलं. अशा लोकांनी सुद्धा, खोटी माहिती देऊन, या योजनेचा लाभ उचलला होता. खरं पाहायला गेलं तर, शासनाची फसवणूक करणं हा फार मोठा गुन्हा आहे. पण पैश्याच्या मोहापायी काही लोकांनी हि नालायक कामं सुद्धा केली.
पण काय आहे, भिंतीला सुद्धा कान असतात. या उक्तीप्रमाणे, माहितीच्या अधिकारात अशा लोकांची काही खरी माहिती असणाऱ्या लोकांनी. अशा व्यक्तींच्या खऱ्या माहितीचा पोलखोल केला. आणि हे सत्य समोर आल्यावर, महाराष्ट्र शासना कडून हि योजना ताबडतोब बंद करण्यात आली. ज्या लोकांनी खोट्या फाईल सबमिट करून, जो आर्थिक लाभ उचलला होता. तो त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली. असं माझ्या ऐकण्यात आलं आहे. आता हे कितपत खरं आहे, ते देवालाच माहिती.
काही नालायक व्यक्तींमुळे, या सरकारी योजनेचे जे कर्मचारी खरे लाभार्थी आहेत. ते व्यक्ती, या लाभापासून विनाकारणच वंचितच राहिले. आणि अजूनही, त्या विषयाची सरकार कडून ठोस अशी कोणतीच अमलबजावणी झाली नाहीये.
आपल्या देशातील लोकांना हेच समजत नाही. कि आपण जे करतोय ते योग्य आहे कि अयोग्य आहे. आपल्या नालायक पणामुळे, दुसऱ्या कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं. याची कोणालाच जान नसते. तुम्ही मला सांगा, पैश्याचा हव्यास तरी किती असावा..?
याला सुद्धा.. काही, मर्यादा असतात हो..!

फार वर्षांपूर्वी.. आमच्या भागात,
खेडेगावातील एक तरुण मुलगा राहायला आला होता.
औद्योगिक वसाहतीचा भाग असल्याने. नोकरीसाठी सिंगल रूम भाड्याने घेऊन, त्याठिकाणी तो एकटाच राहत होता.
काही महिन्यात त्याचं लग्न जुळून आलं. आणि योगायोग सुद्धा असा घडला होता. त्याची होणारी बायको, आमच्या गावाच्या शेजारच्या गावात राहणारीच होती. नाही म्हणता, हे आगदी चांगलंच झालं होतं.
लग्न झालं, नव्याचे नऊ दिवस संपले.
पण मध्यंतरीच्या काळात. त्याच्या सासूला तिच्या मुलीचा लळा काही सुटता सुटत नव्हता.
 दर दोन तीन दिवसांनी, ती मुलीला तिच्याकडे बोलवायची. आणि तिथेच ठेऊन घ्यायची. आईच्या घरी चालत जायला अगदी दहा पंधरा मिनिटांचं अंतर होतं. त्यामुळे, ती मुलगी सुद्धा कोणाकडून सांगावा मिळाला. कि लगेच, माहेरी निघून जायची.
हा कामावरून घरी आला, कि त्याच्या घराला कुलूप असायचं. मग हा आपलं आवरून घ्यायचा. आणि सायकलला टांग मारून सासूचं घर गाठायचा.
ती मुलगी, तशी हुल्लड वयाची होती. पण हा गडी अगदी जानजवान असल्याने त्याला काही बायकोशिवाय करमत नव्हतं.
तिथे गेल्यावर, सासू त्याला तिथेच जेऊ खाऊ घालायची.
त्याच्या सासूचं घर सुद्धा अगदी लहान होतं. त्या दहा बाय बाराच्या रूममध्ये.. सासू, याची बायको, आणि तिचे दोन लहान भावंडे. इतकी लोकं राहायला होती. रात्री जेवण झालं, कि हा बायकोला म्हणायचा..
ए चल, आपण आपल्या घरला जाऊ..!
त्यावर, याची बायको काही बोलण्या अगोदरच. त्याची सासू म्हणायची,
ती ईल उंद्या, जावा तुम्ही..!
सासूचा उद्या काही उजाडत नव्हता. आणि, याची बायको काही घरी येत नव्हती. त्यामुळे, हा गडी पक्का वैतागला होता. एके दिवशी, वैतागून याने काय केलं..
हा कामावरून घरी आला, त्याच्या घराला कुलूप होतं. नेहेमीप्रमाणे, त्याने त्याचं आवरून घेतलं. आणि सासूच्या घरी जाताना हा 'पावशेर' लाऊनच गेला.
सगळ्यांची जेवणं उरकली, आज आपला नवरा दारू पिऊन आला आहे. हे त्याच्या बायकोला बरोबर समजलं होतं. त्यामुळे, जेवण झाल्यावर तिने काही त्याला घरी जाऊन दिलं नाही.
जुना काळ..त्यावेळी, नऊ साडेनऊ वाजता सगळा परिसर गपगार व्हायचा.
त्या रात्री, सगळी आवराआवर झाली. अंथरूनं टाकली गेली, घरातील दिवा मालवला गेला. आणि, अगदी दाटीवाटीने यांचं कुटुंब सुद्धा झोपी गेलं.
डोक्यात आक्काबाई असल्याने. या गड्याला काही झोप लागत नव्हती.
हा जिथे झोपला होता, त्याच्या शेजारी त्याचे लहान मेहुणा आणि मेहुणी झोपले होते. त्यांच्या शेजारी, त्याची सासू आणि सासूच्या पलीकडे याची बायको झोपली होती.
हा गडी, बायकोच्या मधुर मिलनासाठी अगदी आतुर झाला होता. पण करता काय, रात्रीची वेळ, एवढं सैन्य ओलांडून पलीकडे जायचं कसं..?
शेवटी याने मनाचा हिय्या केला, आणि त्या अंधाऱ्या रात्री ढांगा टाकत-टाकत तो त्याच्या बायकोच्या दिशेने निघाला. आणि अंधारात चुकून, त्याचा पाय सासूच्या पायावर पडला. तशी घाबरून, त्याची सासू जोरजोरात बोंबलायला लागली.
बारकी पोरं डाराडूर झोपली होती. पण सासू ओरडल्याच्या आवाजाने याची बायको जागी झाली. आणि, घाई करत तिने लगेच लाईट लावली.
तर.. हा गडी तिथे उभा होता.
जावयाला तिथे उभा असलेला पाहून, त्याची सासू काय समजायचं ते समजून गेली.
समोरील दृश्य पाहून ती पक्की घाबरून सुद्धा गेली होती. आणि, त्या दहशती खाली ती तिच्या मुलीला म्हणाली.
ए.. जा बाई. तू, तुपल्या घरला जा..!
तसा, हा गडी ताबडतोब घराबाहेर पडला. त्याच्या बायकोने सुद्धा तिचं आवरत घराबाहेर निघाली. आणि.. जाता-जाता ती तिच्या आईला म्हणाली.
उद्या येते गं आई..!
त्यावर घाबरतच तिची आई तिला म्हणाली..
उद्या ssss नगं गं बाई, उद्या बी नगं अन परवा बी नगं. तू आता हिकडं ईऊच नगंस..!

बाईकस्वार व्यक्तींनी,
पावसाळ्यात.. खालील सुचनांचं नक्की पालन करा..
पावसाळा.. हा तमाम लोकांचा आवडता ऋतू जरी असला. तरी नियमांचं पालन न करण्याने, पावसाळ्यात दुचाकी स्वारांचे आपल्याला भयंकर अपघात होत असताना दिसतात. पाऊस तर, त्याच्या नियोजित आणि ठरलेल्या वेळेत येत असतो. पण अपघात झाल्यावर, सगळी लोकं बिचाऱ्या पावसाला दोष देत असतात.
पाऊस पडत होता ना, त्यामुळे झालं..!
१ ) पावसाळा येण्या अगोदर, आपण सर्वांनी आपल्या दुचाकी वाहनांची नियमित सर्व्हिसिंग करून घेणं अत्यंत अवश्यक आहे. तुम्ही ती केली नसेल, तर ताबडतोब करून घ्या. गाडीची व्यवस्थितपणे सर्व्हिसिंग करून घेतल्यावर, भर पावसात वाहनं बंद पडण्याची शक्यता फारच कमी असते.
२ ) बाईक स्वार व्यक्तींनी, स्वतःच्या सोयीकरिता.. पावसाळी रेनसूट, त्याचबरोबर हेल्मेट आणि पावसाळी चपला, सँडल किंवा तत्सम बुटाची एखादी जोडी खरेदी करून ठेवावी.
चामड्याचे किंवा महागडे शूज किंवा चपला पावसात वापरून त्यांना खराब करून, मी किती श्रीमंत आणि स्टेटस जपणारा व्यक्ती आहे. असा दिखाऊपणा कोणीही दाखवू नका. कारण, ते स्टेटस बघणारा तर फक्त बघून जातो, पण नुकसान मात्र आपलं होत असतं. ( भरपूर आमदनी असणाऱ्या व्यक्तींनी, ह्या विषयावर बिलकुल विचार करू नये. )
३ ) पावसाळ्यात शक्यतो.. जुने, टाकाऊ आणि अगदी सुस्थितीत असणारे कपडे वापरावेत. आणि पावसाळा संपल्यावर, त्या कपड्यांना ताबडतोब अलविदा सुद्धा करावा. चांगली ठेवणीतली आणि नवीन कपडे पावसाळ्यात वापरली असता. चुकून त्यावर, तेल मिश्रित चिखलाचे डाग किंवा शिंतोडे ऊडल्यास. ते काही केल्या जात नाहीत. त्यामुळे, या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळाव्यात. कारण, ब्रांडेड कपडे बरेच महाग असतात. पुन्हा एकदा, ( भरपूर आमदनी असणाऱ्या व्यक्तींनी ह्या विषयावर बिलकुल विचार करू नये. )
४ ) बाईकच्या पाठीमागील मड गार्डला, एखादा रबरी फ्लॅप तुम्ही नक्की लाऊन घ्या. रबरी फ्लॅप लावल्याने, आपल्या दुचाकीच्या मागील चाकातून पाठीमागील बाजूस हवेत उडणारं चिखल मिश्रित पाणी, आपल्यामागे असणाऱ्या बाईक स्वाराच्या कपड्यावर व चेहऱ्यावर उडू शकतं. त्यामुळे, आपल्यापासून इतरांना होणारा त्रास वाचू शकतो. आणि, स्वतःबरोबरच इतरांची सुद्धा काळजी घेण्याचं समाधान तुम्हाला मिळू शकेल.
५ ) तुमच्या रोजच्या ओळखीच्या किंवा पायाखालच्या रस्त्यात जरी पाणी साठलं असेल. तरी सुद्धा, त्या पाण्यातून बाईक चालवताना तुम्ही कमालीची सावधानता बाळगत अगदी सावकाशपणे वाहनं चालवा. कारण, चुकून त्या रस्त्यावर एखादा मोठा खड्डा पडला असेल. किंवा, एखाद्या पावसाळी चेंबरचं झाकण उघडलं गेलं असू शकतं. अनावधानाने चुकून, त्या खड्यात अडकून दुचाकी सहित तुम्ही त्या खड्यात पडलात. तर, पुढील होणाऱ्या गोष्टींची आपण कल्पनाच न केलेली बरी.
६ ) तुमच्या रोजच्या रस्त्यात, जर तुम्हाला रेल्वेरूळ क्रॉसिंग करावी लागत असेल. तर त्या रेल्वेच्या गुळगुळीत रुळावरून तुम्ही बाईक अगदी सावकाश हाकत चला. चुकून थोडीजरी गफलत झाली, तर तुमचा टांगा पलटी होणारा म्हणजे होणारच. आणि, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. डांबरी रस्त्याचा आणि रेल्वे रुळाचा मार फार जबरी आणि कधीही बरा न होणारा असतो बरं का.
७ ) पावसात.. चिखलाने किंवा रस्त्यावर उडणाऱ्या माती मिश्रित तेलकट पाण्याच्या फवाऱ्याने. तुमचा रेनसूट, आणि शूज खराब होऊ नये म्हणून. बाईकच्या समोरील बंपरला, जाडसर प्लास्टिकची तावदानं लाऊन घ्यावीत. हल्ली रस्त्यावर, तशी तावदानं विक्रीस उपलब्ध असतात. त्यामुळे, बाईकचं इंजिन सुद्धा चिखलमय होत नाही. आणि आपला सुद्धा बचाव होतो.
८ ) रोजच्या रोज न चुकता, तुम्ही तुमच्या बाईकची हेडलाईटची काच स्वच्छ करून घेत चला. पावसाळ्यात, चिखलाचे बारीकसारीक शिंतोडे उडून हेड लाईटच्या काचेवर चिखलाचं एक छोटसं आवरण तयार होत असतं. त्यामुळे, रात्रीच्या वेळी प्रवास करताना, हेडलाईटचा प्रकाश थोडासा कमी पडतो. अंधुक प्रकाश असल्याने, आपल्याला व्यवस्थितपणे दिसत नाही. त्यामुळे सुद्धा एखादा नवीन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
९ ) अगदी जोराचा आणि धुव्वादार पाऊस असेल, तर.. तुम्ही परिधान केलेल्या हेल्मेटची समोरील काच, वरील बाजूस उघडी करून ठेवा. त्यामुळे, तुमचा चेहरा ( स्पेशली, मुलींचा मेकअप ) पाण्याने भिजू शकतो. पण चुकून, हेल्मेटच्या काचेवर नाकातील दमट श्वासोच्छ्वासाने काचेवर धुकं तयार झाल्यास, अंधुक दिसल्याने सुद्धा एक मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१० ) पावसाळ्यात भरधाव वेगाने वाहनं चालवणं टाळा. पावसात, गाड्या स्लीप होण्याचं प्रमाण फार जास्ती असतं. शिवाय, रस्ता ओला असल्याने. चुकून, रस्त्यावर नादुरुस्त गाड्यांचं ऑइल वगैरे सांडलेलं आपल्याला दिसत नाही. असा प्रसंग घडल्यास, गाडी स्लीप झाल्यावर. आपल्याला फार मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं. तेच जर, आपण अगदी सावकाशपणे वाहन हाकत असू. तर, शंभर टक्के नुकसान न होता, ते अगदी दहा टक्क्यावर येऊन पोहोचतं. शेवटी यात आपलाच फायदा आहे. आपल्या शरीराला जास्ती इजा पोहोचणार नाही.
११) सर्वात शेवटची, आणि महत्वाची सूचना..
आमच्याकडे कार घेण्यासाठी पैसे नसल्याने, आम्ही दुचाकी वापरत आहोत. त्यामुळे, कार चालक आणि मालक व्यक्तींनी. किमान पावसाळ्यात तरी, दुचाकी स्वारांना जास्तीचा त्रास न देता. किंवा, त्यांच्या सर्व चुका पोटात घेत, मोठेपणाने सौजन्य दाखवावे. हि नम्रतेची विनंती..!



आत्ता काहीवेळा पूर्वी,
माझ्या एका उच्चविद्याविभूषित मित्राचा मुलगा.
दारूच्या दुकानातून बाहेर येताना मला दिसला. तो मुलगा सुद्धा आता कमवता आहे, आणि बाप सवाई बेटा सुद्धा आहे.
मी रोडवर उभा होतो. 
आणि त्याच्या हातामध्ये असणाऱ्या पिशवीत दारूची बाटली होती. ते दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं.
मी त्याच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली..
तर तो मला म्हणाला..
काय झालं काका..?
मी म्हणालो, वाईट वाटलं रे. तुमच्या सारखी तरुण मुलं असं काही करताना दिसली की मला खूप वाईट वाटतं.
त्यावर.. एक मोठा सुस्कारा सोडत तो मला म्हणाला..
अहो काका.. ही वाईन मी माझ्याकरीता घेतली नाहीये, माझ्या पप्पांकरिता घेतली आहे.
आज त्यांना एन्जॉय करुद्यात,
" फादर्स डे आहे ना आज..! "

काही व्यक्ती खूपच करामती असतात हो..!
आत्ता काहीवेळापूर्वी, आमच्या ऑफिसच्या जवळ असणाऱ्या दवाखान्यात उपचारासाठी एक रुग्ण आला होता. बहुतेक त्या रुग्णाला खूपच अशक्तपणा आला असावा. त्यामुळे तो व्यक्ती, त्याच्या आईच्या आणि बायकोच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा आधार घेत पुढे निघाला होता.
आणि तितक्यात.. त्या भागात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांची आपसात लढत झाली. आणि ती सगळी कुत्री उधळत या तिघांच्या दिशेने धावत निघाली.
त्या कुत्र्यांचा रोख आपल्या बाजूला धावत येत आहे, हे समजताच. त्या आजारी व्यक्तीच्या अंगामध्ये असं काही बळ संचारलं. की त्याने, त्या पिसाळलेल्या कुत्र्यांना पाहून, बायकोच्या आणि आईच्या खांद्यावर आधारासाठी ठेवलेले आपले दोन्ही हात बाजूला काढून. त्यांना सोडून तो एकटाच धूम पळत सुटला.
तुम्हाला खोटं सांगत नाही, त्या ठिकाणी धावण्याची स्पर्धा असती. तर हा व्यक्ती त्या स्पर्धेत नक्कीच पहिला आला असता. घडलेला प्रकार पाहून, आम्ही तर हसतच होतो. पण आमच्या सोबत त्याची बायको व आई सुद्धा आमच्या हशा मध्ये सामील झाल्या होत्या..!


चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरणं,
हे.. म्हणावं इतकं कठीण काम नाहीये. परंतु, चित्रपट क्षेत्रात एक सिनेकलाकार म्हणून करियर करणं नक्कीच धोकादायक आहे..!
निर्माता आणि दिग्दर्शक, हि भूमिका बजावणारे सगळेच व्यक्ती. नेहेमी पडद्याच्या मागे असतात. त्यांना म्हणावं असं कोणी ओळखत नसतं. विचार करा.. तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आवडत्या प्रत्येक सिनेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता चेहऱ्यानिशी आणि नावानिशी माहिती आहे..? ( सुभाष घई सारखे काही व्यक्ती वगळता. असे फारसे लोकं आपल्या ध्यानात राहत नाहीत. ) माझ्या माहितीप्रमाणे, याचं उत्तर बर्यापैकी नकारात्मक येईल. कारण, पडद्यावर आपण यांची फक्त नावं वाचत असतो. यांचा चेहेरा फक्त एखाद्या मासिकात किंवा साप्ताहिकात छापून येत असतो. आणि, आपल्यापैकी सगळेच जन, हि मासिकं किंवा साप्ताहिकं वाचण्याचे शौकीन नसतात.
पूर्वी.. न्हाव्याच्या दुकानात, मायापुरी नावाचं एक हिंदी साप्ताहिक हमखास दिसायचं. त्यात सगळा फिल्मी मसाला भरलेला असायचा. आता तर, न्हाव्याची दुकानं सुद्धा खूप हायफाय झाली आहेत. आणि आता, तिथे मायापुरी मासिक नसतं. तर, स्टारडस्ट नावचं इंग्रजी मासिक असतं. त्यामुळे, इंग्रजी पुस्तकातील चावट फोटो पाहत वेळ मारून न्यावी लागते. पण सिनेमातील म्हणावी अशी माहिती काही मिळत नाही. परंतु चुकून जर कोणी, या विषयाचा अगदीच सखोल अभ्यास करणारा व्यक्ती असेल. तर तोच, यांना त्यांच्या नावासहित आणि फोटोसहीत ओळखू शकतो. हे सुद्धा अगदी शंभर टक्के खरं आहे. आणि, तेवढा वेळ फारच कमी लोकांकडे असतो.
त्याविरुद्ध.. सिने कलाकार लोकांना आपण सगळे जन अगदी नावानिशी ओळखत असतो. तर मग, तो अगदी छोटा मोठा कलाकार का असेना. कारण, सतत तीन तास तो पडद्यावर आपल्यासमोर वावरत असतो. त्यामुळे, आपल्याला त्याची किंवा तिची अगदी घट्ट ओळख होऊन गेलेली असते. आणि त्यामुळे, ती व्यक्ती आपल्या नजरेत एक पक्कं स्थान सुद्धा मिळवून जाते.
चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक..
चित्रपट निर्मितीत सपशेल फेल जरी झाला. तरी त्याला काही फरक पडत नाही.
जास्तीत जास्त काय होईल. तर त्याचा सगळा पैसा धुळीस मिळेल. पडत्या काळात, तो एखाद्या निर्मात्याकडे छोटं मोठं काम करून आपला गुजारा करू शकतो.
परंतु, कालांतराने पदरी पैसा आल्यावर तो पुन्हा एकदा गरुडझेप घेईल. यात तिळमात्र शंका नसते. आणि असं सर्रास होतं सुद्धा. कारण, हे एकप्रकारचं व्यसन आणि व्यासंग सुद्धा आहे.
परंतु, सिनेमात आघाडीची भूमिका करणारी नायिका किंवा नायक, चुकून त्या कार्यक्षेत्रात नाकाम झाला. तर बाकी, त्यांचं जगणं अगदी मुश्कील होऊन जातं.
कारण, सिनेमा क्षेत्रात फेल झालेल्या लंगड्या घोड्यावर किंवा घोडीवर कोणीही निर्माता पैसा लावायला तयार नसतो. हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
या अनामिक आणि भुलभुलैय्या क्षेत्रात पदार्पण केल्याने, त्यांच्या जीवनशैलीत फार मोठा फरक पडलेला असतो. उंची राहणीमानामुळे त्यांचा खर्च सुद्धा फार वाढलेला असतो. उंची कपडे, उंची कार, उंची घर, सगळं काही अगदी उंची झालेलं असतं. आणि नाही म्हणता, त्यांना तसं राहावं सुद्धा लागतं. काळाच्या पुढे किंवा मागे राहून चालत नसतं.
परंतु चुकून या क्षेत्रात नाकाम किंवा बेकार झाल्यावर.. या उंची जीवनाच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्यांना करता येत नाही. अशा वेळी, काही मुली वाममार्गाला सुद्धा लागतात. तुम्ही सुद्धा अशी कितीतरी उदाहरणं पाहिली असतील. फक्त वाममार्गालाच नाही, तर त्या व्यसनाच्या आहारी सुद्धा जातात. आणि, वेश्या व्यवसायात आणि नशेत त्या कायमच्या गुरफटून जातात. आणि तिथेच त्यांचा करून अंत सुद्धा होतो. अशा कितीतरी मुली ठार वेड्या सुद्धा झाल्या आहेत.
सिने क्षेत्रातील मुलं अंगा पिंडाने धडधाकट असतात..
पण सिने क्षेत्रात नाकाम झाल्यावर, इच्छा असून सुद्धा ते बाजारात कोणतंही साधंसुधं काम करू शकत नाहीत. कारण, सिनेमा क्षेत्रात आल्याने त्यांची प्रतिष्टा अगदी पणाला लागलेली असते. त्यांची इच्छा असून देखील त्यांना हमाली करता येत नाही. नाही म्हणता, अगदी तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांना सहन करावा लागत असतो.
परंतु.. आपल्या हातात असलेलं काम करत,करत तुम्ही या क्षेत्रात आलात.
तर, समाजात वावरून पडेल ते काम करण्याची सवय असल्याने. तुमची भीड चेपलेली असते. नोकरी हि तुमची पहिली भाकरी असते. त्यामुळे, लाजण्या लपण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
असो.. आकाश ठोसरचा, एफ. यु. हा सिनेमा जाम गडगडला आहे.
सावर रे बाबा,
तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
महेशच्या सिनेमात काम केलेले सगळे कलाकार नावारूपाला आले आहेत. कालांतराने तू सुद्धा नावलौकिकास पात्र ठरशील अशी आशा करतो. आज, नागराज मंजुळे कुठे आहे आणि काय काम करतोय हे कोणाला माहिती नाहीये.
पण.. तुझा चेहेरा मात्र तमाम सिने रसिकांना ठाऊक आहे..!

मनुष्य जन्म पुन्हा नाही..
हि किती विलक्षण गोष्ट आहे ना. इथे कोणत्याच चुकीला माफी नसते. चुकी केल्यानंतर आपण त्याबद्धल लाख प्रायश्चित्त करू. पण, ते समोरचा मान्य करेल तेंव्हाच.
ह्या संपूर्ण हयातीत काही लोकांना दोन दोन आयुष्य अनुभवायला मिळतात. कारण, सगळेच लोक काही कामगार नसतात. कामगार वर्गातील लोकांची दोन जीवनक्रम असतात. एक तर आपल्या घरातील आणि नातेवाईक मंडळी. तर दुसरी आपल्या कामातील मित्रांचा गोतावळा.
पूर्वी मी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला होतो. त्यावेळी एक घटना घडली होती. दिवाळीचा सण आला होता. दोनेक दिवसांनी कंपन्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या.
त्यामुळे.. काही व्हेंडर लोकं, साहेबांना आणि कामगारांना मिठाईचे पुडे आणि काही भेटवस्तू देण्यासाठी येत होते. आनंदाचे दिवस होते, लोकांचे धंदे मजबूत चालू होते. त्यामुळे सगळे व्यापारी लोकं खूप आनंदात होते. त्यामुळे त्यांचा आनंद आणि पैसा ते इतर कामगार वर्गात सुद्धा वाटत होते.
तर त्या दिवशी, एक मोठा व्हेंडर स्वतः मारुती व्हॅन मधून मिठाईचे पुडे आणि काही भेटवस्तू देण्यासाठी आमच्या कंपनीत आले होते. त्यांनी मला माझी भेटवस्तू आणि मिठाईचा पुडा मला दिला. आणि माझ्यापेक्षा सिनीअर असणाऱ्या दुसऱ्या एका सुपरवायझरला सुद्धा त्यांनी भेटवस्तू आणि मिठाईचा पुडा दिला. त्या साहेबांनी पूर्ण गाडी भरून मिठाईचे पुडे आणले होते.
सहज म्हणून, मी त्या साहेबांना म्हणालो. साहेब, एवढे मिठाईचे पुडे कशाला आणले आहेत हो..?
तर ते म्हणाले, आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या इतर कामगारांना सुद्धा मिठाई देण्याची माझी इच्छा आहे. त्या साहेबांचे हे बोल ऐकून मला फार बरं वाटलं. तितक्यात माझे सिनियर सुपरवायझर त्यांना म्हणाले.
कशाला.. त्या कामगारांना कशाला मिठाईचे पुडे देताय..? नका देऊ, काही कामाचे नाहीयेत ते. माझ्या सिनिअर मित्राचे ते बोल मला काही आवडले नाही. म्हणून मी थोडं मध्ये बोललो, तर म्हणाले. तू गप्प बैस रे, मला शहाणपणा शिकवू नकोस..!
कितीही केलं तरी ते मला बरेच सिनियर होते. शेवटी मी सुद्धा गप्प बसलो. आणि ते साहेब सुद्धा कामगारांना मिठाईचे पुडे न देताच निघून गेले.
त्यानंतर महिनाभराने, तेच साहेब काही कामासाठी आमच्या कंपनीत आले होते. त्यांना एक जॉब खूप अर्जंट करून हवा होता. मी त्यांना घेऊन आमच्या एका वर्करपाशी गेलो. आणि त्याला म्हणालो, साहेबांना हा जॉब खूप अर्जंट आहे. जरा पटकन करून दे.
त्यावर.. तो कामगार त्या साहेबांना म्हणाला. पंडित साहेब म्हणतायेत म्हणून मी त्यांना नकार देत नाहीये. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुम्ही फक्त कामापुरते आमच्याकडे येता. सणावाराला तुम्हाला आम्हाला साधा मिठाईचा पुडा सुद्धा द्यावासा वाटत नाही.! कसले आहात तुम्ही मोठे साहेब..? बापरे, ह्या एका वाक्याने, त्या साहेबांच्या केल्या करविल्यावर पाणी पडलं होतं. आणि दुख्खी अंतकरणाने ते साहेब त्या कामगाराला म्हणाले..
नाहीरे.. मी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मिठाईचे पुडे आणले होते. पण मोठ्या साहेबांनी मला सांगितलं कि त्यांना कशाला मिठाईचे पुडे देताय. बघा, हवं तर पंडित साहेबांना विचारा..!
आता काही बोलावं तर मीच वाईट होणार होतो. पण शेवटी जे खरं आहे, ते मला सांगावं लागलच. हे सगळं ऐकल्यावर त्या कामगाराने त्या साहेबांना लगेच माफी मागितली. आणि त्यांचा तातडीचा जॉब त्यांना करून दिला.
या घडल्या प्रकारा नंतर, सर्व कामगार त्या मोठ्या सुपरवायझरवर खूप चिडून होते. पण त्याला बोलायची कोणाची हिम्मत नव्हती. पण ते कामगार सुद्धा काही साधे नव्हते. त्यांनी सुधा अगदी काट्याने काटा काढला.
वर्षभराने.. माझे सिनियर सुपरवायझर सेवानिवृत्त होणार होते. त्यादिवशी आमच्या स्टाफची चार लोकं वगळता एक सुद्धा कामगार कामावर हजर नव्हता. सर्वांनी अगदी ठरवून सुट्ट्या घेतल्या होत्या.
कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीच तिथे हजर नव्हत्या. तर मग, आता करायचं तरी काय. त्यामुळे, त्या सिनियर सुपरवायझरला त्यादिवशी बिना सत्काराचं त्याच्या घरी जावं लागलं होतं.
ज्या कंपनीत, आपण आपलं सगळं आयुष्य घालवलं. तिथून बाहेर पडताना, शेवटचा अलविदा अगदी चांगल्याप्रकारे आणि आनंदात व्हावा. अशी सर्वांची इच्छा असते.
परंतु.. कर्म तशी फळं, हि मनुष्याला भोगावी लागतातच..!

आपला फोटो कितीही गोरा आला. 
तरी, काळा रंग हीच आपली खरी आयडेंटिटी असते..!

आजची तरुण पिढी..
माझ्यासारख्या वयाच्या लोकांना अगदी मूर्ख समजत असतात. त्यांना काय वाटतं,
कि..आपण काय करत आहोत, ते यांना काय समजणार आहे. पण शेवटी, आम्ही सुद्धा बाप माणसं आहोत,
हे, ते.. अगदी विसरूनच जातात.
किंवा, त्यांच्या मनाला हा साधा विचार सुद्धा शिवत नाही. कि, चुकून पूर्वी यांचा सुद्धा प्रेमविवाह झाला असेल. किंवा, कधीकाळी यांनी सुद्धा मुलींना लाडिक छेडछाड केली असेल. किंवा, कधीकाळी हे सुद्धा नवतरुण असतील. पण नाही ना, त्यांच्या मनाला हा विचार शिवतच नसावा.
असा माझा अंदाज आहे. आता कसं आहे..!
माझ्या निरीक्षणातून काहीच सुटत नसतं.
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण मुला मुलींना मी नेहेमी पाहत असतो. आता, त्या मुला मुलींमध्ये निखळ मैत्री आहे. कि काही गडबड घोटाळा आहे, हे मी अगदी अचूक ताडतो. पण त्याकरिता, माझ्यासारखी माणसं वाचण्याची तुम्हाला सवय मात्र असायला हवी.
जाऊदेत, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. मी स्वतः शोधलेल्या काही ट्रिक्स तुम्हाला सांगतो.
१) समोरून येणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात, सगळी मुलं मुली एकमेकाच्या खांद्याला खांदे घासत. अगदी खेटून, हसत खिदळत, आणि.. छोट्या-छोट्या जोक्सवर एकमेकांना टाळ्या देत असतील. तर तुम्ही समजून जावा, हे सगळे एकमेकांचे अगदी निखळ आणि जिवलग मित्र आहेत. किंवा, आत्ताच कुठेतरी यांचा याराना वाढू लागला आहे.
२) समोरून येणाऱ्या जोडगोळी मध्ये, दोघेही एकमेकाशी साजेसं अंतर ठेऊन चालत असतील. बोलताना, अधेमध्ये एकमेकांना प्रश्नार्थक नजरेने पाहत असतील. किंवा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर बिलकुल उमटत नसेल. ते दोघेही अगदी विचारात गूढ आणि भलतेच सिरीयस असतील. तर तुम्ही समजून जावा, हे दोघेही रँक होल्डर आणि अभ्यासू मित्र आहेत. अभ्यासातून वेळ मिळाला, तर यांच्यात सुद्धा प्रेम होऊ शकतं. पण, वेळ मिळाला तर, बरं का.
३) समोरून येणाऱ्या जोडगोळी मध्ये, दोघेही एकमेकांशी बोलताना अगदी मनमोकळे बोलत असतील. ते दोघेही, हसताना सुद्धा एक छोटीशी लाजरी झालर तुम्हा आम्हाला लगेच दिसून जाईल. पण हे दोघे, चालताना एकमेकांना बिलकुल खेटून चालणार नाहीत. किंवा.. टाळ्या देणे, चिमटे काढणे असले उद्योग कधीच करणार नाहीत. त्यावेळी तुम्ही समजून जावा.
कि हि, एका पहिल्या वहिल्या प्रेमाची निर्मळ सुरवात आहे..
४) समोरून येणाऱ्या जोडगोळी मध्ये, मुलगी आणि मुलगा दोघे सुद्धा अगदी बेफाम असतील. म्हणजे, मुलगी त्याला चिमटे काय काढतेय, तर तो तिची वेणी काय ओढतोय. तर मधेच, चालता-चालता ती मुलगी त्याच्याकडे प्रेमभर्या लाडिक नजरेने काय पाहतेय. आणि त्यावर, तो मुलगा ताबडतोब तिचे गालगुच्चे काय घेतोय.
त्यावेळी.. तुम्ही समजून जावा. इथे सगळं काम तमाम झालं आहे. गाडी अगदी योग्य रुळावर धावत आहे.
५) समोरून येणाऱ्या जोडगोळी मध्ये, दोघे चालत येत असताना. खासकरून मुलगी, त्या मुलाच्या मनगटाच्या थोडील वरील बाजूस, तिच्या हाताच्या पंजा अगदी हळुवार तिथे टेकवून, आणि दुसरा हात त्याच्या त्याच हाताच्या दंडाला धरत, त्याला अगदी चिटकून. आणि, त्याच्याकडे पाहत थोडसं मंद हसत तर मधेच थोडी चिंताग्रस्त होत त्याला खेटत निघालेली असते.
आणि, तो मुलगा तोंड वर करून बिनधास्त निघालेला असतो.
त्यावेळी.. त्या मुलाने, तिच्यात थोडासा इंटरेस्ट कमी केलेला आहे. तो तिच्यावर, थोडासा खट्टू झाला आहे. असं तुम्ही बिनधास्त समजून जावा.
६) हमरस्त्यावर कोणाचीही तमा न बाळगता,
एखादी मुलगी.. त्या संभाव्य मुलासमोर जोरजोरात रडत आणि भांडत असेल. आणि, तो मुलगा तिला कोणतीही प्रतिक्रिया न देता निर्विकारपणे उभा असेल. त्यावेळी, तो मुलगा त्या मुलीशी फिजिकल रिलेशनशिप ठेवून मोकळा झाला आहे. आणि, प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेऊन, एकमेकांना लग्नाची वचनं देऊन, आता नाही होऊन पडला आहे. हे समजायला तुम्हाला बिलकुल वेळ लागणार नाही.
हे झाले.. सुपर सिक्स..!
तर परवा.. मी पुण्यातील एका सिग्नलवर असताना. माझ्या एका ओळखीतल्या व्यक्तीची मुलगी. तिच्या मित्रासोबत निघाली होती. त्यावेळी ती मुलगी पाच नंबरच्या मोडमध्ये होती. मला तिला आवाज द्यावासा वाटत होता. पण मी स्वतःला थोडं थांबवलं. पण अचानक माझ्या तोंडून ते वाक्य बाहेर पडलं. अगं XXX कुठे निघाली आहेस..? त्यावेळी, त्या मुलीचा चेहेरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. ती मुलगी तशीच माघारी फिरली, आणि मला म्हणाली..
अहो काका.. त्या मुलाला हे XXXXX कॉलेज माहिती नव्हतं. मी ते त्याला दाखवायला त्याच्या सोबत आले होते. शेवटी मी सुद्धा वेड्याचं सोंग घेतलं. आणि तो विषय तिथेच सोडून दिला.
कालपरवा.. ती मुलगी मला प्रत्यक्ष भेटली आणि म्हणाली. काका, ते तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना..! मी म्हणालो.. त्यात सांगण्या सारखं काय होतं..?
तर म्हणाली.. आमचा ब्रेकअप झाला आहे. प्लीज कोणाला सांगू नका. मी तुमच्या पाया पडते.
त्यावेळी.. मी फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवला. आणि तिला म्हणालो, बेटा.. एकदा ठेस लाऊन घेतली आहेस. पुन्हा, एखादी मोठी जखम करून घेऊ नकोस. नाहीतर.. ती जखम, तुमच्या सगळ्या घरादाराला चिघळऊन टाकेल..!
हुल्लड वयात, मुलं अशा चुका हमखास करत असतात. जो चुकणार, तो माणूस असतो.
अन्यथा.. जनमानसात " देव " लोकांची बिलकुल कमतरता नसती..!

Tuesday, 13 June 2017

दहावीचा निकाल.. लागला कि लावला..?

काल, दहावीला बसलेल्या मुलांच्या घरी अगदी आनंदी आनंद आणि दिवाळी साजरी झाली असेल. काय जबरदस्त निकाल लागला आहे. रत्नागिरीतील एका मुलाला तर चक्क शंभर टक्के मार्क्स मिळाले आहेत. काय बोलावं आता, ऐकावं ते नवलच. अहो.. शंभर टक्के मार्क्स मिळतीलच कसे..? लिखाणात.. वेलांटी, कान्हा, मातरा काहीतरी चुकलं असेल कि नाही..? कि पेपर तपासणारी यंत्रणा सुद्धा अगदी कुचकामी झाली आहे..? काल दुपारी, आमच्या येथील एका मुलाला दहावीला एक्केचाळीस टक्के मार्क्स मिळाले. आणि, तो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाला. पास झाल्यावर तो गडी इतका खुश झाला होता. कि आनंदाच्या भरात त्याने चक्क गुलाल उधळला. त्यावर, माझे मित्र मला सांगत होते. कि त्याला अजून मराठी सुद्धा नीट वाचता येत नाहीये. परीक्षा देऊन आल्यावर, तो फक्त पाच दहा मार्कांचा पेपर लिहिला आहे असं आम्हाला सांगायचा. तर मग, हा एक्केचाळीस टक्यांचा पराक्रम त्याच्याकडून कसा काय घडला असेल..?

हल्ली, दहावीतील मुलांना.. साठ ते सत्तर टक्के मार्क्स तर अगदी सहजपणे मिळून जातात. हि गेल्या आठ दहा वर्षातील स्पष्ट दिसणारी घटना आहे. दहावीतील विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी, म्हणून हात आखडता न घेता. प्रत्येक महाविध्यालयाने, त्यांच्या शाळेतील मुलांना शाळेतून मिळणारे पंचवीस किंवा तीस टक्के ग्रेस मार्क अगदी मोफत देऊन टाकले आहेत. मग पासिंग करिता उरलेले पाच दहा टक्के मार्क्स मुलं अगदी सहज मिळवून जातात. त्यामुळे, दहावीतील नापासांची संख्या त्यामानाने बरीच कमी झाली आहे.

सर्व पालकांना, सुरवातीपासूनच आपल्या पाल्याची अभ्यासातील झेप कुठवर आहे. हे चांगलंच माहित असतं. पहिली ते नववी पर्यंत, त्याला किती टक्के मार्क मिळाले आहेत. आणि, त्याच्या प्रगतीचा आलेख वाढतोय कि कमी झालाय, हे सुद्धा त्यांना चांगलच माहिती असतं.
तरी सुद्धा.. ऐपत असणारे पालक, आणि ऐपत नसणारे पालक सुद्धा. कर्ज काढून त्यांच्या मुलांना दहावीच्या परीक्षेसाठी खाजगी शिकवण्यांना पाठवताना आपल्याला पाहायला मिळतं. ते खाजगी शिकवणीवाले शिक्षक मंडळी, तुमच्या पाल्याला शिक्षण काय कोळून पाजणार असतात का..? अहो, तुमच्या मुलाचा जेवढा बुद्यांक असणार आहे, तो तेवढीच मजल मारणार. फारफारतर, त्यात दोन पाच टक्क्यांचा फरक पडू शकतो. त्याउपर भव्यदिव्य असं काहीच घडणार नाही. असं माझा अभ्यास मला सांगतोय. माझ्या या वक्तव्यावर बरेच ट्युशन प्रेमी आणि ट्युशन चालक व्यक्ती नाराज होतील. पण आहे हि अगदी सत्य परिस्थिती आहे. पण काय आहे, प्रत्येकाला त्यांचा मुलगा पहिल्या नंबरने पास होताना पहायचं असतं. निव्वळ त्याकरिता, हा सगळा आटापिटा चालू असतो.

माझ्या माहितीप्रमाणे, सर्व शाळांमध्ये अजूनही व्यवस्थितपणे शिक्षण दिलं जात आहे. तर मग, खाजगी शिकवण्या लाऊन लोकांचे खिसे तुम्ही का म्हणून भरताय..?
तुमचा मुलगा पहिली ते नववी पर्यंत कधीही नापास झाला नाहीये. तर तो दहावीला तरी कसा काय नापास होईल..? दहावी म्हणजे काय, अगदी न झेपणारी गोष्ट आहे का..? फारतर टक्के थोडे कमी पडतील. यापुढे दुसरं काय होणार आहे.
लाख, दोन लाखाच्या खाजगी शिकवण्या लाऊन. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्णपणे परावलंबी करत आहात. त्यामुळे, शाळेत व्यवस्थितपणे शिकवलं जात नाही. असा अपप्रचार सुद्धा होताना दिसतोय. दिवसा शाळा आणि शाळेतून आल्यावर मुलांना खाजगी शिकवण्या चालू असतात. झोपेत सुद्धा त्या मुलांना फक्त अभ्यासच दिसत असतो. हे चुकतंय हो कुठेतरी.
मुलांना सतत अभ्यासात ठेऊन तुम्ही त्यांचं बालपण हिरावून घेत आहात. असं तुम्हाला वाटत नाही का..? आणि इतकं सगळं करून सुद्धा, तुमच्या मुलाला जेमतेम साठ सत्तर टक्के मार्कच पडले. तर ते मुल सुद्धा टेन्शन मध्ये. आणि पैश्यापरी पैसा गेल्याने, तुम्ही सुद्धा टेन्शनमध्ये. सांगा ना.. यातून साध्य काय होणार आहे..?
खाजगी शिकवण्यांना होणारा खर्च तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवला. तर तोच पैसा, तुमच्या मुलाच्या पुढील शिक्षणासाठी कामाला येईल. थोडं डोक्याने काम घ्या. इयत्ता दहावी नंतर, अभ्यासक्रम थोडा बदलतो. त्यावेळी, विविध पर्याय निवडत असताना, खाजगी ट्युशन लावण्याला माझा बिलकुल विरोध नाहीये. पण दहावीला खाजगी ट्युशनची बिलकुल आवश्यकता नाहीये. असं माझं ठाम मत आहे.

काहीवेळेस, चुकून दहावीला काही मुलांना ऐंशी नव्वद टक्के मार्क्स मिळतात. आणि तीच मुलं, पुढे अकरावीला नापास होतात. दहावीला जास्ती टक्के पडले. म्हणून, आपण त्यांना लगेच विज्ञान शाखेत पाठवतो. अहो, पण नववी पर्यंत मराठी माध्यमात त्याला इंग्रजीचं कितपत ज्ञान होतं. याची आपण कधी गोळाबेरीज करत असतो का..? शिक्षणा बाबतची त्या मुलाची आवड कोणीच पाहत नसतं. जो तो आपलंच घोडं पुढे ताणत असतो. आत्ताच आमच्या इथे, दहावीला ऐंशी टक्के मार्क घेणारा एक मुलगा बारावीला नापास झाला. हे दुक्ख पचवता न आल्याने, त्या मुलाच्या बापाने फाशी लाऊन घेतली. यातून साध्य काय झालं..?

प्रत्येक पालकाला अपेक्षा असते, माझं मुल खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. पण तुम्हाला खरं सांगतो. नशिबाच्या पुढे काहीएक नसतं हो. मी नशीब म्हणतोय म्हणून, सर्वांनी नशिबावर विसंबून राहता कामा नये. नाशिबासोबत अभ्यासाची नाळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आहे त्यात समाधान माना. खूप काही शिकून, सगळीच मुलं साहेब झाल्यावर. इतर साधीसुधी कामं तरी कोण करणार..?
जीवन म्हणजे, एक तराजू आहे. ते, थोडं खालीवर होत राहणारच. जास्तीचा ताण घेऊ नका, मुलांची आवड पाहून त्यांना त्यांचे मार्ग निवडूद्यात. त्यांना त्यांच्या जीवनाचा खरा आस्वाद घेउद्यात. देवाने चोच दिली आहे, तशी त्याच्या दाण्याची सोय सुद्धा करून ठेवली आहे.

असो.. दहावीतील सर्व यशस्वी विध्यार्थ्याचं. आणि, त्यांच्या पालकांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन..!



Saturday, 10 June 2017

भारतीय समाजव्यवस्था हे फार जुनं खोड आहे. 
आणि, विवाहसंस्था हे त्याचं एक जिवंत फलित आहे.
तुमच्या घरातील महिलांना..
स्पेशली.. तुमच्या बायकोला, बहिणीला, मुलीला, घरातील ईतर स्त्रिया आणि आईला सुद्धा.
 तुम्ही.. आपल्या आणि त्यांच्या जीवनात, त्यांना ५०% आरक्षण दिलं आहे का..?
भारतातील महिलांना, फक्त नावापुरतं पन्नास टक्के आरक्षण मिळालं. असा, माझा शुद्ध आरोप आहे. खेडेगावातील महिला तर. आज सुद्धा, रानात.. गुरासारख राबराब राबत आहेत. हे मी, माझ्या गावी गेल्यावर सर्रास पाहत असतो.
अजूनही, महिलांना म्हणावी इतकी मोकळीक मिळत नाहीये. नाही म्हणता, शहरी भागात काही ठिकाणी, महिला.. पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन समाजात वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. पण, त्याची सुद्धा टक्केवारी म्हणावी इतकी मोठी नाहीये.
थोडा खोलात विचार करायला गेलात. तर, प्रत्येक पुरुषाने महिलेला समान हक्काचा दर्जा दिला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. नाहीतर, त्याचे दूरगामी परिणाम हे खूप वाईट आहेत. आणि ते, आपल्याला आणि आपल्या आप्तांना नक्कीच भोगावे लागतील. यात, तिळमात्र शंका नाही.
वानगीदाखल.. मी इथे फक्त, आता " बायको " या स्त्रीला माझ्या नजरेसमोर ठेऊन खालील वक्तव्य करत आहे.
ती बिचारी.. लोकाच्या घरून आपल्या घरात, घरातील एक जबाबदार स्त्री म्हणून आली आहे.
त्यामुळे तिला, जमेल तेवढा आनंद देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते, कोणीही चुकून सुद्धा टाळू नये. आणि तिला, घरगडी किंवा परकं किंवा याचक म्हणून कधीच पाहू नये. कारण,
भारतीय समाजव्यवस्था हे फार जुनं खोड आहे. आणि, विवाहसंस्था हे त्याचं एक जिवंत फलित आहे,.
आपल्या बायकोला,
महिन्यातून एकदा तरी.. हॉटेलमध्ये जेवायला किंवा किमान नाश्ता करण्यासाठी तरी घेऊन गेलं पाहिजे. महिन्या दोन महिन्यांनी, तिच्या मनाला वाटेल ती शॉपिंग करण्यासाठी. आपल्या खिशाला सोसेल इतकी रक्कम तिला आपण देऊ केली पाहिजे.
जास्ती नाही.. तर, वर्षातून किमान तीन-चार सिनेमे, ते सुद्धा मल्टीप्लेक्स मध्ये नेऊन तिला आपण दाखवले पाहिजे. वर्षातून एकदा तरी, तिला बाहेरगावी फिरायला नेलं पाहिजे. जेणेकरून, तिला सुद्धा देशविदेशाची सफर घडेल. तिचं मन रमवण्यासाठी, एखाद्या महिला मंडळात तिचं नाव आपण स्वतःहून नोंदवून तिला थोडीशी मोकळीक कशी मिळेल ते पाहिलं पाहिजे. देशविदेशातील नेमक्या काय घडामोडी चालू आहेत. हे तिला समजावं. त्याकरिता, अद्ययावत असा मोबाईल सेट आपण तिला देऊ केला पाहिजे. सोशल मिडीया मधील सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगितल्या पाहिजेत. वेळ मिळेल तेंव्हा, तिला घरकामात आपण थोडीफार मदत सुद्धा केली पाहिजे.
अजूनही.. अशा आशा बऱ्याच गोष्टी असतील. त्या प्रत्येकाने, आपआपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या बायकोला देऊ केल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी तिला मिळाल्यावर, तिचं मन कुठेही भरकटनार नाही. अगदी तृप्त मनाने ती तिचा संसार मार्गी लावेल. तिची इच्छा नसली तरी सुद्धा, तिला या गोष्टींची आवड आपण स्वतः निर्माण करून दिली पाहिजे. हि काळाची गरज आहे.
कारण, लपवून ठेवलेल्या किंवा माहित नसलेल्या गोष्टीची माणसाला फार उत्सुकता लागून राहते.
कि ते नेमकं काय असेल..? हि शंका जर एकदा मनात रुजली, कि विषय संपला..!
त्यामुळे, मनामध्ये अशी कोणतीही आडी न धरता. तिला सुद्धा, आपण तिच्या स्त्री जन्माचा पुरेपूर लाभ द्यायला हवा. असं माझं वैयक्तिक मत आहे.
जर या गोष्टीत आपण कोणतीही कुचराई केली. तर उद्या त्याचे फारच गंभीर परिणाम आपल्याला भोगावे आणि पहावे सुद्धा लागतील.
ती एक म्हण आहे ना.. " कधी नाही मिळलं, आणि गटकन गीळलं..! "
तुम्हा सर्वाना या विषयाचं आश्चर्य वाटेल. कि, मी या निकषांवर का आलो आहे..?
त्याचं, एक ताजं उदाहरण मी याठिकाणी तुम्हाला देऊ इच्छित आहे.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची, अगदी घरंदाज अशी बायको होती. तिच्या डोक्यावरचा पदर सुद्धा कधी खाली पडत नव्हता. तिचं घर भलं आणि ती भली. इतकी तर ती चारित्र्यवान बाई होती. ती दिसायला अगदी जेमतेम होती. पण तरी सुद्धा, तिचा नवरा फारच काटेकोर आणि शंकेखोर होता.
त्याची.. प्रत्येक गोष्टीत तिला बंधनं असायची. त्यामुळे, ती बिचारी अगदी तिच्या पायाकडे बघून चालायची. तिला.. हॉटेल, सिनेमा, फिरणं, धरणं याची काहीच माहिती नव्हती.
आता.. शहरात राहणाऱ्या महिलांनी इतकं सुद्धा साधं राहू नये ना. पण, ती बाई इतकी भोळी आणि सरळ होती. कि तिच्याकडे फोन करण्यासाठी एखादा साधा मोबाईल सुद्धा नव्हता. किंवा, तिच्या नवऱ्याला तिला तो साधा फोन सुद्धा घेऊन द्यावासा वाटला नाही. हि बाई म्हणजे, अगदी चूल आणि मुल अशातली होती. जग दुनियेची तीला काहीच माहिती नव्हती.
आणि अचानकपणे..
एके दिवशी, तिच्या नवऱ्याचा अकस्मात मृत्यू झाला. सर्वांना चिंता पडली, आता हि बाई कशी काय निभाऊन नेईल..? कारण, हि कधी घराच्या बाहेरच पडली नव्हती. त्यावेळी, तिचा मोठा मुलगा फक्त सोळा वर्षांचा होता. त्यामुळे, वडिलांच्या जागेवर मुलगा कामाला लागू शकत नव्हता. शेवटी नाईलाज झाल्याने, त्या बाईला तिच्या नवऱ्याच्या जागेवर कामाला लागावं लागलं. आणि, इथेच सगळं गणित फिसकटलं.
जनमानसात वावरायची सवय नसलेली हि महिला.
एकदम, भल्या मोठ्या लोकांच्या गोतावळ्यात कामाला जाऊ लागली. त्याठिकाणी, तिला काही अशा महिला सुद्धा भेटल्या, कि त्यांनी तिला सगळं जग उघडं नागडं करून दाखवलं. त्यानंतर मात्र त्या बाईने मागे वळून काही पाहिलं नाही.
दोन चार महिन्यातच.. ती अगदी मॉडर्न झाली.
तिच्या राहणीमानात कमालीचा फरक पडला होता. हातात भरपूर पैसा आला असल्याने. नको ती मौज करायला आता ती मोकळी झाली होती. तिला आता कोणाचंच आणि कोणतंच बंधन नव्हतं.
उंची साड्या, उंची अत्तरं, महागडा मोबाईल, महागडी पर्स, महागड्या चपला. खरं सांगायला गेलं तर, तिचं जीवनच अगदी महागडं होऊन बसलं होतं.
आता, इतकं सगळं काही तिच्या दिमतीला आहे म्हंटल्यावर. पुढे काय.. हि गोष्ट आलीच कि.
आता तिला फक्त एकाच गोष्टीची कमतरता भासत होती. ती म्हणजे, तिला एखादा " जोडीदार " हवा होता. तिच्या जवानीच्या अग्नीला शांत करणारा एक उमदा पुरुष तिला हवा होता.
आणि योगायोगाने.. काही लोकं सुद्धा अशा महिलांच्या अगदी शोधातच असतात. त्यावेळी, त्या महिलेला फक्त पुरुषी सहवास हवा असतो. अंगाला झटणारा आणि मायेची पाखर घालणारं एक हक्काचं माणूस हवं असतं. त्यावेळी, अशा लोभस अभिलाषेने ती अगदी अंध झालेली असते. भल्या बुर्याची तिला कसलीच तमा उरलेली नसते.
आणि.. शेवटी व्हायचं ते झालं. तिचं एका व्यक्तीबरोबर सुत जुळलं. काही महिन्यातच, ती अगदी बिनधास्तपणे निर्ढावल्या सारखी वावरू लागली होती. पैश्यामुळे लालीलाल झालेल्या या चकाचॉर्ण आयुष्यापुढे, तिला तिचा एकुलता एक मुलगा सुद्धा आता दिसेनासा झाला होता. इतकी तर ती बेभान झाली होती. तिच्या मोबाईल मध्ये.. अश्लील क्लिप तर असायच्याच. त्याचबरोबर, ती आता इतकी निडर झाली होती. कि तिच्या याराशी सहवास करण्यासाठी ती चक्क त्याला तिच्या घरी सुद्धा घेऊन येत होती. आता बाकी, त्या बाईने सगळी हद्द ओलांडली होती.
आता.. कितीही डोळेझाक केली, तरी अशा गोष्टी काही लपून राहत नाही. बघता बघता दोन वर्षांचा कालावधी लोटला. आणि आता तर, तिचा मुलगा सुद्धा अठरा वर्षाचा झाला होता. नाही म्हणता, त्या मुलाला सुद्धा चांगलीच समज आली होती. आता तिने थोडं सांभाळून वागायला हवं होतं. कारण, त्याच्या आईचं हे वागनं त्याला बिलकुल पटत नव्हतं. पण तो बिचारा करणार तरी काय..?
आणि.. शेवटी एके दिवशी नको तेच घडलं..
तिच्या राहत्या घरात, तिच्या मुलाने आईला आणि त्या मामा म्हणवणाऱ्या पुरुषाला नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यावेळी, त्या मुलाच्या मस्तकाची शीर उठली. त्याने, घराला बाहेरून कडी लाऊन घेतली. आणि, तडक पोलीस स्टेशन गाठलं. आणि आजवर घरी जे काही घडत आलं आहे, आणि आत्ता काय घडत आहे. त्याचा सगळा पाढा त्याने पोलिसांना वाचून दाखवला. हे सगळं ऐकून, ते पोलीस सुद्धा अगदी सैरभैर झाले.
आणि शेवटी, अश्रुंचा बांध फुटल्यावर तो मुलगा म्हणाला..
साहेब.. तुम्हाला मी हात जोडून विंनती करतो. तिला सुधरायला सांगा. नाहीतर, मी तिला मारून टाकीन..!
बापरे.. पोटच्या मुलाचं आईच्या बाबतीत असं काही बोलणं कोणाला ऐकवेल का..?
पण.. त्याला तो मुलगा तरी काय करणार. हा प्रसंगच अगदी भयंकर होत.
त्याच्या मुलाच्या कोवळ्या मनावर किती मोठा आघात झाला असेल..?
बस.. याच्यापुढे काय घडलं असेल, ते मला माहिती नाही. किंवा पुन्हा कधीही त्या विषयाकडे मी वळून पाहिलं नाही.
पण हे सगळं का घडलं..? आणि कोणामुळे घडलं..? याला नेमकं कोण कारणीभूत आहे..?
मी तर यामध्ये, त्या बाईला बिलकुल दोष देणार नाही. तिच्या नवर्याने तिला सुरवातीपासून समाजात वावरायला शिकवलं असतं. सगळ्या हौस मौज करायला दिल्या असत्या. तर, ती इतकी वाह्यात कधीच गेली नसती.
नाही म्हणता, तिने वर घडलेल्या सर्व गोष्टी केल्या असत्या. शेवटी ती सुद्धा मनुष्य आहे. तिला सुद्धा भावना आहेत. पण तिने, ते सगळं काही तिने पडद्याआड ठेऊन केलं असतं. कारण, समाजात वावरणाऱ्या व्यक्तींना समाजाची जान असते. ते कधीही इतकं बेभान होऊ शकत नाहीत.
त्याकरिता, सर्व व्यक्तींनी या विषयाकडे अगदी डोळसपणे पाहायला शिकलं पाहिजे.
तशी तर.. बाई ही कधीच वाह्यात नसते. आणि, त्यात तिला सगळी सुखं जर मिळाली. तर, उभ्या जन्मात कधीही तिचं पाऊल वाकडं पडणार नाही. याची मला संपूर्ण खात्री आहे.
आज सकाळचा जबरी बेत..
तर्रीबाज लालभडक मिसळ, त्यासोबत लुसलुशीत मसाला पाव, कुरकुरीत बटाटा भजी आणि मसाला ताक.
हाय काय, नाय काय.. दे ठेऊन. 👍