Thursday, 13 July 2017

आपलं सगळं आयुष्य, हातगाडी ढकलण्यात गेलं..
पण, आपल्या मुलावर तशी वेळ येऊ नये. म्हणून.. खस्ता खात, बाबूने त्याच्या मुलाला शिकून सवरून खूप मोठं बनवायचा निर्धार केला. बाबूचा मुलगा सुद्धा तसा खूप हुशार होता.
आता तर.. तो अगदी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता.
मुलाची सगळी हौस पूर्ण करण्याचा बाबूने मनाशी चंगच बांधला होता.
शेवटच्या वर्षी, कॉलेज मधील मुलामुलींची सहल जाणार होती. अर्थातच बाबूने सुद्धा त्याच्या मुलाला सहलीला पाठवलं. त्याने सहलीला जाण्याची सगळी तयारी करून ठेवली. शंकर झोपला असताना, बाबूने त्याच्या कपड्याला कडक इस्त्री करून ठेवली. आणि शर्टच्या खिशात गुपचूप पाचशे रुपयाची एक नोट ठेऊन दिली.
पहाटे लवकरच उठून.. शंकर कॉलेज मधील ट्रीपसाठी निघून गेला होता. सकाळ झाली, आळसावलेल अंग झटकत बाबू अंथरुणात उठून बसला. आणि त्याने, बायकोला विचारलं..
शंकर सकाळी येळेवर गेला ना गं..?
त्याच्या बायकोने सुद्धा, हसतमुखाने मान हलवत आपल्या नवऱ्याला होकार कळवला.
सहलीला मुलगा गेला होता, पण त्याचा सगळ्यात जास्ती या दोघांना आनंद झाला होता. त्यांनी फार मोठं स्वप्न उराशी बाळगलं होतं. शंकर आपली गरिबी दूर करणार, आपली वणवण थांबवणार. या आशेने ते अगदी झपाटून गेले होते.
बाबूने त्याचं आवरून घेतलं, गरम चहाचे घोट घशाखाली ओतले. एका रुमालात भाजी भाकरी बांधली, आणि हातगाडी घेऊन तो तडक भाजी मंडई मध्ये पोहोचला.
नेहेमीप्रमाणे, त्याने हातगाडीवर केळाचा बोजा लादला. आणि केळाच्या विक्रीसाठी त्याची नित्याची पायपीट सुरु झाली.
बघता-बघता दिवस सरला, बाबूच्या हातगाडीवर असणारी सगळी केळी संपत आली होती. आता फक्त, मोजकी दोन चार डझन केळीच उरली होती.
संध्याकाळचे सहा वाजत आले होते. इतक्या लवकर, घरी जाऊन तरी काय करायचं.?
म्हणून.. सगळा माल संपवूनच आपण घरी जाऊयात. असं मनाशी ठरवत, तो पुन्हा एकदा गाडी रेटत चौकातील एका मोक्याच्या ठिकाणी येऊन थांबला.
घड्याळात आठचा ठोका पडला, आणि तिकडे त्याच्या गाडीवरील सगळ्या केळ्यांची सुद्धा विक्री झाली.
तितक्यात.. बाबुला शंकरची आठवण झाली. पोराची आठवण येऊन गडी मनातच हसला. आणि मनातच विचार करू लागला.
शंकर.. रात्री आठला येतो असं म्हणाला होता.
शंकर, कॉलेजमध्ये आलाय कि नाही, याची शाहनिशा करावी म्हणून, बाबूने शंकरला फोन लावला..
दोन पाच सेकंदात शंकराला फोन लागला, तिकडून शंकरने फोन उचलला, आणि बाबू अगदी अधिरतेने त्याला म्हणाला..
बाळा.. आलास का रे फिरून..!
व्हय भाऊ, गाडी आत्ताच कॉलेजमध्ये पोचली.
लेकरा.. माझ्या गाडीवरचाबी सगळा माल संपलाय. म्या बी त्याच रस्त्याने यायलोय. जाऊ दोघं बी संगच घरी.
तिकडून.. शंकरने सुद्धा त्याच्या बापाला होकार कळवला.
बाबूने खिशात फोन ठेवला..
आणि.. पायात भिंगरी बांधत, झपझप पावलं टाकत हातगाडी ढकलत तो वेगाने पुढे निघाला. वेगात चालल्यामुळे, बाबू चांगलाच घामाघूम झाला होता. काही वेळातच, बाबू कॉलेज पाशी येऊन पोहोचला.
कॉलेजच्या कॅम्पस मध्ये, तरुण मुला मुलींची भली मोठी गर्दी झाली होती.
रोडवर हातगाडी मोकळी सोडून, त्याला आतमध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळे, बाबूने पुन्हा एकदा शंकरला फोन लावला. पण आता शंकरचा फोन काही लागत नव्हता.
बाबू मनातच म्हणाला.. बॅटरी संपली आसल..!
असं म्हणून, गेटच्या जवळच आपली हातगाडी थांबवून. तो शंकरच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला, पण शंकर काही बाहेर आलाच नाही.
त्या अंधाऱ्या रात्री.. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात त्या भल्यामोठ्या मैदानात बाबूची नजर भिरभिर करत शंकराला शोधत होती. आणि अचानक, बाबूच्या शोधक नजरेला शंकर दिसला. इकडून बाबू त्याला हाताचा इशारा करत होता. आणि शंकर मात्र, मित्रांच्या गराड्यात लपून बाबूची नजर चुकवत होता.
बहुतेक.. आपला बाप हातगाडीवर केळी विकतो, हे त्याला त्याच्या मित्रांना दाखवायचं नव्हतं. म्हणून तो मुद्दाम बाहेर येत नव्हता. चुकून तो बाहेर आला, आणि वडिलांसोबत चालत निघाला असता. आणि त्याच्या कोण्या मित्राने ते दृश्य पाहिलं असतं तर..?
मी त्यांना काय उत्तर देऊ..? सर्व मित्र मला हसतील. हातगाडी वाल्याचा मुलगा म्हणून मला चिडवतील. या भावनेने, आणि जगाच्या हशाला घाबरून तो कॉलेजच्या बाहेर काही आलाच नाही.
बराच वेळ वाट पाहून सुद्धा, शंकर काही बाहेर आला नाही. त्यामुळे, बाबू जे काय समजायचं ते समजून गेला. आपल्या बापाची आता पोराला लाज वाटायला लागली आहे. हे पाहून त्याचं मन अगदी विषण्ण झालं. शेवटी, निराश होऊन बाबूने पुन्हा एकदा हातगाडी ढकलत पुढे जायला सुरवात केली. आणि नकळत त्याच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या.
क्षणार्धात, सगळा भूतकाळ त्याच्या नजरेसमोरून तरळून गेला. एकुलत्या एक मुलासाठी, आपल्या पोटाला घेतलेला चिमटा आणि काबाडकष्ट आठवून त्याला धाय मोकलून रडू फुटलं होतं. पण त्या अंधाऱ्या रात्री, त्याचे अश्रू पाहणारं सुद्धा तिथे कोणीच नव्हतं. काळा कभिन्न रस्ता तुडवत, हताश मनाने हातगाडी ढकलत बाबू पुढे निघाला होता.
आणि.. घडलेला प्रसंग आठवून, त्याच्या मनाला तो पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता.
बाब्या.. तुला लेका मरस्तवर हातगाडीच ढकलायचीय बघ.
फक्त, हातगाडीच ढकलायचीय..!

No comments:

Post a Comment