Thursday, 13 July 2017

आज.. हा मधाचा विषय आठवायचं कारण म्हणजे,
काल माझ्या घरातील मध संपला होता. मध आणण्यासाठी, मी सातमहाच्या एका दुकानात गेलो होतो. तिथे विविध प्रकारचे अस्सल मध मिळतात. पण काल रविवार असल्याने, नेमकं ते दुकान बंद होतं.
माझ्यासारखी चोखंदळ मंडळी, काही गोष्टींच्या खरेदीमध्ये कोणतीच तडजोड करत नसतात.
गावरान तूप आणि मध या दोन्ही गोष्टीबाबत मी फारच जागरूक असतो.
काहीवेळा.. रस्त्याच्या कडेला काही लोकं एका मोठ्या पातेल्यात मधाची पोळी घेऊन मध विकत बसलेली असतात. त्या मधाच्या पोळ्यावर, झाडांचा हिरवा पाला टाकलेला असतो. हा त्यांच्या मार्केटिंगचा फ्रेश फंडा मानला जातो. त्यासोबत, दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये त्यांनी मध सुद्धा भरून ठेवलेला असतो.
हा मध म्हणजे.. निव्वळ गुळाचं जाडसर पाणी असतं. ती लोकं व्यापार करत आहेत. म्हणजे, नक्कीच त्यांना कोणीतरी खरेदीदार मिळत असणारच. त्याशिवाय का ती लोकं तिथे बसणार आहेत का..?
अगदी अशाच प्रकारची फसवणूक माझ्यासोबत हिमाचल प्रदेशात झाली होती.
कुलू - मनालीच्या पुढे.. रोहतांग पास येथे, काही विक्रेत्यांनी नकली केशर, हरीणमृग कस्तुरी आणि शिलाजित माझ्या गळ्यात मारलं होतं. त्या विशिष्ट वेळी, आपल्यावर फार मोठी भूल पडते. आणि सगळं काही माहिती असून सुद्धा, आपण त्या वस्तू खरेदी करतोच.
आपणा सर्वांना.. घरगुती आणि गावरान किंवा चुली वरचं. या विषयाची भलतीच आवड असते. त्यामुळे, बऱ्याच हॉटेलमध्ये घरगुती पद्धतीचं जेवण खूप फेमस असतं. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरी सुद्धा करू शकत असतो. पण न जाणो का, आपण आपल्या डोळ्यांवर झापड लाऊन फिरत असतो. मधाच्या बाबतीत मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. उच्च प्रतीचा आणि शुद्ध असा मध बाजारात सहाशे रुपये किलो मिळत असतो. पण काहीवेळा काय होतं.
आपल्या सोसायटीच्या थंड अशा उंच ठिकाणी, काही मधमाशा आपलं मधाचं पोळ तिथे तयार करतात. कालांतराने, त्या पोळाचा फार मोठा विस्तार होतो. शेवटी कोणीतरी, मधाची पोळी काढणाऱ्या कातकरी लोकांना तिथे आमंत्रित करतात. आणि त्यांच्याकरवी ती मधाची पोळी काढून टाकतात. मधाची पोळी काढल्यावर, त्याच सोसायटी मध्ये राहत असणाऱ्या लोकांना ती कातकरी लोकं तो मध मोठ्या किमतीत विकून मोकळी होतात.
कारण, हा मध त्यांनी त्यांच्या समक्ष काढलेला असतो. त्यामुळे, त्या मधात भेसळ या विषयाचा प्रश्नच उद्भवत नाही. असं आपल्याला वाटतं. पण आपण नेमके इथेच फसले जातो.
या लोकांचा तो कायमचा व्यवसाय आहे. लोकांची फसवणूक करूनच ते त्यांचा व्यापार करत असतात. पण तोच व्यापार त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केला. तर त्यांना, नक्कीच मागणी सुद्धा वाढेल. आणि, त्यांना जास्तीचा नफा सुद्धा मिळू शकेल.
पण हि लोकं काय करतात.. यांचा फसवणूक करण्याचा फंडा फार निराळा असतो. तो सहजासहजी कोणाच्या ध्यानात येत नाही. ज्यावेळी, मधाची पोळी काढायला ती लोकं येतात. त्यावेळी, घरून येतानाच. ते त्यांच्या कडीच्या डब्ब्यात, दोन तीन किलो गुळाचं जाडसर पाणी घेऊनच येतात. त्या जर्मलच्या डब्ब्याला झाकण लावलेलं असतं.
आपण लोकं अगदी घाईत असतो. आपल्याला लवकरात लवकर मधमाशा पासून मुक्ती हवी असते. त्यामुळे, कसलीच विचारपूस किंवा चेकिंग न करता आपण त्यांना ह्या कामाला धाडतो.
बिल्डिंगमध्ये मधमाशांची पोळी असणाऱ्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर. ती मधाची पोळी, काढून त्यांच्याकडे असणाऱ्या झाकण लावलेल्या डब्ब्यात ठेवतात. आणि, त्या डब्ब्याला झाकण लाऊन ते पुन्हा खाली येतात. तोवर ते गुळाचं पाणी आणि मध एकजीव होऊन जातात.
खाली आल्यावर, मधाच्या सगळ्या पोळ्या ते व्यवस्थितपणे पिळून घेतात. मध वेगळा आणि मेन वेगळं केलं जातं. आणि तिथे जागेवरच ते तो मध तेथील लोकांना विकून मोकळे होतात.
शिवाय.. मधाचे पोळे काढायचे सुद्धा वेगळे पैसे त्यांना मिळतात. आणि मध विक्रीतून सुद्धा वेगळा नफा मिळतो. पण वृत्ती चांगली नसल्याने, त्या लोकांना कधीही बरकत मिळत नाही. हे माझ्या चांगलं पाहण्यात आहे. त्यामुळे, अशा वस्तू खरेदी करत असताना, नेहेमी अधिकृत दुकानातूनच खरेदी करत चला. खोट्या दिखाव्यावर कधीच भाळले जाऊ नका.
आणि, शेवटची सूचना.. रोज सकाळी, मोकळ्या पोटी ग्लासभर कोमट पाण्यात. एक चमचा मध, अर्धा चमचा हळद आणि एका लहान लिंबाचा रस. एकत्रित करून घेत चला. यापासून, शरीरातील बरेच रोग नष्ट होतात. 

No comments:

Post a Comment