Monday, 24 July 2017

स्पीडब्रेकर किंवा गतिरोधक..
खरं पाहायला गेलं तर, जगभरातील रस्ते नियमात. गतिरोधक या विषयाला अगदी दुय्यम दर्जाचं स्थान दिलं गेलं आहे. पण आपल्या येथील वाहन चालकांची भारतीय मानसिकता काही ठीकशी नसल्याने. आपल्या इथे, हा दुय्यम दर्जाचा पर्याय सगळीकडे अगदी अग्रक्रमाने वापरला जातो. आणि, नाईलाजाने का होईना आपल्या सर्वांना मात्र तो स्वीकारावाच लागतो.
गाड्या चालवताना, लोकं आपली बुद्धी गहाण ठेवत असतील का..?
काही व्यक्तींच्या वाहन चालवण्याच्या लकबी पाहून अशी शंका माझ्या मनात नेहेमी येत असते.
काही वर्षांपूर्वी, आमच्या येथे मध्य वस्तीत एक सुसाट रोड असल्याने. वाहन चालक, मागचा पुढचा कोणताही विचार न करता. कर्कश्य हॉर्न वाजवत, वाहनं जोरात हाकत, त्या रस्त्याने सतत ये जा करत असायचे. पण चुकून.. एके दिवशी, त्या ठिकाणी एक भीषण अपघात झाला.
आणि, एका लहान मुलाला त्या अपघातात जबरी दुखापतीला सामोरं जावं लागलं. अर्थातच रस्ता सुसाट असल्याने, अपघातानंतर तो बाइकस्वार काही कोणाच्या हाती लागला नाही. त्यामुळे, त्यादिवशी तो जनक्षोभाच्या तावडीतून सहीसलामत निसटला.
पण त्यानंतर मात्र, त्या संभाव्य अपघाती ठिकाणी एक भला मोठा डांबरी गतिरोधक तयार करण्यात आला. आणि शेवटी, त्याचा नको तसा परिणाम आम्हाला पाहायला मिळाला.
तो गतिरोधक इतका उंच बनवला गेला होता. कि, त्या उंचवट्यावरून कायनेटिक सारख्या दुचाकी नेत असताना. त्या दुचाक्या गतीरोधकाच्या उंचवट्यावर अक्षरशः अडकून बसायच्या. किंवा..घाईमध्ये एखाद्याने त्यावरून दुचाकी नेलीच. तर.. खर्रर्र असा मोठा आवाज येऊन, त्या गाडीचं काहीनाकाही नुकसान तरी व्हायचं. ज्यावेळी नव्यानेच हा गतिरोधक तयार केला गेला होता. त्यावेळी, त्या गतिरोधकावरून दुचाकी जोरदार आपटल्याने. कित्तेक महिला, मुली, मुलं आणि पुरुषं दुचाकीवरून उडून जमिनीवर भुईसपाट झालेले मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. हे सगळं घडण्यामागे एकच कारण होतं. हा, त्यांचा रोजचा सराव होता ना.
कि.. हा रस्ता, अगदी मोकळा आणि सुसाट आहे..!
रात्रीच्या वेळी तर अंधार असल्याने, कित्तेक सिंगल सीट लोकं सुद्धा त्या गतिरोधकावरून जोरदार आपटली होती. नाही म्हणता, हि वार्ता कर्णोपकर्णी सगळीकडे पसरली. त्यांतर मात्र, त्या रस्त्याने जाताना, तो स्पीड ब्रेकर आला. कि बरेच दुचाकीस्वार त्या ठराविक ठिकाणी गाडी अगदी सावकाश करून, जमल्यास दुचाकीवरून उतरून गाडी सावकाशपणे हाताने ढकलत पुढे घेऊन जात असत. पण एक गोष्ट मात्र, कोणाच्याच ध्यानात येत नव्हती. कि हे सगळं का आणि कशामुळे घडलं आहे..? याचा जाब मात्र, कोणीच विचारायला तयार नव्हतं. या ठिकाणी पुन्हा एकदा आपली भारतीय मानसिकता आड आली.
रस्ता जरी मोकळा आणि सुसाट असला. तरी सुद्धा, आजूबाजूला लोकवस्ती आहे. किमान हि गोष्ट लक्षात ठेऊन लोकांनी वाहनं हाकली असती. तर, हा गतिरोधक तयार करण्याची वेळ आली असती का..? आणि, खरं पाहायला गेलं तर, गतिरोधक हा विषय काही चांगला आहे का..? किंवा सक्तीचा तरी आहे का..?
तुम्हा सर्वांना ठाऊक नसेल, पण मला मात्र समजलं आहे. कि, हा विषय किती भयंकर आहे..!
माझा.. एक दूरचा मेहुणा, मध्यंतरी किडनीच्या आजाराने त्रस्त होता. आणि त्यात.. एकदा, तो सरकारी बसने प्रवास करत त्याच्या घरी निघाला होता. त्यावेळी, तो बसमध्ये नेमका पाठीमागील बाजूस बसला होता. वाहन चालक बेदरकारपणे गाडी चालवत असताना. ते लाल रंगाचं अजस्त्र धूड एका भल्यामोठ्या स्पीड ब्रेकरवर जोरदार आदळलं. तसा माझा मेहुणा अगदी हवेतच उडाला. त्यामुळे, अगदी निवांत आणि बेसावधपणे बसलेल्या माझ्या मेहुण्याच्या कंबरड्याला आणि मानेला इतकी भयंकर मोठी इजा झाली. कि त्यानंतर.. तो किडनीच्या आजाराने कमी, परंतु या अनपेक्षितपणे घडलेल्या अपघातामुळे. जवळपास महिनाभर, एका पाण्याच्या गादीवर विव्हळत पडला. आणि शेवटी, या नको त्या दुखण्यातच त्याचा करून अंत झाला.
किती त्रास आहेत या विषयाचे.. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, या सगळ्या आजारांना या विषयामुळे फुकटचं आमंत्रण मिळत आहे. कारण, याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत. वाहन चालवताना प्रत्येक नियमांची अमलबजावणी हि झालीच पाहिजे.
मग ते नियम.. अधोरेखित असोत अथवा नसतो. आपल्या मनाला पटेल, आणि चांगला वाटेल, तो नियम प्रत्येकाने पाळायला सुरवात केली. तर असे, भलेमोठे गतिरोधक बनवण्याची वेळ सरकारवर येणार आहे का..?
आता नव्याने तयार केले गेलेले रेडीमेड गतिरोधक तर फारच भयंकर आहेत. त्यामुळे, आपल्या गाड्यांचं नुकसान तर होतच आहे. पण त्यावर दुचाक्या आपटून आपल्या शरीराचं होणारं नुकसान कधीही भरून न येण्यासारखं असतं.
चला तर मग, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवूयात. काही गोष्टींचं तारतम्य बाळगलं.
तर, हे जीवन नक्कीच सुंदर आहे..!

No comments:

Post a Comment