Thursday, 20 July 2017

दुचाकीवर मागे बसणाऱ्या महिलांना, मुलींना आजवर मी बरेचदा पाहत आलो आहे.
प्रत्येक महिलेची, मुलीची दुचाकीवर बसण्याची लकब अगदी वेगवेगळी असते. या विषयावर, आजवर मी बरच काही लेखन केलं आहे.
माझी चौकसबुद्धी जसं काम करेल. तशी माझी निरीक्षण शक्ती जागृत होत असते. आणि त्याचं फलित म्हणून, माझ्या विचारांना चालना मिळून. काहीतरी नवीन विषय माझ्या हाती गवसत असतो.
हल्लीच माझ्या निरीक्षणात मला असं आढळून आलं.
कि, जी महिला.. मुलगी असताना, म्हणजे " आई " होण्याअगोदर..!
ती.. तिच्या भावाच्या, वडिलांच्या, प्रियकराच्या किंवा नवऱ्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसली असताना. तिच्या विशिष्ट कला आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्या सगळ्या लकबी तुम्हा मित्रांसमोर मी वेळोवेळी विशद सुद्धा केल्या आहेत.

खरं तर.. महिला, फक्त दिसायला नाजूक असतात. परंतु, त्या पुरुषांपेक्षा फारच सहनशील आणि ताकतवर असतात. प्रसूती वेदनेच्या कळा सहन करून, एका नवीन जीवाला जन्म देणाऱ्या महिला. खरोखर एक फार मोठ्या दिव्य शक्तीचा अविष्कार आपल्या समोर प्रदर्शित करत असतात. या आविष्कारा समोर, समस्त पुरुष वर्ग मला नेहेमीच लुळा पांगळा वाटत आला आहे.
ज्यावेळी.. ती मुलगी, जेंव्हा मातृत्व स्वीकारते. त्यावेळी, त्या मुलगी नामक महिलेला. किंवा, त्या बाळाच्या आईला दुचाकीवर बसताना तुम्ही आवर्जून पाहाच.
जेंव्हा.. ती महिला आपल्या बाळाला घेऊन दुचाकीवर बसलेली असते. त्यावेळी, दुचाकीवर अवघडत बसताना, तिने तिच्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलेलं असतं. आणि बाळाला सपोर्ट म्हणून, तिचे दोन्ही हात सुद्धा त्या बाळाच्या डोक्याच्या आणि पायाच्या बाजूकडे घट्ट आवळून धरलेले तुम्हाला दिसून येतील. त्या अवघडलेल्या बैठकीत सुद्धा, ती स्वतःसाठी खूपच निवांतपणा फील करत असते. आणि, एवढी सगळी कसरत करत असताना सुद्धा.
वेळोवेळी.. बाळूत्याआड दडलेल्या आपल्या बाळाला, बाळूतं सरकावून त्याची ख्याली खुशाली सुद्धा ती पाहत असते.
खरं पाहायला गेलं तर.. दुचाकीवर प्रवास करत असताना. आपल्यापैकी कोणीही कुठलाही आधार न घेता, दुचाकीवर बसत नाही. एकदा आठवून पहा, दुचाकी मागे बसलेला मनुष्य अथवा स्त्री, एकतर समोरील व्यक्तीला किंवा त्या दुचाकीला तरी धरून बसलेली असते. कारण समोरच्या वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या वेगावर आपल्याला बिलकुल विश्वास नसतो. त्यामुळे, एक सिक्युरिटी म्हणून आपण हे कृत्य करत असतो. खरं तर, हि एक नैसर्गिक क्रिया आहे.
पण त्या विपरीत.. एक महिला तिच्या बाळाला घेऊन दुचाकीवर बसताना. कोणताही आधार घेत नसते. ती फक्त आणि फक्त तिच्या चिमुकल्याला आधार देत असते. आणि तिच्या अंगच्या विशिष्ट कलेने ती कुठेही न धरता किंवा आधार न घेता, स्वतःला सावरत बसलेली असते. खरं पाहायला गेलं तर, हि महिलांना मिळालेली एकप्रकारची दैवी देणगीच असते. त्यावेळी, त्यांच्या अंगी कोणतं धाडस आलेलं असतं..? कधी विचार करून पहा.
यावर.. बऱ्याच महिला आपआपली मतं नोंदवू शकतात.
आणि, पुरुष मंडळींना कधी रस्त्यावर असा प्रसंग पाहायला मिळाला. तर, तुम्ही त्याची आवर्जून चाचपणी करायला विसरू नका..!

No comments:

Post a Comment