Thursday, 13 July 2017

२००३ सालची गोष्ट आहे..!
एका मित्राच्या दुकानात माझ्या काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी म्हणून मी गेलो होतो.
तर, तो मित्र.. त्याच्या दुकानात कसल्यातरी फायलींचा पसारा मांडून बसला होता. माझ्या चौकस स्वभावाप्रमाणे, मी सुद्धा त्याला हे काय आहे म्हणून विचारलं.
तर म्हणाला.. मी एका विमा कंपनीचं काम करत असतो. फक्त हजार रुपयात नऊ वर्षांकरिता एका व्यक्तीचा एक लाखाचा अपघाती विमा उतरवून मिळतो. आणि नऊ वर्षात, त्या व्यक्तीला काहीच झालं नाही. तर.. नऊ वर्षांनी, हि हजार रुपयाची रक्कम तीन पटीने, म्हणजे तीन हजार रुपये त्याला परत मिळणार..!
हा नक्कीच फार मोठा फायद्याचा सौदा होता.
एकतर.. मी ड्रायव्हिंग क्षेत्रात असल्याने, माझ्या सोबत काम करत असणाऱ्या काही गरजू ड्रायव्हर मंडळीना, आपण याचा लाभ मिळवून देऊ. असं माझ्या मनात आलं.
"मृत्यू हा कधीतरी येणारच आहे. पण, त्याचं सुद्धा योग्य नियोजन करता आलं. तर, आपल्या पाठीमागे असणाऱ्या मंडळीचं जीवन नक्कीच सुकर होतं. "
हे काम करण्यामागे माझा मुख्य हेतू किंवा त्यामागचा हा मूळ उद्देश होता.
तर.. मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता. माझ्या मनातील गोष्ट मी त्या मित्राला बोलून दाखवली. आणि, मला सुद्धा हि पॉलिसी काढायची आहे असं त्याला म्हणालो.
तर तो मित्र मला म्हणाला.. मग तू एक काम कर ना, तू स्वतःच हे काम का करत नाहीस..?
तुला, लोकांच कल्याण सुद्धा करता येईल. आणि, या माध्यमातून तुला जास्तीचे दोन पैसे सुद्धा मिळतील. चांगल्या कामात उशीर कशाला, त्यामुळे मी लागलीच त्या कंपनीत कामाला सुरवात केली. आणि.. हजार रुपयात, जमेल तितक्या लोकांना त्या विमा पॉलिसीचा लाभ मिळवून दिला.
वर्षभरात मी तब्बल दोन अडीच लाखाचा व्यवसाय केला होता. त्याचं मला योग्य ते कमिशन सुद्धा मिळालं होतं. माझ्या कामावर मी बिलकुल खुश होतो. पण एक वर्ष पूर्ण झाल्यावर मला समजलं. हि विमा पॉलिसी स्कीम म्हणजे, एक प्रकारची, " एम.एल.एम. " कंपनीच आहे.
अरे बापरे.. कारण, एक वर्ष झाल्यावर माझ्या मित्राने मला समजावून सांगितलं.
आता, तू तुझ्या हाताखाली पाच, दहा, पंधरा, वीस किती जमतील तितकी लोकं भरती करू शकतोस. आणि आता इथून पुढे त्यांनी केलेल्या व्यवसायावर, तुला अतिरिक्त कमिशन मिळेल. आता, तुला स्वतःला काम करावं लागणार नाहीये. आता फक्त तुला दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचं आहे.
खरं सांगायला गेलं तर, हि असली नको ती कामं मला काही जमणार नव्हती. कारण, पालिकेच्या कामात दिवसभर ड्रायव्हिंग करून मी पुरता वैतागून जायचो. आणि हा फुकटचा उद्योग, लोकांच्या पाठीमागे काम कर म्हणून कोण मागे लागत बसणार. आणि.. खरं सांगायला गेलं तर, हे एम.एल.एम. प्रकरण माझ्या डोक्यात एकदम फिट्ट बसलं होतं. त्यामुळे, माझा त्या विषयाकडे पाहायचा दृष्टीकोन सुद्धा म्हणावा इतका खास नव्हता.
जाऊदेत.. नाही म्हणता कसंबसं मी तिथे काम सुरु केलं. त्या कामाची खासियत अशी होती. कि, एकूण सोळा वर्षांचं ते करियर होतं. त्यात तुमची चैन व्यवस्थित चालली. तर पुढे चालून तुम्ही नक्कीच करोडपती होणार याची खात्री होती. पण त्याकरिता जिद्द, मेहेनत आणि चिकाटी सुद्धा तितकीच महत्वाची होती. आणि नेमका त्याच गोष्टीचा माझ्याकडे आभाव होता. आमच्या समोर सुटाबुटात टाय घालून फिरणारी सिनियर मंडळी आम्हाला खूप मोठमोठी स्वप्नं दाखवायची. मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये सेमिनार ठेवायचे. आणि माझ्यासारखी गरिबीने पिचलेली तरुण पिढी त्या स्वप्नाखाली पुरती चेंगरून जायची.
पहिल्या वर्षाचा व्यवसाय झाला, कि दुसरं वर्ष यायचं. आणि ते पूर्ण झालं, कि तिसऱ्या वर्षात गेल्याबरोबर. त्या ठराविक एजंट मुलाला, ते सिनियर लोकं एक सेकंड हॅन्ड कार विकत घ्यायलाच लावायचेच. आणि मिटींगमध्ये सांगायचे,
बघा.. आज हे साहेब, तिसऱ्या वर्षात गेल्याबरोबर. त्यांनी हि स्वतःची कार घेतली आहे..!
आपल्या कंपनीत खूप फायदे आहेत हो, तुम्ही फक्त जोरदार काम करा. एक दिवस, तुम्ही सुद्धा असेच कारमध्ये फिरू शकता.
मग, सर्वांसमोर त्यानेच विकत घेतलेल्या त्या जुन्या कारची चावी त्यालाच दिली जायची.
आणि त्याच एजंट मुलाला, तीच सिनियर मंडळी पुढील चौथ्या वर्षी अगदी जबरदस्तीने नवीन कार घ्यायलाच लावायचे. कारण, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात काम करणाऱ्या एजंटला. नाही म्हंटल तरी, मासिक दहाएक हजार कमिशन मिळून जायचं. त्यावेळी, हि फार मोठी रक्कम होती बरं का. या कमिशनच्या नादापायी कित्तेक लोकांनी त्यांच्या कायमच्या नोकऱ्या सुद्धा सोडून दिल्या होत्या. त्यानंतर..त्यातील काही सक्सेस झाले, तर काही देशोधडीला मिळाले.
तर.. माझ्या दुसऱ्या वर्षाचं काम सुरु असताना,
अचानक मला पोटाचा त्रास जाणवू लागला. पोटात जोरात कळ मारून मला लूज मोशन व्हायचे. ते माझ्या आयुष्यातले फार वाईट दिवस होते. बरेच उपचार केले, पण माझा आजार काही बरा होत नव्हता. आणि आजारी असल्याने, माझं या नवीन कामात लक्ष सुद्धा लागत नव्हतं. असेच दोनचार महिने निघून गेले, पण माझ्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती.
दिवसा कामावर जाऊन आल्यावर, संध्याकाळी मी नेमकं जेवायला बसलो. कि माझा सिनियर एजंट मित्र माझ्या घरात धडकायचा. आणि माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु करायचा.
कुंभार साहेब.. या आठवड्यात काही काम झालं कि नाही..? किती लोकं भरती केली आहेत..? किती लोकांच्या तुम्ही फॉलो मध्ये आहात..?
एकतर.. पोटाच्या दुखण्याने माझा जीव मला नकोसा झाला होता. आणि त्यात, हा मित्र म्हणजे मला एक पीडाच वाटायची. मी कसातरी वेळ मारून न्यायचो. पण तो काही माझा पिच्छा सोडत नव्हता. शेवटी एकदा वैतागून मी त्याला म्हणालो..
अरे बाबा, माझा इथं जीव चाललाय. आणि तू का मला त्रास द्यायला लागला आहेस..?
अहो कुंभार साहेब.. तुम्ही जरा ऐका ना..!
त्यावेळी मी तर भयंकर चिडलो होतो. आणि रागाच्या भरात मी त्या मित्राला म्हणालो.
अरे, ते साहेब बियेब गेलं गाडवाच्या गांडीत. तू माझ्या घरी परत येऊ नकोस..!
मी असा सज्जड दम भरल्यावर, पुन्हा फिरून तो मित्र काही माझ्या घरी आला नाही.
माझ्या लूज मोशन्स काही केल्या कमी होत नव्हत्या.
त्यावेळी, मी नव्यानेच पुणे पालिकेत कायम झालो असल्याने. मला सुट्ट्या सुद्धा घेता येत नव्हत्या. तब्बल आठ महिने.. मी, हा त्रास अंगावर काढला.
माझ्या पोटातील अग्नीच विझला होता. त्यावेळी या आजाराकरिता माझे जवळपास तीस हजार रुपये खर्च झाले होते. त्यावेळी माझं अगदी हातावरच पोट होतं. तीस हजार म्हणजे, त्यावेळी सोनं फक्त सहा हजार रुपये तोळा होतं. पण म्हणतात ना, जान बची और लाखो पाये. अगदी तशातली गत झाली होती. एलोपथी औषधी उपचार काही कामी येत नव्हते.
शेवटी महत्प्रयासाने.. योग साधना आणि प्राणायम करून मी कसाबसा ठीक झालो. त्यानंतर, मी त्या कामाकडे कधीही डोकावून पाहिलं नाही. पण त्यांची कामं मात्र अविरत चालू होती.
नवीन मुलं भरती करायची. त्यांना भुलभुलैय्या दाखवून चौथ्या वर्षात चारचाकी गाडी घ्यायला लावायची. हल्लीच.. काहीतरी गडबड झाल्याने. ती कंपनी बंद पडली आहे. असं माझ्या ऐकण्यात आलं. बऱ्याच लोकांचे पैसे त्यात अडकून पडले आहेत. ती कंपनी तशी चांगली होती. पण नेमका काय घोटाळा झाला आहे. ते मला माहित नाही, पण आता लोकांचे परतावे त्यांना परत मिळत नाहीयेत. असं माझ्या ऐकण्यात आलं आहे.
माझ्या नशिबाने, मी त्यावेळी जितक्या लोकांच्या विमा पॉलिसी काढल्या होत्या. त्या सर्वांना, अगदी वेळेतच त्याचा योग्य तो परतावा मिळाला. त्यामुळे, मी अगदी निश्चिंत झालो.
कारण.. मोठ्या रकमेच्या पॉलिसी काढतेवेळी, मी स्वतः लोकांना असं आश्वासन देत होतो.
जर का हि कंपनी बुडाली. तर, मी स्वतः तुम्हाला तूची मुद्दल रक्कम परत देईल..!
पण माझं नशीब बलवत्तर असल्याने, तसं काहीएक घडलं नाही.
पण याठिकाणी, मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटतेय..
त्या कंपनीच्या.. तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात चारचाकी गाडी घेण्याचा बर्याच एजंटला त्याचा फार मोठा आर्थिक आधार आणि फायदा सुद्धा झाला.
आज त्यातील काही लोकं, त्याच कारला टुरिस्ट कार बनवून ओला किंवा उबर सारख्या कंपनीत गाडी चालवून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत..!

No comments:

Post a Comment