Monday, 29 February 2016

होऊदे खर्च,
पण खा फक्त.. आईच्या,बायकोच्या हातचं,
आणि घरचं.. ( भाग :- ३ )
===========================
मी.. शाकाहार आणि मांसाहार, ह्या दोन्ही पदार्थांचा भलताच शौकीन आहे. पण, हे सगळे पदार्थ मला स्वतःच्या घरात बनवून खाण्यात जास्त मजा वाटते. कारण, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चमचमीत भाज्या ताज्या असतीलच, असं मला वाटत नाही. कारण, सर्रास हॉटेलमध्ये भाज्या बनविण्याकरिता लागणारी ग्रेवी हि एकदाच बनवून ठेवली जाते. आणि, आठवडाभर किंवा त्यापुढे सुद्धा ती ग्रेवी सकाळ संध्याकाळ चांगली गरम करून वापरली जाते. हे, माझ्या माहितीतलं आहे. आणि, बहुतेक माझ्या बऱ्याच मित्रांना याची कल्पना सुद्धा असावीच..!
हॉटेलमध्ये आपण,कोणत्याही ठराविक एका भाजीची ऑर्डर दिल्यावर..
ग्रेवी तीच असते. फक्त, भाजीचं माध्यम बदललं जातं. बाकी काहीएक फरक नसतो. काही भाज्या, आपल्या घरी बनत नसतात. त्यामुळे, आपण आवडीने त्या हॉटेलमध्ये जाऊन खात असतो. त्यावेळी, हे असले भलते सलते विचार मी माझ्या मनात आणत सुद्धा नाही. हे देखील तितकंच सत्य आहे.
तर मुद्दा असा आहे, महत्वाचं म्हणजे.. प्रत्येक घरातील स्त्री हि सुगरण असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे, माणूस जेवायला घराबाहेर पडत नाही. आणि पर्यायाने, तो तृप्त आणि समाधानी सुद्धा राहतो. तर काहीवेळेस, काही व्यक्तींच्या घरामध्ये मांसाहार बनवला जात नाही. अशावेळी, त्या व्यक्ती घराचा उंबरा ओलांडताना पाहायला मिळतात. शेवटी हे सगळे जिव्हेचे चोचले आहेत बरं का.
पण मी स्वतः, फार कमी प्रमाणात हॉटेलिंग करतो. कारण,
एकदा मी, घरी भाजी बनवण्याकरिता चिकन खरेदीला गेलो होतो. नेहेमीप्रमाणे माझ्या मित्राने मला दीड किलोची कोंबडी कोल्डड्रेस्ड करून दिली. आणि अचानक, त्याचं लक्ष त्या कोंबडीकडे गेलं. त्याला त्यात काहीतरी तफावत जाणवली. म्हणून त्याने, माझ्याकरिता दुसरी कोंबडी वजन करून दिली. शेवटी कुतूहल म्हणून, मी त्याला म्हणालो.. का रे, त्या कोंबडीला काय झालं होतं..?
तर म्हणाला, तो डेमेज पीस होता..!
आता.. कोंबड्या सुद्धा डेमेज असतात. हे मला त्यादिवशी समजलं. तो म्हणाला, त्या कोंबडीला मार लागला होता. त्यामुळे, मी ती कोंबडी तुला दिली नाही.
मी म्हणालो, मग त्या कोंबडीचं तू आता काय करणार आहेस..? तर म्हणाला,
आता.. हा माल हॉटेलमध्ये जाणार..! बघा.. म्हणजे हा असा प्रकार असतो.
त्यानंतर दुसर्यांदा, मी मटन खरेदी करण्यासाठी गेलो होतो. दुपारची वेळ होती, बकर्याची एक सुक्की खडखडीत मांडी हुकाला अडकवली होती. सुक्क मटन असेल, तर वजनाला मस्त बसतं. त्यामुळे, त्या मटन वाल्याला मी म्हणालो. हि मांडी लावा..!
तर तो म्हणाला, दुसरं घ्या हो शेठ, तो तीनशे रुपये किलोवाला हॉटेलचा माल आहे.
मी म्हणालो, ठीक आहे ना.. द्या, मला काही फरक पडत नाही.
शेवटी, तो मालक मला म्हणाला.. शेठ मी नको म्हणतोय ना..! दुसरं काहीतरी घ्या कि.
मी म्हणालो, पण का नको..? तर ते म्हणाले, हे कालचं मटन आहे. आणि अमुक एका हॉटेलमध्ये आम्हाला हे मटन द्यायचं आहे.
त्या हॉटेलचं नाव ऐकल्यावर, मी त्यांना म्हणालो. अहो, त्या हॉटेलमध्ये तर बोल्हाईचं मटन असतं ना. आणि, हे तर बोकडाचं मटन आहे..!
शेवटी, वैतागून तो शेठ मला म्हणाला.. जाऊद्या ओ शेठ, बोला काय लाऊ तुम्हाला..?
शेवटी, अर्धा किलो 'फुट' घेऊन मी तिथून फुटलो.
तर हे असले प्रकार, हॉटेलमध्ये सर्रास चालू असतात. त्यामुळे मी या गोष्टी टाळत असतो. आता मटणाचा बराच विषय झाला आहे. तर थोडं दारूविषयी बोलूयात.
माझ्या घरामध्ये, माझ्या दारू पिण्याबद्धल कोणालाच कोणत्याच प्रकारचा आक्षेप नाहीये. कारण, त्या बाबतीत मी फारच शिस्तबद्ध असतो. मी बाटली फोडली, कि माझी बायको मला पापड वगैरे अगदी हौसेने तळून देते. कारण, त्यांना माझा स्वभाव माहित आहे. मी कोणत्याही वस्तूच्या आहारी जाणारा मनुष्य नाहीये.
पण, चुकून चार मित्रात गेल्यावर. माझा 'कोठा' ओव्हरफुल होत असतो. त्यामुळे, माझ्या बायकोची मला सक्त ताकीत असते. कि, आपल्या घरात बसून घ्या, बाहेर गेल्यावर तुम्हाला शुद्ध राहत नाही. तुम्ही जास्तीची घेता. त्यामुळे, मी बाहेर पिणं टाळतो. पण कधीमधी जावं लागतंच कि, मित्रांच्या आग्रहाखातर हो... नाही का..
तर.. असं कधीमधी बारमध्ये गेल्यावर, दारूसोबत मोफत मिळणारी कोम्पलीमेंट्री ( चकली, शेव, शेंगदाणे ) घेणं आणि खानं मी हमखास टाळत असतो.
का तर... ह्या वस्तू, हॉटेल मालकाला दारूसोबत मोफत द्यायच्या असतात. आणि, एखाद्या वाटीत शिल्लक राहिलेले शेंगदाणे किंवा तत्सम वस्तू, हि लोकं टाकून देत नाहीत.
ते जिन्नस, पुन्हा त्याच डब्यात जातं. आता, ते जिन्नस खात असणारा व्यक्ती कोण असेल. कसला असेल, काय करून आला असेल, ते आपल्याला माहित असतं का..?
मला काय म्हणायचं आहे. ते तुम्हाला समजलं असावच.
म्हणूनच..
खावं सुद्धा घरचं, आणि प्यावं सुद्धा घरचं.. मग, होऊदे कितीबी खर्च..!
( समाप्त )

Sunday, 28 February 2016

होऊदे खर्च,
पण खा फक्त.. आईच्या,बायकोच्या हातचं,
आणि घरचं.. ( भाग :- २ )
==========================
पोटाची आग, फार वाईट असते हो.
त्यावेळच्या तुटपुंज्या पगारामध्ये, माझे वडील घरी आणून देतील त्या घर सामानात. माझी आई समाधान मानायची. त्याबाबत, तिची कधीच आणि कोणतीच कुरबुर नसायची. आणि त्यातच, तिच्या हौशी सुगरणी कौशल्याने नवनवीन पदार्थ बनवून आम्हा भावंडांना ती आवडीने खाऊ घालायची. त्यावेळी, नाश्ता वगैरेला.. पोहे किंवा शिरा असले पदार्थ आम्हाला बिलकुल मिळत नसायचे. आणि, खरं सांगायला गेलं तर. आम्हाला, ते पदार्थ माहित सुद्धा नव्हते. माझी आई म्हणजे, साक्षात सुगरणीचा एक उत्कृष्ट नमुना होता, आणि आहे. परंतु,आज ती कोणतंच काम करत नाही. कारण, त्यापाठीमागे असणारं तिचं वयोवृद्ध शरीर..
पण ती माऊली, शिळ्या पाक्यातून का होईना. नवनवीन पदार्थ बनवून, आम्हाला खाऊ घालायची.
अजूनही, तिच्या हातची चव माझ्या जिभेवर रेंगाळत असते..
आमच्या घरात, मोठं खटलं असल्या कारणाने. शिळं अन्न, हे आमच्या घरात नेहेमी ठरलेलं असायचं. पण.. माणसाने, " खाऊन माजावं, टाकून माजू नये..! "
हा वाक्प्रचार, माझ्या आईने कायम तडीस नेला. त्यामुळे, टोपल्यात शिळ्या राहिलेल्या चपातीचा आमच्या घरात, साखर आणि गुळ घालून मस्त असा गोड चकुल्याचा कार्यक्रम दर रविवारी हमखास ठरलेला असायचा. किंवा, शिळ्या भाकरीच्या तुकड्यांना पाण्यामध्ये भिजवून त्याचे छोटेछोटे तुकडे करून त्यात हळद, मीठ, जिरे, मोहोरी, कांदा, लसून मिरचीची खमंग फोडणी देऊन. सुग्रास 'तुकडे' सुद्धा ती बनवायची. त्यावेळी, ती सुद्धा आमच्याकरिता एकप्रकारची मेजवानीच ठरायची. त्यावेळी, आमचा रोजचा नाश्ता म्हणजे...
चहा चपाती, किंवा गरमागरम भाकरीचं पोट फोडून त्याला तेल मीठ लाऊन ते खायचं. बाजरीची गरम-गरम भाकरी कुसकरून त्यात तूप, गुळ घालून त्याचे लाडू बनवून खायचे. दुध, भाकरी, गुळ कुसकरुन खायची, तरी कधी.. चपातीला तूप, साखर लाऊन तो रोल खायला मिळायचा. एकदा तर, मी चक्क चहा भाकरी खाल्लेली सुद्धा मला आठवतेय..
सांगण्याचा विषय असा आहे. कि, त्याकाळच्या महिलांना संसार करायला शिकवावं लागत नव्हतं. कारण, ते ज्ञान त्यांना उपजत म्हणा किंवा त्यांच्या अंगी बानवल्या सारखंच असायचं.
त्यामुळे, आम्हाला... हे आवडत नाही, आणि ते आवडत नाही, आणि हे बनवायला जमत नाही. आणि, मला ते जमणारच नाही. असला प्रकार, आमच्या आईच्या अंगाला कधी शिवलाच नाही. आणि आजपावेतो, तोच ठसा आमच्या अंगी सुद्धा कायम राहिला आहे.
नवीन बाळाचा जन्म झाल्यावर,
प्रथम.. आईचं दूधच काय, ते त्याचं प्रथम अन्न असतं. त्यानंतर, आपण जसजसे मोठे होऊ लागतो. तसं.. दुध भात, दुध चपाती, दुध भाकरी, वरण भात, तूप भात, इत्यादी.. ह्या विषयांना सुरवात होऊ लागायची. कारण, त्याकाळी भारतामध्ये 'फेरेक्स' नामक जड द्रवपदार्थ उदयास आलं नव्हतं. नाही म्हणता, डब्यातलं पावडरीचं दुध मात्र आम्ही पिलो आहोत..
हळूहळू.. आमची आई, आम्हाला भरवणारे प्रत्येक खाद्य पदार्थ आम्हाला आवडू लागले. कारण, जे मिळतंय ते खायचं. चवीचा विषय बिलकुल करायचा नाही..!
हा, फार मोठा दंडक आमच्या घरी ठरलेला असायचा.
आमचं घर.. संमिश्र भोजनी असल्याने. आमच्या घरी, कधीतरी मांसाहार सुद्धा असायचा. आणि, बघता-बघता त्या विषयाचा मी कधी पाईक झालो. ते, माझं मला सुद्धा समजलं नाही.
शेवटी.. आवड, आपली-आपली.
तर.. तोंडाला लागलेला विषय कधी सुटत नाही. तर मग, लाख गरिबी आली तरी चालेल. त्याला काही लोकं पर्यायी मार्ग सुद्धा शोधून काढत असतात. वानगीदाखल, काही लोकांना मटन, चिकन किंवा मासे.. विकत घेऊन खायला परवडत नाहीत. कारण, हे खाद्य आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्यावेळी, अशी हौशी मागास मंडळी. चिकन, मटन कापून झाल्यावर उरलेली छाटण ( वेस्टेज ) विकत नेऊन आपली क्षुधा शांती करत असतात. तर मासळीची शौकीन मंडळी, माश्याची तोंडं ( मुंडकी ) घरी विकत नेवून आपली हौस भागवत असतात.
तसं पाहायला गेलं तर, हा फार गंभीर विषय आहे. एकदा का, एखादी आवडती वस्तू आपल्या तोंडाला लागली. आणि तिची चव आपल्या जिव्हेला भावली. की, ती सुटता सुटत नाही.
ह्या जिव्हेची किमयाच खूप न्यारी असते. " जिभेवर सेकंदभर आणि पोटामध्ये आयुष्यभर..! "
पण, हे सगळं काही ह्या पापी पोटासाठीच चालू असतं बरं का..
( क्रमशः )

Saturday, 27 February 2016

फेसबुकी ( प्रेम ) कविता..
~~~~~~~~~~~~~~~~~

फेसबुक्यांची दुनियादारी, 
बिन ओळखीची उंच भरारी.

मुलींच्या वालवर चकरा मारी,
तेंव्हा गवसे एक सुंदरी.

दिसणे, हसणे, लाजणे, नटणे,
स्वप्नांचा बाजार एकट्यानेच थाटणे.

सगळे फोटो लायकून झाले,
ती काय म्हणते, ते ऐकून झाले.

बोलता-बोलता चाल पुढे चालली,
किती प्रयत्न केले, तरी डाळ नाही शिजली.

चाटा, चाटिंग भरपूर झाली,
पण " चुम्मा चाटी "  नाही मिळाली.

खोट्या नाट्या प्रेमाच्या घेतल्या आणा भाका,
झालाय मोठा पचका, आता सांगू कोण्या काका.

इथे सर्वांचेच प्रेम कुठे शेवटाला जाते,
'बाई' म्हणवनारा 'बाप्या' सुद्धा, समोर दिसून येते.

चुकून एखाद्याचाच इथे होत असतो झटका,
जसा चुकून बसावा रतन खत्रीचा 'मटका'..

Thursday, 25 February 2016

होऊदे खर्च,
पण खा फक्त.. आईच्या,बायकोच्या हातचं,
आणि घरचं.. ( भाग :- १ )

========================
बायकोच्या रोजच्या त्रासाला ( अहो... आज काय भाजी करू..? ) कंटाळून. मी स्वतः बनवलेलं एक मेनूकार्ड आमच्या किचनमध्ये लाऊन ठेवलं आहे. मध्यंतरी, मी त्याचा फोटो सुद्धा इथे अपलोड केला होता. हा विषय झाला भाजी बनवण्याचा. तर त्यावर, तो विषय सोडून माझ्या बायकोचा मला आणखीन एक खास पुणेरी शैलीतला प्रश्न असतो.
अहो.. तुम्ही किती चपाती खाणार आहात..?
आता.. तिला हा पुणेरी वान लागलाय कि गुण लागलंय काय माहिती. पण, खरं पाहायला गेलं तर जेवणात कसली आलीयेत हो मोजमापं..?
आपल्या पोटाचा, आपल्याला कधी अंदाज येतो का..?
जेवणाचं मुख्य अंग, म्हणजे आज ताटात भाजी काय आहे..?
हे सगळं, त्यावर अवलंबून असतं. ताटात जर, आपल्या खूपच आवडीची एखादी भाजी असेल. तर आपल्या पोटातील अग्नी दुप्पट वेगाने प्रज्वलित होतो. आणि मनुष्य, रोजच्या मात्रेपेक्षा दोनच्या जागी तीन चपात्या सुद्धा खाऊन जातो.
खरं तर.. ह्या महिला मंडळींनी, रोजच्या प्रमाणे हवं तितकंच चपातीचं पीट मळून ठेवलेलं असतं. तरी सुद्धा, त्या हा प्रश्न का विचारात असाव्यात..?
हे कोडं, मला आजतागायत उलगडलं नाहीये..!
मध्यंतरी.. माझ्या बायकोने मला नेमका हाच प्रश्न विचारला. तसा तर, ती रोजच न चुकता हा प्रश्न मला विचारत असते. पण त्या दिवशी, मी जरा वेगळ्याच मूडमध्ये होतो. आणि, तिचा संभाव्य प्रश्न मला येऊन धडकला.
अहो.. तुम्ही किती चपाती खाणार आहात..?
मी सुद्धा गंमत म्हणून, त्या दिवशी तिला म्हणालो. भाजी काय आहे गं..?
तर म्हणाली.. आळूचं फदफदं आणि मासवड्या आहेत.
खरं तर, मी संध्याकाळी अगदी अल्पाहार घेत असतो. पण वरील दोन्ही विषय माझ्या खूपच आवडीचे आहेत. म्हणून मी तिला मुद्दामच म्हणालो.
आज, मी पाच चपाती खाणार आहे....!
त्यावेळी, माझ्या ह्या अवघड उत्तरावर तिची काहीएक प्रतिक्रिया नव्हती.
नेहेमीप्रमाणे पानं लावली गेली, मी जेवायला बसलो. तिने सुद्धा, माझ्यासाठी पाच चपाती बनवल्या होत्या. पण तिने, त्या रोजच्या चपातीचा आकार कमी करून हा 'आकडा' वाढवला होता.
लैच हुशार असतात हो ह्या महिला मंडळी..!
पण.. त्यादिवसापासून एक गोष्ट मात्र घडली. मी सुद्धा, माझ्या जेवणाचा वाढीव आकडा तिला कधीही सांगत नाही. नेहेमीप्रमाणे, " आन्देव आणि पेटमे जान्देव. "
एकुणात, असा कार्यक्रम असतो.
त्यामुळे पर्यायाने, आमच्या घरात शिळं अन्न पडत नाही. आणि, ताजं अन्न सुद्धा कोणाला कमी पडत नाही. रात्रीला, आमच्या घरातील चपातीचं टोपलं रिकामं असतं.
पण.. ते सुद्धा, आनंदाने भरून पावलेलं असतं...!
( क्रमशः )

Wednesday, 24 February 2016

बाबा आयेगा.. हमारा बाबा, आज जेलसे बाहर आयेगा.

त्याच्यावर, देशद्रोही म्हणून खटला चालवला गेला. काही सबळ पुरावे हाती लागल्यामुळे, तो शिक्षेस पात्र ठरला. शेकोडो निरपराध लोकं त्या हल्ल्यात मारली गेली होती. शेकडो संसार उध्वस्त झाले होते. बरीच मुलं अनाथ झाली होती. विधवा महिलांचे चेहेरे पाहवत नव्हते. परंतु, सापडला तो चोर. या उक्तीप्रमाणे, याला मात्र ताबडतोब चार भिंतीत डांबलं गेलं. गुन्हा केला आहे. तर शिक्षा भोगणं हे क्रमप्राप्त आहे. आणि, त्याची शिक्षा त्याला मिळाली. वरील सर्व घटनाक्रम पाहता, जे काही घडलं त्याबद्धल भारतीय संविधानाचा मला नितांत आदर वाटत आहे.

परंतु.. ह्या नियोजित कटामागील खरा मास्टर माइंड, आजही राजरोसपणे बाहेर देशात मोकाट फिरत आहे. त्याला आजवर कोणीच जेरबंद करू शकलं नाही. आणि, इथून पुढे तरी तो कोणाच्या हाती लागेल कि नाही, हि शक्यता सुद्धा फार धूसर आहे. ह्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी, संजू बाबा निव्वळ हुल्लडबाजी करायला गेला
. किंवा, कोणाच्या तरी दबावाखाली त्याला हे कृत्य करावं लागलं. किंवा, प्रत्यक्षात हि किरकोळ समजली जाणारी बाब नंतर फार मोठं रूप धारण करेल. याची त्याला पुसटशी कल्पना सुद्धा नसावी. नाहीतर, एवढा मोठा सेलिब्रिटी माणूस असलं भयंकर कृत्य करू शकला असता का..?

होणार्या गोष्टी कधीच टळत नसतात. सगळं काही विधिलिखित असतं. आणि, शेवटी होत्याचं नव्हतं झालं. त्याला, या प्रकरणात अलगद गुंतवलं गेलं. त्यात सुद्धा बऱ्याच ज्ञात अज्ञात घटना आहेत. तरी सुद्धा, त्याने त्याची शिक्षा पूर्ण केली. चांगल्या वर्तणुकीमुळे म्हणा, किंवा एक सेलिब्रिटी मनुष्य आहे म्हणून म्हणा. त्यामुळे, मिळालेल्या ठराविक शिक्षेत, भारत सरकार मार्फत त्याला शिक्षेत विशेष सूट मिळाली आहे. मात्र हा न्याय प्रत्येक अपराध्याला मिळेलच असं नाही.

मला पडलेला हा एक फार मोठा प्रश्न आहे..!
देशद्रोही संजू बाबा सगळी शिक्षा भोगतो. आणि, देशाविरुद्ध बेताल वक्तव्य करणारी हि उर्वरित अपराधी मंडळी राजरोसपणे बाहेर फिरत आहेत. काळवीट मारा, नाहीतर रस्त्यावर झोपलेला माणूस मारा. शेवटी, गुन्हा हा गुन्हाच आहे. आणि, वीतभर पोटासाठी ज्या देशात आपण भाकरीचा तुकडा मोडत आहोत. किंवा, ज्या देशामुळे आपल्याला मान, मर्यादा, ऐश्वर्य आणि सर्वस्व मिळालं. त्याच देशात राहायला, हल्ली मला सुरक्षित वाटत नाही. असं बेताल वक्तव्य करून तमाम भारतीय जनतेचा रोष पत्करण्यास कारणीभूत ठरणं. हि सुद्धा, देशाशी केलेली एकप्रकारची "गद्दारी" आहे. एकप्रकारचा देशद्रोह आहे. देशाशी केलेली प्रतारणा आहे. 
आणि, हा सुद्धा एक फार मोठा गुन्हा आहे. शेवटी.. गुन्हा हा गुन्हाच असतो. न्याय हा सर्वांना एकसारखाच असावा. माझ्या ह्या आजच्या लेखामागील, माझी एवढीच एक माफक अपेक्षा आहे.

तू क्लियर झालास रे मित्रा.. वेलकम संजू बाबा..!
कोणी तरी, नसण्याची 'उनीव'
जेवढी,
'खंत' देऊन जात नाही.
तेवढीच,
'मी' असण्याची 'जानीव'
मनाला, नक्कीच 'समाधान ' देऊन जाते..!

Saturday, 20 February 2016

टक्कल पुराण....
हा, टक्कल पडलेल्या बऱ्याच लोकांचा अगदी नावडता विषय जरी असला. तरी, मी स्वतः टक्कलग्रस्थ असून सुद्धा. मला, हा विषय खूप जिव्हाळ्याचा आणि हवाहवासा वाटतो.
कारण, हा विषयच फार गमतीदार आहे हो..
मला स्वतःला, मी टक्कल पडण्याची नेमकी कारणं जरी माहित नसली. तरी, माझ्या तरुणपणात मी माझ्या केसांचे खूपच अतोनात 'हाल' केले आहेत.
केसांचे.. आणि हाल..?
पडलात ना कोड्यात, तर ऐका...!
माझ्या डोक्यावर केसं असताना, त्या केसांना, वळणदारपणे आणि नीटनेटकं बसविण्याकरिता. मी त्याकाळी नाना क्लुप्त्या लढवल्या आहेत. अंघोळ केल्यानंतर, ओल्या केसांनी मला हवा तसा भांग पाडता यायचा नाही. आणि, तेल लावल्यावर तर नाहीच नाही. ( बहुतेक, तेल न लावण्यामुळे सुद्धा ते कुपोषित झाले असावेत. ) त्यामुळे, माझी केसं मी अक्षरशः गेस शेगडीवर, स्टोव्हवर आणि कधी-कधी तर चक्क पाणी तापवण्याच्या बंबाच्या वरील नळकांडीवर टाचा उंच करून त्यांना सुखे पर्यंत तापवायचो. कारण, हेअरस्टाईल करिता. केसं कोरडी करणारा ड्रायर घेण्याइतपत मी कमवत सुद्धा नव्हतो. आणि, ते महागडं मशीन घरात मागावं तर ते मला बिलकुल मिळणार सुद्धा नव्हतं. केसं कोरडी झाल्यावर, त्या विशिष्ट प्रकारच्या गोलाकार काट्याच्या कंगव्याने. मी त्यांना, वळणाच्या विरुद्ध दिशेने फिरवून हवी तशी बसवायचो. ह्या, नको त्या प्रकारामुळे. माझ्या केसांनी, माझ्याशी कट्टी पुकारली. आणि, माझी लवकरात लवकर साथ सोडली असावी. असं मी मानतो, किंवा तसा माझा अंदाज आहे..
टक्कल पडायला सुरवात झाल्यावर, बात्राज सारख्या खर्चिक होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे. मी त्या गोष्टीकडे, साफ दुर्लक्ष करायचो. आणि, शरद पवार साहेबांचा 'आदर्श' डोळ्यासमोर ठेवत पुढे मार्गक्रमण करत राहिलो. तरीही नाही म्हणता, वयाच्या तिशी पर्यंत त्या काळ्याभोर केसांची मला अमुल्य आणि अतुल्य अशी साथ लाभली. तोवर, माझं लग्न वगैरे झालं असल्यामुळे. जास्ती, घाबरण्याच्या फंदात मी पडलो नव्हतो. आणि, त्या केसगळती बाबत माझ्या सौ ची सुद्धा काहीएक तक्रार नव्हती. त्यामुळे, मी आणखीनच बिनधास्त झालो होतो.
टक्कल पडल्यानंतर त्या टकलाला लपवण्यासाठी मी कधीही टोपी वा तत्सम वस्तूंचा वापर हमखास टाळला. ( हल्ली, त्वचेच्या तेलकट पणामुळे 'हेल्मेट' खराब होऊ नये. म्हणून मी डोक्याला रुमाल बांधत असतो. काहीवेळा, तो रुमाल तसाच राहून जातो. त्यामुळे, मी स्वतःसाठी ती एकप्रकारची फेशन मानतो. आणि, आता मी कधी-कधी स्टाईल म्हणून सुद्धा त्याचा वापर करत असतो. )
किंवा, टक्कल झाकण्याकरिता एका बाजूची केसं भरमसाठ वाढवून. टक्कल असणाऱ्या भागावर, त्यांची मुक्तहस्ते पसरण करणं, मला कधीही आवडलं नाही. आणि, मला ते जमणार सुद्धा नाही. त्यामुळे, बाराही महिने, बोडकं डोकं घेऊन मी सगळीकडे फिरत असतो. त्यात, मला कोणत्याच प्रकारचा कमीपणा किंवा लाज वाटत नाही.
राहता राहिला विगचा विषय. तर, ते सुद्धा जाणकार लोकांच्या पटकन लक्षात येतं. अस्सल विग बसविण्याकरिता.. सलमान, अमिताभ इतका मी जहागीरदार नाहीये. त्यामुळे, मी त्या विषयाला सुद्धा कधी दुजोरा दिला नाही. टक्कल पडल्यावर, माणूस श्रीमंत वगैरे होतो. असं मी ऐकून होतो, पण आजवर मी फक्त खाऊन, पिऊन सुखी आहे. श्रीमंती काय असते, ते आजपावेतो मला अनुभवायला मिळालेली नाहीये.
इती टक्कल पुराणं संपूर्णम..

Thursday, 18 February 2016

पुरुषांची, दुचाकी चालवण्याची कला. आणि, त्यांच्या लकबी..

सुरवातीपासूनच.. मी, दुचाकी अगदी बेताने हाकत असतो. हो.. मला अपघाताची फार भीती वाटते. पण काही मुलांना, किंवा व्यक्तींना याचं मुळी भानच नसतं.

त्यांच्या हातामध्ये, वेगवान दुचाक्या असल्यामुळे. ते तिला, हवी तशी ताबलत असतात. आपल्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल. याचं त्यांना बिलकुल भान नसतं. ह्या असल्या आतातायीपणामुळे, माझी काहीएक चूक नसताना. गतवर्षी, मला एका अपघाताला सामोरं जावं लागलं होतं. आणि, ह्या असल्या महाभागांच्या दुचाक्या चालवण्याची पद्धत सुद्धा खूप विचित्र असते..!

काही मुलं, अगदी समोरच्या बाजूला झुकून गाडी चालवत असतात. तर काही जन, हाताचे दोन्ही कोपरे बाहरेच्या बाजूला काढून विचित्र बैठक करत गाडी चालवत असतात. 
तर काही जन, हवेच्या वेगाने सुसाट झोकांड्या देत गाडी चालवत असतात. सोबतच, त्यांचे ब्रेक आणि गियर वर ठेवण्याचे पाय मागील बाजूच्या फुटरेस्टवर असल्याचं सुद्धा बरेच वेळा निदर्शनास येतं.  
काही पुरुष, दुचाकी चालवत असतात तेंव्हा. वेळातवेळ काढून, त्यांचं सगळं लक्ष दुचाकी चालवत असणाऱ्या महिलांकडे असतं. 
हिची फिगर चांगली आहे बरं का..! शीट यार... हिने स्कार्फ उगाचच घातला. बहुतेक हि दिसायला सुंदर असावी बरं का. 
अशा विविध आचरट विचारांनी, यांची गाडी भलतीकडेच भरकट असते.

मावा किंवा गुठ्का खाऊन रस्ते रंगवत पिचकार्या मारत सुसाट गाड्या चालवणारांची सुद्धा इथे बिलकुल कमतरता नसते. सगळेच काही सारखे नसतात. पण त्यातल्या त्यात असतातच. काही महाभागांना, एक भलतीच सवय असते. ते मुद्दाम जोरजोरात कर्कश्श होर्न वाजवत मुलींना ओव्हरटेक करत असतात. मी यांना, भटकती आत्मा म्हणतो. 
काही व्यक्तींना तर, सिग्नलला थांबल्यावर. अगदी, दोन मिनिट सुद्धा दम नसतो. लगेच, आजूबाजूला पाहून सिग्नल तोडून ते भर्रकन निघून जाणार. आणि, मागे सिग्नलला थांबलेले सगळे मूर्ख आहेत. अशा अविर्भावात, मागे वळून सुद्धा पाहणार. शोर्टकट शोधून, मुद्दाम रोंग साइडने गाडी चालवत येणार. आणि, समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणणाऱ्या महाभागांची संख्या सुद्धा इथे कमी नाही.
सगळे नियम धाब्यावर बसवून, मोबाईल वर बोलत दुचाकी चालवणार. आणि, मागील लोकांना हकनाक त्रास देणार. यांना काही बोलावं, तर.. समोरच्या व्यक्तीच्या आई बापाचा उद्धार करून भांडणाला उतरणार.
मुली, साईड मिररचा चेहेरा पाहण्यासाठी तरी उपयोग करतात. परंतु, काही पुरुषांनी दुचाकीचे आरसेच काढून टाकलेले असतात. त्यात त्यांना, कोणता मोठेपणा वाटत असतो ते देवच जाणो. बहुदा, त्यामुळेच ते जास्त धडकत असतात. आणि, सोबतच दुसऱ्याला सुद्धा अडचणीत आणत असतात. इतर वेळी, फावला वेळ नसतो कि काय. म्हणून काही पुरुष, तोंडात सिगारेट धरून गाडी चालवत असतात. शिवाय, दारू पिऊन आपल्याच मस्तीत बेधुंद होऊन गाडी चालवनारे सुद्धा आहेतच कि..
ह्या अशा... एक नाही तर हजार प्रकारच्या चुका पुरुष मंडळी करत असतात.
अशा दुचाकी स्वारांचा, मला खूपच राग येत असतो.

एकदा, आमचं काम चालू असताना. असाच एक उडानटप्पू मुलगा जोरजोराने आवाज आणि धूर सोडणारी गाडी घेऊन आमच्या समोरून उधळला. आणि, थोडं अंतर पुढं गेल्यावर रस्त्यावर जोरदार स्लीप झाला. 
माझ्या सोबत असणारी मुलं, लगेच त्याला उचालायला निघाली होती. पण, मी त्यांना जाऊ दिलं नाही. आम्ही जागेवर थांबून, त्याची गंमत पाहत होतो. शेवटी, तो स्वतः उठून आमच्या पर्यंत आला. आणि म्हणाला, 
काय राव नुसते बघत राहिले. मला मदत करायला कोणीच आलं नाही. माझी पण सटकली होती. मी त्याला म्हणालो.. तुला कोणी वाऱ्याशी स्पर्धा करायला सांगितली होती..? मगाशी आमच्यासमोरून तर, आम्हालाच कट मारून निघून गेला होतास ना..!

माझ्या ह्या शाब्दिक माराने, तो मुलगा खूप खजील झाला होता. म्हणाला, माफ करा.. माझ्या गाडीचा हेंडल जाम झाला आहे. मला थोड्या वेळाकरिता स्क्रू ड्राईव्हर मिळेल का..? माझ्याकडे, स्क्रू ड्राईव्हरअसून सुद्धा मी त्याला मदत केली नाही. माझ्या तडाख्यात घावल्यावर, असल्या व्यक्तींना आपण सुट्टी देतच नसतो..

Wednesday, 17 February 2016

" धर्म "

हा, एक 'चुंबक' आहे.

आणि..

त्याकडे आकर्षित होनारे.
आपन,

एक " लोह " आहोत...!

Tuesday, 16 February 2016

माझ्या, एका दूरच्या नात्यातल्या मित्राकडे माझं एकदा जाणं झालं होतं.
तसा तर, मी वारुणी आणि.. मटन, मासळीचा खूप शौकीन माणूस आहे. आणि, गावाबाहेर गेल्यावर. माझ्या, ह्या शौकात एक कमालीची आणि वेगळीच आवड निर्माण होते.
माझा, तो मित्र सुद्धा माझ्या सारखा 'घेणाराच' आहे. बरेचदा, तो माझ्याकडे येत असतो. पण माझं काही त्याच्याकडे जाणं होत नाही. तो माझ्याकडे आल्यावर, मी त्याला बरेचदा ओलाचिंब करून सोडला आहे. पण, काही लोकांना फार वाईट सवय असते..
पुण्या मुंबईची लोकं म्हणजे मालदार पार्टी असते. आपल्या गावात आलं तरी सुद्धा, त्यांनीच सगळा खर्च करून आपल्याला दारू पाजावी. अशी, त्यांची अपेक्षा असते.
हा सुद्धा, नेमका त्याच प्रवृत्तीचा निघाला..
पण का..?
नाही म्हणता, शेतीवाडी मुळे त्यांना सुद्धा बऱ्यापैकी आमदनी असतेच कि.
हे बाकी माझ्या नियमात बसत नाही.
तुम्ही माझ्याकडे आलात. तर मला झेपेल इतका तुमचा खाण्यापिण्याचा सगळा खर्च मी उचलणार. आणि, मी तुमच्याकडे आलो. तर त्यावेळी, तुम्ही कुठेही गायब न होता. माझी सरबराई करावी. माझी एवढी एकच माफक इच्छा असते.
तर, त्या दूरच्या नात्यातल्या मित्राकडे माझं एकदा जाणं झालं होतं. ग्रामीण पाहुणचारासाठी, मी खूप आसुसलेला असतो. मोकळ्या वातावरणात बसून वारुणीचा आस्वाद घेणं असो. किंवा, चुलीवरील बनवलेलं मटणाचं झटकेबाज जेवण असो. मी ह्या दोन्ही गोष्टीचा फार शौकीन माणूस आहे.
तर त्यादिवशी, संध्याकाळचे सात वाजत आले. तरी तो मित्र, 'राष्ट्रीय' कार्यक्रम करायचं नाव काही घेता घेईना. शेवटी, माझी सुद्धा प्रतीक्षा संपली. आणि, मी विषयाला हात घातला.
" अरे.. काही कार्यक्रम वगैरे करायचा आहे कि नाही..? "
माझ्या ह्या प्रश्नावर तो म्हणाला. अरे, मी आता घ्यायची बंद केली आहे. तुला हवी असेल तर तू घेऊन ये. त्याच्या ह्या वक्तव्यावर, नाही म्हणता मी थोडासा नाराज झालो होतो. पण, एखाद्याने दारू बंदच केली असेल. तर त्याला बळजबरी करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून तो विषय मी तिथेच सोडून दिला. आणि गाडीला किक मारून गावाबाहेर असणाऱ्या एका बार मध्ये जाऊन बसलो. आणि, माझा घसा ओला करून परत घरी निघून आलो.
झालं.. तो विषय तिथेच संपला. आणि, मला कोठूनतरी कुणकुण लागली. कि, पाहुणे रावळे आल्यावर जास्तीच्या खर्चात पडायची भानगड नको. म्हणून, माझ्या त्या मित्राने हि नामी शक्कल लढवली होती.
त्यानंतर.. काही दिवसांनी, माझ्या एका नातेवाईका सोबत तो माझ्या घरी आला होता. आमच्यात बऱ्याच गपागोष्टी झाल्या. वेळ हि पुढे सरकत चालला होता. आता, संध्याकाळच्या वेळी हा माझ्याकडे कोणत्या कारणाने आला होता. ते मी, लगेच समजून गेलो होतो. बराच वेळ झाला, मी सुद्धा काही विषय काढत नाहीये. हे पाहून, त्या दोघांमध्ये थोडीशी चुळबुळ सुरु झाली. त्यांची हि अवस्था पाहून, मी त्यांना म्हणालो..
" तुम्ही घरात बसा, चहा पाणी करून जावा. मला, बाहेर एक ओली पार्टी आहे. त्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे. काय आहे, तिथे.. मी तुम्हाला सुद्धा नेलं असतं. पण, तिथे येऊन तुम्ही काय करणार..? तुम्ही तर आता दारू बंद केली आहे ना...! "
सगळं काही, मी एकटाच बोलून गेलो होतो.. माझ्या ह्या वक्तव्यावर त्यांना काय बोलावं तेच समजलं नाही. त्यांनी सुद्धा, मानेनेच माझ्या हो मध्ये हो मिळवला. कारण, मी त्यांचेच 'बोल' त्यांना सुणावले होते. असं म्हणून, मी तेथून निघून गेलो.
आपल्यासोबत, हि गोष्ट का घडली असेल..? हे न समजण्या इतपत, ते नक्कीच खुळे नव्हते. त्यांची चूक त्यांच्या ध्यानात आली होती. त्यांना, फार मोठी अद्दल घडली होती.
त्यानंतर.. मी कधीही त्यांच्याकडे येणार आहे. असं समजलं, कि ते अगोदरच माझी सगळी 'सोय' करून ठेवतात. आणि, माझ्यासोबत स्वतःही दोन चार पेग मारतात. बाकी, त्यांच्यासाठी आपला पाहुणचार तर एकच नंबर असतो..
 wink

Monday, 15 February 2016

चला कोकणात जाऊ, येवा कोकण आपलोच असा...!

अशा आशयाच्या बऱ्याच जाहिराती तुम्ही पहिल्या असतील. हे सगळं खरं आहे. कोकणाचा लवकरात लवकर केलिफोर्निया होवो. हे सुद्धा अगदी माझ्या मनातलं आहे. कोकणाकरिता, माझ्या सदैव ह्याच शुभेच्छा असतील...

पण, कोकणाचा केलिफोर्निया झाल्यानंतर काय..?

मी साधारण दहाएक वर्षापासून कोकणात जात आलोय. खास करून, दापोली, हर्णे आणि करदे बीचवर माझं बरेचदा जाणं झालं आहे. हल्ली दोनेक महिन्यापूर्वी मी गुहागरला सुद्धा जाऊन आलो. पण सगळीकडे, मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली.

कोकणामध्ये " मासळीचं जेवण कुठेच स्वस्त नाहीये..! "

तुम्ही म्हणताल, हा माणूस भलताच चेंगट दिसतोय. पण मित्रहो तसं नाहीये,
मीच काय.. आपण सगळेच पूर्वीपासून ऐकत आलोय. कि, कोकणात नारळ स्वस्त असतात. आणि, मासे तर विचारूच नका. अथांग समुद्रच आहे त्यांच्या दारी. पण नाही हो... जिकडे पहावी तिकडे निव्वळ महागाई आणि महागाईच दिसून येते. ताम्हिणी घाट उतरल्या बरोबर, निजामपूर मधील एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. आणि, तिथले मासळीच्या थाळीचे रेट पाहून. मला तर अक्षरशः चक्कर यायचीच बाकी राहिली होती.
अहो.. हे रेट आहेत का मस्करी..?
साधी बांगडा थाळी, अडीचशे रुपयाला होती..! आणि त्यात मेन्यू काय, तर..
एक लहान आकाराचा तळलेला बांगडा, तीन चपात्या, डिश भरून भात, सोलकडीची वाटी, कांदा लिंबू आणि मच्छीचा रस्सा.. हि झाली साधी थाळी, सुरमई थाळी आणि पापलेट थाळी त्याहूनही महाग होती. मी सहज म्हणून, त्या दुकानाच्या मालकिणीला म्हणालो.
ताई.. कोकणात सुद्धा मासे एवढे महाग का आहेत हो..? माझ्या या प्रश्नावर, त्या महिलेचं उत्तर होतं. " गालातल्या गालात छद्मीपणे हसनं.. "

आईशप्पत.. मी खोटं सांगत नाही. ठराविक प्रांतात, लोकं निव्वळ जिभेचे चोचले पुरवायला जात असतात. त्या पर्यटकांच्या घरी, किंवा त्यांच्या शहरात त्यांना हे खाद्य पदार्थ मिळत नसतात, अशातला भाग नाहीये. पण भटकंती सोबतच, खाद्य भ्रमंती सुद्धा होऊन जाते. त्यासाठी, हि सगळी पायपीट चालू असते. पण कसलं काय,
एकवेळ, त्या हर्णे बंदरावरून ताजे मासे विकत घेऊन. तिथल्या स्थानिक, 'भावे' किंवा 'नागवेकर' सारख्या व्यक्तीला बनवायला दिले तर मनसोक्त मासे खायला तरी मिळतात. नाहीतर, तेथील स्थानिक हॉटेल मध्ये पाय ठेवायची सुद्धा मला जाम भीती वाटते. अर्थातच, माझं हे मध्यमवर्गीय बोलनं झालं. खिसा गरम असणार्यांची बात काही निराळीच असते.

एकदा तर, दापोलीमध्ये आम्ही अगदी खिशाला परवडेल अशा एका साध्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. सुरवातीला आम्ही सुरमई फ्राय सांगितली. अगदी लहान आकारातील सुरमई चवीला बऱ्यापैकी होती. आणि त्यानंतर, आम्ही त्यांना पापलेटची ऑर्डर दिली. वेटर आमची ऑर्डर घेऊन निघून गेला. तितक्यात, आमच्या पासून थोडंसं दूरवर जेवायला बसलेला एक स्थानिक कोकणी व्यक्ती आमच्यापाशी आला. आणि म्हणाला,
तुम्ही बाहेरून आला असाल ना..! पापलेट घेऊ नका, मच्छी 'लागलेली' आहे.
मी, काय समजायचं ते समजून गेलो. त्या व्यक्तीला आम्ही धन्यवाद केला. आणि, पापलेट न घेता. झालेलं बिल देऊन, आम्ही तेथून निघून गेलो.

बाकी, मी एकदा केरळला गेलो असता. तिथे 'कप्पा' नावाचा एक खाद्य प्रकार मला खायला मिळाला. जो कोणत्यातरी कंद मुळाला शिजवून बनवलेला असतो. अगदी, आपल्या बटाटयाचा किंवा रताळ्याचा लगदा असतो तसाच. सकाळच्या प्रहरी, नाश्ता म्हणून हा पदार्थ त्या हॉटेलमध्ये मिळत होता. त्यासोबत, तिथल्या लोकल मासळीचा नारळाच्या दुधातील खुमासदार हवा तेवढा रस्सा आणि त्यामध्ये एक माशाचा तुकडा सुद्धा मिळाला होता. सोबत, तळलेला एक खरपूस मासा सुद्धा होता. तो कप्पा, आणि मासळीचा रस्सा एकत्र करून मस्तपैकी ओरपायचा. आणि हे सगळं, अवघ्या साठ रुपयामध्ये होतं. आणि विशेष म्हणजे, ते अन्न इतकं भरपेट होतं. कि मला संध्याकाळ पर्यंत भूक सुद्धा लागली नाही.
गोव्यात तर, अजून सुद्धा पन्नास रुपयात मच्छी कढी राईस मिळतो. त्याबद्धल, मी पुन्हा कधीतरी लिहीन.

तिकडे ते काहीही असो. मी ना कोकणाला नावं ठेवतोय. आणि, ना केरळची किंवा गोव्याची उदोउदो करतोय. पण कसं आहे, सगळेच पर्यटक काही श्रीमंत नसतात हो. काही लोकं, जग दुनिया फिरण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन सुद्धा निघालेली असतात. याची जान, स्थानिक व्यवसायिकांनी ठेवायला हवी आहे. माझी एवढी एकच माफक इच्छा आहे.

गड्या.. आमचं पुणे बाकी यात एकच नंबर आहे बरं का. माझ्या घरापासून काही अंतरावरच, मच्छी थाळी मिळ्ण्याचं एक ठिकाण आहे. उडुपी कारभार असलेलं हे हॉटेल अगदी साधंसुधं आहे. पण, तिथे चव बाकी अगदी अस्सल आहे. तिथे फक्त अवघ्या शंभर रुपयामध्ये मच्छी थाळी मिळते. आणि, ते जेवण सुद्धा अगदी पोटभर असतं. कोकणातल्या व्यावसायिकांवर माझा राग वगैरे नाहीये. पण पर्यटकांना तुम्ही वेठीस धरू नका. त्यांची जिव्हा, योग्य तितक्या पैश्यात तृप्त करा. पोट भरल्यावर तो खवय्या तृप्ततेचा ढेकर देता-देता.. तुम्हाला लाख मोलाचे आशीर्वाद सुद्धा नक्कीच देईल...!



हि पोस्ट् 'स्त्रियांनी' आणि 'मुलींनी' फक्त, हसण्यावारी घ्यावी हि नम्र विनंती....!!

माझं नेहमीच निरीक्षण.

विविध वयाच्या 'मुलींच्या / स्त्रियांच्या..


दुचाकी, चालविन्याच्या विविध पद्धती / प्रकार, त्यांचे पेहराव आणि हावभाव..


वयोगट, १८ ते ३० वर्ष....

या वयातील मुली/स्त्रिया, तशातर कोणत्याही प्रकारच्या दुचाकी चालवतात. पण, खास करून कायनेटिक,एकटीवा सदृश्य दुचाक्यांना यांची खास मागणी असते. 
या मुली/स्त्रिया, नवीनच गाडी चालवायला शिकलेल्या असतात. त्यामुळे, यांची गाडी फारच सुसाट वेगाने धावत असते. दुचाकी सुरु केल्यावर, ती पुरेसा वेग घेईपर्यंत यांचे पाय रोड ला समांतर असतात. नंतर, ते अपोआप फुटरेस्ट वर स्थिरावतात. दुचाकीच्या साईड मिररचा वापर या फक्त स्वतःचा 'चेहेरा' न्याहाळन्या करिताच करतात. यांना, ओवर टेक करणं म्हणजे ओलम्पिक पदक जिंकल्या प्रमाणेच आहे. 
या शक्यतो.. आपल्या पुढे कोणाला जाऊच देत नाहीत. कारण, त्यांना अपघाताचं 'भान' आणि 'भय' दोन्ही नसतं. या मुली /स्त्रियांचा पेहराव प्रामुख्याने जीन्स, लेगीस, टोप किंवा सलवार कमीज. आणि, कधी साडी सुद्धा असते. यांच्या डोळ्यावर, सुंदरसा गोगल असतो. उन्हाने, हात काळे पडू नये म्हणून, हाथ मोजेही असतात. आणि, पायात सुंदर सेन्डेल किंवा शूज असतात.. या मुली/स्त्रिया, सुंदर असतीलच अस 'मी, छातीठोकपने सांगू शकत नाही. कारण, त्यांचा चेहरा नेहमी 'स्कार्फ' ने झाकलेला असतो.

वयोगट ३१ ते ४५ वर्ष....

यांना सुद्धा कायनेटिक सदृश्य दुचाक्याच आवडतात. या गाडी जरा बेतानेच चालवतात. यांनी, दुचाकी चालू केली' आणि, ती पुढे निघाली 'कि, यांचे दोन्ही पाय रस्त्याच्या दिशेने खाली सोडले जातात. आणि ते रोडला घासत असतात. यांचा, बहुतेक त्या 'दोन' चाकांवर विश्वासच नसतो. गाडी, जोपर्यंत बर्यापैकी वेग घेत नाही. तोपर्यंत, यांचे पाय 'खालीच, लोंबकळत असतात. जेंव्हा, पायांना आराम द्यायची वेळ येते. आणि 'त्या, पाय फुटरेस्ट वर ठेवणार. तेवढ्यात,... समोर त्यांना अडथळा दिसतो. पुन्हा, पाय खाली सोडले जातात. हा शिवणापाणी चा खेळ, मुक्काम येइपर्यंत चालू असतो. यांचा पेहेराव, सलवार कमिस किंवा साडी असते. क्वचित प्रसंगी 'या, इतर आवडीचे पोशाख हि धारण करत असतात. आणि हो, त्यावर सनकोट मात्र असतोच. चेहेर्याला स्कार्फ, डोळ्यावर' वयाला शोभेल अशा पद्धतीचा गोगल असतो. आणि, पायामध्ये केनवास चे शूज,सेन्डेल,किंवा चप्पल असते.

वयोगट ४६ ते त्यापुढे..

यांना सुद्धा, कायनेटिक सदृश्य दुचाक्याच आवडतात. क्वचित यांच्याकडे लुना किंवा स्कूटर हि असतात. यांची दुचाकी खूप सावकाश असते. 
यांची दुचाकी, जेंव्हा चालू होते. तेंव्हा, यांचे दोन्ही ओठ 'तोंडाच्या, आतील बाजूस घट्ट दाबून धरलेले आढळतात. आणि, दुचाकीने वेग घेण्याअगोदरच. या, आपले दोन्ही पाय रस्त्यावरून, मागील बाजूस ढकलत गाडीला स्वतःच वेग देण्याचा प्रयत्न करतात. यांना, बहुतेक त्या गाडीच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर विश्वासच नसतो. 
पुढे, गाडीने वेग घेतल्यावर गाडीला पुढे लोटणारे पाय, मुक्काम येइपर्यंत लोंबकळलेलेच असतात. बहुदा, आपला तोल केंव्हाही जाऊ शकतो. त्या करिता, त्या ती सावधानी घेत असाव्यात. यांचा पेहेराव प्रामुख्याने साडी त्यावर सनकोट असतो. डोक्यावर, बहुदा कडा खाली झुकलेली गोलसर टोपी असते, त्याचं 'रबर' हनुवटी पाशी घट्ट आवळलेल असत. डोळ्यावर, चष्मा किंवा गोगल असतो. आणि, पायात चप्पल किंवा केनवास चे शूज असतात.

टीप : काही वेळेस, यातील कोणतेही बदल. कोणत्याही वयात पहावयास मिळू शकतात. ते एकुणात सर्वस्वी त्या स्त्री वर अवलंबून आहे.

Friday, 12 February 2016

शर्मिला..

दिसायला, खूप सुंदर होती...!

तेंव्हा, मी नुकताच अकरावीत गेलो होतो. माझ्या वडिलांचे एक मित्र, जे राहायला बारामतीला होते. त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष होऊन गेली होती. परंतु, त्यांच्या पत्नीची प्रेग्नन्सी काही सक्सेस होत नव्हती. अवघ्या दोन तीन महिन्यात गर्भ पडून जात होता. सलग, चार ते पाच वेळा त्यांना हा पुत्र वियोग सहन करावा लागला होता. त्याकरिता, बरेच डॉक्टर झाले. पाण्यासारखा पैसा खर्च करून झाला. पण कसलाच गुण म्हणून येत नव्हता.
त्यावेळी, पुण्यातील एका नामांकित डॉक्टरांनी..
हि केस.. मी, सक्सेस करून देतो...! असं, त्यांना आश्वासन दिलं होतं.
काकींना दिवस गेल्यापासून. सलग सहा महिने, काकी त्या डॉक्टरांच्या निगराणीखाली होत्या. आणि त्यानंतर, सातव्या महिन्यापासून. प्रसूती होईपर्यंत, त्यांना दवाखान्यातच एडमिट व्हायचं होतं. असं डॉक्टरांकरवी सांगून झालं होतं.
झालं.. काकींना सातवा महिना लागला. आणि, त्यांची आवराआवर सुरु झाली. सगळा बाडबिस्तारा बारामातीहून पुण्यात दाखल झाला होता. सुरवातीला ते उभयता आमच्या घरी आले. आणि त्यानंतर, दुसऱ्या दिवशी काकींना त्या दवाखान्यात दाखल केलं गेलं.

काकी, त्या डॉक्टरांच्या देखरेखेखाली दवाखान्यात एडमिट होत्या. आणि त्याकाळी, माझ्या वडिलांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. त्यावेळी, माझ कॉलेज दुपारी तीन वाजता सुटायचं. म्हणून, वडिलांनी मला फर्मान सोडलं होतं.
काकी सकाळचं जेवण दवाखान्यात मिळत असेल तेच करतील. आणि, तू कॉलेज वरून घरी आलास. कि, त्यांच्याकरिता संध्याकाळच्या जेवणाचा डबा घेऊन जात जा.
माझ्या वडिलांपुढे, नकार द्यायची कोणताच हिंमत नव्हती. त्यामुळे, गपगुमान मला हे काम करावं लागणर होतं. आणि, ते सुद्धा थोडे थोडके दिवस नाही. तर.. " तब्बल तीन महिने..! "
वडिलांची आज्ञा पाळत, मी काकींना रोज आमच्या घरून, पुण्यात जेवणाचा डबा घेऊन जायचो.
त्याच प्रसूतिगृहात.. शर्मिला सुद्धा एडमिट होती. माझ्या, तिथे रोजच्या जाण्यायेण्यामुळे शर्मिलाची आणि माझी, चांगलीच ओळख झाली होती. का कोण जाने.. ते, मला सुद्धा माहित नाही. पण, अगदी पहिल्या भेटीपासुनच आम्ही दोघेही, एकमेकांना एकेरीतच बोलायचो. माझ्या माहितीप्रमाणे, त्यावेळी तिला सुद्धा जेमतेम सातवा महिनाच असावा. असं, एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून समजून यायचं..

सौंदर्य काय असतं...! ते मला, तिला पाहून समजलं.

सोळावं वरीस धोक्याचं.. तेंव्हा, मी नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता. स्त्री काय असते, आणि कशी असते. याची मला, नुकतीच ओळख आणि आवड सुद्धा होऊ लागली होती.
शर्मिला म्हणजे, अतिशय गोरीपान आणि सुंदर मुलगी, ती अंदाजे वीस बावीस वर्षाची असावी.
तिचे खांद्यापर्यंत रुळणारे केस, गोबरे गाल, गुलाबी ओठ, भरलेली अंगकांती. आणि, त्यावर दिवस गेल्याने तिला आलेलं गोल गुटगुटीत पोट..
लाजरी,बुजरी, गोड अशी सुंदर मुलगी. खरोखरच, ती खूप म्हणजे खूपच सुंदर होती. कुणीही पटकन तिच्या प्रेमात पडावं अगदी अशीच होती ती.
स्त्री सौंदय काय असतं...? ते मी, प्रथम तिच्यामध्ये पाहिलं होतं. तिचं, वर्णन करावं तीतकं कमीच. माझ्या तारुण्याच्या भरात, मी पाहिलेली ती एकमेव सुंदर स्त्री/मुलगी.
स्वप्न परीच म्हणा ना...!
काय लिहू, किती लिहू, शब्द कमी पडतील.

काकींना डबा घेऊन मी दवाखान्यात गेलो. कि, मी तिच्याशी तासन तास गप्पा मारत बसायचो. ती खूप गोड बोलायची. त्यामुळे, तिचा सहवास मला खूप हवाहवासा वाटायचा. तसं पाहायला गेलं तर, मला तिच्याशी प्रेमच झालं होतं. पण, ह्या प्रेमात वासना नव्हती. त्यामध्ये, एकमेकांबद्धल असणारी एक नितांत ओढ होती. त्यामुळे, मला तिचा सहवास खूप हवाहवासा वाटायचा.

दवाखान्यात असताना, तिला भेटायला रोज नवी-नवी लोकं यायची. त्यात, विदेशी लोकांचा हि समावेश असायचा. हि गोष्ट, माझ्या तरुण मनाला खूप खटकायची. कारण, आमच्या काकींना भेटायला येणारे आम्ही जेमतेम लोकच असायचो. याबद्धल, मी तिला काही विचारलं. कि, ती मला काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची. असं, नेहेमीच घडायचं.
आणि, शेवटी तो दिवस उजाडला. नऊ महिन्यांच्या कठोर तपश्चर्येनंतर. काकींनी, सुंदर अशा गोंडस बाळाला जन्म दिला. काका, काकींची इतक्या दिवसांची मेहेनत आणि चिकाटी फळाला आली होती. तीन महिने, मी सुद्धा न कंटाळता त्यांना जेवणाचा डब्बा पोहोचवत होतो. त्याचं सुद्धा, मला चीज झाल्या सारखं वाटत होतं.

पाच-सहा दिवसांच्या अंतराने, शर्मिलाने सुद्धा एका सुंदर मुलाला जन्म दिला. ती सुद्धा खूप समाधानी दिसत होती. माझं रोजचं येणं जाणं चालूच होतं. आमचे काका, खूप खुश झाले होते. दहा वर्षांनी, त्यांच्या घरात मुल जन्माला आलं होतं. त्या खुशीमध्ये.. त्यांनी, पूर्ण दवाखान्यात पेढे वाटले होते. साधारण पंधरा एक दिवसा नंतर, काकींना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलं. तोपर्यंत, शर्मिला तिथेच होती.
काकींना ज्या दिवशी दवाखान्यातून सोडलं.
तेंव्हा, मी शर्मिलाला भेटलो. तिला डोळेभरून पाहिलं आणि म्हणालो..
" शर्मिला.. आपली भेट आता काही होणार नाही..! "
खूप जड अंतकरणाने, मी तिला, निरोप दिला. त्यावेळी, शर्मिलाचे डोळे सुद्धा भरून आले होते. पण, तिने वेळीच स्वतःला सावरलं. आणि, ती आतमध्ये निघून गेली.

आता, माझंही दवाखान्यात जाणं येणं बंद झालं होतं. पण, मला तर शर्मिलाची खूप आठवण व्हायची. तिच्याशिवाय मला करमतच नव्हतं. ती, माझ्या रोजच्या जीवनाचा एक हिस्सा झाली होती. पण करायचं काय..? घरात काय सांगायचं..?
मी, फारच अडचणीत सापडलो होतो. शेवटी मला काही राहवेना. आणि धाडस करून, मी मुद्दामच शर्मिलाला भेटण्यासाठी दवाखान्यात गेलो.

ती.. एका कुशीवर आडवी होऊन बेडवर निवांत पहुडली होती. मी तिला आवाज मारला. तशी ती, ताडकन उठून बसली. मला पाहून, तिला सुद्धा खूप आनंद झाला होता. तिने तिच्या शेजारी मला बसायला जागा करून दिली. तिने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. मी तिच्याशी मनभरून गप्पा मारल्या. आणि, तिला म्हणालो.
शर्मिला... तू सुद्धा, आता तुझ्या घरी जाशील ना..! तू आता, मला परत कधीच भेटणार नाहीस.
हो ना ?
ती फक्त, शांत आणि निर्विकारपणे माझं बाळबोध बोलनं ऐकत होती.
एकटक, शून्यात पाहत...
तिच्या धीरगंभीर चेहेऱ्याकडे मला पाहवत नव्हतं. थोडसं विषयांतर करावं म्हणून.
तिच्या बाळाला पाहण्याकरिता, मी पाळण्याकडे गेलो. पाहतो तर, बाळ काही पाळण्यात नव्हतं. मी, दचकूनच तिला प्रश्न केला..

" शर्मिला sssss तुझं बाळ कुठे आहे ग ?

ती, एकटक शून्यात पाहत मला म्हणाली..
" बाळ.. नेलं ना त्यांनी...!

मला, काही कळायलाच तयार नाही. माझ्या डोक्यात, फक्त गोंधळ चालला होता. काय विचारावं, कसं विचारावं मला तर काहीच समजत नव्हतं. शेवटी, माझ्या मनात नसतानाही. तिच्याशी थोडावेळ गप्पा मारून जड पावलांनी मी तिथून निघून गेलो.
बाहेर जाताना.. मी पुन्हा एकदा, तिच्याकडे वळून पाहिलं. पाणावलेल्या डोळ्याने, ती माझ्याकडे पाहत होती. मी सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी समजण्या इतपत मोठा तरी कुठे होतो..?

दोन एक महिन्यांनी, अचानक शर्मिला आमच्या घरी आली. मी, तिला पाहून पुरता चक्राऊनच गेलो होतो. माझ्या आनंदाला काही पारावारच उरला नव्हता. आमच्या घरच्यांनी, तिचं खूप आदर तिथ्य केलं. आमच्या घरी, ती तब्बल दोन दिवस राहिली होती. त्या दोन दिवसाच्या काळात, मी तिच्याशी मन भरून गप्पा मारल्या. आमच्या घरच्यांना, बहुतेक तिची " कर्म कहाणी " माहित असावी. त्यामुळे, आमच्या घरातील कोणीच तिच्यासमोर तिच्या 'बाळाचा' विषय काढत नव्हतं.
दोन दिवसांनी, आमच्या येथील पाहुणचार उरकल्या नंतर. माझे मोठे बंधू, तिला दिल्लीच्या रेल्वेमध्ये बसवून आले. जाताना, तिने माझ्या गालावरून फिरवलेल्या तिच्या कोमल हाताचा स्पर्श. मला, आजून सुद्धा आठवणीत आहे..!

त्यानंतर, आजतागायत शर्मिला मला कधीच भेटली नाही. आज.. मी, खूप मोठा, आणि जाणता सवरता सुद्धा झालोय.
मला, आता समजतंय. कि, नेमकी काय परिस्तिथी होती...?
तिने, तसं का केलं असेल. ते, मला माहित नाही.
कारण..

'शर्मिला'.. एक, " सरोगेटेड मदर " होती..!

आज शर्मिला कुठे असेल ? कशी असेल ? किंवा, असेल कि नाही ? ते मला काही सांगता येणार नाही. आणि, ती जरी या जगात आसली. तरी, तिच्या, बाळाशीवाय 'ती' जगू शकत असेल का..?

ह्या गोष्टीला, आता बरीच वर्षं उलटलीत. तरी सुद्धा, हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो.
मी, तिच्यासाठी फक्त एवढंच म्हणत असतो..

शर्मिला.. तू, कुठेही असावीस. पण, सुखी असावीस..!
बस्स.....