Saturday, 20 February 2016

टक्कल पुराण....
हा, टक्कल पडलेल्या बऱ्याच लोकांचा अगदी नावडता विषय जरी असला. तरी, मी स्वतः टक्कलग्रस्थ असून सुद्धा. मला, हा विषय खूप जिव्हाळ्याचा आणि हवाहवासा वाटतो.
कारण, हा विषयच फार गमतीदार आहे हो..
मला स्वतःला, मी टक्कल पडण्याची नेमकी कारणं जरी माहित नसली. तरी, माझ्या तरुणपणात मी माझ्या केसांचे खूपच अतोनात 'हाल' केले आहेत.
केसांचे.. आणि हाल..?
पडलात ना कोड्यात, तर ऐका...!
माझ्या डोक्यावर केसं असताना, त्या केसांना, वळणदारपणे आणि नीटनेटकं बसविण्याकरिता. मी त्याकाळी नाना क्लुप्त्या लढवल्या आहेत. अंघोळ केल्यानंतर, ओल्या केसांनी मला हवा तसा भांग पाडता यायचा नाही. आणि, तेल लावल्यावर तर नाहीच नाही. ( बहुतेक, तेल न लावण्यामुळे सुद्धा ते कुपोषित झाले असावेत. ) त्यामुळे, माझी केसं मी अक्षरशः गेस शेगडीवर, स्टोव्हवर आणि कधी-कधी तर चक्क पाणी तापवण्याच्या बंबाच्या वरील नळकांडीवर टाचा उंच करून त्यांना सुखे पर्यंत तापवायचो. कारण, हेअरस्टाईल करिता. केसं कोरडी करणारा ड्रायर घेण्याइतपत मी कमवत सुद्धा नव्हतो. आणि, ते महागडं मशीन घरात मागावं तर ते मला बिलकुल मिळणार सुद्धा नव्हतं. केसं कोरडी झाल्यावर, त्या विशिष्ट प्रकारच्या गोलाकार काट्याच्या कंगव्याने. मी त्यांना, वळणाच्या विरुद्ध दिशेने फिरवून हवी तशी बसवायचो. ह्या, नको त्या प्रकारामुळे. माझ्या केसांनी, माझ्याशी कट्टी पुकारली. आणि, माझी लवकरात लवकर साथ सोडली असावी. असं मी मानतो, किंवा तसा माझा अंदाज आहे..
टक्कल पडायला सुरवात झाल्यावर, बात्राज सारख्या खर्चिक होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे. मी त्या गोष्टीकडे, साफ दुर्लक्ष करायचो. आणि, शरद पवार साहेबांचा 'आदर्श' डोळ्यासमोर ठेवत पुढे मार्गक्रमण करत राहिलो. तरीही नाही म्हणता, वयाच्या तिशी पर्यंत त्या काळ्याभोर केसांची मला अमुल्य आणि अतुल्य अशी साथ लाभली. तोवर, माझं लग्न वगैरे झालं असल्यामुळे. जास्ती, घाबरण्याच्या फंदात मी पडलो नव्हतो. आणि, त्या केसगळती बाबत माझ्या सौ ची सुद्धा काहीएक तक्रार नव्हती. त्यामुळे, मी आणखीनच बिनधास्त झालो होतो.
टक्कल पडल्यानंतर त्या टकलाला लपवण्यासाठी मी कधीही टोपी वा तत्सम वस्तूंचा वापर हमखास टाळला. ( हल्ली, त्वचेच्या तेलकट पणामुळे 'हेल्मेट' खराब होऊ नये. म्हणून मी डोक्याला रुमाल बांधत असतो. काहीवेळा, तो रुमाल तसाच राहून जातो. त्यामुळे, मी स्वतःसाठी ती एकप्रकारची फेशन मानतो. आणि, आता मी कधी-कधी स्टाईल म्हणून सुद्धा त्याचा वापर करत असतो. )
किंवा, टक्कल झाकण्याकरिता एका बाजूची केसं भरमसाठ वाढवून. टक्कल असणाऱ्या भागावर, त्यांची मुक्तहस्ते पसरण करणं, मला कधीही आवडलं नाही. आणि, मला ते जमणार सुद्धा नाही. त्यामुळे, बाराही महिने, बोडकं डोकं घेऊन मी सगळीकडे फिरत असतो. त्यात, मला कोणत्याच प्रकारचा कमीपणा किंवा लाज वाटत नाही.
राहता राहिला विगचा विषय. तर, ते सुद्धा जाणकार लोकांच्या पटकन लक्षात येतं. अस्सल विग बसविण्याकरिता.. सलमान, अमिताभ इतका मी जहागीरदार नाहीये. त्यामुळे, मी त्या विषयाला सुद्धा कधी दुजोरा दिला नाही. टक्कल पडल्यावर, माणूस श्रीमंत वगैरे होतो. असं मी ऐकून होतो, पण आजवर मी फक्त खाऊन, पिऊन सुखी आहे. श्रीमंती काय असते, ते आजपावेतो मला अनुभवायला मिळालेली नाहीये.
इती टक्कल पुराणं संपूर्णम..

No comments:

Post a Comment