Monday, 1 February 2016

मध्यंतरी, माझा एक अंध मित्र आणि मी.. 

एका उच्चभ्रू व्यक्तीच्या लग्न समारंभात गेलो होतो. भयंकर खर्चिक असा तो कार्यक्रम होता. मोठ्या लोकांचं सगळंच मोठं. ह्या वाक्याला, अगदी साजेसा असा नयनरम्य देखावा त्याठिकाणी निर्माण केला गेला होता. लग्नासाठी वारेमाप खर्च केला होता.
आजूबाजूचा झगमगाट, माझ्या मित्राच्या डोळ्यांना जरी दिसत नसला. तरी तो, त्याचा अनुभवत मात्र नक्कीच घेत होता. काय आहे, परमेश्वराने त्यांना तशी एक प्रकारची अदभूत शक्ती प्रदान केलेली असते. कि, आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय. याचा त्यांना, थोड्या फार प्रमाणात अंदाज बांधता येतो. आणि त्यामुळे, ते सुद्धा त्याचा मनमुराद आनंद लुटत असतात.
तर त्या दिवशी, त्या उंची लग्न समारंभात. आलेल्या पाहुण्यांना, वेलकम ड्रिंक आणि पाणी देण्याकरिता काही सुंदर मुलींना त्याठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. गुढग्यापर्यंत आखूड आणि अंगाशी घट्ट असलेले काळ्या रंगाचे स्कर्ट. आणि, पूर्ण बाह्याचा तंग असा पांढरा शर्ट घातलेल्या त्या मुली. दिसायला सुद्धा खूप सुंदर होत्या.
हे सर्व काही, मला दिसत होतं. पण माझा अंध मित्र मात्र, ते काही पाहू शकत नव्हता.
तितक्यात एक मुलगी हातामध्ये शीतपेयाचा ट्रे घेऊन आमच्यापाशी आली. आणि म्हणाली..
सर.. थंड घेणार का..!
आम्हीही होकारार्थी माना हलवत, त्या ट्रे मधील शीतपेयाचा एक-एक ग्लास उचलला. आणि, त्याचा आस्वाद घेऊ लागलो. आम्हाला ज्यूस देऊन ती मुलगी तेथून निघून गेली.
माझ्या मित्राने, त्या मुलीच्या आवाजा वरूनच थोडसं ताडलं होतं. कि, हि मुलगी दिसायला खूप सुंदर असावी.
आणि, त्याने मला प्रश्न केला.
" ती आत्ता ज्यूस घेऊन आलेली मुलगी दिसायला कशी होती हो..? "
" मी म्हणालो.. खूपच सुंदर होती..! का हो..?
" काय नाही.. " तिने, ड्रेस कसला घातला होता..? "
मी, त्याचं सुद्धा त्याला वर्णन करून सांगितलं. त्या मुलीने, अशाप्रकारचा ड्रेस परिधान केलेला आहे. त्या मुलीने.. असा, आखूड पोशाख घातलेला आहे. हे बाकी त्याला आवडलं नाही.
कारण,
ती मुलगी.. आमच्याशी " मराठी " मध्ये बोलली होती...!
हा एकच मुद्दा धरून, तो मला म्हणू लागला.
चांगलं नाहीये हो हे. गुजर मारवाड्यांच्या लग्नात, आपल्या मराठी पोरी अशी तोकडी कपडे घालून आल्याच कशा असतील..? मी त्याला, लाख समजवायचा प्रयत्न केला. पण, ते काही त्याच्या मनाला पटलंच नाही. आमचं इकडे बोलणं चालू होतं. आणि, नेमकी तीच मुलगी आमच्या मागे राहून आमचं संभाषण ऐकत होती. याची आम्हाला, साधी भनक सुद्धा लागली नाही..!
आणि.. तडक ती मुलगी आमच्यापाशी आली.
आणि, सौम्य शब्दात म्हणाली..
काका.. " आम्ही, हा व्यवसाय स्वीकारला आहे, अंगिकारला नाहीये..! "
कामात कसला आला आहे हो कमीपणा..? ह्या दोन पाच तासांच्या कामाचे. आम्हाला, दोन हजार रुपये मिळतात. मी स्वतः, बाहेर गावावरून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले आहे. होस्टेलमध्ये राहते. आणि, फावल्या वेळात कधीतरी हे काम करते. त्यामुळे, माझ्या शिक्षणाला सुद्धा दोन पैश्याचा हातभार लागतो.
" अगं.. पण, शिक्षणासाठी तुझ्या घरून तुला पैसे येत असतीलच ना..?
" हो येतात कि, पण घरून येणाऱ्या पैश्यात सगळं काही भागत नाही काका. त्यासाठी, असं काहीतरी वेगळं काम करावं लागतं..! आमच्या घरची परिस्थिती सुद्धा खूप हालाकीची आहे. घरची लोकं, आम्हाला मोजून मापून पैसे पाठवतात. त्यात, माझ्या सगळ्या गरजा भागतीलच असं सांगता येत नाही. शिवाय, त्या घरून येणाऱ्या पैश्यांचा घरच्यांना सगळा हिशोब सुद्धा द्यावा लागतो. एक सुद्धा फालतू पैसा खर्च केलेला घरच्यांना आवडत नाही. आणि, इथे तर बऱ्याच
" बेहिशोबी " गोष्टी सुद्धा घडत असतात. चारचौघीत राहायचं म्हणजे, लाजंकाजं ते सगळं आम्हाला करावच लागतं. म्हणून घरच्यांच्या नकळत, कधीतरी आम्ही हे काम करत असतो.
" अगं पण हे काम चांगलं आहे का..? नाना प्रकारची लोकं अशा ठिकाणी आलेली असतात.
मी काय म्हणतोय, ते समजतंय ना तुला..?
" हो.. तुम्ही म्हणताय ते सुद्धा अगदी बरोबर आहे. हे काही फारसं चांगलं काम नाहीये. पण, थोडंसं धीट वागलं. कि, लोकं आपल्या वाटेला जात नाहीत. हा माझा स्वानुभव आहे.
पण, इथे येणाऱ्या सगळ्या मुली माझ्यासारख्या 'सोज्वळ' सुद्धा नाहीत बरं का. यातल्या काही मुली, आज होस्टेलवर जाताना आपल्या सोबत "दहा हजार" रुपये नेणाऱ्या सुद्धा असतील..!
बापरे.. माझ्यासाठी हे सगळं अगदी नवीन होतं. हे सगळं ऐकून, मी तर अगदी सुन्नं झालो होतो. ऐकावं आणि पहावं ते नवीनच. त्या मुलीशी, माझा मित्र बोलत होता. त्यामुळे, मी फक्त बघ्याची आणि ऐकण्याची भूमिका घेतली होती.
आमच्या, बऱ्याच गप्पा झाल्या होत्या. त्या मुलीला सुद्धा, पुढे भरपूर काम होतं.
पण.. जाता-जाता ती मुलगी माझ्या मित्राला म्हणालीच..
काका.. एवढी का चौकशी केलीत हो..?
त्यावर, माझा मित्र तिला म्हणाला. मला सुद्धा, एक मुलगी आहे गं..!
तर ती मुलगी म्हणाली.. आतापर्यंत तुम्ही माझं सगळं ऐकलंत. अजून एक ऐकाल का..?
मित्र म्हणाला.. हो, बोल ना बेटा...!
" तुमच्या मुलीला, शिक्षणासाठी तुम्ही कधी होस्टेलमध्ये पाठवू नका."
एवढं एक वाक्य बोलून,
ती मुलगी पाठमोरी निघून गेली. ते आम्हाला पुन्हा न दिसण्यासाठीच..!

No comments:

Post a Comment