Thursday, 11 February 2016

परवा नेहेमीप्रमाणे,
मी एकटाच घोरावडेश्वराला निघालो होतो....
बाईक सुरु केली, आणि मुख्य रस्त्याला लागलो. रस्त्यात एके ठिकाणी, सिमेंटचा रोड बनवण्यासाठी खोदकाम चालू होतं. आणि नेमकं त्याच ठिकाणी एक फसवं डायवर्शन सुद्धा होतं.
काहीवेळा.. त्या ठिकाणी, विरुद्ध दिशेने येणारे. शोर्टकट रस्ता आहे म्हणून, काही, 'चुकार' दुचाकीवाले तेथून हमखास घुसखोरी करत असतात. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे, मी माझ्या बाजूने अगदी सावकाश निघालो होतो. आणि, अचानक..
योग्य दिशेने येत असलेल्या एका दुचाकी स्वाराला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका घुसखोर दुचाकी स्वाराने एक हलकीशी धडक दिली. आणि, त्याठिकाणी एक विचित्र अपघात घडला. अपघात घडल्याबरोबर, दुर्दैवाने.. नेमका योग्य दिशेने येत असलेला दुचाकीस्वारच रस्त्यावर कोलमडून पडला होता. तो दुचाकीस्वार म्हणजे, अक्षरशः " वठलेल्या झाडाची सुक्की फांदी होती..! " अत्यंत कृश असा तो व्यक्ती, अगदी अलगदपणे त्या रस्त्यावर पडला. गाडी एकीकडे, आणि हा दुसरीकडे..

आता, कसं असतं बघा. " आपल्यासोबत जेंव्हा एखादी भयंकर क्रिया घडते. त्यावेळी, आपलं शरीर सुद्धा त्या घडलेल्या प्रसंगानुसार योग्य तीच प्रतिक्रिया देत असतं. त्यात, कोणताही दिखाऊपणा नसतो. कारण, हे सगळं काही अगदी क्षणार्धात घडत असतं..! "

तर, रस्त्यावर पडल्या बरोबर. तो लुकडा व्यक्ती, ताडकन उठून बसला. कारण, त्याला काहीच झालं नव्हतं ना. पण क्षणार्धात, समोरचं दृश्य पाहून त्याच्या डोक्यात विचारांची कालवाकालव सुरु झाली असावी. कि.. समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्यक्तीचीच यात संपूर्ण चूक आहे. आणि, राहणीमाना वरून तरी तो व्यक्ती बऱ्यापैकी मालदार असावा. हे, लगेच लक्षात येत होतं.
त्याच्या मेंदूला, हे क्लिक झाल्या बरोबर, काही सेकंदातच..

तो.. चांगला उठून बसलेला असताना. पुन्हा जमिनीवर कोसळला, आणि मोठमोठ्याने बोंबलायला लागला. मेलो-मेलो ss वाचवा-वाचवा ss आयोव-आयोव..
त्याने केलेल्या ह्या फालतू कालव्यामुळे, तिथे दोन पाच लोकं लगेच जमा झाली. त्या काडी पैलवानाने तर, तो पक्का कंबरेत मोडला असल्यासारखाच अविर्भाव आणला होता. आणि, तो मोठमोठ्या विव्हळत होता. शेवटी, मी सुद्धा त्या गर्दीचा हिस्सा झालो. त्या व्यक्तीच्या, तुफान अभिनयाला मी मनोमन दाद देत होतो.
नंतर, एका व्यक्तीने त्याची गाडी बाजूला उभी केली. सुदैवाने, त्याच्या गाडीला सुद्धा काहीच झालं नव्हतं. त्याला सुद्धा, एका बाजूला बसवलं गेलं. आणि, तो अपराधी दुचाकीस्वार म्हणाला..
भाऊ.. मला माफ करा. तुम्हाला जास्ती लागलं तर नाही ना..?
तो नाटकी माणूस, विव्हळतच नकारार्थी आणि सोबतच होकारार्थी अशी संमिश्र मान हलवत होता. त्यामुळे, या व्यक्तीला सुद्धा थोडं हायसं वाटलं. आणि, तो त्याला म्हणाला..
" मला, पुढे जायला खूप उशीर होतोय. खूप अर्जंट काम आहे. हे बघा, हे हजार रुपये घ्या. आणि, तुम्ही पहिलं दवाखान्यात जाऊन या. काही कमी जास्ती वाटल्यास, माझं हे कार्ड तुमच्या सोबत असुध्यात..! "
असं म्हणून, त्या व्यक्तीने.. हजाराची एक नोट, आणि त्याचं कार्ड त्या व्यक्तीला दिलं.
याने सुद्धा, थोडंसं नाटकी कळवळत. हात पुढे केला, आणि ती हजाराची नोट आणि ते कार्ड आपल्या मुठीत चुरगाळलं.

सकाळची वेळ.. प्रत्येकाला कामाला जायची घाई होती. त्यामुळे, जो तो लगेच आपआपल्या मार्गी निघून गेला. मी सुद्धा, माझ्या गाडीला किक मारली. आणि पुढे निघून गेलो. आणि, एका ठिकाणी लपून मी पुढचा घटनाक्रम पाहु लागलो.
थोड्यावेळाने... सगळं काही जिकडे तिकडे झालं आहे. असं पाहून, त्या अपघाती बहाद्दराने. प्रथम आपल्या गाडीला काही झालं आहे का. ते, पाहून घेतलं. नंतर, दोन्ही हातांनी आपलं सर्वांग झटकलं. बाईकला जोरदार किक मारली.
आणि, आल्या मार्गी तो तसाच पुढे निघून गेला..!

No comments:

Post a Comment