चला कोकणात जाऊ, येवा कोकण आपलोच असा...!
अशा आशयाच्या बऱ्याच जाहिराती तुम्ही पहिल्या असतील. हे सगळं खरं आहे. कोकणाचा लवकरात लवकर केलिफोर्निया होवो. हे सुद्धा अगदी माझ्या मनातलं आहे. कोकणाकरिता, माझ्या सदैव ह्याच शुभेच्छा असतील...
पण, कोकणाचा केलिफोर्निया झाल्यानंतर काय..?
मी साधारण दहाएक वर्षापासून कोकणात जात आलोय. खास करून, दापोली, हर्णे आणि करदे बीचवर माझं बरेचदा जाणं झालं आहे. हल्ली दोनेक महिन्यापूर्वी मी गुहागरला सुद्धा जाऊन आलो. पण सगळीकडे, मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली.
कोकणामध्ये " मासळीचं जेवण कुठेच स्वस्त नाहीये..! "
तुम्ही म्हणताल, हा माणूस भलताच चेंगट दिसतोय. पण मित्रहो तसं नाहीये,
मीच काय.. आपण सगळेच पूर्वीपासून ऐकत आलोय. कि, कोकणात नारळ स्वस्त असतात. आणि, मासे तर विचारूच नका. अथांग समुद्रच आहे त्यांच्या दारी. पण नाही हो... जिकडे पहावी तिकडे निव्वळ महागाई आणि महागाईच दिसून येते. ताम्हिणी घाट उतरल्या बरोबर, निजामपूर मधील एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. आणि, तिथले मासळीच्या थाळीचे रेट पाहून. मला तर अक्षरशः चक्कर यायचीच बाकी राहिली होती.
अहो.. हे रेट आहेत का मस्करी..?
साधी बांगडा थाळी, अडीचशे रुपयाला होती..! आणि त्यात मेन्यू काय, तर..
एक लहान आकाराचा तळलेला बांगडा, तीन चपात्या, डिश भरून भात, सोलकडीची वाटी, कांदा लिंबू आणि मच्छीचा रस्सा.. हि झाली साधी थाळी, सुरमई थाळी आणि पापलेट थाळी त्याहूनही महाग होती. मी सहज म्हणून, त्या दुकानाच्या मालकिणीला म्हणालो.
ताई.. कोकणात सुद्धा मासे एवढे महाग का आहेत हो..? माझ्या या प्रश्नावर, त्या महिलेचं उत्तर होतं. " गालातल्या गालात छद्मीपणे हसनं.. "
आईशप्पत.. मी खोटं सांगत नाही. ठराविक प्रांतात, लोकं निव्वळ जिभेचे चोचले पुरवायला जात असतात. त्या पर्यटकांच्या घरी, किंवा त्यांच्या शहरात त्यांना हे खाद्य पदार्थ मिळत नसतात, अशातला भाग नाहीये. पण भटकंती सोबतच, खाद्य भ्रमंती सुद्धा होऊन जाते. त्यासाठी, हि सगळी पायपीट चालू असते. पण कसलं काय,
एकवेळ, त्या हर्णे बंदरावरून ताजे मासे विकत घेऊन. तिथल्या स्थानिक, 'भावे' किंवा 'नागवेकर' सारख्या व्यक्तीला बनवायला दिले तर मनसोक्त मासे खायला तरी मिळतात. नाहीतर, तेथील स्थानिक हॉटेल मध्ये पाय ठेवायची सुद्धा मला जाम भीती वाटते. अर्थातच, माझं हे मध्यमवर्गीय बोलनं झालं. खिसा गरम असणार्यांची बात काही निराळीच असते.
एकदा तर, दापोलीमध्ये आम्ही अगदी खिशाला परवडेल अशा एका साध्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. सुरवातीला आम्ही सुरमई फ्राय सांगितली. अगदी लहान आकारातील सुरमई चवीला बऱ्यापैकी होती. आणि त्यानंतर, आम्ही त्यांना पापलेटची ऑर्डर दिली. वेटर आमची ऑर्डर घेऊन निघून गेला. तितक्यात, आमच्या पासून थोडंसं दूरवर जेवायला बसलेला एक स्थानिक कोकणी व्यक्ती आमच्यापाशी आला. आणि म्हणाला,
तुम्ही बाहेरून आला असाल ना..! पापलेट घेऊ नका, मच्छी 'लागलेली' आहे.
मी, काय समजायचं ते समजून गेलो. त्या व्यक्तीला आम्ही धन्यवाद केला. आणि, पापलेट न घेता. झालेलं बिल देऊन, आम्ही तेथून निघून गेलो.
बाकी, मी एकदा केरळला गेलो असता. तिथे 'कप्पा' नावाचा एक खाद्य प्रकार मला खायला मिळाला. जो कोणत्यातरी कंद मुळाला शिजवून बनवलेला असतो. अगदी, आपल्या बटाटयाचा किंवा रताळ्याचा लगदा असतो तसाच. सकाळच्या प्रहरी, नाश्ता म्हणून हा पदार्थ त्या हॉटेलमध्ये मिळत होता. त्यासोबत, तिथल्या लोकल मासळीचा नारळाच्या दुधातील खुमासदार हवा तेवढा रस्सा आणि त्यामध्ये एक माशाचा तुकडा सुद्धा मिळाला होता. सोबत, तळलेला एक खरपूस मासा सुद्धा होता. तो कप्पा, आणि मासळीचा रस्सा एकत्र करून मस्तपैकी ओरपायचा. आणि हे सगळं, अवघ्या साठ रुपयामध्ये होतं. आणि विशेष म्हणजे, ते अन्न इतकं भरपेट होतं. कि मला संध्याकाळ पर्यंत भूक सुद्धा लागली नाही.
गोव्यात तर, अजून सुद्धा पन्नास रुपयात मच्छी कढी राईस मिळतो. त्याबद्धल, मी पुन्हा कधीतरी लिहीन.
तिकडे ते काहीही असो. मी ना कोकणाला नावं ठेवतोय. आणि, ना केरळची किंवा गोव्याची उदोउदो करतोय. पण कसं आहे, सगळेच पर्यटक काही श्रीमंत नसतात हो. काही लोकं, जग दुनिया फिरण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन सुद्धा निघालेली असतात. याची जान, स्थानिक व्यवसायिकांनी ठेवायला हवी आहे. माझी एवढी एकच माफक इच्छा आहे.
गड्या.. आमचं पुणे बाकी यात एकच नंबर आहे बरं का. माझ्या घरापासून काही अंतरावरच, मच्छी थाळी मिळ्ण्याचं एक ठिकाण आहे. उडुपी कारभार असलेलं हे हॉटेल अगदी साधंसुधं आहे. पण, तिथे चव बाकी अगदी अस्सल आहे. तिथे फक्त अवघ्या शंभर रुपयामध्ये मच्छी थाळी मिळते. आणि, ते जेवण सुद्धा अगदी पोटभर असतं. कोकणातल्या व्यावसायिकांवर माझा राग वगैरे नाहीये. पण पर्यटकांना तुम्ही वेठीस धरू नका. त्यांची जिव्हा, योग्य तितक्या पैश्यात तृप्त करा. पोट भरल्यावर तो खवय्या तृप्ततेचा ढेकर देता-देता.. तुम्हाला लाख मोलाचे आशीर्वाद सुद्धा नक्कीच देईल...!
No comments:
Post a Comment