Monday, 29 February 2016

होऊदे खर्च,
पण खा फक्त.. आईच्या,बायकोच्या हातचं,
आणि घरचं.. ( भाग :- ३ )
===========================
मी.. शाकाहार आणि मांसाहार, ह्या दोन्ही पदार्थांचा भलताच शौकीन आहे. पण, हे सगळे पदार्थ मला स्वतःच्या घरात बनवून खाण्यात जास्त मजा वाटते. कारण, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चमचमीत भाज्या ताज्या असतीलच, असं मला वाटत नाही. कारण, सर्रास हॉटेलमध्ये भाज्या बनविण्याकरिता लागणारी ग्रेवी हि एकदाच बनवून ठेवली जाते. आणि, आठवडाभर किंवा त्यापुढे सुद्धा ती ग्रेवी सकाळ संध्याकाळ चांगली गरम करून वापरली जाते. हे, माझ्या माहितीतलं आहे. आणि, बहुतेक माझ्या बऱ्याच मित्रांना याची कल्पना सुद्धा असावीच..!
हॉटेलमध्ये आपण,कोणत्याही ठराविक एका भाजीची ऑर्डर दिल्यावर..
ग्रेवी तीच असते. फक्त, भाजीचं माध्यम बदललं जातं. बाकी काहीएक फरक नसतो. काही भाज्या, आपल्या घरी बनत नसतात. त्यामुळे, आपण आवडीने त्या हॉटेलमध्ये जाऊन खात असतो. त्यावेळी, हे असले भलते सलते विचार मी माझ्या मनात आणत सुद्धा नाही. हे देखील तितकंच सत्य आहे.
तर मुद्दा असा आहे, महत्वाचं म्हणजे.. प्रत्येक घरातील स्त्री हि सुगरण असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे, माणूस जेवायला घराबाहेर पडत नाही. आणि पर्यायाने, तो तृप्त आणि समाधानी सुद्धा राहतो. तर काहीवेळेस, काही व्यक्तींच्या घरामध्ये मांसाहार बनवला जात नाही. अशावेळी, त्या व्यक्ती घराचा उंबरा ओलांडताना पाहायला मिळतात. शेवटी हे सगळे जिव्हेचे चोचले आहेत बरं का.
पण मी स्वतः, फार कमी प्रमाणात हॉटेलिंग करतो. कारण,
एकदा मी, घरी भाजी बनवण्याकरिता चिकन खरेदीला गेलो होतो. नेहेमीप्रमाणे माझ्या मित्राने मला दीड किलोची कोंबडी कोल्डड्रेस्ड करून दिली. आणि अचानक, त्याचं लक्ष त्या कोंबडीकडे गेलं. त्याला त्यात काहीतरी तफावत जाणवली. म्हणून त्याने, माझ्याकरिता दुसरी कोंबडी वजन करून दिली. शेवटी कुतूहल म्हणून, मी त्याला म्हणालो.. का रे, त्या कोंबडीला काय झालं होतं..?
तर म्हणाला, तो डेमेज पीस होता..!
आता.. कोंबड्या सुद्धा डेमेज असतात. हे मला त्यादिवशी समजलं. तो म्हणाला, त्या कोंबडीला मार लागला होता. त्यामुळे, मी ती कोंबडी तुला दिली नाही.
मी म्हणालो, मग त्या कोंबडीचं तू आता काय करणार आहेस..? तर म्हणाला,
आता.. हा माल हॉटेलमध्ये जाणार..! बघा.. म्हणजे हा असा प्रकार असतो.
त्यानंतर दुसर्यांदा, मी मटन खरेदी करण्यासाठी गेलो होतो. दुपारची वेळ होती, बकर्याची एक सुक्की खडखडीत मांडी हुकाला अडकवली होती. सुक्क मटन असेल, तर वजनाला मस्त बसतं. त्यामुळे, त्या मटन वाल्याला मी म्हणालो. हि मांडी लावा..!
तर तो म्हणाला, दुसरं घ्या हो शेठ, तो तीनशे रुपये किलोवाला हॉटेलचा माल आहे.
मी म्हणालो, ठीक आहे ना.. द्या, मला काही फरक पडत नाही.
शेवटी, तो मालक मला म्हणाला.. शेठ मी नको म्हणतोय ना..! दुसरं काहीतरी घ्या कि.
मी म्हणालो, पण का नको..? तर ते म्हणाले, हे कालचं मटन आहे. आणि अमुक एका हॉटेलमध्ये आम्हाला हे मटन द्यायचं आहे.
त्या हॉटेलचं नाव ऐकल्यावर, मी त्यांना म्हणालो. अहो, त्या हॉटेलमध्ये तर बोल्हाईचं मटन असतं ना. आणि, हे तर बोकडाचं मटन आहे..!
शेवटी, वैतागून तो शेठ मला म्हणाला.. जाऊद्या ओ शेठ, बोला काय लाऊ तुम्हाला..?
शेवटी, अर्धा किलो 'फुट' घेऊन मी तिथून फुटलो.
तर हे असले प्रकार, हॉटेलमध्ये सर्रास चालू असतात. त्यामुळे मी या गोष्टी टाळत असतो. आता मटणाचा बराच विषय झाला आहे. तर थोडं दारूविषयी बोलूयात.
माझ्या घरामध्ये, माझ्या दारू पिण्याबद्धल कोणालाच कोणत्याच प्रकारचा आक्षेप नाहीये. कारण, त्या बाबतीत मी फारच शिस्तबद्ध असतो. मी बाटली फोडली, कि माझी बायको मला पापड वगैरे अगदी हौसेने तळून देते. कारण, त्यांना माझा स्वभाव माहित आहे. मी कोणत्याही वस्तूच्या आहारी जाणारा मनुष्य नाहीये.
पण, चुकून चार मित्रात गेल्यावर. माझा 'कोठा' ओव्हरफुल होत असतो. त्यामुळे, माझ्या बायकोची मला सक्त ताकीत असते. कि, आपल्या घरात बसून घ्या, बाहेर गेल्यावर तुम्हाला शुद्ध राहत नाही. तुम्ही जास्तीची घेता. त्यामुळे, मी बाहेर पिणं टाळतो. पण कधीमधी जावं लागतंच कि, मित्रांच्या आग्रहाखातर हो... नाही का..
तर.. असं कधीमधी बारमध्ये गेल्यावर, दारूसोबत मोफत मिळणारी कोम्पलीमेंट्री ( चकली, शेव, शेंगदाणे ) घेणं आणि खानं मी हमखास टाळत असतो.
का तर... ह्या वस्तू, हॉटेल मालकाला दारूसोबत मोफत द्यायच्या असतात. आणि, एखाद्या वाटीत शिल्लक राहिलेले शेंगदाणे किंवा तत्सम वस्तू, हि लोकं टाकून देत नाहीत.
ते जिन्नस, पुन्हा त्याच डब्यात जातं. आता, ते जिन्नस खात असणारा व्यक्ती कोण असेल. कसला असेल, काय करून आला असेल, ते आपल्याला माहित असतं का..?
मला काय म्हणायचं आहे. ते तुम्हाला समजलं असावच.
म्हणूनच..
खावं सुद्धा घरचं, आणि प्यावं सुद्धा घरचं.. मग, होऊदे कितीबी खर्च..!
( समाप्त )

No comments:

Post a Comment