Sunday, 28 February 2016

होऊदे खर्च,
पण खा फक्त.. आईच्या,बायकोच्या हातचं,
आणि घरचं.. ( भाग :- २ )
==========================
पोटाची आग, फार वाईट असते हो.
त्यावेळच्या तुटपुंज्या पगारामध्ये, माझे वडील घरी आणून देतील त्या घर सामानात. माझी आई समाधान मानायची. त्याबाबत, तिची कधीच आणि कोणतीच कुरबुर नसायची. आणि त्यातच, तिच्या हौशी सुगरणी कौशल्याने नवनवीन पदार्थ बनवून आम्हा भावंडांना ती आवडीने खाऊ घालायची. त्यावेळी, नाश्ता वगैरेला.. पोहे किंवा शिरा असले पदार्थ आम्हाला बिलकुल मिळत नसायचे. आणि, खरं सांगायला गेलं तर. आम्हाला, ते पदार्थ माहित सुद्धा नव्हते. माझी आई म्हणजे, साक्षात सुगरणीचा एक उत्कृष्ट नमुना होता, आणि आहे. परंतु,आज ती कोणतंच काम करत नाही. कारण, त्यापाठीमागे असणारं तिचं वयोवृद्ध शरीर..
पण ती माऊली, शिळ्या पाक्यातून का होईना. नवनवीन पदार्थ बनवून, आम्हाला खाऊ घालायची.
अजूनही, तिच्या हातची चव माझ्या जिभेवर रेंगाळत असते..
आमच्या घरात, मोठं खटलं असल्या कारणाने. शिळं अन्न, हे आमच्या घरात नेहेमी ठरलेलं असायचं. पण.. माणसाने, " खाऊन माजावं, टाकून माजू नये..! "
हा वाक्प्रचार, माझ्या आईने कायम तडीस नेला. त्यामुळे, टोपल्यात शिळ्या राहिलेल्या चपातीचा आमच्या घरात, साखर आणि गुळ घालून मस्त असा गोड चकुल्याचा कार्यक्रम दर रविवारी हमखास ठरलेला असायचा. किंवा, शिळ्या भाकरीच्या तुकड्यांना पाण्यामध्ये भिजवून त्याचे छोटेछोटे तुकडे करून त्यात हळद, मीठ, जिरे, मोहोरी, कांदा, लसून मिरचीची खमंग फोडणी देऊन. सुग्रास 'तुकडे' सुद्धा ती बनवायची. त्यावेळी, ती सुद्धा आमच्याकरिता एकप्रकारची मेजवानीच ठरायची. त्यावेळी, आमचा रोजचा नाश्ता म्हणजे...
चहा चपाती, किंवा गरमागरम भाकरीचं पोट फोडून त्याला तेल मीठ लाऊन ते खायचं. बाजरीची गरम-गरम भाकरी कुसकरून त्यात तूप, गुळ घालून त्याचे लाडू बनवून खायचे. दुध, भाकरी, गुळ कुसकरुन खायची, तरी कधी.. चपातीला तूप, साखर लाऊन तो रोल खायला मिळायचा. एकदा तर, मी चक्क चहा भाकरी खाल्लेली सुद्धा मला आठवतेय..
सांगण्याचा विषय असा आहे. कि, त्याकाळच्या महिलांना संसार करायला शिकवावं लागत नव्हतं. कारण, ते ज्ञान त्यांना उपजत म्हणा किंवा त्यांच्या अंगी बानवल्या सारखंच असायचं.
त्यामुळे, आम्हाला... हे आवडत नाही, आणि ते आवडत नाही, आणि हे बनवायला जमत नाही. आणि, मला ते जमणारच नाही. असला प्रकार, आमच्या आईच्या अंगाला कधी शिवलाच नाही. आणि आजपावेतो, तोच ठसा आमच्या अंगी सुद्धा कायम राहिला आहे.
नवीन बाळाचा जन्म झाल्यावर,
प्रथम.. आईचं दूधच काय, ते त्याचं प्रथम अन्न असतं. त्यानंतर, आपण जसजसे मोठे होऊ लागतो. तसं.. दुध भात, दुध चपाती, दुध भाकरी, वरण भात, तूप भात, इत्यादी.. ह्या विषयांना सुरवात होऊ लागायची. कारण, त्याकाळी भारतामध्ये 'फेरेक्स' नामक जड द्रवपदार्थ उदयास आलं नव्हतं. नाही म्हणता, डब्यातलं पावडरीचं दुध मात्र आम्ही पिलो आहोत..
हळूहळू.. आमची आई, आम्हाला भरवणारे प्रत्येक खाद्य पदार्थ आम्हाला आवडू लागले. कारण, जे मिळतंय ते खायचं. चवीचा विषय बिलकुल करायचा नाही..!
हा, फार मोठा दंडक आमच्या घरी ठरलेला असायचा.
आमचं घर.. संमिश्र भोजनी असल्याने. आमच्या घरी, कधीतरी मांसाहार सुद्धा असायचा. आणि, बघता-बघता त्या विषयाचा मी कधी पाईक झालो. ते, माझं मला सुद्धा समजलं नाही.
शेवटी.. आवड, आपली-आपली.
तर.. तोंडाला लागलेला विषय कधी सुटत नाही. तर मग, लाख गरिबी आली तरी चालेल. त्याला काही लोकं पर्यायी मार्ग सुद्धा शोधून काढत असतात. वानगीदाखल, काही लोकांना मटन, चिकन किंवा मासे.. विकत घेऊन खायला परवडत नाहीत. कारण, हे खाद्य आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्यावेळी, अशी हौशी मागास मंडळी. चिकन, मटन कापून झाल्यावर उरलेली छाटण ( वेस्टेज ) विकत नेऊन आपली क्षुधा शांती करत असतात. तर मासळीची शौकीन मंडळी, माश्याची तोंडं ( मुंडकी ) घरी विकत नेवून आपली हौस भागवत असतात.
तसं पाहायला गेलं तर, हा फार गंभीर विषय आहे. एकदा का, एखादी आवडती वस्तू आपल्या तोंडाला लागली. आणि तिची चव आपल्या जिव्हेला भावली. की, ती सुटता सुटत नाही.
ह्या जिव्हेची किमयाच खूप न्यारी असते. " जिभेवर सेकंदभर आणि पोटामध्ये आयुष्यभर..! "
पण, हे सगळं काही ह्या पापी पोटासाठीच चालू असतं बरं का..
( क्रमशः )

No comments:

Post a Comment