शर्मिला..
दिसायला, खूप सुंदर होती...!
तेंव्हा, मी नुकताच अकरावीत गेलो होतो. माझ्या वडिलांचे एक मित्र, जे राहायला बारामतीला होते. त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष होऊन गेली होती. परंतु, त्यांच्या पत्नीची प्रेग्नन्सी काही सक्सेस होत नव्हती. अवघ्या दोन तीन महिन्यात गर्भ पडून जात होता. सलग, चार ते पाच वेळा त्यांना हा पुत्र वियोग सहन करावा लागला होता. त्याकरिता, बरेच डॉक्टर झाले. पाण्यासारखा पैसा खर्च करून झाला. पण कसलाच गुण म्हणून येत नव्हता.
त्यावेळी, पुण्यातील एका नामांकित डॉक्टरांनी..
हि केस.. मी, सक्सेस करून देतो...! असं, त्यांना आश्वासन दिलं होतं.
काकींना दिवस गेल्यापासून. सलग सहा महिने, काकी त्या डॉक्टरांच्या निगराणीखाली होत्या. आणि त्यानंतर, सातव्या महिन्यापासून. प्रसूती होईपर्यंत, त्यांना दवाखान्यातच एडमिट व्हायचं होतं. असं डॉक्टरांकरवी सांगून झालं होतं.
झालं.. काकींना सातवा महिना लागला. आणि, त्यांची आवराआवर सुरु झाली. सगळा बाडबिस्तारा बारामातीहून पुण्यात दाखल झाला होता. सुरवातीला ते उभयता आमच्या घरी आले. आणि त्यानंतर, दुसऱ्या दिवशी काकींना त्या दवाखान्यात दाखल केलं गेलं.
काकी, त्या डॉक्टरांच्या देखरेखेखाली दवाखान्यात एडमिट होत्या. आणि त्याकाळी, माझ्या वडिलांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. त्यावेळी, माझ कॉलेज दुपारी तीन वाजता सुटायचं. म्हणून, वडिलांनी मला फर्मान सोडलं होतं.
काकी सकाळचं जेवण दवाखान्यात मिळत असेल तेच करतील. आणि, तू कॉलेज वरून घरी आलास. कि, त्यांच्याकरिता संध्याकाळच्या जेवणाचा डबा घेऊन जात जा.
माझ्या वडिलांपुढे, नकार द्यायची कोणताच हिंमत नव्हती. त्यामुळे, गपगुमान मला हे काम करावं लागणर होतं. आणि, ते सुद्धा थोडे थोडके दिवस नाही. तर.. " तब्बल तीन महिने..! "
वडिलांची आज्ञा पाळत, मी काकींना रोज आमच्या घरून, पुण्यात जेवणाचा डबा घेऊन जायचो.
त्याच प्रसूतिगृहात.. शर्मिला सुद्धा एडमिट होती. माझ्या, तिथे रोजच्या जाण्यायेण्यामुळे शर्मिलाची आणि माझी, चांगलीच ओळख झाली होती. का कोण जाने.. ते, मला सुद्धा माहित नाही. पण, अगदी पहिल्या भेटीपासुनच आम्ही दोघेही, एकमेकांना एकेरीतच बोलायचो. माझ्या माहितीप्रमाणे, त्यावेळी तिला सुद्धा जेमतेम सातवा महिनाच असावा. असं, एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून समजून यायचं..
सौंदर्य काय असतं...! ते मला, तिला पाहून समजलं.
सोळावं वरीस धोक्याचं.. तेंव्हा, मी नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता. स्त्री काय असते, आणि कशी असते. याची मला, नुकतीच ओळख आणि आवड सुद्धा होऊ लागली होती.
शर्मिला म्हणजे, अतिशय गोरीपान आणि सुंदर मुलगी, ती अंदाजे वीस बावीस वर्षाची असावी.
तिचे खांद्यापर्यंत रुळणारे केस, गोबरे गाल, गुलाबी ओठ, भरलेली अंगकांती. आणि, त्यावर दिवस गेल्याने तिला आलेलं गोल गुटगुटीत पोट..
लाजरी,बुजरी, गोड अशी सुंदर मुलगी. खरोखरच, ती खूप म्हणजे खूपच सुंदर होती. कुणीही पटकन तिच्या प्रेमात पडावं अगदी अशीच होती ती.
स्त्री सौंदय काय असतं...? ते मी, प्रथम तिच्यामध्ये पाहिलं होतं. तिचं, वर्णन करावं तीतकं कमीच. माझ्या तारुण्याच्या भरात, मी पाहिलेली ती एकमेव सुंदर स्त्री/मुलगी.
स्वप्न परीच म्हणा ना...!
काय लिहू, किती लिहू, शब्द कमी पडतील.
काकींना डबा घेऊन मी दवाखान्यात गेलो. कि, मी तिच्याशी तासन तास गप्पा मारत बसायचो. ती खूप गोड बोलायची. त्यामुळे, तिचा सहवास मला खूप हवाहवासा वाटायचा. तसं पाहायला गेलं तर, मला तिच्याशी प्रेमच झालं होतं. पण, ह्या प्रेमात वासना नव्हती. त्यामध्ये, एकमेकांबद्धल असणारी एक नितांत ओढ होती. त्यामुळे, मला तिचा सहवास खूप हवाहवासा वाटायचा.
दवाखान्यात असताना, तिला भेटायला रोज नवी-नवी लोकं यायची. त्यात, विदेशी लोकांचा हि समावेश असायचा. हि गोष्ट, माझ्या तरुण मनाला खूप खटकायची. कारण, आमच्या काकींना भेटायला येणारे आम्ही जेमतेम लोकच असायचो. याबद्धल, मी तिला काही विचारलं. कि, ती मला काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची. असं, नेहेमीच घडायचं.
आणि, शेवटी तो दिवस उजाडला. नऊ महिन्यांच्या कठोर तपश्चर्येनंतर. काकींनी, सुंदर अशा गोंडस बाळाला जन्म दिला. काका, काकींची इतक्या दिवसांची मेहेनत आणि चिकाटी फळाला आली होती. तीन महिने, मी सुद्धा न कंटाळता त्यांना जेवणाचा डब्बा पोहोचवत होतो. त्याचं सुद्धा, मला चीज झाल्या सारखं वाटत होतं.
पाच-सहा दिवसांच्या अंतराने, शर्मिलाने सुद्धा एका सुंदर मुलाला जन्म दिला. ती सुद्धा खूप समाधानी दिसत होती. माझं रोजचं येणं जाणं चालूच होतं. आमचे काका, खूप खुश झाले होते. दहा वर्षांनी, त्यांच्या घरात मुल जन्माला आलं होतं. त्या खुशीमध्ये.. त्यांनी, पूर्ण दवाखान्यात पेढे वाटले होते. साधारण पंधरा एक दिवसा नंतर, काकींना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलं. तोपर्यंत, शर्मिला तिथेच होती.
काकींना ज्या दिवशी दवाखान्यातून सोडलं.
तेंव्हा, मी शर्मिलाला भेटलो. तिला डोळेभरून पाहिलं आणि म्हणालो..
" शर्मिला.. आपली भेट आता काही होणार नाही..! "
खूप जड अंतकरणाने, मी तिला, निरोप दिला. त्यावेळी, शर्मिलाचे डोळे सुद्धा भरून आले होते. पण, तिने वेळीच स्वतःला सावरलं. आणि, ती आतमध्ये निघून गेली.
आता, माझंही दवाखान्यात जाणं येणं बंद झालं होतं. पण, मला तर शर्मिलाची खूप आठवण व्हायची. तिच्याशिवाय मला करमतच नव्हतं. ती, माझ्या रोजच्या जीवनाचा एक हिस्सा झाली होती. पण करायचं काय..? घरात काय सांगायचं..?
मी, फारच अडचणीत सापडलो होतो. शेवटी मला काही राहवेना. आणि धाडस करून, मी मुद्दामच शर्मिलाला भेटण्यासाठी दवाखान्यात गेलो.
ती.. एका कुशीवर आडवी होऊन बेडवर निवांत पहुडली होती. मी तिला आवाज मारला. तशी ती, ताडकन उठून बसली. मला पाहून, तिला सुद्धा खूप आनंद झाला होता. तिने तिच्या शेजारी मला बसायला जागा करून दिली. तिने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. मी तिच्याशी मनभरून गप्पा मारल्या. आणि, तिला म्हणालो.
शर्मिला... तू सुद्धा, आता तुझ्या घरी जाशील ना..! तू आता, मला परत कधीच भेटणार नाहीस.
हो ना ?
ती फक्त, शांत आणि निर्विकारपणे माझं बाळबोध बोलनं ऐकत होती.
एकटक, शून्यात पाहत...
तिच्या धीरगंभीर चेहेऱ्याकडे मला पाहवत नव्हतं. थोडसं विषयांतर करावं म्हणून.
तिच्या बाळाला पाहण्याकरिता, मी पाळण्याकडे गेलो. पाहतो तर, बाळ काही पाळण्यात नव्हतं. मी, दचकूनच तिला प्रश्न केला..
" शर्मिला sssss तुझं बाळ कुठे आहे ग ?
ती, एकटक शून्यात पाहत मला म्हणाली..
" बाळ.. नेलं ना त्यांनी...!
मला, काही कळायलाच तयार नाही. माझ्या डोक्यात, फक्त गोंधळ चालला होता. काय विचारावं, कसं विचारावं मला तर काहीच समजत नव्हतं. शेवटी, माझ्या मनात नसतानाही. तिच्याशी थोडावेळ गप्पा मारून जड पावलांनी मी तिथून निघून गेलो.
बाहेर जाताना.. मी पुन्हा एकदा, तिच्याकडे वळून पाहिलं. पाणावलेल्या डोळ्याने, ती माझ्याकडे पाहत होती. मी सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी समजण्या इतपत मोठा तरी कुठे होतो..?
दोन एक महिन्यांनी, अचानक शर्मिला आमच्या घरी आली. मी, तिला पाहून पुरता चक्राऊनच गेलो होतो. माझ्या आनंदाला काही पारावारच उरला नव्हता. आमच्या घरच्यांनी, तिचं खूप आदर तिथ्य केलं. आमच्या घरी, ती तब्बल दोन दिवस राहिली होती. त्या दोन दिवसाच्या काळात, मी तिच्याशी मन भरून गप्पा मारल्या. आमच्या घरच्यांना, बहुतेक तिची " कर्म कहाणी " माहित असावी. त्यामुळे, आमच्या घरातील कोणीच तिच्यासमोर तिच्या 'बाळाचा' विषय काढत नव्हतं.
दोन दिवसांनी, आमच्या येथील पाहुणचार उरकल्या नंतर. माझे मोठे बंधू, तिला दिल्लीच्या रेल्वेमध्ये बसवून आले. जाताना, तिने माझ्या गालावरून फिरवलेल्या तिच्या कोमल हाताचा स्पर्श. मला, आजून सुद्धा आठवणीत आहे..!
त्यानंतर, आजतागायत शर्मिला मला कधीच भेटली नाही. आज.. मी, खूप मोठा, आणि जाणता सवरता सुद्धा झालोय.
मला, आता समजतंय. कि, नेमकी काय परिस्तिथी होती...?
तिने, तसं का केलं असेल. ते, मला माहित नाही.
कारण..
'शर्मिला'.. एक, " सरोगेटेड मदर " होती..!
आज शर्मिला कुठे असेल ? कशी असेल ? किंवा, असेल कि नाही ? ते मला काही सांगता येणार नाही. आणि, ती जरी या जगात आसली. तरी, तिच्या, बाळाशीवाय 'ती' जगू शकत असेल का..?
ह्या गोष्टीला, आता बरीच वर्षं उलटलीत. तरी सुद्धा, हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो.
मी, तिच्यासाठी फक्त एवढंच म्हणत असतो..
शर्मिला.. तू, कुठेही असावीस. पण, सुखी असावीस..!
बस्स.....
No comments:
Post a Comment