Sunday, 7 February 2016

परवा.. माझा मुलगा आणि मी, गेलरी मध्ये गप्पा मारत उभे होतो. तितक्यात, खाली उभ्या असलेल्या त्याच्या एका मित्राने त्याला हात केला. माझ्या मुलाने सुद्धा त्याला हात केला. आणि, त्यांच्यात थोडंसं हाय बाय झालं.
तो मुलगा माझ्या काही ओळखीतला नव्हता. म्हणून, माझ्या मुलाला मी त्याबाबत विचारणा केली. तर तो म्हणाला..
आपल्या इथे, शेजारील इमारतीत कोल्हापूर जवळील खेडेगावातील काही बेचलर मुलं रहायला आली आहेत. त्यात हा सुद्धा असतो
चेहेऱ्यावरून, मला तो मुलगा थोडासा गरीब स्वभावाचा आणि गरीब सुद्धा वाटला. म्हणून, माझ्या मुलाला मी म्हणालो. " खूप गरीब दिसतोय रे तो मुलगा..! "
तर माझा मुलगा म्हणाला.. " तुम्ही स्वभावाने म्हणताय, कि पैश्या पाण्याने म्हणताय..? "
मी म्हणालो.. पैश्या पाण्याने रे.
तर म्हणाला.. नाही हो पप्पा, कोल्हापुर शेजारील गावामध्ये त्यांची दहा एकर जमीन आहे. सगळ्या रानात उस लावला आहे. त्याचे वडील, चांगले सधन शेतकरी आहेत. त्याने, कोणता तरी आयटीआय ट्रेड केला आहे. म्हणून, तो जॉबसाठी पुण्यात आला आहे.
मी माझ्या मुलाला म्हणालो. एवढी मोठी शेती करायची सोडून. हा कशाला इकडे हात काळे करायला आलाय..?
तर त्यावर माझा मुलगा मला जे म्हणाला.. ते ऐकून मी फारच अचंबित झालो.

म्हणाला.. पप्पा, त्यांच्या इथे, शेती करणाऱ्या मुलाशी कोणतीही मुलगी लवकर लग्न करायला तयार होत नाही. काही मुलीकडची लोकं तर, मुलगा शेती करतो असं समजल्यावर अगदी घराच्या उंबरठ्यावरून परत निघून गेले आहेत. असं सुद्धा तो म्हणाला. पुण्या मुंबईत नोकरी करणाऱ्या मुलांना, लगेच मुलगी मिळते. निव्वळ, ह्या एका कारणामुळे तो पुण्यात कामाला आला आहे. नाहीतर, त्याच्या घरचं जळता जळणार नाही. इतका गडगंज आहे तो..

ऐकावं ते नवलच. पुण्यातली मुलं असं काय कमवत असणार आहेत. शेतकऱ्याच्या आमदनी समोर, सगळेच फिके पडतील असा माझा तरी विश्वास आहे.

" शहरातल्या मुलींना, खेडेगावातला मुलगा नको. तर, खेडेगावातल्या मुलींना नवरा म्हणून शहरातला मुलगा हवा आहे. खेडेगावातल्या मुलांना, खेड्यातली मुलगी नको. तर त्यांना शहरातली मुलगी हवी आहे..! "

काय विचित्र परिस्तिथी निर्माण झाली आहे ना.
हल्लीची तरुण पिढी, ह्या भयंकर भुलभुलैय्या मध्ये पुरती गुरफटून गेली आहे. शेवटी, तीळा तांदळाच्या गाठी जिथे बांधल्या गेल्या आहेत. तिथेच आपलं भविष्य घडणार असतं. पण ह्या महासागरातून प्रत्येकाला पोहत जावच लागतं. हे, त्रिकालाबाधित सत्य आहे.

पण साधा विचार करण्याची गोष्ट आहे. शहरातला मुलगा महिन्याला लाखो रुपये कमवेल. पण, शेतकऱ्याने धान्य पिकवले तरच तो सुखाचे दोन घास खाईल ना. कि, ते लाखो रुपये खाऊन तो जगणार आहे. किंवा, शेतकरी मुलासोबत लग्न केलं तर, स्वतः पिकवून खाता तरी येईल. कारण, हे सगळं काही चाललं आहे. ते निव्वळ आपल्या पोटासाठी. त्यालाच भरपेट खायला मिळालं नाही. तर त्या पैश्याला काय आग लावायची आहे का..?
मी तर म्हणतो, हल्लीच्या जमान्यात ज्या व्यक्तीकडे एखादा एकर जरी शेती असली. तर तो व्यक्ती, शेती करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करू शकतो. दुर्दैवाने,आमच्याकडे वडिलोपार्जित शेतीवाडी नाहीये. आणि, शेती विकत घेण्या इतपत मी श्रीमंत देखील नाहीये. त्यामुळे, चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाही. नेमकी अशातली गत होऊन बसली आहे.

मला वाटतंय, हा समतोल कुठेतरी ढासळत चालला आहे. खेड्यातील मुलांनी आधुनिक शेती करून फळबागा रुजवणं फार महत्वाचं आहे. शेती ह्या विषयात अत्याधुनिकीकरण करून, त्या विषयाला हायटेक केलं गेलं पाहिजे. शेतीत काबाडकष्ट न करता, सगळं काही यंत्रवत आणि विना कष्टाचं काम कसं करता येयील. याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे.
मुलीचे आईवडील शेतकरी असतील, तर त्या घरातील मुलींना सुद्धा शेतातील छोटी मोठी कामं करावीच लागतात. त्यामुळे, साहजिकच त्या मुलीची अशी इच्छा असते. कि, किमान आपला नवरा तरी शेतकरी नसावा. नाहीतर, संपूर्ण आयुष्य शेतीमध्ये भांगलनी करण्यात खर्ची घालावं लागेल. परंतु त्याच ठिकाणी, सर्व यंत्रनांनी सुसज्ज असा प्रगतशील शेतकरी असेल. तर ती मुलगी सुद्धा, हौसेने त्या शेतकऱ्या सोबत लग्न करायला राजी होईल. एवढंच काय, शहरातील मुली सुद्धा लग्नासाठी त्यांना प्रथम प्राधान्य देतील. असा मला विश्वास आहे..!

No comments:

Post a Comment