Thursday, 20 September 2018

उद्या सुद्धा काश्मीरमध्ये बंद पुकारला असल्याने, आमचे धाबे अगदी दणाणून गेले होते. जेवण उरकून पटकन झोपी जाऊयात. आणि सकाळी लवकर उठून या गावातून कधी एकदाचे बाहेर पडतोय, असं झालं होतं. रूमवर जाऊन फ्रेश होऊन आलो, आणि हॉटेलमध्ये जेवायला बसलो. आज श्रीनगरमध्ये जरा मांसाहारी पाहुणचार घेऊयात असा विचार केला. आणि आम्हाला सात आठ जणांसाठी आम्ही चिकन थाळ्या मागवल्या.
आणि काय सांगावं, त्या चिकन थाळीमध्ये.. डाळ, भात, चपाती, भाजी, पापड, लोणचं, कांदा, लिंबू आणि त्यासोबत एका मोठ्या वाडग्यात चिकन आणि रस्सा दिला गेला होता. त्यांना आम्ही विचारलं.. हा नेमका काय प्रकार आहे.? मांसाहारी थाळी मागवल्यावर यात व्हेज पदार्थ का दिले आहेत.? तर म्हणाले, आमच्या इथे असच असतं. कोणत्या भागात हॉटेलमध्ये कसं वेड्यात काढतील, ते काही सांगता येत नाही. शेवटी आम्ही जेवायला सुरवात केली, ते चिकन सुद्धा अगदी जून कोंबडीचं असल्याने, ते नीट शिजलं सुद्धा नव्हतं. शेवटी जमेल तसं जेवण केलं, निम्मं अर्धं उष्टं सोडलं आणि तडक रूमवर निघालो.
जाताना तो हॉटेलवाला आम्हाला सांगत होता,
कोणी पाहू नये म्हणून.. " पत्थरबाज लोग सवेरे सवेरे हमला कर देते है " इसलिये सुबह संभलके जाईये..! त्याचं म्हणनं ऐकून घेतलं, रूमवर गेलो.. उद्या सकाळी लवकर उठायचं असल्याने पटकन झोपी सुद्धा गेलो.
पहाटे चार वाजताच आमची लगबग सुरु झाली, सगळी आवराआवर करून पाच वाजता आम्ही हॉटेलच्या खाली आलो. सगळं सामान गाड्यावर लादलं गेलं, बाहेर गाड्यापाशी आलो, तर तिथे काही व्यापारी अगदी झुंडीने जमा झाले होते. बाईकवर, मारुती व्हॅनमध्ये, त्यांनी भरभरून माल आणला होता. अगदी दीडशे दोनशे रुपयाला चांगले स्वेटर, शाली ते विक्री करत होते. आणि हे सगळं विक्री करणारी मुलं अगदी जवान, शिक्षित आणि चिकणी चोपडी होती. भयंकर बेकारी आणि बेरोजगारी, त्यात या बंदचा अडथळा.. लोकांनी जगायचं तरी कसं.? त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना जमेल तितका रोजगार दिला.
आम्ही सर्वांना खरेदीसाठी सूट दिली खरी, पण आता बाकी कमाल झाली, सहा वाजत आले होते. आणि लोकांची खरेदी काही आटोपत नव्हती. शेवटी कसबसं आम्ही सगळ्यांना जबरदस्ती गाड्यात कोंबलं. आणि पुढील प्रवासाला निघालो.
सकाळची वेळ.. आल्हाददायक वातावरण होतं. नुकतीच रिमझिम पावसाला सुरवात झाली होती. हळूहळू पावसाने त्याचा जोर वाढवला, आमच्या गाड्या जम्मूच्या दिशेने निघाल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा.. अगदी मुंग्या सारखं सैनिक होतं. अतिरेकी या फालतू आणि नको त्या विषयामुळे, सैनिक लोकांना भर पावसात रेनकोट घालून हातामध्ये अत्याधुनिक शस्त्र घेऊन त्या रस्त्यावर पायी पेट्रोलिंग करावं लागत होतं. काही ठिकाणी विशिष्ट आकाराच्या सैनिकी गाड्या, ज्यावर फार मोठ्या स्टेनगण घेऊन काही सैनिक चहूकडे नजर फिरवत खडा पहारा देत होते. खरच हे सगळं पाहून भारतीय जवानांचं मला खूपच कौतुक आणि अभिमान वाटत होता.
तर या फालतू टेन्शनमध्ये त्यांना विनाकारण त्रास भोगावा लागत आहे. याचं दुखः सुद्धा वाटत होतं. श्रीनगर सोडून आम्ही आता साठ सत्तर किलोमीटर पुढे आलो होतो. खरं तर.. नेहरू बोगदा ओलांडल्या शिवाय थांबायचं नाही, असं आम्ही ठरवलं होतं. पण लघुशंका आणि चहा पाण्यासाठी आम्हाला एका ठिकाणी थांबावंच लागलं.
तिथे असणाऱ्या धाब्यावर आम्ही गेलो, त्या धाब्याच्या बाजूला, अक्रोड आणि इतर सुका मेवा विक्रीची दुकानं होती. श्रीनगरमध्ये म्हणावी अशी मनमोकळी खरेदी करायला न मिळाल्याने, सगळी लोकं पुन्हा तिथे खरेद्या करायला लागले.
आम्ही हॉटेलमध्ये जाताना, तिथे एक बंदूकधारी फौजी त्या हॉटेल वाल्याला काहीतरी धमकावत होता. माझ्या समोर तो फौजी त्याला म्हणाला.. जास्ती नाटकं करू नकोस, हिशोबात राहा, नाहीतर तुझ्या XXX गोळ्या घालील.
नेमका काय प्रकार झाला होता ते समजलं नाही. पण नक्कीच काहीतरी आक्रीत घडलं असणार आहे. त्याशिवाय तो जवान त्याच्यावर येवढा चिडला नसणार.
त्या ढाब्यावर.. आलू पराठा आणि मॅगी असे दोनच पदार्थ मिळत होते. दोन्ही पदार्थ पन्नास रुपयाला होते. आवडीप्रमाणे ऑर्डर दिल्या गेल्या, नाश्ता उरकला.
आणि.. बिल देताना आलू पराठा सत्तर रुपयाला आहे असं म्हणून तो हॉटेलवाला आम्हाला नाडू लागला. म्हणाला.. दही वाटी आणि लोणच्याचे वेगळे वीस रुपये होतात.
खरं तर या भागात, हा नालायकपणा नेहेमी होत असतो. याचे बरेच विडीयो मी युट्युबवर पाहिले सुद्धा होते. शेवटी आम्ही सुद्धा त्याला भिक घातली नाही. झाले तेवढेच पैसे दिले. हा हॉटेलवाला नेहेमीच प्रवाशांना असं लुटत असणार आहे. हे मला लगेच समजून आलं. आणि त्यावेळी मला एक गोष्ट आठवली.. तो फौजी याला XXX गोळ्या घालेल असं का म्हणाला असेल.?
नाश्ता उरकला.. आमच्या गाड्या आता पुढील प्रवासाला निघाल्या होत्या. पावसाची रिमझिम चालूच होती, काही वेळातच पहेलगाम फाटा आला, तो आल्यासरशी माझ्या जुन्या आठवणी उचंबळून आल्या. पहिली अमरनाथ यात्रा मी याच मार्गे केली होती. पण यावेळी मात्र, पहेलगाम मार्गे गेलेल्या लोकांना यात्रेला जायला मिळालं नव्हतं. हॉटेलमध्ये भेटलेली काही मराठी मंडळी आम्हाला सांगत होते. आम्ही सलग तीन दिवस पहाटे तीन वाजता पहेलगाम ते चंदनवाडीला जात होतो. पण यात्रा काही सुरु झाली नाही. शेवटी आम्ही नाद सोडला आणि माघारी फिरलो.
आता आज पुन्हा निघालो आहोत, यात्रा होईल अशी आशा आहे. त्यांना अमरनाथ यात्रा घडो, अशा शुभेच्छा देत आम्ही पुढे मार्गक्रमण केलं.
आता आम्ही एका घाटातून मार्गक्रमण करत होतो. तुम्हाला काय सांगू, त्या घाटात सुद्धा अगदी दूरवर मिलिटरीची लोकं पसरली होती. अतिरेकी अगदी दोनचार असतात, पण त्यांच्यासाठी हजारो लोकं कामाला लागलेली असतात. ते फक्त आणि फक्त आपल्या सुरक्षेसाठी.
काही वेळात.. घाट पार करून आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू भुयारी मार्गापाशी आलो. इथे थोडं ट्राफिक थांबवून ठेवलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बोगद्यातून एकावेळी एका बाजूनेच वाहतूक चालू ठेवली होती. हा बोगदा पास केल्यावर आम्ही जम्मूमध्ये पोहोचणार होतो. आणि खऱ्या अर्थाने, एका दहशतवादी मुलखातून बाहेर पडणार होतो.
पावसाचा जोर फारच वाढला होता, सगळा रस्ता जाम झाला होता. गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारचे बारा वाजत आले होते. पावसामुळे वेळ समजून येत नव्हती. भयंकर बेक्कार क्लायमेट तयार झालं होतं. दरीतून वाहणाऱ्या नद्या पाहून भीती वाटत होती. फारच मोठ्या आणि अक्राळविक्राळ, रुद्रावतार धारण करून त्या चिखल मिश्रित नद्या वाहत होत्या. हा ट्राफिक जाम कधी संपेल असं झालं होतं. एका जागेवर अर्धा-अर्धा तास उभं राहावं लागत होतं. त्यात काही नालायक लोकं मध्ये गाड्या घालून आणखीन जाम करत होते. शेवटी एकदाचा जाम सुटला, इथे जाम होण्याचं कारण म्हणजे, त्याभागात आता फारच मोठमोठ्या रस्त्यांची कामं अगदी वेगात सुरु झाली आहेत. फारच रुंद आणि सुरक्षित रस्त्यांची एक वेगळीच मालिका आपल्याला भविष्यात त्या भागात पाहायला मिळणार आहे.
जम्मुकडून यात्रेसाठी जास्ती वाहनं येत नव्हती. पण आता मात्र ट्राफिक सुटल्यावर मोठमोठ्या लग्झरी बसेस यात्रेकरूंनी भरभरून येऊ लागल्या होत्या. बहुतेक त्या अतिरेकी कारवायांना सरकार भिक घालत नव्हतं. असं एकुणात दिसून येत होतं.
जाम सुटल्यावर एका ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा लंगर दिसला. अमरनाथ यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे, या यात्रेला जाताना तुम्हाला हॉटेलचा खर्च होत नाही. सगळीकडे लंगर असतात, तिथे पंचपक्वान्नाचे जेवण असते. त्यामुळे उपाशी मरायचं काम होत नाही, आणि आपल्या खिशाला सुद्धा चाट बसत नाही. या लंगरमध्ये मस्त जेवण होतं, गरमागरम राजमा भात, लिंबू लोणचं आणि स्वीट मध्ये बेसन बर्फी होती. जेवण साधं होतं, पण फारच टेस्टी होतं. तिथे आम्ही जेवणं उरकली, आणि पुढील मार्गाला लागलो.
आता वातावरण थोडं निवळल होतं, पाऊस संपला होता, मस्तपैकी ऊन पडलं होतं. सगळ्यांची पोटं भरली होती, मस्त सुस्ती आल्याने सगळी गाडी आता झोपी गेली होती. आमचा प्रवास चालूच होता.. आणि अचानक समोरच्या बाजूला मला एक भूयारीमार्ग दिसला. आजवरच्या प्रवासात या ठिकाणी नेहरू टनल सोडला तर एकही भुयारी मार्ग नव्हता. तर मग हा कोणता नवीन मार्ग आला.? त्या मार्गावर फक्त शंभर रुपये टोल देऊन आमची गाडी पुढे निघाली, बोगदा सुरु झाला. खूपच अद्ययावत असा हा बोगदा होता. नाशरी ते चेनानी गावांच्या मध्ये हा बोगदा बनवला गेला आहे. प्रवासात सुरु झालेला हा बोगदा, आता संपले मग संपेल असं म्हणता तो बोगदा काही संपेना. शेवटी तब्बल नऊ किलोमीटर अंतर संपल्यावरच तो बोगदा संपला.
बापरे.. एवढा मोठा बोगदा.
हा बोगदा संपल्यावर काही वेळातच आम्ही, उधमपूरच्या अलीकडे येऊन पोहोचलो होतो. या बोगद्यामुळे आजच्या प्रवासातील आमचं तब्बल चाळीस किलोमीटरचं अंतर वाचलं होतं. म्हणजे जवळपास दीड ते दोन तासाचं अंतर, दहा मिनिटांत कव्हर झालं होतं. आमचा ट्राफिक जाम मध्ये मगाशी वाया गेलेला वेळ, असा भरून निघाला होता. हे लिहिताना मला फार आनंद होत आहे, कि भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे एक नंबरच्या आणि जगातल्या सर्वात मोठ्या नऊ नंबरच्या बोगद्यातून आम्ही आज प्रवास केला होता. आणि काही वेळातच.. आम्ही उधमपूर येथे येऊन पोहोचलो होतो. इथून पुढे वैष्णोदेवी येथे जाण्यासाठी आम्हाला फक्त पासष्ठ किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार होतं. रस्ते अगदी सरळसरळ असल्याने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू असा अंदाज होता.
उधमपूर वरून आम्ही पुढे निघालो होतो.. तर या मोठ्या बोगद्यातून जम्मूला जाण्यासाठी आणि तिथे असणाऱ्या जकात किंवा टॅक्स एन्ट्री भरण्यासाठी वाहनांची भलीमोठी रांग मला दिसून आली. मी पाहत बसलो होतो, पण ती रांग काही संपता संपत नव्हती. खोटं सांगत नाही, तब्बल पाच ते सहा किलोमीटर लांबीची लाईन लागली होती. हजारो गाड्या लाईनीत उभ्या होत्या. मनात विचार आला, या गाड्या रात्री सुरु झाल्यावर कसलं मोठं ट्राफिक जॅम होईल.
आमचा प्रवास सुरूच होता.. आणि पुढे एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो. तिथे चौकशी केल्यावर समजलं, जम्मूला मस्त वातावरण आहे. दर्शन मस्त होऊन जाईल. खरं तर उद्या संध्याकाळी आमची परतीची तिकिटं होती. मग देवीचं दर्शन घेऊनच पुढे जाउयात असं ठरलं. तसं तर आमच्या प्रवासात हे ठिकाण सुद्धा होतंच. पण मागील प्रवासात काही अडचण आलीच, तर एखादा दिवस शिलकी असावा म्हणून आम्ही हि तजवीज करून ठेवली होती. आमच्या गाड्या आम्हाला जम्मूला सोडणार होत्या, त्यांना आम्ही गाड्या वैष्णोदेवी कटरा येथे घ्यायला लावल्या. तिथे पोहोचल्यावर.. चांगलं हॉटेल पाहून आम्ही रूम बुक केल्या. सगळं सामान गाडीतून उतरवून घेतलं. ड्रायव्हर लोकांना त्यांची बक्षिशी दिली. आणि त्यांचे आभार मानत त्यांना अलविदा केला.
समाप्त..

Wednesday, 19 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २४ )


काही वेळातच आम्ही श्रीनगरच्या भूमीत दाखल झालो. पहिलं आम्हाला गाडीचं काम करून घ्यावं लागणार होतं. त्यामुळे आम्ही बायपासने न जाता, सिटीमधून निघालो. तर आतमध्ये सगळीकडे जागोजागी.. रस्त्यावर, शेतामध्ये, घरांच्या छतावर, दुकानात, टेरेसवर बिल्डिंगच्या गॅलरीत सगळीकडे बंदूकधारी शिपाई दिसून येत होते. सगळ्या श्रीनगर शहराला मिलिटरी छावणीचं स्वरूप आलं होतं. पुन्हा काहीतरी गडबड झाली असावी हे आम्हाला लगेच समजून आलं. खरं तर, या गावात येण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. पण शेड्युल ठरल्याप्रमाणे प्रवास करावा लागणार होता. म्हणून काहीच बोलता येत नव्हतं. शेवटी श्रीनगर सिटीमध्ये रस्त्यावर पाटा दुरुस्ती करणारं एक दुकान आम्हाला आढळून आलं. आणि आमच्या गाड्या बाजूला घेण्यात आल्या. दुपारी अकरा वाजताच उन्हाचा भयंकर चटका पडला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. गाडी कामाला लावली, किमान तासभर तरी वाया जाणार होता. पण गाडीचं काम होणं महत्वाचं होतं. आम्ही इथवर सुखरूप आलो, तीच आमच्या गाडीची मेहेरबानी म्हणायची.
गाडीचं काम सुरु झालं.. महिला, पुरुषांना गाडीतून खाली उतरवून गाडी जॅकवर चढवण्यात आली. सगळ्या महिला त्या गॅरेजमध्ये जाऊन बसल्या. त्या गॅरेजचा मालक आणि कामगार लोकं खूप भली माणसं होती. त्यांनी सर्वांना बसायला जागा करून दिली. तोवर दुकानात जाऊन मी पिण्याच्या थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो. सर्वांना प्यायला पाणी दिलं. सगळीकडे निव्वळ भीतीचं वातावरण होतं. पण तिथे राहात असणाऱ्या लोकांना आता त्याची सवय झाली असल्याने, त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. सगळी भीती फक्त आमच्या मानगुटीवर बसलेली होती. तितक्यात एक वृद्ध व्यक्ती माझ्या बायकोपाशी आला आणि म्हणाला..
इथे मागेच माझं घर आहे, हवं तर तुम्ही माझ्या घरात जाऊन विश्रांती घ्या. आमच्या घरात सुद्धा महिला मंडळी आहेत..! परक्या भागात कोणाचं काय घ्या, पण भीतीपोटी माझ्या बायकोने त्या वृद्ध गृहस्थाला अगदी प्रेमळ नकार दिला. कोणाचं काय सांगता येतंय हो. त्यामुळे आमच्या महिलांनी हि रिस्क घेतली नाही.
काहीवेळाने.. तिथेच आजूबाजूला घिरट्या घालणारा एक व्यक्ती माझ्यापाशी आला, आणि म्हणाला.
कहासे आये हो..?
मी म्हणालो.. अमरनाथ यात्रेवरून आलो आहे.
म्हणाला.. तसं नाही, तुम्ही कोणत्या भागातून आला आहात.?
मी म्हणालो.. महाराष्ट्र..!
तर म्हणाला.. मुंबई वरून आला आहात का.?
मी म्हणालो.. नाही पुण्यावरून आलो आहोत.
पुणे हा विषय तेथील बऱ्याच लोकांना खास असा माहिती नाहीये. त्यामानाने मुंबई बाकी सर्वांना माहिती आहे.
नंतर तो व्यक्ती मला म्हणाला.. तुम्ही घाबरू नका, इथे काहीही होणार नाही. तुम्ही अगदी सुरक्षित ठिकाणी आहात. त्याच्या बोलण्याचा रोख मला समजला होता. तो मला एक वेगळीच भीती दाखवू पाहत होता. पण चेहऱ्यावर उसनं अवसान आणत मी त्याला म्हणालो.
मी कशाला घाबरू..? मी काही भारताच्या बाहेर नाहीये, अजून मी हिंदुस्तानी भूमीतच आहे. माझ्या या उत्तरावर तो सुद्धा थोडा वरमला. आणि आल्या पावली माघारी निघून गेला.
नाही म्हणता श्रीनगर मधील जनजीवन अगदी सुरळीत होतं. पण अशा भीतीदायक वातावरणाची सवय नसल्याने आम्ही मात्र घाबरून गेलो होतो. तासाचे दोन तास झाले तेंव्हा कुठे आमची गाडी दुरुस्त झाली. गॅरेज वाल्याचे पैसे चुकते केले, त्याचे आभार मानले, आणि आम्ही पुढे निघालो. पुढे तर अगदी जत्रा भरावी अशी गर्दी झाली होती. बहुतेक तो बाजाराचा भाग असावा, तिथे सुद्धा मिलिटरी तैनात करण्यात आली होती. सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे नको त्या गर्दीच्या रस्त्याने आम्हाला मार्गक्रमण करावं लागत होतं. आता आम्ही दाल सरोवराच्या कडेने पुढे निघालो होतो. शेकडो एकरात पसरलेलं दाल सरोवर पाहून मी सुद्धा आवाक झालो. सगळ्या सरोवरात जलपर्णी जमा झाली होती. आणि ते काढण्याचं काम तेथील नगर निगमचे ( नगरपालिका ) कर्मचारी अगदी अत्याधुनिक यंत्राच्या द्वारे काढत होते. तर काहीठिकाणी, तीच जलपर्णी शिकार्यातून सुद्धा काढण्यात येत होती.
दाल सरोवराला फार मोठा वळसा घालून आम्ही पुढे निघालो होतो. आम्ही काश्मीरमध्ये आहोत असं मुळीच वाटत नव्हतं. मिलिटरीचा बंदोबस्त वगळला तर, तिथे अगदी पुण्या मुंबई सारखं वातवरण होतं. या अतिरेकी लोकांनी त्या स्वर्गीय भूमीची अगदी वाट लाऊन टाकली होती. शेवटी पत्ता शोधत शोधत आम्ही आमच्या मुक्काम स्थळी पोहोचलो.
आजचा लॉज फारच अडचणीच्या ठिकाणी होता. पण तिथे असणारे कामगार आमच्या मदतीला आल्याने बॅग वाहायचा आमचा त्रास वाचला. हॉटेल मस्त होतं, रूम अलिशान होत्या. रुमच्या मॅनेजरला समजलं, हि लोकं अमरनाथ यात्रेवरून आले आहेत. त्यामुळे त्यांनी आमची अगदी उचित बडदास्त ठेवली. आणि आम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना दिली, आज श्रीनगरमध्ये तीन अतिरेकी मारले गेले आहेत. त्यामुळे तुम्ही जरा सावधान होऊन फिरायला जावा. कधीही काहीही घडू शकतं. दुपारचे दोन वाजले होते. सगळ्यांनी आवराआवर केली, जेवण करण्याचा विषय नव्हता. लंगर मध्ये सगळे भरपेट जेऊन आले होते. त्यामुळे सुस्तावून सगळ्यांनी आपली अंगं बेडवर टाकली.
दुपारी चार वाजता आम्हाला बाहेर पडायचं होतं. पण थोडा उशीर झाला, आणि बघता बघता पाच वाजले. सगळ्यात पहिलं आम्हाला.. तिथे असणाऱ्या, आदि शंकराचार्य यांच्या मठात आणि मंदिरात जायचं होतं. पण हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेल्यावर तेथील मालक म्हणाला. ते मंदिर साडेपाच वाजता बंद होतं. येवढ्या लवकर मंदिर बंद कसं होईल.? असा विचार करत आम्ही त्या मार्गाला लागलो. आणि खरोखरच.. ते मंदिर साडेपाच वाजता बंद करण्यात आलं होतं. मग नियोजित विषयानुसार आम्ही शिकार्यात सैर करायला निघालो.
या शिकार्यात सैर करणं म्हणजे मला तर एक प्रकारची शिक्षाच वाटली. सैर सुरु होते न होते तोच, निरनिराळ्या शिकार्यातून काही व्यापारी मंडळी आमच्या रंगाचा बेरंग करू लागली. सुरवातीला एक ज्वेलरी वाला आला, त्याने फारच डोकं खाल्लं. शेवटी त्याच्याकडून गळ्यातील दोन माळा घेतल्या. तो जात नाही तोवर बांगड्या वाला आला, त्याला चुकवत नाही तोवर सुक्या मेव्याची आईसक्रिम घेऊन एक शिकारा आला, त्याला चुकवून पुढे गेलो तर शाल विकणारा आला, अजून पुढे गेलो तर, केसर विकणारा आला. या सगळ्यांनी अगदी नको करून सोडलं होतं. नाही, नको म्हणून तोंड अगदी दुखून आलं होतं. त्या शिकाऱ्या वाल्याला सुद्धा काहीतरी कमिशन ठरलं असल्याने, ती लोकं आल्यावर तो शिकारा अगदी हळूहळू चालवायचा.
त्या सरोवरातून काही महिला आणि पुरुष त्यांच्या स्वतःच्या शिकार्यातून आपल्या घरी येजा करताना सुद्धा दिसत होते. एकंदरीत मस्त माहोल होता, शेवटी एक केसर वाला दोनशे रुपायचा नकली केसर माझ्या गळ्यात मारून गेलाच. तासाभरात शिकारा राईड संपली. आणि आम्ही मुघल गार्डनमध्ये गेलो. हे गार्डन मला म्हणावं इतकं खास वाटलं नाही. पण पुरतान वारसा आणि जुन्या काळातील पाण्याच्या जोरदार फोर्सने उडणारे कारंजे आणि तिथे असणारी विविध प्रकारची फुल झाडं पाहून माझं मन सुखावलं. आणि मुघल राज्यकर्ते त्या काळात सुद्धा किती एन्जॉयमेंट करत असतील, या विचारात मी गढून गेलो. ही सगळी फिरस्ती आटोपून संध्याकाळी आठ वाजता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो.
बसच्या खाली उतरल्यावर.. एक काश्मिरी व्यक्ती त्याच्या लहान मुलासोबत माझ्या जवळ आला, अगदी पाच सव्वापाच फुट उंची, दिसायला गोरागोमटा, हनुवटीवर मुसलमानी दाढी, डोक्यावर मुसलमानी टोपी, अंगात पांढऱ्या रंगाचा काश्मिरी पोशाख, आणि अगदी हसतमुखाने तो मला म्हणाला. भाईसहाब कहासे आये हो.?
मी त्याला सांगितलं पुण्यावरून आलो आहे. तर म्हणाला.. तुमचा भाग खूप चांगला आहे. तुम्ही लोकं तिकडे अगदी आनंदात जगत आहात. हे काय.. या माझ्या मुलाचा मामा सुद्धा औरंगाबाद मध्ये असतो. त्याचं बोलणं चालू असताना मला विनाकारण वाटत होतं. कि हा मला काहीतरी पैशाची गळ वगैरे घालेल कि काय.? पण तसं काही घडलं नाही, तो मला म्हणाला. माझी सासूबाई या खैबर हॉस्पिटल मध्ये एडमीट आहे. आजच्याला पुन्हा तीन अतिरेकी मारले गेलेत. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा श्रीनगर बंद असणार आहे. राजकारणी लोकांनी आपल्या पोळ्या भाजण्यासाठी सर्वसाधारण जनतेला अगदी वेठीस धरलं आहे. आम्हाला तर इथे राहावं सुद्धा वाटत नाही. पण काय करणार मजबुरी आहे. आणि म्हणाला.. गेल्या आठवड्यात सुद्धा एक बंद पुकारला होता. त्यावेळी या समोरच्या हॉटेलमध्ये आम्हाला दाल चावल मिळाला होता. मी आणि माझं कुटुंब पूर्ण शाकाहारी आहे, त्यामुळे उद्या सुद्धा आम्हाला इथे जेवण मिळेल का.? त्याची चौकशी करायला आलो होतो. असं म्हणून तो बुटकासा दाढीदारी मनुष्य त्याच्या मुलाला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने चालता झाला.
( दाल सरोवरची सफर पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. )
क्रमशः


#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २३ )
=====================
रात्रीचे आठ वाजले होते.. खरेद्या आटोपल्या आता पटकन जेऊन येउयात असा विचार केला. तितक्यात काहीतरी सूचना मला ऐकू आली. गडबडीमुळे नीट ऐकू येत नव्हतं. म्हणून मी अगदी जवळ जाऊन ऐकलं. बापरे.. एक मोठी समस्या समोर उभी ठाकली होती. तिथे लाउडस्पीकर वर एक सूचना देत होते.
आजच्याला बालताल मध्ये असणाऱ्या सर्व यात्रेकरूंनी उद्या सकाळी सहा वाजायच्या आत येथून रवाना झालं पाहिजे. नाहीतर तिथून पुढे कोणालाही बाहेर सोडलं जाणार नाही. सकाळी सहा वाजता निघायचं म्हणजे, पुन्हा पहाटे चार वाजता उठणं आलं. कारण दोन तीन दिवसांचा फार मोठा फ्लो तिथे जमा झाला होता. जो तो निघायच्या गडबडीत असणार, त्यामुळे ट्राफिक जाम होणार. आणि वेळेत बाहेर पडलो नाही, तर.. पुढील नियोजन ढासळत जाणार. हा सगळा विचार मनात एकाचवेळी येऊन गेला. तसं आम्ही सर्वांना या विषयाची सूचना दिली. आणि सगळे जन पटापट लंगरमध्ये जाऊन जेवणं करून आली. तंबूमध्ये आल्यावर, सगळं सामान आपापल्या बॅगमध्ये व्यवस्थितपणे भरून घेतलं. आणि आल्या सरशी सगळी लोकं निद्रा देवीच्या स्वाधीन झाले.
सकाळ झाली.. आज उठायला नेमका उशीर झाला, पहाटेचे पाच वाजले होते. आता अंघोळ करायच्या भानगडीत कोणी पडणार नव्हतं. कारण..सहाच्या पुढे वेळ गेली, तर आजचा मुक्काम इथेच करावा लागणार होता. मुखमार्जन करून आम्ही आमच्या बॅग्स घेऊन तडक पार्किगच्या दिशेने निघालो. सगळीकडे एकच धावपळ सुरू होती. जो तो इथून बाहेर पडायच्या घाईत होता. सगळा रस्ता जाम झाला होता. आमच्या गाड्या गर्दीमध्ये अडकल्या होत्या. कालच्याला राकेश नामक ड्रायव्हरला आम्ही या विषयाची सूचना दिली होती. त्यावर तो म्हणाला होता, तुम्ही काही काळजी करू नका आज रात्रीच आम्ही सगळं सामान गाड्यावर लादून ठेवतो. तुमच्याकडे असणारं सामान तुम्ही गाडीत घेऊन बसा. पण इथे येऊन पाहतो तर काहीच तयारी झाली नव्हती, ड्रायव्हर लोकं आत्ताशी झोपेतून उठली होती. गाडीवर चढून ते सगळं सामान आता बांधावं लागणार होतं. आणि त्या घाईमध्ये आमचा ड्रायव्हर आमच्या लोकांवर खेकसायला लागला, आता बाकी माझा संयम सुटला होता. मग बाकी मी त्याला कचाकच शिव्या द्यायला सुरवात केल्या. तसा तो थोडा नरमला. मग त्या राकेश नामक ड्रायव्हरला सुद्धा झापला, तसा तो थोडा सारवासारवी करायला लागला. त्याला पण दोनचार शिव्या घातल्या. माझा मेहुणा मला दाबायला लागला. म्हणाला अजून बराच प्रवास बाकी आहे. सकाळी सकाळी कटकट नको, त्यामुळे मी थोडं आवरतं घेतलं
शेवटी.. काहीवेळात सगळं सामान गाडीवर लादून झालं. गर्दीमधून वाट काढत आमच्या गाड्या बाहेर निघाल्या, सकाळचे सव्वासहा वाजले होते. मिलिटरीच्या लोकांनी तासभर सवलत वाढवली होती. सात वाजता सगळा बाजार बंद करून टाकणार होते. शेवटी अगदी पाऊणे सात वाजता आम्ही तेथून बाहेर पडलो. पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी शंभोच्या नावाचा जयकारा केला. आणि आमच्या गाड्या श्रीनगरच्या दिशेने रवाना झाल्या.
बालताल ते श्रीनगर हे फक्त सत्तर किलोमीटरचं अंतर होतं. त्यामुळे हे अंतर अगदी तीन तासात संपणार होतं. त्यानंतर आजच्याला तेथील प्रमुख ठिकाणं पाहून आजचा मुक्काम श्रीनगर येथे करून उद्याच्याला आम्ही जम्मूला निघणार होतो. बालताल पासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर चाहापानासाठी आम्ही थांबलो. तिथे आमच्या ड्रायव्हरला सकाळी मी त्याच्यावर का ओरडलो ते सांगितलं. त्यावर तो म्हणाला, माझ्या सहकाऱ्याने मला काल हे काहीच सांगितलं नव्हतं. मग थोड्यावेळाने त्या दोघात हमरीतुमरी झाली. शेवटी तो विषय मिटवता घेतला. आणि आम्ही चहापान केलं. तो राकेश नामक ड्रायव्हर आमच्या गाडीच्या मागील बाजूस जाऊन काहीतरी पाहू लागला. तसा आमचा ड्रायव्हर त्याच्यावर खेकसला आणि म्हणाला.. तू माझ्या गाडीची चेकिंग करू नकोस. तुझ्या गाडीचं बघ. पण राकेश पाहत होता तो विषय फार गंभीर होता. आमच्या गाडीच्या मागील पाट्याचा नट कट होऊन बाहेर आला होता. हे वेळीच पाहिलं नसतं, तर पुढे काहीही घडू शकलं असतं. आता पाट्याचं दुकान पाहून आम्हाला पहिलं हे काम करून घ्यावं लागणार होतं. तो नट थोडा आतील बाजूस ढकलून कामचलाऊ पद्धतीने आम्ही हळूहळू प्रवासाला सुरवात केली. पुढे गेल्यावर मिलिटरीच्या हद्दीमध्ये एक लंगर होता. तिथे जेवायला अगदी पंच पक्वान्न होती. तिथे जाऊन भरपूर पोटोबा केला. आणि पुढील मार्गाला लागलो.
क्रमशः


#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २२ )
=====================
परतीचा प्रवास सुद्धा म्हणावा इतका सोपा नव्हता.. आता सगळा उतार असल्याने, घोड्यावर बसताना पाठ आणि कंबर अवघडून येत होती. कारण.. उतार आल्यावर मागे रेलून बसावं लागायचं, त्यामुळे फार त्रास व्हायचा. शिवाय उताराला घोडे सुद्धा फार घसरतात मनात ती भीती सुद्धा होती. परतीच्या प्रवासात.. एका ठिकाणी एक घोडं फार थकल्याने आजारी पडून यात्रेकरूला घेऊन खाली बसलं, ते पुन्हा काही उठलं नाही. त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न झाला.
पण त्याने ताबडतोब डोळे पांढरे केले, आणि.. सगळं अंग ताठ केलं. अशारितीने एक घोडं अगदी माझ्या समोर मेलं. फार वाईट वाटत होतं, त्या लोकांप्रमाणे हे घोडे सुद्धा या भागात जन्माला येऊन फार मोठा पश्चाताप सहन करत असतील. वर्षातून चारच महिने काम असतं. पण या घोड्यांना सुद्धा हे काम अगदी गधा मेहेनत वाटत असेल. लोकांची गोष्ट निराळी आहे. मुक्या जनावराला काय बोलता येतंय होय. तरी सुद्धा, काही लोकं आपल्या घोड्याची खूपच काळजी घेत होते. परतीच्या प्रवासात काहींना सवारी मिळाली नाही. म्हणून ते स्वतः घोड्यावर बसून येत नव्हते. त्या घोड्यासोबत ते सुद्धा चालत निघाले होते.
मजल दरमजल करत शेवटी एकदाचे आम्ही बालताल येथे येऊन पोहोचलो. संध्याकाळचे पाच वाजले होते. आणी आभाळात अचानक ढग दाटून आले. ढग दाटून काय आले, आणि पावसाला सुरवात सुद्धा झाली. हे एकेक भला मोठा गोटी सारखा थेंब. एकतर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून बरच उंच असल्याने तो थेंब खूपच जोरात अंगावर धडकत होता. आणि त्याचा मार सुद्धा खूप लागत होता. आम्ही प्रत्येकाने घोडेवाल्याचा हिसाब चुकता केला. त्यांना बक्षिशी सुद्धा देऊ केली. एकवार मी घोड्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, ईश्पाकच्या हातात हात दिला, आणि पुढे चालता झालो. पाऊस आला तसा आम्हाला भिजवून परत निघून गेला होता. आम्ही घोड्यावरून प्रवास केला होता, तरी सुद्धा आम्ही फार दमलो होतो. मग चालत गेलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल.? तरी नशीब, आम्ही अमरनाथ येथे असताना पाऊस आला नाही. पण वरील भागात आता बराच पाऊस दिसून येत होता. मागे राहिलेल्या यात्रेकरूंना परतीच्या प्रवासात तो नक्कीच झोडपून काढणार होता.
सगळे जन आपापल्या तंबूकडे निघाले होते. सकाळपासून आमच्या पोटात जास्ती काही भर नव्हती. मग वाटेत असणाऱ्या लंगरमध्ये आम्ही थोडी पोटपूजा केली. आजच्याला लंगरमध्ये.. आलू रगडा, रगडा पेटीस, आलू चाट, मेगी, उत्तप्पा, मसाला डोसा अशा चटकेबाज आणि चवदार नाश्त्याची सोय केली होती. सर्वांनी गरमागरम असा पोटभर नाश्ता केला. आणि तंबूत जाऊन सगळे निवांत पसरले. अगदी दहा मिनिटात जवळपास सगळेच घोरू लागले होते. कारण काल कोणाचीच झोप झाली नव्हती. आम्ही दोघे तिघे वगळता बाकी सगळे झोपी गेले होते. मला तर बिलकुल झोप येणार नव्हती, कारण.. आत्ता झोपल्यावर मला रात्री झोप येणार नव्हती. रात्री जेवण करून, सकाळी दहा वाजेपर्यंत मस्त ताणून देऊयात. अशा विचारात मी होतो. माझ्यासोबत आमचा एक मित्र सुद्धा झोपला नव्हता. त्याला मशेरी लावायची सवय ( व्यसन ) आहे. तो मशेरी लावायला बसला, कि अगदी दोन तीन तास मशेरी लावत असतो.
तेवढ्यात तिथे.. कपडे, स्वेटर आणि शाली विकणारे काही व्यापारी आले. काल त्यांना आमच्या महिला म्हणाल्या होत्या. कल शामको आओ, कल लेगे..!
हे वाक्य ध्यानात ठेवत, ते महिला मंडळींच्या येण्याची वाट पाहत होते. पण सगळ्या महिला झोपल्या होत्या, त्या काही लवकर उठणार नव्हत्या. इकडे माझ्या मित्राची मशेरी लावणं चालू होतं. तब्बल दोन तास झाले तरी याचं मशेरीकाम चालूच होतं. शेवटी तो शाल विक्रेता सुद्धा त्याला म्हणाला. आज पहेली बार देखा जनाब.. इतना देर भी कोही मंजन करता होगा..?
आमचा तंबू असणाऱ्या ठिकाणी, उद्याच्या दर्शनासाठी आज एक नवीन ग्रुप आला होता. ती मंडळी दक्षिण भारतातून अमरनाथ यात्रेला आली होती. त्यांना हिंदी बोलता येत नव्हती. त्यातील एक महिला माझ्याशी कानडी भाषेत काहीतरी बोलू लागली. मी तिला थांबा म्हणून हाताने इशारा केला, आणि आमच्या सोबत असणाऱ्या एका साऊथ इंडियन व्यक्तीला बोलावून घेऊन आलो. त्या दोघांचा आपसात काही वार्तालाप चालू होता. ते पाहून त्या तंबू वाल्याच्या मनात शंका आली. कि आमचा व्यक्ती त्यांना सगळं सगळं काही समजावून सांगत आहे. कि इथे कशी फसवणूक वगैरे होते. किंवा घोड्याचे दर वगैरे किती आहेत, त्याची माहिती देत असावा. त्यामुळे त्यांनी मला बाजूला घेऊन अगदी दमात घेऊन सांगितलं. त्या व्यक्तीला सांगा त्या लोकांना काही माहिती वगैरे देऊ नका. नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल. शेवटी मी त्या व्यक्तीला याबाबत विचारणा केली. तर तो म्हणाला.. आमच्या फक्त नॉर्मल गप्पा चालू आहेत. तसला काहीही विषय नाही. त्यावेळी त्यांना जरा हायसं वाटलं, आणि म्हणाले.. इतना एकही सीजन होता है हमारा.. फिर सालभर कुछ नही मिलता. इसलिये हमारे आडे कोही आया.. तो हम उसे छोडते नही. अशी दमदाटी पाहून मी सुद्धा दचकून गेलो होतो. खरं सांगतो.. हि यात्रा दोन तीन वर्ष बंद केली पाहिजे. उपाशी मारलं पाहिजे त्या हरामखोर लोकांना. तेंव्हा त्यांची अक्कल ठिकाणावर येईल.
रात्री आठ वाजता.. अगदी बळे बळेच सगळे झोपेतून उठले. तर बाहेर हे व्यापारी बसले होते. महिला थोड्या फ्रेश झाल्या, आणि त्यांनी हवी ती खरेदी केली. अगदी घासाघीस करून खरेदी चालू होती. माल तसा काही स्वस्त नव्हता. पण इतका वेळ थांबले आहेत, म्हणून त्यांना कोणी नाराज केलं नाही. तरी नाही म्हणता, वीसेक हजार रुपयांची विक्री झाली होती. बाकी त्या व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेला मी मनोमन सलाम केला. तीन तास कसलीही कुरबुर न करता ते त्यांची वाट पाहत बसले होते. तीन तासानंतर माझ्या मित्राचं मशेरीकाम संपल्यावर, माझ्या सोबतच त्या व्यापाऱ्याने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला..!
क्रमशः