Saturday, 15 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २१ )
=====================
पायी चालणारी लोकं चालून अगदी थकून गेली होती. ते अगदी आशाळभूत नजरेने घोड्याकडे पाहत होते. पण पैशा अभावी म्हणा, किंवा काहींची चालत जाण्याची इच्छा असल्याने म्हणा. ते आपली भावना आपल्या मनात मारून पुढे निघाले होते. आकाशात हेलिकॉप्टरच्या फेऱ्या सुरूच होत्या. आता फारच अरुंद आणि खडकाळ रस्ता सुरु झाला होता. वाटेमध्ये पाणी आणि फ्रुटी विकणारे काही लोकं आढळून येत होते. पोटासाठी इथे फारच वणवण करावी लागते. एकेठिकाणी पाण्याचा प्रवाह आला, तिथे आमच्या घोड्यांनी पोटभर पाणी प्यालं. मगाशी घेतलेल्या विसाव्यात त्यांना दाणा मिळाला होता. पाणी पिल्यावर घोडे पुढे निघाले. घोड्याचं अंग सुद्धा भयंकर तापलं होतं. त्यांच्या अंगातून वाफा बाहेर पडत होत्या. त्यांच्या अंगाला घाम सुद्धा आला होता. चालताना घोडे टराटर पादत आणि हागत होते. जनावारची हि अवस्था होते, तर मग चालत जाणार्या व्यक्तींना किती त्रास होत असेल याची तुम्हाला कल्पना येईलच.
बालताल मार्ग म्हणावा इतका खडतर नाहीये, पण पावसामुळे रस्त्याची वाट लागली होती. आणि रस्ते फारच अरुंद होते. काल यात्रा बंद असल्याने आज वरील बाजूने खाली येणारे घोडे नव्हते. त्यामुळे रस्त्यावर म्हणावी इतकी गर्दी नव्हती. नाहीतर आमची सुद्धा फारच तारांबळ उडाली असती. एकाच रस्त्यावरून येजा करताना घोडे एकमेकाला घासत जातात. त्यामुळे आपल्या पायांना खूपच मार बसतो. तरी बरं, त्या अरुंद रस्त्यावर लोखंडी कठडे निर्माण केले आहेत. त्यामुळे घोडे आणि संभाव्य यात्रेकरू दरीत पडण्याची भीती नसते.
इथे एका ठिकाणी फार खराब रस्ता असल्याने आम्हाला काही अंतर चालत जावं लागणार होतं. जवळच्या रस्त्याने पाण्यातून आणि खळग्यातून आमचे घोडे पुढे गेले. आम्हाला थोडा वळसा मारून पुढे जावं लागणार होतं.
आणि इथूनच पायी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा एक दुसरा पायी मार्ग उपलब्ध होणार होता. त्यामुळे घोड्याच्या गर्दीतून आता त्यांची सुटका होणार होती. जवळपास अर्धा किलोमीटर अंतर आम्ही चालून गेलो असुत. पुढे आमचे घोडे थांबले होते. त्याठिकाणी मिलिटरी कॅम्प होता. भारतीय जवानांसोबत आम्ही काही क्षण घालवले. तिथे बहुतकरून आपल्या महाराष्ट्रातील जवानाच तैनात असतात. त्यामुळे ते सुद्धा आपली अगदी आपुलकीने चौकशी करतात. त्यांच्यासोबत काहीवेळ घालवला, फोटो काढून घेतले. आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
इथे एक बरं असतं.. काही घोडेवाले यात्रेकरू लोकांना मुद्दाम त्रास देतात. अशावेळी आपण त्यांना फक्त धमकी जरी दिली.. कि, तुझं नाव फौजीला सांगू का.? कि ते लगेच जागेवर येतात. आणि आपल्याशी गोडगोड बोलू लागतात. कारण आपण कम्प्लेंट केल्यावर, फौजी लोकं त्यांना अगदी बेदम बडवतात. बिलकुल कसलीच भीडभाड ठेवत नाहीत. त्यामुळे यात्रेदरम्यान ती लोकं फौजी लोकांना फारच दचकून असतात. पुढे एका ठिकाणी फारच अरुंद रस्ता आला, आणि कडेला कठडा सुद्धा नव्हता. अशावेळी आपण कितीही धाडशी असलो तरी भीती हि वाटतेच. कारण, खाली फार मोठी दरी असते. चुकून खाली गेलं तर, राम नाम सत्य है.
घोड्यांच्या गळ्यातील घुंगरूचा मंजुळ आवाज, आणि घोडेवाल्याने त्याच्या मोबाईलवर लावलेली गाणी ऐकत माझा प्रवास चालू होता. त्याने सुद्धा नेमकं दुख्खी गानं लावलं होतं. दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है..!!
आता एक असा टापू आला, कि तिथे फारच मोठा चढ होता. आणि रस्ता सुद्धा फारच खडकाळ होता. चढ आल्यावर घोड्यावर बसलेल्या व्यक्तीने पुढे वाकून बसायचं आणि उतार आल्यावर, मागे रेलून घ्यायचं. याचं शिक्षण आपल्याला ते घोडेवाले देतात. यामुळे घोड्यांना अंगावरील वजनाचा जास्तीचा त्रास होत नाही. तर या चढावर घोडे अगदी घसरत होते, इतके गोल गुळगुळीत दगड होते. आमच्यातील एक व्यक्ती याठिकाणी घोड्यावरून खाली पडला, त्याला जबरी मार लागला. त्यामुळे बाकी सगळेजण सावध झाले. आणि आपापल्या घोड्याला घट्ट बिलगून आणि अगदी सावध बसले होते.
दरीमध्ये खालील बाजूला.. बर्फाची एक फार मोठी चादर होती. आणि त्याखालून पाण्याचा प्रवाह वाहत होता. खूपच मनमोहक असं ते दृश्य होतं. घोडे वाहतुकीच्या कामात काही बिहारी मुलांनी सुद्धा शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांचा आणि त्यांचा वाद अगदी उफाळून येत होता. ते म्हणतात ना, पोटासाठी दाही दिशा. अगदी अशातला प्रकार तिथे पाहायला मिळत होता. आमचा प्रवास सुरूच होता. दूर डोंगरावर पायी चालत जाणाऱ्यांना रस्ता करून दिला होता. तर दुसर्या बाजूला, पंचतरणी वरून येणाऱ्या भाविकांच्या घोड्याच्या रांगा दिसत होते. आता अगदी काही वेळातच म्हणजे तासाभरात आम्ही अमरनाथ येथे पोहोचणार होतो.
काही वेळातच.. दुरून मला ती गुफा दिसून आली. आणि माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. यावर्षी त्याभागात बराच बर्फ साठला होता. आमचे घोडे बर्फावरून चालले होते. त्या बर्फाच्या ढिगाऱ्या वरच व्यापारी लोकांनी आपली दुकानं थाटली होती. आमचे घोडे इथेच थांबणार होते, आणि इथून पुढे एक दीड किलोमीटर अंतर चालत जावं लागणार होतं. आणि त्यापुढे नव्याने बनवण्यात आलेल्या दोन चारशे पायऱ्या चढून पवित्र गुफेपर्यंत जावं लागणार होतं. माझी सौ थोडीफार चालली असेल, आणि तिचा दम फुलून आला. मग काय.. सातशे रुपये देऊन तिच्यासाठी एक डोली करावी लागली. अगदी काही वेळातच आम्ही बाबा भोलेनाथाच्या पवित्र गुफेपाशी जाऊन पोहोचलो. आज जास्तीची गर्दी नसल्याने दर्शन अगदी मस्त होणार होतं. सुरवातीला वाटेत असणाऱ्या पितळी नंदीच्या पाया पडून आम्ही पुढे गेलो. यावेळी गुफेच्या बाहेर, मला चार कबुतरे दिसून आली. इतक्या गारठ्यात तिथे दुसरा कोणताही पक्षी दिसून येत नाही. आणि शेवटी तो क्षण आला.. मी बाबा अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाच्या समोर उभा होतो. यावेळी शिवलिंग अगदी पाच फुटाच्या आसपास होतं. मी मनोभावे त्याठिकाणी नतमस्तक झालो. सर्व आप्तेष्ट आणि फेसबुक मित्रांचा सुद्धा नमस्कार कळवला. फार प्रसन्न वाटलं, याठिकाणी दुसऱ्यांदा आल्याने, मी स्वतःला फार भाग्यवान समजत होतो.
दर्शन करून खाली आलो, आणि माझा शूज वरील बाजूस असणाऱ्या शु रेक मध्ये राहिल्याचं समजलं. तसा मी पुन्हा वर गेलो.. आणि, पुन्हा एकदा अमर पिंडीचं दर्शन घेऊन आलो. असं यावेळी मला दोनदा दर्शन घडलं.
दुपारचा एक वाजला होता. दर्शन अगदी मस्त झालं होतं. त्यामुळे सगळा थकवा नाहीसा झाला होता. सौ डोलीत बसून केंव्हाच पुढे निघून गेली होती. पुन्हा मागे वळून त्या पवित्र भूमीला मी पुन्हा एकदा वंदन केलं. आणि अमरनाथ भूमीला अलविदा केला.
भाग चार :- https://youtu.be/pRuSUIplLlY
क्रमशः
Y

No comments:

Post a Comment