Monday, 10 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- १५ )
=====================
सकाळ झाली, सगळीकडे मस्त उन पडलं होतं. आणि कॉटेजमध्ये सुद्धा उबदार वातावरण होतं. एकेकाची अंघोळ उरकतेय, म्हणून मी बाहेर येऊन थांबलो. तर आमच्या ग्रुपमध्ये असणारा एक व्यक्ती माझ्यापाशी आला, आणि म्हणाला.
रात्रभर झोप नाही राव मला, श्वसनाचा खूप त्रास झाला..!
इथे सुद्धा श्वास घेण्यासाठी भरपूर त्रास होतो. पण ते जास्ती वयं झालेल्या व्यक्तींनाच. तरुण आणि धडधाकट असणाऱ्या व्यक्तींनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तसा आमच्यापैकी फक्त या एकाच व्यक्तीला त्रास झाला होता. बाकी सगळे प्रवासी मस्त मजेत होते. अगदी आमच्या नर्स मॅडम सुद्धा.
आज सकाळचा नाश्ता करून आम्हाला पुन्हा लेहला निघायचं होतं.
हॉटेलमध्ये.. पोहे, पराठे, ऑम्लेट पाव, उपमा अशी पदार्थांची रेलचेल होती. ज्यांना जे आवडेल ते खाऊन घेतलं. पुन्हा एकदा सगळी आवराआवर झाली, सगळं सामान गाडीत ठेवण्यात आलं. आणि आमच्या गाड्या पुन्हा एकदा कुलूच्या दिशेने निघाल्या.
पुन्हा एकदा त्या भागातील आसमंत सगळे आपापल्या डोळ्यात साठवत होते. कोणी मोबाईलमध्ये ते क्षण टिपत होते. तर कोणी फक्त मंत्रमुग्ध होऊन अगदी शून्यात पाहत सगळं दृश्य नजरेत आणि मनात साठवत होते. ते अवाढव्य पर्वत, त्या हिमाच्या टोप्या, पेंगोंग लेकची ती निळाई, नजर हटत नव्हती आणि मन सुद्धा भरत नव्हतं. सर्वांची अगदी अशी गत झाली होती. शेवटी आमच्या गाड्या पुन्हा परतीच्या मार्गाला लागल्या.
आज सकाळी.. अगदी नऊ वाजता आमचा प्रवास सुरु झाला असल्याने. आम्ही लेहला सुद्धा लवकर पोहोचणार होतो. लेहमधील आजचा मुक्काम, या स्वर्गीय भागातील आमचा शेवटचा ( या ट्रीप मधील  ) मुक्काम होता.
उद्या सकाळी आम्हाला पुढील प्रवासाला, म्हणजे..कारगिल मुक्कामी निघायचं होतं.
पुन्हा एकदा आमची गाडी च्यांगला पास येथे आली. भरपेट नाश्ता झाल्याने, जेवण करण्याचा विषय येत नव्हता. पुन्हा एकदा तिथे असणाऱ्या पांढर्याशुभ्र बर्फात फोटोग्राफी करण्यात आली. आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो. वाटेत जाताना.. लेह साठी निघालेल्या दीड दोनशे मिलिटरी गाड्यांचा जत्था आमच्या समोर आडवा आला. यांना ओव्हरटेक करून आम्हाला पुढे जाता येणार नव्हतं. कारण यांच्यामध्ये, कोणी शिरकाव करू शकत नाही. आणि करू सुद्धा नये. पण एका ठिकाणी, त्यांची कान्वाय काही वेळासाठी थांबली. आणि या संधीचा लाभ उचलत आमच्या पहाडी ड्रायव्हर लोकांनी आमच्या गाड्या सुसाट ताणल्या. समोरच्या बाजूने सुद्धा येणाऱ्या गाड्या नव्हत्या, आणि अगदी काही मिनिटात आम्ही त्या सगळ्या गाड्या पास करून पुढे उताराला लागलो.
या गाड्या पास केल्यावर अगदी युद्ध जिंकल्याचा आम्हाला आनंद झाला होता. नाहीतर फार रखडत प्रवास करावा लागला असता.
परतीच्या प्रवासात.. लेहमध्ये असणार्या हेमिस मॉनेस्ट्री ( म्युझियम ) येथे आम्ही भेट दिली. खूपच सुंदर असं हे धार्मिक ठिकाण होतं. हे ठिकाण लेह पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. १६७२ साली या बौद्ध मठाची स्थापना लदाखचे राजा सेनगे नामग्याल यांच्या हस्ते झाली. जून महिन्यात येथे, पद्मसंभव नामक उत्सवाला सुरवात होत असते.
या मठामध्ये, गौतम बुद्धांची फार सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे. आणि त्याच बरोबर, इथे पुरातनकालीन वस्तूचं एक संग्रहालय सुद्धा आहे. संग्रहालयात खूप पुरातन वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. या मठाच्या मागील बाजूस, हेमिस नेशनल पार्क सुद्धा आहे, याठिकाणी आपल्याला स्नो लेपर्ड पाहायला मिळतात. पण याठिकाणी फारच हौशी फोटोग्राफर वगळता अन्य कोणीही जात नाही.
हे ठिकाण पाहून झाल्यावर, थ्री इडियट सिनेमाचं चित्रीकरण ज्या शाळेत झालं होतं. तिथे सुद्धा आम्ही भेट देऊन आलो. तिथे.. सायलेन्सरने सुसू केलेली भिंत वगळता, दुसरं काहीही दाखवलं जात नाही. सोनम वांगचुंगची प्रयोगशाळा वगैरे बिलकुल दाखवली जात नाही.
संध्याकाळी चारच्या दरम्यान आम्ही लेहमध्ये पोहोचलो. सगळीकडे दलाई लामा यांच्या वाढदिवसाची धूम चालु होती. आज सगळी दुकानं बंद होती. चुकून एकाठिकाणी.. एक दुकान आम्हाला उघडं दिसलं, संध्याकळी चहा सोबत थोडा नाश्ता करूयात म्हणून, तिथे आम्ही ब्रेड खरेदी केले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आमचा चहा नाश्ता झाला.
सगळं समान रूममध्ये ठेवलं गेलं. आणि जमेल तसे सगळेजन लेहच्या बाजारा मध्ये खरेदी करण्यासाठी निघून गेले.
पण मी मात्र...
लेह मध्ये असणाऱ्या पुरातन राजवाड्याला भेट देण्यासाठी निघून गेलो. अगदी सिटीमध्ये असणारा हा लेह पॅलेस लेह गावचं अगदी खरंखुरं वैभव आहे.
सतराव्या शतकात, राजा सेंगे नामग्याल याने या पॅलेसची निर्मिती केली होती. हा पॅलेस एकूण नऊ मजली आहे. ज्यामध्ये अगदी वरील बाजूस शाही परिवार राहत असे, आणि खाली बाजूला कोठार करून ठेवले होते. हा पॅलेस अजूनही सुस्थितीत आहे. पण आज त्या ठिकाणी राजांचे वंशज राहत नाहीत. त्यामुळे हे ठिकाण राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केली गेली आहे. आणि एक पर्यटनस्थळ म्हणून आज तिचा वापर होत आहे.
( हेमिस बौद्ध मठ, आणि.. लेह पॅलेसची चित्रफित पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. )
हेमिस म्युझियम.. https://youtu.be/fAXmVQ_FJ8g
संपूर्ण लेह सिटी पाहण्यासाठी, हा लेह पॅलेस, नक्की पहा..
https://youtu.be/HDNo1H2Sy44
क्रमशः

No comments:

Post a Comment