Wednesday, 19 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २३ )
=====================
रात्रीचे आठ वाजले होते.. खरेद्या आटोपल्या आता पटकन जेऊन येउयात असा विचार केला. तितक्यात काहीतरी सूचना मला ऐकू आली. गडबडीमुळे नीट ऐकू येत नव्हतं. म्हणून मी अगदी जवळ जाऊन ऐकलं. बापरे.. एक मोठी समस्या समोर उभी ठाकली होती. तिथे लाउडस्पीकर वर एक सूचना देत होते.
आजच्याला बालताल मध्ये असणाऱ्या सर्व यात्रेकरूंनी उद्या सकाळी सहा वाजायच्या आत येथून रवाना झालं पाहिजे. नाहीतर तिथून पुढे कोणालाही बाहेर सोडलं जाणार नाही. सकाळी सहा वाजता निघायचं म्हणजे, पुन्हा पहाटे चार वाजता उठणं आलं. कारण दोन तीन दिवसांचा फार मोठा फ्लो तिथे जमा झाला होता. जो तो निघायच्या गडबडीत असणार, त्यामुळे ट्राफिक जाम होणार. आणि वेळेत बाहेर पडलो नाही, तर.. पुढील नियोजन ढासळत जाणार. हा सगळा विचार मनात एकाचवेळी येऊन गेला. तसं आम्ही सर्वांना या विषयाची सूचना दिली. आणि सगळे जन पटापट लंगरमध्ये जाऊन जेवणं करून आली. तंबूमध्ये आल्यावर, सगळं सामान आपापल्या बॅगमध्ये व्यवस्थितपणे भरून घेतलं. आणि आल्या सरशी सगळी लोकं निद्रा देवीच्या स्वाधीन झाले.
सकाळ झाली.. आज उठायला नेमका उशीर झाला, पहाटेचे पाच वाजले होते. आता अंघोळ करायच्या भानगडीत कोणी पडणार नव्हतं. कारण..सहाच्या पुढे वेळ गेली, तर आजचा मुक्काम इथेच करावा लागणार होता. मुखमार्जन करून आम्ही आमच्या बॅग्स घेऊन तडक पार्किगच्या दिशेने निघालो. सगळीकडे एकच धावपळ सुरू होती. जो तो इथून बाहेर पडायच्या घाईत होता. सगळा रस्ता जाम झाला होता. आमच्या गाड्या गर्दीमध्ये अडकल्या होत्या. कालच्याला राकेश नामक ड्रायव्हरला आम्ही या विषयाची सूचना दिली होती. त्यावर तो म्हणाला होता, तुम्ही काही काळजी करू नका आज रात्रीच आम्ही सगळं सामान गाड्यावर लादून ठेवतो. तुमच्याकडे असणारं सामान तुम्ही गाडीत घेऊन बसा. पण इथे येऊन पाहतो तर काहीच तयारी झाली नव्हती, ड्रायव्हर लोकं आत्ताशी झोपेतून उठली होती. गाडीवर चढून ते सगळं सामान आता बांधावं लागणार होतं. आणि त्या घाईमध्ये आमचा ड्रायव्हर आमच्या लोकांवर खेकसायला लागला, आता बाकी माझा संयम सुटला होता. मग बाकी मी त्याला कचाकच शिव्या द्यायला सुरवात केल्या. तसा तो थोडा नरमला. मग त्या राकेश नामक ड्रायव्हरला सुद्धा झापला, तसा तो थोडा सारवासारवी करायला लागला. त्याला पण दोनचार शिव्या घातल्या. माझा मेहुणा मला दाबायला लागला. म्हणाला अजून बराच प्रवास बाकी आहे. सकाळी सकाळी कटकट नको, त्यामुळे मी थोडं आवरतं घेतलं
शेवटी.. काहीवेळात सगळं सामान गाडीवर लादून झालं. गर्दीमधून वाट काढत आमच्या गाड्या बाहेर निघाल्या, सकाळचे सव्वासहा वाजले होते. मिलिटरीच्या लोकांनी तासभर सवलत वाढवली होती. सात वाजता सगळा बाजार बंद करून टाकणार होते. शेवटी अगदी पाऊणे सात वाजता आम्ही तेथून बाहेर पडलो. पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी शंभोच्या नावाचा जयकारा केला. आणि आमच्या गाड्या श्रीनगरच्या दिशेने रवाना झाल्या.
बालताल ते श्रीनगर हे फक्त सत्तर किलोमीटरचं अंतर होतं. त्यामुळे हे अंतर अगदी तीन तासात संपणार होतं. त्यानंतर आजच्याला तेथील प्रमुख ठिकाणं पाहून आजचा मुक्काम श्रीनगर येथे करून उद्याच्याला आम्ही जम्मूला निघणार होतो. बालताल पासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर चाहापानासाठी आम्ही थांबलो. तिथे आमच्या ड्रायव्हरला सकाळी मी त्याच्यावर का ओरडलो ते सांगितलं. त्यावर तो म्हणाला, माझ्या सहकाऱ्याने मला काल हे काहीच सांगितलं नव्हतं. मग थोड्यावेळाने त्या दोघात हमरीतुमरी झाली. शेवटी तो विषय मिटवता घेतला. आणि आम्ही चहापान केलं. तो राकेश नामक ड्रायव्हर आमच्या गाडीच्या मागील बाजूस जाऊन काहीतरी पाहू लागला. तसा आमचा ड्रायव्हर त्याच्यावर खेकसला आणि म्हणाला.. तू माझ्या गाडीची चेकिंग करू नकोस. तुझ्या गाडीचं बघ. पण राकेश पाहत होता तो विषय फार गंभीर होता. आमच्या गाडीच्या मागील पाट्याचा नट कट होऊन बाहेर आला होता. हे वेळीच पाहिलं नसतं, तर पुढे काहीही घडू शकलं असतं. आता पाट्याचं दुकान पाहून आम्हाला पहिलं हे काम करून घ्यावं लागणार होतं. तो नट थोडा आतील बाजूस ढकलून कामचलाऊ पद्धतीने आम्ही हळूहळू प्रवासाला सुरवात केली. पुढे गेल्यावर मिलिटरीच्या हद्दीमध्ये एक लंगर होता. तिथे जेवायला अगदी पंच पक्वान्न होती. तिथे जाऊन भरपूर पोटोबा केला. आणि पुढील मार्गाला लागलो.
क्रमशः


No comments:

Post a Comment