Wednesday, 19 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- २२ )
=====================
परतीचा प्रवास सुद्धा म्हणावा इतका सोपा नव्हता.. आता सगळा उतार असल्याने, घोड्यावर बसताना पाठ आणि कंबर अवघडून येत होती. कारण.. उतार आल्यावर मागे रेलून बसावं लागायचं, त्यामुळे फार त्रास व्हायचा. शिवाय उताराला घोडे सुद्धा फार घसरतात मनात ती भीती सुद्धा होती. परतीच्या प्रवासात.. एका ठिकाणी एक घोडं फार थकल्याने आजारी पडून यात्रेकरूला घेऊन खाली बसलं, ते पुन्हा काही उठलं नाही. त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न झाला.
पण त्याने ताबडतोब डोळे पांढरे केले, आणि.. सगळं अंग ताठ केलं. अशारितीने एक घोडं अगदी माझ्या समोर मेलं. फार वाईट वाटत होतं, त्या लोकांप्रमाणे हे घोडे सुद्धा या भागात जन्माला येऊन फार मोठा पश्चाताप सहन करत असतील. वर्षातून चारच महिने काम असतं. पण या घोड्यांना सुद्धा हे काम अगदी गधा मेहेनत वाटत असेल. लोकांची गोष्ट निराळी आहे. मुक्या जनावराला काय बोलता येतंय होय. तरी सुद्धा, काही लोकं आपल्या घोड्याची खूपच काळजी घेत होते. परतीच्या प्रवासात काहींना सवारी मिळाली नाही. म्हणून ते स्वतः घोड्यावर बसून येत नव्हते. त्या घोड्यासोबत ते सुद्धा चालत निघाले होते.
मजल दरमजल करत शेवटी एकदाचे आम्ही बालताल येथे येऊन पोहोचलो. संध्याकाळचे पाच वाजले होते. आणी आभाळात अचानक ढग दाटून आले. ढग दाटून काय आले, आणि पावसाला सुरवात सुद्धा झाली. हे एकेक भला मोठा गोटी सारखा थेंब. एकतर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून बरच उंच असल्याने तो थेंब खूपच जोरात अंगावर धडकत होता. आणि त्याचा मार सुद्धा खूप लागत होता. आम्ही प्रत्येकाने घोडेवाल्याचा हिसाब चुकता केला. त्यांना बक्षिशी सुद्धा देऊ केली. एकवार मी घोड्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, ईश्पाकच्या हातात हात दिला, आणि पुढे चालता झालो. पाऊस आला तसा आम्हाला भिजवून परत निघून गेला होता. आम्ही घोड्यावरून प्रवास केला होता, तरी सुद्धा आम्ही फार दमलो होतो. मग चालत गेलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल.? तरी नशीब, आम्ही अमरनाथ येथे असताना पाऊस आला नाही. पण वरील भागात आता बराच पाऊस दिसून येत होता. मागे राहिलेल्या यात्रेकरूंना परतीच्या प्रवासात तो नक्कीच झोडपून काढणार होता.
सगळे जन आपापल्या तंबूकडे निघाले होते. सकाळपासून आमच्या पोटात जास्ती काही भर नव्हती. मग वाटेत असणाऱ्या लंगरमध्ये आम्ही थोडी पोटपूजा केली. आजच्याला लंगरमध्ये.. आलू रगडा, रगडा पेटीस, आलू चाट, मेगी, उत्तप्पा, मसाला डोसा अशा चटकेबाज आणि चवदार नाश्त्याची सोय केली होती. सर्वांनी गरमागरम असा पोटभर नाश्ता केला. आणि तंबूत जाऊन सगळे निवांत पसरले. अगदी दहा मिनिटात जवळपास सगळेच घोरू लागले होते. कारण काल कोणाचीच झोप झाली नव्हती. आम्ही दोघे तिघे वगळता बाकी सगळे झोपी गेले होते. मला तर बिलकुल झोप येणार नव्हती, कारण.. आत्ता झोपल्यावर मला रात्री झोप येणार नव्हती. रात्री जेवण करून, सकाळी दहा वाजेपर्यंत मस्त ताणून देऊयात. अशा विचारात मी होतो. माझ्यासोबत आमचा एक मित्र सुद्धा झोपला नव्हता. त्याला मशेरी लावायची सवय ( व्यसन ) आहे. तो मशेरी लावायला बसला, कि अगदी दोन तीन तास मशेरी लावत असतो.
तेवढ्यात तिथे.. कपडे, स्वेटर आणि शाली विकणारे काही व्यापारी आले. काल त्यांना आमच्या महिला म्हणाल्या होत्या. कल शामको आओ, कल लेगे..!
हे वाक्य ध्यानात ठेवत, ते महिला मंडळींच्या येण्याची वाट पाहत होते. पण सगळ्या महिला झोपल्या होत्या, त्या काही लवकर उठणार नव्हत्या. इकडे माझ्या मित्राची मशेरी लावणं चालू होतं. तब्बल दोन तास झाले तरी याचं मशेरीकाम चालूच होतं. शेवटी तो शाल विक्रेता सुद्धा त्याला म्हणाला. आज पहेली बार देखा जनाब.. इतना देर भी कोही मंजन करता होगा..?
आमचा तंबू असणाऱ्या ठिकाणी, उद्याच्या दर्शनासाठी आज एक नवीन ग्रुप आला होता. ती मंडळी दक्षिण भारतातून अमरनाथ यात्रेला आली होती. त्यांना हिंदी बोलता येत नव्हती. त्यातील एक महिला माझ्याशी कानडी भाषेत काहीतरी बोलू लागली. मी तिला थांबा म्हणून हाताने इशारा केला, आणि आमच्या सोबत असणाऱ्या एका साऊथ इंडियन व्यक्तीला बोलावून घेऊन आलो. त्या दोघांचा आपसात काही वार्तालाप चालू होता. ते पाहून त्या तंबू वाल्याच्या मनात शंका आली. कि आमचा व्यक्ती त्यांना सगळं सगळं काही समजावून सांगत आहे. कि इथे कशी फसवणूक वगैरे होते. किंवा घोड्याचे दर वगैरे किती आहेत, त्याची माहिती देत असावा. त्यामुळे त्यांनी मला बाजूला घेऊन अगदी दमात घेऊन सांगितलं. त्या व्यक्तीला सांगा त्या लोकांना काही माहिती वगैरे देऊ नका. नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल. शेवटी मी त्या व्यक्तीला याबाबत विचारणा केली. तर तो म्हणाला.. आमच्या फक्त नॉर्मल गप्पा चालू आहेत. तसला काहीही विषय नाही. त्यावेळी त्यांना जरा हायसं वाटलं, आणि म्हणाले.. इतना एकही सीजन होता है हमारा.. फिर सालभर कुछ नही मिलता. इसलिये हमारे आडे कोही आया.. तो हम उसे छोडते नही. अशी दमदाटी पाहून मी सुद्धा दचकून गेलो होतो. खरं सांगतो.. हि यात्रा दोन तीन वर्ष बंद केली पाहिजे. उपाशी मारलं पाहिजे त्या हरामखोर लोकांना. तेंव्हा त्यांची अक्कल ठिकाणावर येईल.
रात्री आठ वाजता.. अगदी बळे बळेच सगळे झोपेतून उठले. तर बाहेर हे व्यापारी बसले होते. महिला थोड्या फ्रेश झाल्या, आणि त्यांनी हवी ती खरेदी केली. अगदी घासाघीस करून खरेदी चालू होती. माल तसा काही स्वस्त नव्हता. पण इतका वेळ थांबले आहेत, म्हणून त्यांना कोणी नाराज केलं नाही. तरी नाही म्हणता, वीसेक हजार रुपयांची विक्री झाली होती. बाकी त्या व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेला मी मनोमन सलाम केला. तीन तास कसलीही कुरबुर न करता ते त्यांची वाट पाहत बसले होते. तीन तासानंतर माझ्या मित्राचं मशेरीकाम संपल्यावर, माझ्या सोबतच त्या व्यापाऱ्याने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला..!
क्रमशः


No comments:

Post a Comment