Thursday, 6 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ११ )
=====================
काहीवेळात ट्राफिक जाम मोकळं झालं, आणि मुंगी पावलाच्या गतीने एक-एक गाडी घाटातून पुढे मार्गक्रमण करू लागली. वेडीवाकडी वळणं घेत, तासाभरात आम्ही खारदुंगला टॉप येथे जाऊन पोहोचलो. मी उभ्या आयुष्यात कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. कि मी इथवर येऊन पोहोचेल म्हणून. कारण.. या रस्त्यावर घडणारे भयंकर अपघात, आणि त्याच्या क्लिप्स यापूर्वी मी पाहिल्या होत्या. त्यामुळे या भागात कधीच जायचं नाही. असं मी माझी मनाशी ठरवून टाकलं होतं. पण नशिबात असणाऱ्या गोष्टी कधीच चुकत नाहीत. याची मला पुन्हा एकदा पावती मिळाली.
खारदुंगला टॉप येथे सुद्धा हलका हलका स्नो फॉल चालूच होता. चहुबाजूंनी सगळा बर्फ साठला होता. जणू काही सगळीकडे पांढर्याशुभ्र कापसाचे उंच सखल गालिचे अंथरले असावेत. आबाल वृद्धांची एकच गर्दी झाली होती. प्रत्येक जन हा स्वर्गीय अनुभव आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होतो. नजरेत साठवून घेण्याचा प्रयत्न करत होता. हवेमध्ये अजूनही गारवा होतो, वरून स्नो फॉल चालूच होता. अगदी स्वर्गात असल्या सारखं वाटत होतं. स्वर्ग तरी दुसरा काय असणार आहे हो.! जिकडे बघावं तिकडे, फक्त फोटो आणि शुटींग चालू होती.
त्यात तिथे बाईक राईडर्स मुलांची फोटो काढण्यासाठी भलतीच गर्दी झाली होती. त्या गर्दीत मी सुद्धा सामील झालो. माझ्या जुन्या मोबाईल मध्ये, दोनचार फोटो, आणि एक छोटी चित्रफित काढून घेतली. सोनम ड्रायव्हरने आम्हाला सुरवातीलाच कल्पना दिली होती. कि या भागात, पंधरा मिनिटाच्या वरती थांबायचं नाही. इथे फारच कमी ऑक्सिजन असतो. त्यामुळे जास्तीचा त्रास होऊ शकतो. आम्ही सुद्धा त्याची आज्ञा मानली, आणि पटकन बसमध्ये येऊन बसलो.
चिखल मिश्रित बर्फ तुडवत आम्ही पुढे निघालो होतो. आता मोठा उतार उतरत आमची बस नुब्रा व्हॅलीच्या दिशेने निघाली होती. घाट उतरताच वातवरण अगदी स्वच्छ झालं. मस्त उन पडलं होतं. नुब्रा व्हॅली येथे जाताना फारच अजब आणि गजब असे पर्वत मला पाहायला मिळाले. शब्दात वर्णन करता येणार नाही, इतके विभिन्न आकाराचे पर्वत मला तिथे पाहायला मिळाले. ते पर्वत पाहून असं वाटायचं.. कि आपण इजिप्त मध्ये आलोय कि काय..? फारच चित्र विचित्र आकाराचे आणि तितकेच सुंदर दिसणारे पर्वत पाहत आम्ही पुढे निघालो. या भागात.. मला खूपच रंगारंग दगड गोटे सुद्धा मला आढळून आले. पिवळा, निळा, जांभळा, राखाडी आणि गुलाबी रंगाचे मोठमोठे दगड या भागात आढळून आले..
नुब्रा व्हॅली म्हणजे, बर्फाळ प्रदेशातील वाळ्वंट आहे.. त्या रस्त्याने जात असताना, चहूकडे वालुकामय पर्वत दिसत होते. आम्ही जसजसं पुढे निघालो, तशी रस्त्याच्या कडेला आम्हाला भरपूर वाळू दिसून आली. मनात प्रश्न पडला, या भागात वाळवंट कसं काय निर्माण झालं असेल.? काहीच कळायला मार्ग नव्हता. देवाची करणी, आणि नारळात पाणी. कारण या भागात जाण्यापूर्वी मी इथला सखोल अभ्यास केला नव्हता.
सायंकाळचे पाच वाजत आले होते. या नुब्रा व्हॅली पासून एक रस्ता सियाचिनला गेला होता. येथून सियाचीन फक्त सत्तर ऐंशी किलोमीटर अंतरावर होतं. पण त्या भागात जाण्यासाठी परवानगी होती कि नाही ते मला माहिती नाही. कारण त्या रस्त्यावर मिलिटरीची एक मोठी चेकपोस्ट मला दिसून आली. आम्हाला तिकडे काही जायचं नव्हतं. म्हणून आम्ही सरळ नुब्रा व्हॅलीच्या दिशेने गेलो. बऱ्यापैकी मोठं असं हे वाळवंट होतं. आम्ही ज्या परिसरात उभे होतो. तिथे पावसाळ्यात बहुतेक नदी वाहत असावी, कारण त्या भागात मला वाटोळ्या आकाराचे दगड मोठ्या प्रमाणात आढळून आले. खूपच मस्त-मस्त दगड होते. मी स्वतः जवळपास सातेक किलो दगड तेथून घेऊन आलो. तिथे वाळूतल्या मोटर राईड्स सुद्धा होत्या. त्या मोकळ्या वातावरणात या ईश्वरी कलेला पाहत, नकळत माझे हात जोडले गेले. आमची दुसरी बस अजून आली नव्हती, म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत तिथेच थांबलो.
काहीवेळात दुसरी बस आली.. आणि आम्हाला समजलं, त्या बसमध्ये असणाऱ्या नर्स मॅडमना भयानक त्रास होत आहे. त्यांची तब्बेत फारच खालावली होती. तिथे चौकशी केल्यावर पुढे दहाएक किलोमीटर अंतरावर डीस्कीट नावाचं एक गाव होतं. त्या गावात एक मोठा सरकारी दवाखाना आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. आम्ही ताबडतोब त्या गावात जाऊन पोहोचलो. आमच्या मॅडमची तब्बेत फारच खालावली होती. त्यांना त्या सरकारी इस्पितळात ऍडमिट करून घेतलं. त्यांच्या तपासण्या करून, त्यांना ऑक्सिजन आणि सोबत सलाईन सुद्धा लावण्यात आली. वेळात वेळ आहे म्हणून, भीतीपोटी इतर सर्वांनी सुद्धा आपापल्या तपासण्या करून घेतल्या. इतक्या दुर्गम भागात, हे खूपच सुंदर आणि स्वच्छ असं एकमेव इस्पितळ होतं.
तिथे चौकशी केली असता समजलं, या भागात इतका बर्फ पडत असतो, कि या भागातील अस्थम्याचे रोगी, त्याकाळात इथे राहत नाहीत. जम्मू सारख्या सुरक्षित ठिकाणी जाऊन राहतात. नाहीतर त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. पण या पहाडी भागातील व्यक्तींना हा त्रास फारच अभावाने होतो. नाहीतर, सगळ्या बाया बापे अगदी फिट आणि गुलाबी असतात.
नुब्रा व्हॅली येथील कॅमल सफारी आणि वाळवंट पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा..
क्रमशः


No comments:

Post a Comment