Saturday, 28 January 2017

तीसेक वर्षांपूर्वी..
माझ्यासमोर एका तरुण गंजाडी मुलाला, काही मुलं मिळून चोप देत होते. त्यावेळी स्वतःला सावरत त्याने त्या मुलांना उद्देशून एक डायलॉग मारला.
" आत्ता जातो, मटण खातो. आणि मग तुम्हाला बघतो. "
त्यावेळी, मला त्या वाक्याची फार गंमत वाटली होती. थोडक्यात तूप खाल्लं कि लगेच रूप येत नाही, असं काहीसं ते समीकरण होतं.
खरं तर, मी त्या मुलाला चांगला ओळखतो. पण गंमत अशी आहे. कि तो मला बिलकुल ओळखत नाही. आता त्या मुलाचं एका प्रौढ व्यक्तीत रूपांतर झालं आहे.
हल्ली तो, एका छोट्या टपरी मध्ये जुन्या बॅग्स वगैरे दुरुस्तीची कामं करत असतो.
तर परवा, मी त्याच्याकडे एक जुनी बॅग दुरुस्तीसाठी घेऊन गेलो. त्याच्या हातातील काम बाजूला ठेवत त्याने पहिली माझी बॅग दुरुस्त करून दिली. मी त्याला त्या कामाचे पैसे विचारले.
तर म्हणाला,
" तुमचे तीस रुपये झालेत. पण तुम्ही मला विसच रुपये द्या. "
बहुदा.. जास्ती पैसे सांगून कमी पैसे घ्यायचे हि त्याची स्टाईल असावी.
मी त्याला वीस रुपये दिले, तसा तो ताडकन जागेवर उठून उभा राहिला.
मी सहजच त्याला विचारलं..
का हो, काय झालं.? तुम्ही उभे का राहिलात..?
तर म्हणाला..
काही नाही.. जरा गारठा जाणवतोय, वीस रुपयाची " लाऊन " येतो.
तो गंजाडी तर होताच, पण आता बेवडा सुद्धा झालाय.
पण या लोकांचं मला नेहेमीच एक कौतुक वाटत असतं.
हि लोकं, त्यांच्या जीवनावर कधीच नाराज नसतात. आहे त्यात समाधान मानणारी असतात. कायम खुश आणि हसतमुख असतात. त्यामुळे लाख व्यसनं असून सुद्धा, यांना रोगराई अशी नसतेच.
जीवनाची गणितं फार मोठी असतात. सुख आहे, तर समाधान नसतं. पण काही ठिकाणी काहीच नसतं. पण समाधान मात्र भरभरून वाहत असतं. आहे त्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. शेवटी सगळं काही इथेच सोडून जायचं असतं. हे गणित कदापी विसरता कामा नये.
बहुतेक यालाच म्हणतात, जिना इसिका नाम है..!

No comments:

Post a Comment