Saturday, 28 January 2017

काल पुन्हा एकदा, एटीएम च्या लाईनीत पैसे काढण्यासाठी मी उभा होतो.
लाईनीत उभा राहिल्यावर सगळ्यात पहिलं मी काय काम केलं असेल..? तर, त्या लाईनीत एकूण किती लोकं उभे आहेत, ते मोजून घेतलं.
तर, त्या लाईनीत माझ्यापुढे बरोबर तीस लोकं उभी होती.
एक-एक, करता-करता नंबर पुढे सरकत होते. दोन हजारची एकच गुलाबी नोट हातात घेऊन प्रत्येक व्यक्ती एटीएमच्या बाहेर पडत होता. तरीसुद्धा माझ्या मनात भीती होतीच,
नोटा संपतील कि काय..?
लाईन पुढे सरकत होती, आता एटीएम च्या आतमध्ये दोन लोकं आणि माझ्या पुढे दोन मुली अशी चारच जण शिल्लक राहिले होते.
तर, त्या दोन व्यक्तींपैकी एटीएम सेंटरमध्ये एक वयस्क व्यक्ती पैसे काढत होती. पण मशीन मधून, पैसे काही बाहेर येत नव्हते. नाही म्हणता, मी थोडा धास्तावलो होतो. कारण, पैसे नाही मिळाले, तर माझी अर्ध्या तासाची मेहेनत वाया जाणार होती.
तर, समोर घडत असलेला प्रकार पाहून. स्वतःच्या मनाची समजूत घालत. माझ्या समोर लाईनीत उभ्या असणार्या त्या दोन मुली आपसात चर्चा करत होत्या..
" बहुतेक.. त्या बाबांच्या खात्यात पैसे नसावेत असं वाटतंय.
नाहीतर, इतका वेळ लागला नसता..! "
काही गडबड होत असेल म्हणून, शेवटी तिथे असणाऱ्या दुसऱ्या मुलाने, त्याचं कार्ड मशीन मध्ये घातलं. आणि.. त्यालाही रिस्पॉन्स मिळाला नाही.
शेवटी, आतील दोघे जन मोकळ्या हाताने हासत-हासत बाहेर आले. आणि, एटीएम सेंटरच्या बाहेर होती नव्हती तेवढी सगळी लाईन एका सेकंदात विस्कळीत झाली.
आणि जो तो जिकडे तिकडे झाला.
तेवढ्यात, एटीएम सेंटरच्या बाहेर पैसे घेऊन येणारी जाळीची पिवळी गाडी येऊन उभी राहिली. तसे सगळी लोकं, पुन्हा धावत पळत लाईनीत येऊन उभे राहिले. घाईमुळे थोडीफार क्रमवारी चुकली होती, त्यामुळे काही लोकं एकमेकाला सांगत होते. अहो..मगाशी तुम्ही माझ्या मागे उभे होते बरं का. असं म्हणून, प्रत्येक जन एकमेकाला सांभाळून घेत होता. आणि, पुन्हा एकदा जशी होती तशी लाईन तयार झाली.
तेंव्हा, त्या कॅश व्हॅन गाडीचा ड्रायव्हर आम्हाला म्हणाला,
आहो.. तुम्ही लाईनीत उभे राहू नका, माझ्या गाडीत पैसे नाहीयेत. माझं, ह्या शेजारच्या दुकानात जरा काम आहे. म्हणून मी इथे थांबलोय.
क्षणार्धात झालेल्या धावपळीने, पैसे मिळतील म्हणून सर्वांना आनंद झाला होता. पण त्या ड्रायव्हरचे बोल ऐकून, झालेल्या फजितीवर सगळे जन एकमेकांकडे पाहून छद्मीपणे हसत आपआपल्या मार्गी लागले..!

No comments:

Post a Comment