Saturday, 28 January 2017

पूर्वी.. माझं, एक कटलरी दुकान होतं.
त्या दुकानात, मी प्रत्येक सिझनल आयटम्स विक्रीला ठेवायचो.
जसे कि..
दिवाळीत.. आकाश कंदील, राखी पौर्णिमेला राख्या, रास गरभा असेल तेंव्हा दांडिया, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये..
भोवरा, गोट्या आणि हिवाळ्यात पतंग सुद्धा मी विक्रीला ठेवायचो.
त्यातल्या त्यात, पतंग उडवण्याची मला भारी हौस, पण उभ्या आयुष्यात हा खेळ प्रकार मला काही जमलाच नाही. हजारो रुपयाच्या पतंग आणि मांजा मी माझ्या हाताने विकला असेल. पण.. त्याच हाताने, सफाईदारपणे पतंग काही मला उडवता आली नाही.
तिकडे काहीही असुध्यात, मला पतंग उडवायला येत नव्हती. पण माझ्याकडे असणाऱ्या अस्सल कागदी पतंग, आणि बरेलीचा मांजा खरेदी करण्यासाठी फार दूरदूरहून माझ्या दुकानात हौशी पतंगबाज यायचे. आणि त्यामुळे, आमच्या पंचक्रोशीत माझं चांगलच नाव झालं होतं..
पतंग का सामान लेनेका, तो पंडित भाई के पासीच..!
त्यावेळी, मी एक व्यावसाईक होतो. पण धंद्यात मी कधीही कोणालाही आणि कधीही फसवलं नाही. नकली माल देणं म्हणा, फाटक्या पतंग विकणं म्हणा, किंवा मांजा देताना दोनपाच आट्या चोरनं म्हणा. असली कामं मी कधीही केली नाहीत.
त्यामुळे, माझं दुकान बंद होऊन आता जवळपास वीसेक वर्ष तरी झाली असतील.
पण आजही, काही शौकीन भुले भटके पतंगबाज मित्र माझ्या दुकानाच्या बाजूच्या दुकानात येऊन विचारात असतात.
ये.. बाजूवाला पतंग का दुकान आज बंद है क्या..?
कारण, त्याकाळी पतंग उडवणारी मुलं. हवेच्या झोक्यावर आणि शिक्षणावर हुकुमत गाजवत. जोरदार फर्लांग मारून, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वीदेशी निघून गेलेले होते.
आणि, पुन्हा फिरून त्याच गावात आणि स्वदेशात आल्यावर. त्यांना फक्त एकमेवाद्वितीय आणि प्रसिद्धीस पात्र ठरलेला " पंडित पतंगवालाच " आठवणार ना..!
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, आपला वर्ष भरातील पहिला भारतीय सन, म्हणजे,.
" मकर संक्रात "
देश विदेशात, संक्रातीत फार मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. गुजरात मध्ये तर, पतंग या खेळामध्ये या महिन्यात अक्षरशः करोडो रुपयांची विक्रीची उलाढाल होते.
पण.. माझ्या सर्व पतंग शौकीन मित्रांना माझं एकच सांगणं आहे. तुम्ही पतंग उडवा, आपले सन साजरे करा. पण.. फक्त आणि फक्त आपल्या देशी मांजानेच.
विनाकारण, " चायनिस मांजा " खरेदी करून तुम्ही पतंग उडवताल. आणि हकनाक, पक्ष्यांच्या किंवा माणसांच्या बळीला कारण ठरताल. तो चायनिस मांजा खूप वाईट आहे,
परवाच.. मी एका पक्षी मित्राकडून त्या चायनिस मांज्यामध्ये अडकलेल्या एका पक्षाची सुखरूप सुटका केली आहे. हा माझा अगदी ताजा अनुभव आहे.
तर.. सर्व भारतीयांनी मिळून हा सन अगदी जोरदार पद्धतीने साजरा करा,
पण.. देशी सन साजरे करत असताना.
फक्त स्वदेशी मालालाच प्राधान्य द्या. आणि, आपल्या भारतीय सणाचा आनंद आणखीन द्विगुणित करा..!

No comments:

Post a Comment