Saturday, 28 January 2017

निवडणुकीचा प्रचार, हा एक भलताच आणि अजब अनुभव आहे. हे नुकतंच मला समजलं.
गेल्या पंधरा-वीस दिवसापासून, आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार मित्राबरोबर प्रचारफेरीत मला वेळ मिळेल तसा मी सहभागी होत असतो.
अशा ठिकाणी, प्रत्येक घराशी आणि त्या घरातील किंवा वस्तीमधील लोकांशी आपल्याला संवाद साधायला मिळतो, किंवा तो कटाक्षाने साधायचा असतोच.
परवा रविवार असल्याने, अगदी सकाळीच मी घोरवडेश्वराच्या डोंगरावर जाऊन आलो होतो. आणि त्यानंतर, संपूर्ण दिवसभर आमची प्रचाराची रणधुमाळी चालू होती.
वीसेक वर्षांपूर्वीच्या जुन्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नावाचा प्रकार नसतो. त्यामुळे, एखाद दुसर्या मताकरिता सुद्धा, आम्हाला दोनचार मजले चढून जावं लागत होतं.
सकाळच्या डोंगर चढाईमुळे, आणि दुपारच्या प्रचार फेरीमुळे मी थोडा थकून गेलो होतो. त्यामुळे, संध्याकाळच्या सत्रात, दोनचार बिल्डिंगमध्ये मी प्रचार केला.
पण त्यानंतर, जसे माझे पाय मला शिव्या द्यायला लागले. तसा मी सुद्धा शहाणा झालो. आणि, प्रचारा ठिकाणी त्या ठराविक बिल्डिंगच्या खाली किंवा तेथील रस्त्यावर मी थांबू लागलो.
आमच्या सोबत, पाच पन्नास मित्र असल्याने, आमच्या काहीतरी गप्पागोष्टी चालूच असायच्या.
पूर्वी.. मोबाईलची भाषा खूप फेमस होती, किंवा त्यावर आपल्या चल जीवनात भयंकर विनोद सुद्धा निर्माण झाले होते. आणि, आजही ते विनोद प्रत्येक व्यक्तीचा ध्यानात सुद्धा आहेत.
उदा :- मिस कॉल, चार्जिंग आणि इत्यादी-इत्यादी.
तर परवा.. इंटरनेट आणि मोबाईल संबंधित एक नवीन आणि थोड्या वेगळ्या प्रकारचा विनोद या प्रचारा दरम्यान मला ऐकायला मिळाला. तो मी, तुमच्यासमोर सादर करत आहे.
तर.. त्या दिवशी, माझा मित्र आणि त्याच्यासोबत आमचे काही मित्र प्रचार करण्यासाठी एका बिल्डिंगमध्ये गेले होते. माझे पाय दुखत असल्याने, मी त्या बिल्डींग खालीच खालीच उभा होतो. आणि तितक्यात,
एक दारू पिलेला मध्यमवयीन मुलगा तिथे आला. आणि, आमच्या ग्रुपमधील एका ओळखीच्या मित्राला जाऊन तो भिडला. आता, माझा तो मित्र सुद्धा थोडा मिश्किल स्वभावाचा आहे.
तर.. तो तरुण मित्र त्याला भेटल्या बरोबर म्हणाला..!
भाई.. कोण आलय रे..?
त्यावर माझा मित्र म्हणाला.. अरे आपले फारूक भाऊ तुमच्या भागात प्रचारासाठी आले आहेत.
दारू पिलेल्या माणसाला, लैच चौकशा असतात हो. तर तो पिलेला मुलगा माझ्या मित्राला म्हणाला, आपल्याला फारूक भाऊला भेटायचं आहे..!
माझ्या मित्राला तर ताबडतोब समजलं, कि हा गडी तर जाम पिऊन आला आहे.
त्यामुळे, माझा मित्र त्याला म्हणाला..
किती घेतलीस तू..? छोटा रिचार्ज आहे, कि मोठा रिचार्ज..?
( म्हणजे, तू अख्खी कोर्टर लावली आहेस, कि नाइंटी लावली आहेस..? )
तर.. तो मुलगा म्हणाला,
नाय रे मित्रा, मी छोटा " रिचार्ज मारलाय..!
( म्हणजे, हा गडी नव्वद मिली लावून आला होता. )
बराच वेळ झाला.. शेवटी, प्रचार संपवून फारूक भाऊ सुद्धा त्या बिल्डींग मधून खाली आले.
आणि.. हा हौशी " टाकेश " मित्र त्यांना भेटला.
एकतर, आमचा फारूक भाऊ दारू वगैरे पीत नाही. आणि त्यात, या टाकेश मुलाने त्यांना पाहिल्याबरोबर डायरेक्ट त्यांची गळाभेटच घेतली. आणि, नको तो गंध आमच्या फारूक भाईना त्याने मोफत देऊन टाकला.
शेवटी वैतागून, त्या मुलाशी गळाभेट घेत असताना फारूक भाऊ आमच्या 'त्या' मिश्किल मित्राला म्हणाले..
कशाला राव तुम्ही अशा लोकांना थांबवून ठेवता..? लगेच घरी पाठवून द्यायचं ना..!
त्यावेळी, माझा तो छैलछबीला आणि रंगरंगीला मित्र फारूक भाऊला म्हणाला..
फारूक भाऊ, आता काय करता..
तो सध्या " ऑनलाईन " ( म्हणजे दारू पिऊन आला आहे. ) आहे ना. त्यामुळे त्याला नकार सुद्धा देता येत नाहीये हो..
आता.. ऑनलाईन म्हणल्या बरोबर, त्या पिताड मुलाला सुद्धा लकवर काही समजलं नाही. त्यामुळे, तो सुद्धा अगदी प्रश्नांकित मुद्रेने माझ्या त्या मिश्किल मित्राकडे पाहत होता.
शेवटी एकदाची, ती गळाभेट उरकली.
आणि कसाबसा आम्ही आणि फारूक भाऊंनी त्या हौशी " टाकेश " मतदार मित्रापासून सुटकारा मिळवला.

No comments:

Post a Comment