Saturday, 28 January 2017

परवा.. काही कामाने एका मित्राच्या घरी मी गेलो होतो.
त्याच्या घराच्या बाजूलाच, एक लेडीज ब्युटीपार्लरचं दुकान होतं. फारच प्रशस्थ आणि आकर्षक असं ते दुकान होतं. सहजच माझं लक्ष, त्या दुकानाबाहेर असणाऱ्या चपलांवर गेलं. तर त्या ठिकाणी, जवळपास दहा पंधरा लेडीज चपलांचे जोड पडले होते.
मी मनातच ठोकताळा बांधला, कि या इथे पार्लरचं कामही चांगलं होत असावं, आणि भरपूर व्यवसाय सुद्धा होत असावा. त्यामुळे, इथे महिलांची भरपूर गर्दी सुद्धा आहे.
मित्राच्या घरात, माझं चहापाणी उरकलं. आणि बोलता-बोलता मी सहजच विषय काढला.
आणि, मित्राच्या बायकोला म्हणालो.
वहिनी.. तुमच्या घराच्या बाजूच्या पार्लरमध्ये भरपूर व्यवसाय होत असावा..!
तर त्या म्हणाल्या..
नाही हो, काही खास विषय नाहीये. पण भाऊजी तुम्हाला काय माहित हो..?
तर मी त्यांना म्हणालो..
अहो बघा ना, त्या पार्लरच्या बाहेर महिलांच्या चपलांचा अगदी ढीग लागला आहे.
त्यावरून समजतय कि.
माझ्या या वक्तव्यावर, आमच्या वहिनी अगदी खळखळून हसल्या.
आणि म्हणाल्या,
अहो.. त्या पार्लरची मालकीन खूप हुशार आहे. तिने स्वतःच, तिच्या दुकानाबाहेर दहा बारा चपलांचे जोड ठेवून दिले आहेत. त्यामुळे, नवीन येणाऱ्या महिलेला वाटतं. इथे बऱ्याच महिला येतात, म्हणजे इथे काम सुद्धा मस्त होत असेल. त्यामुळे, बऱ्याच नवीन येणाऱ्या महिला या नकली " दिखाव्याला " भुलतात. आणि, त्यामुळे तिचा व्यवसाय सुद्धा बऱ्यापैकी होतो.
खरच.. पुणेकरांची डोकी कशी चालतील, त्याचा काही नेम नाही..!

No comments:

Post a Comment