Saturday, 28 January 2017

एकाच प्रकारची भाजी..
एकसारखं.. तेल,मीठ, मिरची, मसाला. एकाच प्रकारची कढई, एकाच प्रकारचं उलातनं, एकसारखीच चूल..!
पण ती पाककृती तयार करणाऱ्या, दहा वेगवेगळ्या महिला असतील..
तर, त्या प्रत्येक भाजीची चव निराळी असणारच.
आहे कि नाही गंमत..
कालपासून, मला वेळ मिळेल तसा माझ्या एका नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवार मित्राबरोबर. आमच्या येथील परिसरामध्ये, त्यांच्यासोबत मी फेरफटका मारत आहे.
पूर्वी, आमच्या इथे एक छोटासा स्लम एरिया होता. पिंपरी महापालिकेने, तिथे राहत असणाऱ्या लोकांना. एस. आर. ए. स्कीम अंतर्गत अत्यल्प रकमेत सुंदर अशी दर्जेदार घरं बांधून दिली आहेत. सात मजल्याच्या एका बिल्डिंगमध्ये, प्रत्येक मजल्यावर एकूण सोळा घरं आहेत. अशी एकूण, एकशे बारा घरांची एक इमारत आहे.
झोपड्यातून फ्ल्याट मध्ये आलेल्या लोकांनी, त्यांची घरं सुद्धा अगदी चकाचक ठेवली आहेत. छोट्या घरात मस्तपैकी रंगरंगोटी करून.. त्यात छोटसं फर्निचर, एका कोपऱ्यात टीव्ही, भिंतीला टेकून एखादा दिवान, आणि नजरेत भरावा असा नीटनेटकेपणा. आता, आमची आणि त्या लोकांची फार जुनी ओळख असल्याने, प्रत्येक घरातील महिला आणि पुरुष आमच्या Faruk Inamdar च्या माथ्यावर मनमोकळेपणाने आशीर्वाद देत होते. आम्हाला तर, आम्ही अगदी आमच्या घरीच आल्यासारखं वाटत होतं.
संध्याकाळी सातची वेळ, आमचा.. प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार चालू होता.
संमिश्र समाजाच्या लोकांची वसाहत असल्याने, आम्ही एका विशिष्ट घराचा दरवाजा ठोठावला, आणि तो दरवाजा उघडला..
कि.. प्रत्येक घरातून, वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा सुवास माझ्या नासिकात दौडायचा.
कोणाच्या घरातून.. घमघमीत " मटन " पुलावाचा सुवास दरवळायचा, तर कोणाच्या घरातून मेथीच्या भाजीचा खुमासदार ठसका अनुभवायला मिळायचा. तर, कोणाच्या घरातून लसून मिरचीच्या झणझणीत खरड्याचा झटकेबाज गंध नाकाला सुखद अनुभूती द्यायचा. तर कोणी, वाटण घाटन करून केलेल्या विविध रस्सा भाज्यांचा सुवास मला वेडंपिसं करून सोडायचा.
त्या प्रत्येक घरातील ताया बायांना, माझ्या मित्राला मत द्या म्हणून साकडं घालत असताना. सोबतच, माझ्या मनातल्या मनातच मी म्हणायचो..
" मला, तुमच्या घरी जेवायला कधी बोलावताय..! "
मी एक नंबरचा खवय्या माणूस आहे. निव्वळ खाण्यासाठी, मी जगत आहे किंवा या जगात आहे. असं म्हणलं तर, ती अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या अंतर्मनातील आवाज, त्या महिलांच्या पर्यंत भले पोहोचत नसेल. पण, त्या गरिबा घरच्या घरातून जेवणाचा येणारा सुवास मला पक्कं वेडं करून टाकत होता. फक्त, त्या बेधुंद सुवासाने माझी क्षुधाशांती होत होती.
मी पूर्वीपासून पाहत आलोय, जी लोकं जेमतेम पैसा आडका कमवत असतात. ती लोकं, फक्त आपल्या पोटासाठी झटत असतात. त्या कष्टकरी घरातील महिलांना माहित असतं,
आपला माणूस.. भलं मोठं काबाडकष्ट करून घरी येणार असतो. त्याच्या मुखात, दोन चमचमीत आणि चांगले घास घातले. तरच तो, नव्या दमाने आणि जोमाने कामाला लागेल. हे गणित या महिलांना अगदी तंतोतंत माहित असतं.
एक गोष्ट इथे प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो.
गरीब घरातील मुलींना, दुर्दैवाने शिक्षण मिळत नसेल. पण त्याच मुली, घरातील इतर कामात बाकी महिलांना कधीच मागे सोडून देत असतात. हा, माझा स्वानुभ आहे.
आईच्या पट्टीत, आणि सुगरणीच्या भट्टीत ज्या मुली घरगुती मुदपाकखान्यात तयार झाल्या आहेत. त्यांच्या हातच्या जेवणाला, एक आगळी आणि वेगळीच चव असते. आणि, त्यामुळेच त्यांच्या स्वयपाकघरात सदैव अन्नपूर्णा सुद्धा नांदत असते. माझा मित्र निवडून आला, कि त्या ठराविक घरात मी नक्कीच जेवायला जाणार आहे. सोबत माझी सगळी मित्रमंडळी, आणि खुद्द भावी नगरसेवक फारूक इनामदार सुद्धा असतीलच.

No comments:

Post a Comment